Pages

Monday, August 29, 2011

तारकेश्वरी





फार पूर्वीची म्हणजे 1971 ची गोष्ट. बिहारमधील समस्तीपूरच्या तारकेश्वरी सिन्हा संघटना काँग्रेसमध्ये असतानाचा काळ. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या आणि तारकेश्वरीबाई त्यांच्याविरुध्द जहाल भाषणे देत होत्या. त्यांच्या सभांना गर्दी खूप व्हायची. मोठाल्या सभांमधून प्रचंड हातवारे करीत त्या बोलायच्या. त्यांना उर्दूतले शेकडो शेर पाठ होते. दर चार वाक्यागणिक त्यातला एखादा चपखल शेर ऐकवून त्या श्रोत्यांची दाद मिळवायच्या. 'इर्शाद', 'सुभान अल्ला', 'बहोत खूब' असा रसिक प्रतिसाद श्रोत्यांमधून उठायचा. त्या प्रतिसादाने तारकेश्वरींना आणखी जोम चढायचा आणि आपल्याच आवेशाने त्या घामाघूम व्हायच्या. हातच्या सुगंधी रुमालाने घामाने डवरलेला सुंदर चेहरा टिपत श्रोत्यांसमोर नम्र होत मग त्या आसनस्थ व्हायच्या...
साडेपाच फुटांवर उंची असणारी बांधेसूद आणि आकर्षक देहयष्टी. गोरापान गुलाबी झाकेचा वर्ण. केस कापून बॉब केलेले अन् त्यांना खूप देखणी वळणं असणारे. गोल गोबरा आणि देखणा चेहरा. डोळे जरा लहान पण ते मोठया आणि लांबसडक पापण्यांनी झाकलेले. लहानसं अपरं नाक. मात्र त्या साऱ्यांत नजरेत भरावी अशी बाब होती त्यांच्या चर्येवर आणि देहावर झळाळणारा आत्मविश्वास. त्यांच्या प्रत्येकच हालचालीतून तो व्यक्त व्हायचा. अंगभर खादीची तलम आणि पांढरीफेक बारीक काठांची साडी, दंडावर रुतणारा तसाच ब्लाऊज.
काही व्यक्तींभोवती तेजाची एक अस्पष्टशी आभा असते. ती त्यांना जाणवत असेल, नसेल. अवतीभवतीच्या साऱ्यांना ती जाणवत असते. सोबतची माणसे मग आपोआपच वचकून दूर राहतात. अशा वलयातल्या व्यक्तींचं एक वैशिष्टयं असं की त्यांना सभोवतीच्या माणसांवरची आपली छाप नजरेच्या एका फेकेत समजते. ती माणसं सहजगत्या आकर्षिल्यासारखी त्यांच्याजवळ जातात... त्या व्यक्ती मात्र तशा सहजी मोकळया होत नाहीत. त्यांचा आत्मविश्वास त्यांना सदैव एका विशिष्ट उंचीवर ठेवतो. त्यांना मोकळे व्हायला वा वश व्हायला त्यांच्याएवढयाच उंचीची माणसे लागत असावी.
ऐन तारुण्यात, वयाच्या 16 व्या वर्षी 1942 च्या चले जाव आंदोलनात उडी घेतलेल्या आणि 26 व्या वर्षी पाटणा शहरातून लोकसभेवर निवडून आलेल्या या स्वरुपसुंदर बाईंनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि तडाखेबंद भाषणांनी पहिलीच लोकसभा गाजविली. एवढी की 58 मध्ये तेव्हाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात घेऊन अर्थखात्याचे उपमंत्रीपदच त्यांच्याकडे सोपविले. तारकेश्वरींनी 57, 62 आणि 67 या नंतरच्या निवडणुकीही प्रचंड बहुमताने जिंकल्या. या साऱ्या काळात त्यांची ख्याती एक 'तडाखेबंद संसदपटू', 'बेबी ऑफ द हाऊस' आणि 'ग्लॅमर गर्ल ऑफ इंडियन पॉलिटिक्स' अशी झाली. 'संसदेतील सौंदर्यवती' असा एक किताबही त्यांच्या खात्यात जमा झाला.
याच काळात त्यांचे नाव फिरोझ गांधींशी जुळले. स्वतः फिरोझ गांधी त्यांचा उल्लेख 'आपली मैत्रीण' असा करीत. कॅथेराईन फ्रँकने लिहिलेल्या 'इंदिरा' या चरित्रग्रंथात तारकेश्वरींचा उल्लेख फिरोझ गांधींच्या 'मिस्ट्रेस' असाच केला आहे. त्यासंबंधांचा वा तशा वर्णनाचा तारकेश्वरींनीही इन्कार केल्याचे कधी दिसले नाही. स्वतः फिरोझ गांधींच्या नावाभोवती एक लखलखती आभा होती. इंदिरा गांधींशी त्यांचा विवाह झाला होता. तरीही पंडितजींच्या सरकारवर ते बेदरकारपणे टीकेची झोड उठवत होते. त्यांच्या नावाशी आपले नाव जुळविले जाणे तारकेश्वरींना आवडणारेही असावे. आपले नाव एखाद्या मोठया माणसाशी वा स्त्रीशी असे जुळल्याने काही छोटे जीव सुखावतातही.
फिरोझ गांधींच्या मृत्यूनंतर त्यांचे नाव मोरारजी देसाई या करडया पुढाऱ्याशी जुळून त्यांच्या संबंधांबाबतही प्रवाद उभे झाले. 'मोरारजीभाई अर्थमंत्री असताना त्यांच्या खात्यात मी त्यांची सहकारी होते. शास्त्रीजींच्या नंतर मोरारजीभाईंनी देशाचे पंतप्रधान व्हावे असा मी प्रयत्नही केला. एवढी एकच गोष्ट माझ्याविषयीच्या तशा अपप्रचारासाठी माझ्या टीकाकारांनी वापरून घेतली' हे त्यावरचे तारकेश्वरींचे म्हणणे.
इंदिरा गांधी विरुध्द मोरारजी देसाई या लढतीत त्या सदैव मोरारजीभाईंच्या बाजूने उभ्या राहिल्या. 1958 मध्ये मोरारजीभाई देशाचे अर्थमंत्री तर तारकेश्वरी त्या खात्याच्या उपमंत्री झाल्या. तेव्हापासून त्यांचे संबंध विश्वासाचे आणि जवळिकीचे राहिले. (शास्त्रीजींच्या पश्चात देशाचे पंतप्रधानपद इंदिरा गांधींकडे येईल याचा अंदाज तारकेश्वरींनाही योग्य वेळी आला. सत्तेच्या बाजूने राहण्याची राजकारणी माणसांची प्रवृत्ती त्यांच्यातही होती. त्याकाळात इंदिरा गांधींशी जुळवून घेण्याचा त्यांनी आपल्या परीने प्रयत्नही केला. परदेश दौऱ्यावर निघालेल्या इंदिरा गांधींना निरोप द्यायला पालम विमानतळावर त्या एकत्र आल्या तेव्हा पत्रकारांनी त्या घटनेच्या बातम्या बनवल्या... आपण खरेदी केलेल्या कुठल्याशा जमिनीविषयी अटर्नी जनरलच्या कार्यालयाने घेतलेले आक्षेप मागे घ्यायला त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधींना विनवले. इंदिराजींचा त्यांच्यावरचा राग जुनाच होता. या प्रसंगातील त्यांची विनंती इंदिराजींनी बहुदा धुडकावली असणार. नंतरच्या काळात त्यांच्यातले वैमनस्य वाढत गेले आणि तारकेश्वरी पुन्हा एकवार मोरारजीभाईंच्या बाजूने ठामपणे उभ्या राहिल्या.) शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर झालेल्या सांसदीय काँग्रेस पक्षाच्या नेतेपदाच्या निवडणुकीत त्यांनी मोरारजीभाईंची बाजू हिरीरीने लढविली. बिहारमधील भूमीहार समाजातून आलेल्या तारकेश्वरींचा ओढा मोरारजींकडे असण्याचे एक कारण, परशुरामाला आपला आद्यपुरुष मानणारा हा समाज मोरारजीभाईंनाही भूमीहार समजणारा होता हेही आहे.
लोकसभेत कुटूंबनियोजनावर झालेल्या चर्चेत एकदा राम मनोहर लोहियांनी एक प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण भाषण केले. त्यावर बोलताना तारकेश्वरी त्यांच्या नेहमीच्या उखडेल शैलीत म्हणाल्या, 'आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलेल्या लोहियांनी कुटूंबनियोजनावर बोलणे ही बाब स्वागतार्ह म्हणावी अशी आहे.' बाईंचे वाक्य पूर्ण होण्याआधीच लोहिया उभे राहिले आणि तेवढयाच छद्मीपणे म्हणाले, 'क्या करे बाई, आपने हमे कभी मौकाही नही दिया' सारे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले अन् तारकेश्वरीही त्यात सामील झाल्या...
1967 मध्ये झालेल्या इंडिकेट व सिंडिकेट या काँग्रेसच्या दुभंगात तारकेश्वरींनी सिंडिकेटचे इंदिराविरोधी राजकारण केले. इंदिरा गांधींविषयीची त्यांच्या मनातली सुप्त असूयाही त्यांच्या त्या सहभागाला कारणीभूत झाली. 22 जुलै 1967 या दिवशी सिंडिकेटच्या नियंत्रणातील काँग्रेस वर्किंग कमिटीने इंदिरा गांधींची इच्छा डावलून संजीव रेड्डींना चार विरुध्द दोन मतांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली तेव्हा इंदिरा गांधींचा संताप अनावर होऊन त्यांनी रेड्डींविरुध्द सरळ बंडच पुकारले. त्यावेळी सिंडिकेटच्या वतीने काढलेले इंदिराविरोधी निवेदन तारकेश्वरींनी स्वतः लिहिले. त्यात 'पक्षाचा निर्णय पंतप्रधानांना अडचणीचा वाटत असेल तर त्यांनी सांसदीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व सोडायला तयार व्हावे' असे म्हणून इंदिरा गांधींना त्यांचे पंतप्रधानपद सोडायलाच त्यांनी सांगितले. त्यावर पक्षातील ज्येष्ठांनी आक्षेप घेतला तेव्हा त्या निवेदनाची मूळची भाषा त्यांनी बदलली आणि 'पंतप्रधान पक्षाकडे फेरविचाराची विनंती करू शकतात' असे म्हटले. इंदिरा गांधींचा त्यांच्यावरचा राग अखेरपर्यंत कायम राहिला. 1971 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव करणाऱ्या धर्मवीर सिन्हांना इंदिरा गांधींनी थेट माहिती आणि नभोवाणी खात्याचे मंत्रीपदच दिले.
... तर अशा या तारकेश्वरी. त्यांच्या संघटना काँग्रेसपर्वात काही दिवस मी त्यांच्या सोबत प्रवास केला. त्या काळात एका मध्यमवर्गीय गुजराती कुटूंबात आम्ही मुक्कामाला होतो. रात्रीची एकच सभा असल्याने सारा दिवस मोकळा होता. बाईंना बऱ्याच दिवसांनंतर फुरसत मिळाली होती. त्या कुटूंबातल्या घरपणानं त्या काहीशा हरखल्या आणि हळव्या झाल्या होत्या. त्या घरच्या मुलींना मायेनं जवळ घेऊन त्या खूप वेळ त्यांचं कौतुक करीत होत्या.
पाहता पाहता एका क्षणी जमिनीवर पाय पसरून त्या त्यांच्याशी गोटया खेळू लागल्या. साऱ्या प्रवासात दिसला नाही एवढा उत्साह त्यांच्या चर्येवरून तेव्हा ओसंडत होता. गोटया खेळून झाल्यानंतर यजमानीणबाईंना विनवून त्यांच्याकडून त्यांनी मराठी ढंगाचे नऊवारी पातळ नेसवून घेतले. कपाळावर ठसठशीत कुंकू लावलं. मग खूप वेळ त्या आपलं देखणेपण आरशात न्याहाळत राहिल्या... हा सोहळा संपल्यानंतर त्यांनी एक फुलाचं तबक मागवलं. ते स्वतः सजवलं अन् घरापासून लांबवर असलेल्या एका मंदिरापर्यंत पायी चालत जाण्याचा हट्ट धरला. सारा दिवस त्यांनी चालवलेलं स्वतःच कौतुक पाहून यजमानीणबाई गंमतीनं म्हणाल्या, 'सम्हलिये, तुम्हे खुद की नजर लगेगी'
एवढी देखणी अन् प्रसिध्द बाई रस्त्यानं पायी निघाली तर तिच्यामागे माणसांची मिरवणूक चालू लागेल या भीतीनं मी त्यांच्यासाठी गाडी बोलवली. गाडीत बसायला नकार देऊन त्या तशाच मंदिराच्या दिशेनं निघाल्या. साऱ्या रस्त्यात लोक त्यांच्याकडे कुतूहलानं पहात आणि आम्ही काहीजण त्यांच्यापासून अंतर राखून मागाहून चालत.
सभेची वेळ झाली तेव्हा बाईंनी तो नऊवारी मराठी वाण उतरवला आणि त्या नेहमीच्या तारकेश्वरी सिन्हा बनल्या. घरून बाहेर पडताना त्यांचं पाऊल जड झालं. यजमानांच्या मुलींनी त्यांना वाकून नमस्कार केला तेव्हा त्यांचं सारं अवसान गळालं. त्यातल्या धाकटीला पोटाशी धरून त्या अक्षरशः रडायला लागल्या. खूप दिवसांची दबलेली वेदना टोकदार झाली होती. भोवतीची मंडळी अवाक् होती. गांगरलेल्या मुलीला दूर करीत बाईंनी पुन्हा एकवार तारकेश्वरींची ताठ भूमिका घेतली. सोबतच्या मंडळीकडे ओल्या डोळयांनी पाहून त्या म्हणाल्या, चला.
गाडीतून जाताना मी त्यांना त्यांच्या त्या हळवेपणाविषयी विचारले. अतिशय कापऱ्या आवाजात त्या म्हणाल्या, 'आमचं घर कसलं? महिन्यामहिन्यांनी केव्हातरी तिथं जायचं. आई आल्याचं समजलं की मुलगा धावत येतो. थोडावेळ सभोवती घुटमळतो अन् निघून जातो. त्याला मी त्याची आई वाटत नाही. श्रीमती तारकेश्वरी सिन्हा वाटते. घरात खूप पुढारी येतात. त्याच्यासाठी त्यातलीच मी एक.'
तारकेश्वरींचा राजकारणात पराभव व्हावा असं त्या क्षणी मला खूप वाटलं. या बाईंनी आजवर गमावलेलं त्यांनी मिळविलेल्या साऱ्या गोष्टींहून खूप मोठं होतं. ते त्यांना मिळायला हवं होतं. पण राजकारणातले भाव वेगळे. पराभव होत राहिले. तारकेश्वरी तरीही त्यातच राहिल्या. लोक त्यांचा आणि त्या स्वतःचा पराभव करीत जगल्या.
71 च्या निवडणुकीतील इंदिरालाटेत तारकेश्वरी पहिल्यांदा पराभूत झाल्या. 72 च्या बिहार विधानसभेत निवडून येणेही त्यांना जमले नाही. येथून त्यांच्या पडझडीला आणि विजनवासाला सुरुवात झाली. पुढे 77 मध्ये त्या समस्तीपुरात पुन्हा पडल्या आणि दृष्टीआड जाऊन संपल्याच. मी मात्र तारकेश्वरींना अजून विसरू शकलो नाही. त्यांच्या ऐन उभारीचा काळ मी वृत्तपत्रांतून वाचत होतो. त्यांच्या पडत्या काळाचा आरंभ मला पाहता आला होता. त्यातलं त्यांचं केविलवाणं धावणं मी पाहिलं होतं. अपप्रचाराचा मारा सहन करीत कुठल्यातरी अदृष्य नि फसव्या गोष्टीच्या मागे धावणारी ही संवेदनशील बाई स्वतःला घायाळ करून घेत आपल्या मी पणाला मूठमाती देत निघालीसं तेव्हा वाटलं होतं. पुष्कळांना त्यांचं मीपण गवसलं नसतं. ज्यांना गवसतं त्यातले काहीजण ते गाडून टाकायला उठले असतात. अशी माणसं नेमकं काय करीत असावी? आत्महत्या की खून? बलिदान की नुसतीच वंचनेची फरफट?
महत्त्वाकांक्षा आणि माणूसपण यांच्यात अंतराय येतो तेव्हा माणसांना महत्त्वाकांक्षांचाच मोह अधिक पडतो काय? एखाद्या स्वप्नाच्या मागे लागून वर्तमान हरवून बसणाऱ्या माणसांचे नेमके काय होत असते? त्यातल्या ज्या कुणाला त्याची स्वप्ने गवसतात त्याचे ठीक, पण ज्यांना ती गवसत नाहीत आणि त्यांच्यापायी दमछाक झाल्याने मग वर्तमानही जवळ करता येत नाही त्यांचे अधांतरीचे जीणे केवळ एकाकी होते की केविलवाणे? तारकेश्वरी विवाहित होत्या. त्यांचे यजमान पाटण्यातील धनवंत अन् प्रतिष्ठित जमीनदार होते. त्यांच्या वाडयात डॉ. राजेंद्रप्रसादांसारखा, पुढे देशाचा राष्ट्रपती झालेला नामवंत कायदेपंडित एकेकाळी भाडेकरू म्हणून राहिला होता... एवढे ऐश्वर्यशाली वर्तमान हाती असताना तारकेश्वरींना पडलेला मोह कशाचा होता? नावाचा..सत्तेचा..प्रसिध्दीच्या झगमगाटाचा की त्या ईर्षेत कराव्या लागणाऱ्या नुसत्याच बेभान धावपळीचा?... दुसरेही एक खरे असेल, सामान्य क्षमतेच्या माणसांनाही आयुष्याच्या पळापळीत कुठे थांबायचे ते कळत नाही. तारकेश्वरींची क्षमता मोठी होती. त्यांच्या देहात न मावणारी, दृष्टीच्या पल्याड धावणारी आणि त्यांना असलेल्या मर्यादांचा त्यांनाच विसर पाडणारी...
सारी हयात कामगारांच्या चळवळीत घालविलेल्या अन् दोन वर्षे इंटकसारख्या महासंघटनेचं अखिल भारतीय अध्यक्षपद भूषविलेल्या मैत्रेयी बोस यांच्यासोबत काही दिवस मी नक्षलबारीच्या परिसरात घालविले. त्यावेळी त्या दार्जिलिंग क्षेत्रातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. राजकारण आणि समाजकारणाएवढाच लढाऊ चळवळींशी आयुष्यभराचा संबंध असलेल्या मैत्रेयीदेवी शांत अन् सुस्वभावी होत्या. आमच्या भेटीच्या वेळी त्यांनी सत्तरी गाठली होती. त्यांच्याएवढया अनुभवसंपन्न स्त्रीने आत्मचरित्र लिहावे असे मी त्यांना सुचविले. मोकळया केसांच्या, ठेंगण्या, सावळया अन् कमालीची छाप पाडणारं धीरगंभीर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या मैत्रेयीदेवी क्षणभर थांबून म्हणाल्या, 'सगळं आयुष्य हा नको असलेला प्रवास ठरल्याचं आता जाणवू लागलं आहे. आत्मचरित्र काय लिहायचं. सारा चुकांच्याच कबुलीचा पाढा असेल तो.'...
'तुमच्या व्यक्तिमत्त्वातले मोठेपण आणि सौंदर्य मला आता (उशीरा) जाणवू लागले आहे. पूर्वी तुम्ही खूप दूर असायचे अन् तसेच वाटायचेही. तुमच्यापर्यंत पोहचणं अवघडच नाही तर अशक्य असायचं. तुम्ही सदैव कामात गर्क.. मला कधी तुमची भीतीही वाटायची. तुम्ही खूप उंचीवर आहात. तुमच्या जवळच्या माणसांना त्यांचे लहानपण त्यामुळे जाणवणारे आहे. माणसांना तसे वाटणे आवडतही नसते.' इंदिरा गांधींनी लाहोरच्या तुरूंगात असलेल्या पं. नेहरूंना लिहिलेल्या या पत्रातून नेमकी हीच व्यथा शब्दांकित झाली आहे.
तारकेश्वरींचं असंच काहीतरी झालं होतं. 71 च्या पराभवानंतर त्या इंदिरा गांधींना शरण गेल्या होत्या. नंतरच्या आणीबाणीत इंदिरा गांधींच्या बाजूनं उभं होण्यातही त्यांनी धन्यता मानली होती. आणीबाणीच्या अखेरीस 77 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी त्यांना पक्षाचं तिकिट दिलं. त्यात त्या पराभूत झाल्या... आणीबाणीत 14 महिने तुरूंगात राहून आलेला मी तेव्हा जनता पक्षाच्या बाजूने प्रचारात सहभागी झालो. मात्र त्याही स्थितीत तारकेश्वरींच्या पराभवाची बातमी वाचून मी हळहळलो होतो.
मग न राहवून मी त्यांना पत्र लिहिले. त्यात त्यांच्या झालेल्या पराभवाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. पत्राच्या शेवटी 'राजकारणानं त्यांना जे सोडायला लावलं ते घर अन् त्यातली माणसं आता तरी त्यांच्या वाटयाला यावी' अशी शुभेच्छा लिहीली.
खूप दिवसांनी आलेल्या उत्तरात तारकेश्वरींनी लिहिलं होतं, 'अभिनंदन समजलं, शुभेच्छाही समजली. राजकारण हे व्यसन आहे. ते सुटता सुटत नाही. या सक्तीच्या विजनवासानं ते घालवलं तर त्याचा मला आनंदच होईल.'
या विजनवासात त्यांनी नालंदा जिल्ह्यातल्या आपल्या परिसरातील खेडयात कुठे दवाखाने बांध, कुठे शाळा वाढव तर कुठे गावकऱ्यांच्या तक्रारी सोडव अशी कामे केली. त्यांच्या पुर्वायुष्यातील उंचीने दबणारी लहान माणसे याही काळात त्यांच्यापासून दूर राहिली आणि त्यांच्यावर असलेल्या सत्ताधाऱ्यांचा रोष ठाऊक असणाऱ्या मोठया माणसांना त्यांची दखल घेणे अवघड झाले. मग त्या आपले मन रमवीत अन् स्वतःला शांत ठेवीत तशाच एकटया राहिल्या.
पण त्यांना खऱ्या अर्थानं शांतही होता आलं नाही. याच काळात त्यांच्या एका जुन्या चाहत्यानं त्यांना विचारलं, 'संसदेबाहेर राहून तुम्ही काय करता?' त्यावर सगळा संताप अन् वैफल्य उफाळून आलेल्या तारकेश्वरी म्हणाल्या, 'झक् मारते' (झक मार रही हूँ) या प्रसंगाचा पुढे त्यांना पश्चात्ताप झाला की नाही हे कधी कोणाला कळले नाही. पण त्यांच्यासारख्या संवेदनशील मनाच्या स्त्रीने त्यासाठी पुढे नक्कीच अश्रू गाळले असणार. पण तोवर त्यांच्या शायरीची, सौंदर्याची, वक्तृत्त्वाची आणि अश्रूंचीही किंमत कवडीमोल झाली होती... यशाच्या वाटयाला राजकारणात सारे काही येते. अपयशाच्या सोबतीने तेथे कोणी जात नाही. तरीही जे अट्टहासाने त्या वाटेने चालत राहतात त्यांच्या वाटेला एका उदासपणाखेरीज दुसरे काही यायचे नसते.
राजकारण हे समाजजीवनाचे शक्तीशाली अंग आहे. त्यात भाग घेणाऱ्या माणसांकडे त्यांच्या आयुष्याची फार मोठी किंमत ते मागत असते. त्यातल्या यशस्वी माणसांना ते लोकप्रियतेचा साज चढविते. हा साज ज्यांना खुलतो ती माणसे दिसतातही छान... पण कोणत्या गोष्टीची किती किंमत मोजायची याचे भानही अशा माणसांना राखावे लागते. त्यातल्या अनेक समर्थांना ते राखता व पेलता येते. मात्र त्यात वाहून जाणारी माणसेही असतात. मग ही माणसे साऱ्या आयुष्याचीच त्या एका साजासाठी किंमत मोजतात... अन् तेवढयावरही हवे ते हाती आले नाही की हताश होतात... तारकेश्वरीही अशा हताश झाल्या होत्या.
तारकेश्वरींना राजकारणानं बाहेर केलं होतं अन् त्यांचं घरही कायमचं हिरावून घेतलं होतं. याच काळात कधीतरी त्यांच्या मुलाची डायरी त्यांच्या हातात पडली. त्यात त्यानं लिहिलं होतं, 'जोवर जिवंत आहे तोवर मी आईला क्षमा करणार नाही. संसद आणि राजकारण या समुद्रात ती हरवली आहे. या घरात मी एकाकी आहे. आईजवळ साऱ्यांसाठी वेळ आहे. संवेदनशीलता आहे. कळवळाही आहे. पण माझ्यात अन् तिच्यात उभी राहिलेली भिंत तोडायला हवी ती क्षमता आणि वेळ मात्र तिच्याजवळ नाही. मी मग मूक होतो... पोलिटिशियन्स! दे ड्रिंक माय वाईन.. तुम हो जहाँ, बेशक वहाँ उंचाई है. मगर इस सागर में गहरी खाई है.'
आपल्या विद्यार्थीदशेत त्यांचा हा मुलगा त्याच्या परिक्षेच्यावेळी नागरिक शास्त्राचे काही प्रश्न घेऊन त्यांच्याजवळ आला होता. मात्र राजकारणातल्या व्यस्ततेमुळे त्या प्रश्नांची उत्तरे त्याला समजून द्यायला त्यांना कित्येक आठवडे सवड झाली नाही. हा मुलगा पुढे दिवसचे दिवस एकाकी राहू लागला. तारकेश्वरींची साधी दखलही त्याच्या लेखी उरली नाही. या गोष्टीची खंत आयुष्याच्या अखेरपर्यंत तारकेश्वरींनी मनात बाळगली. सत्तेच्या बाहेरही आयुष्य आहे हे त्यांना आरंभापासून जाणवायचे. समुद्राच्या तटावर उभे राहून त्यातल्या मासळयांकडे दूरस्थासारखे पहावे तशी राजकारणातली माणसे आपल्या कुटूंबातल्या माणसांकडे कोरडया निरपेक्षपणे पाहतात हे त्यांना जाणवत राहिले. अशा माणसांत आपलाही समावेश आहे हे लक्षात आले की त्या अंतर्मुख अन् दुःखी व्हायच्या.
ते सारे दिवस आता मागे पडले. इंदिराजींचं पंतप्रधानपद इतिहासजमा झालं. तारकेश्वरींची संघटना काँग्रेस विस्मरणात गेली. इंदिराजी राहिल्या नाहीत आणि तारकेश्वरींनीही जगाचा निरोप घेतला...
14 ऑगस्ट 2007 या दिवशी तारकेश्वरींचा मृत्यू झाला. त्या मृत्यूवर कोणी अश्रू ढाळल्याचे दिसले नाही. स्वातंत्र्यलढयात भाग घेणारी बेदरकार वृत्तीची लढाऊ मुलगी, ऐन तारुण्यात संसदेएवढाच देश गाजवणारी खासदार, पं. नेहरूंच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्र्याचे पद भूषवणारी आणि युनोच्या व्यासपीठावरून भारताची बाजू जगासमोर मांडणारी ही प्रभावी महिला राजकारणातले एक वळण चुकीचे घेतले अन् तेवढयाखातर पडद्याआड आणि स्मृतीआड झाली. एवढी की तिच्या मृत्यूची दखल घ्यावी असे या देशात कोणालाही फारसे वाटले नाही.

No comments:

Post a Comment