Pages

Monday, August 29, 2011

चौधरी चरणसिंग






पोलिस मैदानावर ते छोटेखानी हेलिकॉप्टर घोंघावू लागले आणि मैदानाच्या कडेने उभ्या असलेल्या हजारोंच्या उत्साहाला उधाण आले. जयप्रकाश नारायण झिंदाबादच्या घोषणा उठल्या. रेटारेटी वाढली. पोलिसांच्या धावपळीला वेग आला.
काही सेकंदातच प्रचंड आवाज करीत ते हेलिकॉप्टर जमिनीवर येऊन स्थिरावले. आम्ही पुढे झालो. जरा वेळानं दरवाजा उघडला. शिडी लागली आणि केंद्रीय गृहमंत्री चौधरी चरणसिंग पायउतार झाले. खूप थकलेला पण गोरापान चेहरा. घाऱ्या डोळयात विलक्षण अस्वस्थपण. पांढराशुभ्र सदरा अन् धोतर असा साधा पेहराव. एका हातानं मागे सरकलेली टोपी पुढे करीत चौधरीसाहेब पुढे झाले. मग हारतुरे, घोषणा जयप्रकाश झिंदाबाद, जनता पार्टी झिंदाबाद, चरणसिंग झिंदाबाद. शेवटच्या घोषणेने चौधरीसाहेब अस्वस्थ होतात. 'अशा व्यक्तिगत गौरवाच्या घोषणा देऊ नका.' म्हणतात. त्या गर्दीत पोलिस अधिक्षक सलामीची सूचना द्यायला त्यांच्याकडे येतात. चौधरीसाहेब नाखुषीनेच सलामीसाठी जातात. सलामी देणाऱ्या अधिकाऱ्यालाच 'तुम्हा पोलिसांना घरंबिरं आहेत की नाही' असं विचारतात. त्या आकस्मिक प्रश्नानं तो भांबावतो तेव्हा बाजूच्या अधिकाऱ्यांना 'त्यांना घरं नसतील तर त्याचे प्लॅन्स तयार करा, मी पैसे देईन' असं सुनावतात.
पोलिस मैदानापासून मुख्य सभेचे ठिकाण जरा लांब आहे. चौधरीसाहेबांसाठी पक्षानं एका कारखान्याची वातानुकूलित गाडी आणली आहे. (जनता सरकारच्या मंत्र्यांनी पक्ष कार्यासाठी सरकारी गाडया वापरायच्या नाहीत असा दंडक आहे आणि चौधरीसाहेब महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी शहरात आले आहेत.) ती भलीमोठी गाडी पाहून ते अस्वस्थ होतात. 'किसकी गाडी है ये?'
मी कारखान्याचं नाव सांगतो. त्यावर 'ये कारखानेवाले लोग मतलबी होते है. ऐसीही बातों की वे बाद में कीमत मांगते है. उन्हे गाडियाँ मत मांगो.' म्हणतात. चौधरीसाहेबांसोबत मी गाडीत बसतो. सभेच्या जागी पोहचेपर्यंत मी त्यांना स्थानिक राजकारण, जनता पक्षाची रिपब्लिकन पक्षाशी महाराष्ट्रात झालेली निवडणूक युती आणि पक्षाच्या स्थानिक उमेदवाराची माहिती सांगतो. मला अर्ध्यावर तोडून चौधरीसाहेब विचारतात, 'इकडल्या लोकांत माझ्याविषयी काय बोललं जातं?'
जनता पक्षाची राजवट दिल्लीत स्थापन होऊन उणेपुरे चार महिने झाले आहेत. तिच्याविषयीचा लोकांचा भ्रमनिरास एव्हाना सुरू व्हायचाय. मीही त्यामुळे निष्ठावान पक्ष कार्यकर्त्याच्या थाटात सांगतो. 'लोग तो आपको लोहपुरुष के रुप मे सरदारसाहब का सही वारिस करके देखते है' चौधरीसाहेबांच्या थकल्या चेहऱ्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिसत नाही.
सभास्थानी गाडया पोहचतात तेव्हा तिथं तोबा गर्दी उडाली असते. पंचेवीसेक हजारावर लोक मैदानावर आहेत. उंच उभारलेल्या व्यासपीठावरून त्या गर्दीसमोर बोलणारा स्थानिक कार्यकर्ता थांबतो. लगेच जयजयकाराच्या घोषणा सुरू होतात आणि त्या गजरात चौधरीसाहेब व्यासपीठावर येऊन विराजमान होतात. आसनस्थ होण्याआधी व्यासपीठाच्या चारही बाजूंना जाऊन उपस्थितांना हात जोडून अभिवादन करतात. गर्जना स्थिरावतात आणि मी स्वागतपर भाषणासाठी माईकपुढे उभा होतो.
निवडणुकीतलं भाषण जेवढं अतिशयोक्त असावं तेवढं मी बोलतो. चौधरीसाहेबांनी इंग्रजीतून लिहिलेल्या कृषीविषयक पुस्तकांची नावं ओळीनं सांगतो तेव्हा त्यांचे कान टवकारलेले मला दिसतात आणि 'सारी सत्ता किसानों के हाथ देण्याचे स्वप्न पाहणारे चौधरीसाहेब' म्हणतो तेव्हा त्यांची संमतीदर्शक प्रसन्नतेनं लवलेली मान मला दिसते.
माझ्यानंतर ते बोलायला उठतात. संथपणे दोन्ही हातांच्या बाह्या वर सरकवत पुन्हा टोपी नीट बसवतात आणि अतिशय थकल्या व क्षीण आवाजात बोलायला सुरूवात करतात. मध्येच त्यांचा आवाज करडा होतो, चिरका होतो. धीम्या गतीनं बोलतात. मध्येच उत्तरप्रदेशी थाटात लोकांना सवाल टाकतात. समोरच्या मराठी श्रोत्यांतून उत्तरेतल्यासारखा प्रतिसाद उठत नाही तेव्हा 'अरे भई, यहाँ के लोग बोलना नही जानते क्या' असा सवाल व्यासपीठावरून फेकतात. पन्नासेक मिनिटे बोलून झाल्यावर टाळयांच्या गजरात ते व्यासपीठावर लोडाला रेलून बसतात.
इथं मी शेजारी आहे. एकाएकी माझा हात धरून आपल्या छातीवर ठेवीत म्हणतात, 'यहाँ, सीने में काफी दर्द है.'
'मग पक्षातली इतकी तरुण माणसं बाजूला ठेवून तुम्ही एवढी धावपळ कशाला करता'
'सब निकम्मे है'
या उत्तरानं मी हैराण होतो. आभाराचं दोनेक मिनिटांचं भाषण होऊन सभा संपते. आम्ही पुन्हा गाडयांत स्वार होतो.
'हमारे बाद यहाँ कौन आ रहा है अपनी ओर से' चौधरीसाहेब.
'बाबूजी' मी.
' कौन बाबूजी' अतिशय कडू चेहऱ्यानं तिरका सवाल येतो.
'जगजीवनरामजी' मी.
'अरे, उसे काहे को बुलाया. बहुत भद्दा आदमी है भई वह. देखना एक दिन ये आदमी और वो बहुगुणा हमारी पार्टी को तोड के रहेंगे'
देशाचा गृहमंत्री आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांबद्दल माझ्यासारख्या सामान्य आणि अपरिचित कार्यकर्त्याशी पहिल्या भेटीत हे बोलत होता. जगजीवनराम वारंवार परदेशचे दौरे का करतात आणि प्रत्येक दौऱ्यानंतर त्यांची श्रीमंती कशी वाढली असते हेही त्यांनी गाडीतच मला ऐकविले. जरा वेळानं गाडया सर्किट हाऊसवर पोहचल्या. तिथल्या वातानुकूलित दालनात दुधाचा ग्लास तोंडाला लावीत चौधरीसाहेब पक्षातल्या दुसऱ्या गटांवर घसरतात.
'तुम्हारे यहाँ ये सोशलिस्ट है या नही'
'काफी है' ते पुढे काय म्हणतील या शंकेने मी जरा बिचकतच उत्तर दिले.
'उनसे सावधान रहो. बहुत निकम्मे लोग है. उनके पास न समाज है ना समाजवाद. जनता पार्टी का सहारा लेकर वे देशपर हावी होना चाहते है'
समाजवाद्यांविषयी आणखीही बरंच बोलायचं त्यांच्या मनात असावं. पण त्यांच्या सचिवानं आत येऊन पुढल्या कार्यक्रमासाठी घाई करायची वर्दी दिली. आम्ही पुन्हा गाडीत. आतापर्यंत नुसता ऐकतच होतो. मनात आलं एवढया साऱ्यांविषयी हे गृहस्थ असं बोलले आता उरलेल्यांविषयीही त्यांना विचारून घ्यावं.
'जनसंघियों के बारेमे'... मला वाक्यंही पूर्ण करता आलं नाही.
'अरे, वो भी वैसेही है. जब जनता पार्टी की जीत हुई तब ये तुम्हारा नाना देशमुख अस्पताल आया था हमे मिलने. बोला, जगजीवनराम को प्राईम मिनिस्टर बनाओ. हमने कहा, जिस आदमी ने इमर्जन्सीका रेझोल्यूशन रखा उसे हम प्राईम मिनिस्टर नही होने देंगे. तब जाके ये तुम्हारा मोरारजी प्रधानमंत्री बना.'
मोरारजीभाईंविषयीही ते फारशा आदराने बोलत नव्हते. कोणाही विषयी सामान्यपणे ते तसेच बोलायचे. साऱ्यांचा उल्लेख सातत्याने एकेरीत करायचे. मग ते मोरारजी असोत नाहीतर जगजीवनराम. नानाजी देशमुख असोत नाहीतर मधु लिमये. आपल्या भाषणात व खाजगी चर्चेत त्यांनी एकदाही जयप्रकाशांचा वा त्यांच्या संपूर्ण क्रांतीच्या घोषणेचा उल्लेख केला नाही. सारा रोख इंदिरा गांधींवर आणि त्यांच्याविरुध्द करावयाच्या कारवाईवर... मोठया पदावर लहान मनाची माणसे गेली की त्यांचे असेच होत असणार. काही माणसांमुळे पदे मोठी होतात तर काहींना त्यांचे मोठेपण पदामुळे लाभते असे म्हणतात. पण पदेही ज्यांना मोठी करू शकत नाहीत त्यांना काय म्हणायचे असते? चौधरीसाहेब अभ्यासू होते. त्यांचे इंग्रजीत ग्रंथ प्रकाशीत होते. पण मनाला असलेले जातीचे कुंपण जयप्रकाशांच्या सोबत राहूनही त्याभोवती कायमच राहिले होते. जुन्या जमीनदारांमध्ये असणारी दरबारी ऐट आणि अहंभाव यांनी ते परिपूर्ण होते.
सत्तेतली माणसे जास्तीच्या सत्तेसाठी आणि वरच्या व मोठया पदांसाठी नेहमीच उतावीळ असतात. तिथवर जायचे दोन मार्ग आहेत. एक स्वतःचे बळ आणि उंची वाढविण्याचा आणि दुसरा इतरांचे बळ आणि उंची कमी करण्याचा. चौधरी साहेबांना उत्तर प्रदेशाबाहेर स्थान नव्हते. त्यांचा लोकक्रांतीदल हा पक्ष त्या राज्याच्या जाटबहुल असलेल्या काही जिल्ह्यांतच आपले अस्तित्व राखून होता. या उलट जगजीवनराम काँग्रेसमधील सगळयाच दलितांचे नेते होते. केंद्रीय मंत्रीपदाचा त्यांचा अनुभव मोठा होता. त्यांच्या विरोधात बोलण्यासारखे बरेच होते आणि चौधरीसाहेब ते सर्वत्र बोलत असावे. त्यातले बरेचसे सांगण्याजोगे आणि छापण्याजोगे तर बरेचसे न सांगण्याजोगे आणि न छापण्याजोगे.
प्रादेशिक पातळीवर राजकारण कराव्या लागणाऱ्या सगळया लहानमोठया पुढाऱ्यांची आणि त्यांच्या पक्षांची मर्यादा ही त्यांची बुध्दी व आवाका कितीही मोठा असो तरी त्यांना त्या प्रदेशाच्या मर्यादेपलिकडे जाता वा वाढता येत नाही. या नेत्यांना आपल्या उंचीवर बहुदा अनिच्छेने त्यांच्या प्रदेशांच्या मर्यादेच्या टोप्या चढवाव्या लागतात.... सारे आयुष्य राजकारणात काढूनही करुणानिधी तामिळनाडूचे नेते राहतात, विचारांना विश्वाचा आवाका असला तरी नम्बुद्रीपाद अखेरपर्यंत केरळपुरतेच मर्यादित राहतात, तीस वर्षे मुख्यमंत्री राहूनही ज्योती बसूंना बंगालबाहेर चाहते मिळत नाहीत, फारुख अब्दुल्लांना देशाचे नेते होता येत नाही, रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट_ाबाहेर वाढता येत नाही आणि पवारांना महाराष्ट_ाचे नेते म्हणूनच बाहेरचे जग ओळखते... ही मर्यादा केवळ प्रदेशाचीच नसते. भाषा व संस्कृती यांच्याएवढीच ती जातीचीही असते. समाजकारणातल्या जातीयवादाएवढी राजकारणातल्या जातीयवादाची चर्चा सामान्यतः होत नसली तरी तो जातीयवाद जास्तीचा कडवा आणि द्वेषाच्या पातळीवर जाणारा आहे... थोर म्हणून मिरविलेल्या अनेक ज्येष्ठांच्या या क्षेत्रातील गमजा सांगता येतील. मात्र हे त्याचे ठिकाण नाही.
आपल्या जाती रचनेचा खुला अभ्यासही त्याविषयीच्या आपल्या भित्र्या व आत्मप्रतारणेच्या वृत्तीमुळे आपण कधी त्याच्या वास्तव स्वरूपापर्यंत नेऊ शकलो नाही. आपली जाती व्यवस्था ही ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशी केवळ उतरंडवजाच (तशीींळलरश्र) नाही. उतरंडवजा असतानाच तिचे विभाजन समांतर व प्रादेशिकही (केीळूेपींरश्र) आहे. आपल्यातील काही जाती अखिल भारतीय तर काही प्रादेशिक आहेत. ब्राम्हण व चर्मकार या दोन जाती (आणि मानलाच तर मुसलमान हा वर्ग) अखिल भारतीय आहेत. बाकी साऱ्यांना प्रादेशिक मर्यादा आहेत. जाट उत्तरप्रदेश, हरियाणा आणि पंजाबात, यादव उत्तरप्रदेश आणि बिहारात, राजपूत राजस्थान आणि मध्यप्रदेशाच्या पश्चिम भागात, मराठे आणि पूर्वाश्रमीचे महार महाराष्ट_ात, कम्मा आणि रेड्डी आंध्रप्रदेशात अशी आपल्या जातींची प्रादेशिक विभागणी आहे... अनेक जातींना तर एकेका जिल्ह्याच्या व तालुक्याच्याच मर्यादा आहेत. बिहारातले कुर्मी, पूर्व विदर्भातले कोहळी आणि समुद्राकाठचे कोळी असा हा आपला छानपैकी जिल्हानिहाय जातीभेद आहे... यातल्या ज्या पुढाऱ्यांना जातीभेदावर व आपल्या जातीच्या अहंतेवर उठून अखिल भारतीय होणे जमेल त्यांनाच राष्ट_ीय होता येणार आहे. एरवी सारा जन्म जातीच्या आखाडयात दंडबैठका काढून ताकद कमावल्यामुळे कोणाला राष्ट_ीय नेतृत्व प्राप्त करता यायचे नाही. जात धरून ठेवण्याच्या प्रयत्नात देश सुटतो आणि देशामागे लागले की जात हातून जाते अशी या पुढाऱ्यांची ओढाताण असते... राष्ट_ीय नेते होण्याचा दुसराही एक मार्ग आहे. देशातील जातीव्यवस्था समाजातूनच नव्हे तर माणसांच्या मनातून हद्दपार करण्याचा. तो अर्थातच अवघड आणि दूरचा आहे... तिसराही एक मार्ग आहे, तो आपली जात पुसण्याचा व राष्ट_ीय होण्याचा. मात्र तो एकटया गांधींना जमला.
चरणसिंगांसारख्यांच्या मर्यादा अशावेळी स्पष्ट होतात. त्या त्यांच्या एकटयाच्याच नाहीत. त्यात अडकलेले बाकीचे पुढारी अशावेळी आपल्या डोळयांसमोर उभे होतात... अशा माणसांना स्वतःचे समर्थन व बचाव करण्याचा एकच मार्ग उरतो. दुसरे आपल्याएवढेच वा आपल्याहून वाईट आहेत हे दाखविण्याचा. आपली रेषा मोठी काढता आली नाही की इतरांच्या मोठया रेषा पुसण्याच्या बालिश प्रयत्नाचीच ती ज्येष्ठ व जनता-आवृत्ती असते.
आता लक्षात येते ते हे की 1967 च्या लोहिया प्रयोगाने तेव्हाचा सत्तारूढ काँग्रेस पक्ष आणि विरोधक यांना दोन वेगळे धडे शिकविले. तोवर एकदाही पराभव न पाहिलेल्या काँग्रेसला आपला पराभव होऊ शकतो हे त्या निवडणुकीत प्रथम समजले. काही केले वा न केले तरी लोक आपल्यासोबत राहणारच आहेत हा तोपर्यंतचा त्या पक्षाचा भ्रम तिने संपविला. चांगले, संघटित व परिणामकारक राजकारण केले नाही तर जनता आपल्याला सहज बाजूला सारू शकते या जाणिवेमुळे देशावर 'यावःश्चंद्र दिवाकरौ' राज्य करण्याचे त्याचे स्वप्न भंगले... विरोधकांनी घेतलेला धडा याहून वेगळा होता. आपल्या मतांची नुसती बेरीज केली तरी सत्ता मिळविता येते, त्यासाठी जनतेच्या प्रश्नावर लढे द्यायला लागणारे कष्ट उपसण्याचे कारण नाही ही बाब त्यांच्या लक्षात आली. परिणामी जनतेच्या प्रश्ांवरची आंदोलने संपली आणि जातीधर्मासारख्या अस्मितांच्या प्रश्ावर मतांचे गठ्ठा राजकारण संघटित करण्याचे त्यांचे उद्योग सुरू झाले.
सरकार निवडताना देश नुसताच उत्साहाने भारला नसावा. एखाद्या लढयाच्या व पुढाऱ्याच्या मागे लागून तो धावत सुटला नसावा. सरकार निवडताना ते टिकेल, चालेल आणि एकजुटीने राज्य करील याचा विश्वासही त्याला वाटायला हवा. ज्यांच्या हाती विकासाची आणि संपत्तीची सूत्रे सोपवायची त्यांच्या विषयीची त्याला खात्री वाटायला हवी. त्या माणसांचा आवाका, उंची, मर्यादा आणि खाली उतरण्याची क्षमता या साऱ्या गोष्टी त्याला कळायलाच हव्या... पण देशही वाहवतात आणि समाजही लाटांच्या आहारी जातात. जर्मनीसारखा तत्त्वज्ञ माणसांचा देश हिटलरला आपला नेता निवडतो आणि इटलीसारखे ज्ञानसंपन्न इतिहास असलेले राष्ट_ मुसोलिनी नावाच्या गुंडाच्या हाती आपले भवितव्य सोपविते. जर्मनीचे नोबेल पारितोषिक विजेते चॅन्सेलर (पंतप्रधान) विली ब्रॅन्ड यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले माणसांच्या आयुष्यासारखे देशाच्या इतिहासातही तमोयुग येत असते. ते युग आमच्या देशाने हिटलरच्या काळात अनुभवले आहे.
भारताच्या वाटयाला तमोयुग आले नाही, मात्र त्या काळात त्याचे राजकारण जे भरकटले ते अजून सावरले नाही. ज्यांच्या पाठीशी थोडासाही जनाधार नाही अशी माणसे देशाच्या पंतप्रधानपदावर आली. कोणत्याही पुढाऱ्याचा, पक्षाचा वा व्यवस्थेचा विश्वास वाटू नये अशा वातावरणात देशाने नंतरची किती वर्षे काढली? ती अवस्था अजून संपली नाही. 'आघाडीचे युग' हा शब्दप्रयोग आपली समजूत घालणारा आहे की वंचना करणारा?
खूप मोठया पदावर गेलेली माणसे अशी कां वागतात? त्यांना त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीचे, त्यांच्यावर विश्वास ठेवून मागे येणाऱ्या अनुयायांचे आणि खांद्यावर असलेल्या इतिहासाच्या ओझ्याचे भान का नसते?
सभेच्या मैदानाकडे जात असताना जनता पार्टीने रिपब्लिकन पक्षाशी केलेल्या निवडणूक समझोत्याविषयी चरणसिंगांना सांगितले होते. त्यातून विधानसभेची स्थानिक जागा रिपब्लिकन पक्षाच्या वाटयाला गेल्याचे व ती जिंकण्याची शक्यता असल्याचेही सांगितले... ज्या मैदानावर चौधरीसाहेबांची सभा व्हायची होती त्याला एक आगळे पावित्र्य होते. आपल्या लक्षावधी अनुयायांना नागपुरात बौध्दधम्माची दीक्षा दिल्यानंतर काही दिवसांनी बाबासाहेब त्या मैदानावर आले होते. त्याही ठिकाणी आपल्या काही लाखभर अनुयायांना त्यांनी त्या धम्मात आणले होते.
'आप अपने भाषण में बाबासाहब का नाम जरूर लिजिये.' मी चौधरीसाहेबांना म्हणालो होतो. माझ्याकडे वळूनही न बघता त्यांनी 'नही' एवढा एकच शब्द उच्चारला होता. मी त्यांना त्या मैदानावरील दीक्षेच्या सोहळयाची माहिती दिली. तेव्हा त्यांनी विचारले, ' मुझसे पहले कौन बोलनेवाला है'
'मैं' मी उत्तर दिले.
'तो फिर तुम अपने भाषण में उनका नाम ले लेना' एवढे बोलून ते थांबले आणि माझ्या मनातून उतरले होते.
उत्तरप्रदेशावर दीर्घकाळ जाटांनी सत्ता गाजविली. या जाटांच्या प्रमुख नेत्यांपैकी चौधरीसाहेब एक होते. त्यांच्या मनात समाजातील दलितच नव्हे तर ब्राह्मणांसह इतर सर्वच जाती जमातींविषयी असलेली विद्वेष व तिरस्काराची भावना तेव्हाही आजच्या एवढीच प्रज्वलित होती. देशाच्या प्रत्येक भागात एकेक गांधी आणि एकेक आंबेडकर जन्माला येणे कसे आवश्यक आहे हे सांगणारा तो खणखणीत अनुभव होता... काही माणसांमुळे पदांना मोठेपण येते तर काही माणसे पदांमुळे मोठी होतात असे म्हणून आजवर आपण थांबत आलो. या सत्याला आणखीही एक चरण जोडावा असे तेव्हा मनात आले, '... आणि काही माणसे मोठया पदांना लहान करून टाकतात' हे. अशी माणसे डोंगरासारखी दुरूनच चांगली दिसतात. ती तशीच पहावी, त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे मातीचे पाय पाहू नयेत... त्यांच्यातल्या काहींच्या अदृश्य शेपटयाही दिसू देऊ नयेत.
अंगावर प्रकाशाचा खूप मोठा झोत पडला की खुजी माणसेही झगझगीत झालेली दिसतात. जयप्रकाश नावाचा असा प्रकाशझोत तेव्हा अनेक सामान्यच नव्हे तर अतिसामान्यांनाही लखलखाटून गेला होता. त्या मंतरलेल्या काळात अनेकांना मोठेपण मिळाले. त्यातले अनेक नमुने नंतरच्या काळात त्यांच्या छोटया आणि खऱ्या स्वरुपात देशाला पाहताही आले.
जनता पक्षात सामील झालेल्या एकाही पक्षाशी माझा पूर्वी संबंध नव्हता. आणीबाणीचे चटके सहन केलेला आणि त्यातले चौदा महिने तुरूंगात घातलेला मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. जनता पक्षाच्या रुपाने उभे राहिलेले जनतेचे अभियान आणखी काही काळ चालावे अशी भावना असणाऱ्या लाखो लोकांतला एक होतो आणि ज्यांनी त्या अभियानाची धुरा वाहायची त्यातला चरणसिंग हा ज्येष्ठ माणूस माझ्याशी असे बोलत होता.
हेलिपॅडशी गाडी थांबली तेव्हाही चौधरीसाहेबांची बसक्या आवाजातली इतरांची नालस्ती सुरूच होती. मी विषण्ण मनानं गाडीतून उतरलो. जरा वेळानं ते हेलिकॉप्टर त्यांना घेऊन उडाले.
माझं पाऊल जड झालं होतं. पुढे दोन अडीच वर्षांनी जनता पार्टी रीतसर तुटली. मात्र माझ्या मनात तिचे तुकडे तेव्हाच झाले होते. चौधरीसाहेबांच्या भेटीच्या क्षणापासूनच पक्षफुटीच्या उपचाराची मी वाट पाहू लागलो होतो.
चौधरीसाहेब काय आणि तेव्हाचे जनता पक्षाचे बाकीचे पुढारी काय, त्यांचा जनाधार नगण्य म्हणावा एवढा लहान होता. त्या साऱ्यांची बेरीज करून काँग्रेसला पराभूत करण्याचा एक प्रयत्न 1967 मध्ये लोहियांनी करून पाहिला. त्या बेरजेत गोळा झालेले पक्ष आणि काँग्रेसवर या ना त्या कारणाने राग असलेले त्या बेरजेला आशेने मत देणारे, पण तोवर कोणत्याही पक्षासोबत नसणारे असंख्य अपक्ष मतदार यांच्या बळावर लोहियांना एक मर्यादित यश मिळविता आले. केंद्रात काँग्रेस पक्षच सत्तारुढ राहिला आणि या गोळाबेरीजवाल्यांची, संयुक्त विधायक दल असे तात्पुरते नाव घेतलेली आघाडी सात राज्यांत सत्तेवर आली. निवडणूक या विषयाचे तज्ज्ञ त्या यशात या बेरजेतल्या पक्षांचा वाटा किती आणि बेरजेचा स्वतंत्र वाटा किती हे आजही सांगू शकतील. संयुक्त विधायक दलाची सरकारे टिकली नाहीत. काही आपसातल्या भांडणांपायी पडली आणि बाकीची इंदिरा गांधींनी, त्यांना 1971 मध्ये मिळालेल्या प्रचंड यशानंतर पाडली.
जयप्रकाशांच्या मागे गेलेल्या नव्या बेरजेला लोहियांचा जुना अनुभव काही शिकवू शकला नव्हता. डावे पक्ष सरकारबाहेर राहिले आणि उजवे व मध्यममार्गी आपसात भांडत आणि एकमेकांवर कुरघोडया करीत खर्ुच्यांवर राहिले. जयप्रकाशांसोबत जाण्यापूर्वीचा आपला जनाधार आणि त्यांच्यासोबत गेल्यामुळे वाढून मिळालेला जनाधार यातला फरक लक्षात घ्यावा असेही त्यांना कधी वाटले नाही. जयप्रकाशांच्या जनता पक्षाला मिळालेली सगळीच्या सगळी म्हणजे 53 टक्के मते आपलीच असल्याच्या व ती तशीच राहणार असल्याच्या गुर्मीत सारे राहिले. त्यांनी आपापल्या पक्षांची व जमलेच तर स्वतःची ताकद वाढविली. जयप्रकाशांच्या संपूर्ण क्रांतीचा त्या ओढाताणीत बळी गेला... जनतेच्या एका प्रलयंकारी पण लोकशाही उठावाचे हे सारे पुढारीच मग मारेकरी बनले.
काँग्रेस पक्षामागे शंभर वर्षांचा इतिहास होता, स्वातंत्र्यलढयाचा तेजस्वी वारसा होता. टिळक-गांधींपासून जवाहर-सुभाषांपर्यंतच्या साऱ्यांची पुण्याई होती. गावागावात कार्यकर्ते होते आणि देशाच्या स्वभावाचा भाग बनलेला तो मध्यममार्गी पक्ष होता. या स्वभावाला कमालीचे डावे आणि टोकाचे उजवे असे काही मानवत नाही. संतापाच्या एखाद्या क्षणी तो इकडे वा तिकडे काहीसा झुकेल पण सारे स्थिरस्थावर होऊ लागले की तो त्याच्या मूळ भूमिकेवर येईल. जयप्रकाशांच्या प्रयत्नांची दिशा असे मध्यममार्गी संघटन उभे करून काँग्रेसला कायम स्वरुपाचा पर्याय देणारी होती. पण तात्कालिक लाभ, पक्षीय स्वार्थ, त्यातले रागलोभ, देवेदावे आणि व्यक्तीगत महत्त्वाकांक्षा यांच्यावर उठू न शकणाऱ्या तेव्हाच्या साऱ्याच पुढाऱ्यांनी जयप्रकाशांचा आणि त्यांच्या मागे गेलेल्या जनतेचा विश्वासघात केला.
चौधरीसाहेब राजकारणाचे अनुभवी नेते होते. उत्तरप्रदेशासारख्या खंडप्राय राज्याचे ते दोन वेळा मुख्यमंत्री राहिले होते. राजकारणातल्या खाचाखोचा, त्यातली जाती-जमातीची समीकरणे आणि पुढाऱ्यांच्या अहंता या साऱ्यांचा त्यांना अनुभव होता. त्या क्षेत्रात कोणतीही गोष्ट फार काळ दबत नाही, लपविता येत नाही हे त्यांना कळत होते. कोणाजवळ काय आणि केव्हा बोलायचे याचीही त्यांना चांगली जाण असावी... आणि तरीही ते माझ्यासारख्या अपरिचिताजवळ ते सारे हातचे काही न राखता, स्वतःच्या रागलोभानिशी सांगत होते.
चरणसिंगांसारख्यांच्या मर्यादा अशावेळी स्पष्ट होतात. त्या त्यांच्या एकटयाच्याच नसतात. त्या मर्यादात अडकलेले बाकीचे पुढारी अशावेळी डोळयांसमोर उभे राहतात. अशा माणसांना स्वतःचे समर्थन वा बचाव करण्याचा मग एकच मार्ग उरतो. दुसरे आपल्याएवढेच व आपल्याहून अधिक वाईट आहे हे दाखविण्याचा. आपली रेषा मोठी काढता आली नाही की इतरांच्या मोठया रेषा पुसण्याच्या बालिश प्रकाराचीच ती ज्येष्ठ व जनता आवृत्ती असते.
चरणसिंग हे एक अध्ययनशील नेते होते. कृषीक्षेत्राची व त्याच्या अर्थकारणाची त्यांची ओळख ठाम व पक्की होती. शेतीच्या अर्थकारणावरचे त्यांचे इंग्रजी ग्रंथ लोकांच्या वाचनात होते. ते अर्थमंत्री असताना देशाच्या अर्थकारणाचा ओघ कृषीक्षेत्र व ग्रामीण भागाकडे वळविला जाईल अशी भाकिते राजकारणाचे भाष्यकार करीत होते. एवढे अध्ययन आणि एवढा सारा अनुभव असलेल्या या नेत्याचे मन मात्र अस्थिर आणि लहान होते. त्यात उत्तरप्रदेश मावला नाही. कृषी क्षेत्र सामावू शकले नाही. हा देश तर त्यात कधी बसूच शकला नसता... मी आणि माझे यात ज्यांचे समाजकारण सामावले असते त्यांचे निर्णयही मी आणि माझे याच कसोटीवर ठरत असतात... जनता पक्षाचे दुर्दैव हे की असे 'मी'च त्यात फार होते.
अखेरच्या काळात पदाच्याच मोहाने चौधरीसाहेबांचा घात केला. इंदिरा गांधींनी बाहेरून दिलेल्या पाठिंब्याच्या बळावर त्यांनी पंतप्रधानपद मिळविले. पण तो पाठिंबा फुकट मिळाला नव्हता. त्याचा मोबदला म्हणून इंदिरा गांधींवर जनता सरकारने लावलेले सर्व आरोप, खटले, चौकशा आणि आयोग मागे घेण्याची अट त्यात समाविष्ट होती. चौधरीजींनी पंतप्रधानपद घेतले पण एवढा मोठा मोबदला देण्याची तयारी त्यांना अखेरपर्यंत करता आली नाही. 'कानून की चक्की आरामसे लेकिन बहुत बारिकीसे पिसती है' हे धमकीवजा वाक्य त्यांनी इंदिरा गांधींच्या संदर्भात देशाला अनेकदा ऐकविले होते. ते गिळणे त्यांना जमले नाही. परिणामी लोकसभेतले विश्वासदर्शक बहुमतही त्यांना जमविता आले नाही. राष्ट्रपतींनी लोकसभेची मध्यावधी निवडणूक जाहीर केली आणि ती होतपर्यंत त्यांना कामचलाऊ सरकार चालवायलाच तेवढे सांगितले गेले.
चौधरी चरणसिंग या जेमतेम एका राज्याचा मुख्यमंत्री होण्याची क्षमता असणाऱ्या इसमाला देशाचे राजकारण पेलता आले नाही. पंतप्रधानपदाची अवजड वस्त्रे धारण करता आली नाहीत. त्या पदाला असलेली असंख्य व्यवधाने त्या एकसुरी आणि एकेरी वृत्तीच्या माणसाला सांभाळणे जमणारेही नव्हते... जनता पक्षाचे सरकार अशा माणसांमुळे गेले याचे दुःख नव्हते. जयप्रकाशांनी उभ्या केलेल्या संपूर्ण क्रांतीच्या देशव्यापी उत्साहाचा त्यामुळे शेवट झाला याचे खरे दुःख होते...
जनता पक्षात सामील होण्यापूर्वी जनसंघाला जेमतेम आठ टक्के मते मिळत. समाजवाद्यांना चार, स्वतंत्र पक्षाला तीन, लोकक्रांती दलाला दोन आणि अकाल्यांना दीड. त्या साऱ्यांच्या मतांची अगोदरची बेरीज वीस टक्क्यांच्या पुढे जाणारी होती. जयप्रकाशांच्या जनतापक्षाला त्रेपन्न टक्के मते मिळाली. ही वरची तेहतीस टक्के मते त्या आधीच्या एकाही पक्षाची नव्हती. ती जयप्रकाशांवर विश्वास ठेवून आलेल्या सामान्य व पक्षनिरपेक्ष माणसांची मते होती. दुर्दैव हे की त्या तेहतीस टक्के लोकांवर सत्तेवर आलेली चार आणि आठ टक्केवाली माणसे आपली मालकी सांगत आणि तिचा तोरा मिरवीत होती. त्यांनी केलेला विश्वासघात त्यांच्या मागे पूर्वीपासून आलेल्या वीस टक्के मतदारांचाच नव्हता. जयप्रकाश आणि संपूर्ण क्रांती यांच्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या तेहतीस टक्के लोकांचाही होता. त्या मतदारांचा अपराध करणाऱ्यांमध्ये जुन्या जनसंघाच्या पुढाऱ्यांपासून समाजवाद्यांपर्यंतचे आणि संघटन काँग्रेसवाल्यांपासून चौधरीसाहेबांपर्यंतचे सारे होते. त्यांचे कृतघ्नपण हे की एवढया मोठया जनसमूहाची आपण कधीतरी क्षमा मागावी असे त्यांना तेव्हा आणि नंतरही कधी वाटले नाही.
इतिहास सगळया जखमा भरून काढतो. तशी ही जखमही पुढे भरून निघाली... पण ती भरून निघण्यात एक महाआंदोलन खलास झाले. 1971 पासून 76 पर्यंतच्या चार वर्षांतील लक्षावधी लोकांचा त्याग वाया गेला आणि जयप्रकाशांच्या उत्तुंग ध्येयवादाची राखही त्यात वाऱ्यावर उडाली... काही माणसे मोठी होतच नाहीत. त्यांच्या हाती स्वर्गाची सत्ता आली तरी तिच्याशी खेळून ते ती खेळण्यासारखीच भिरकावून देतात. ताठ मानेचे मोरारजीभाई त्यातले. मृदु बोलणारे जगजीवनराम तसेच आणि चौधरीसाहेबांचे वाकडेपणही त्यापैकीच. बाकीच्यांचे सत्ताकारण आणि बालिशपण या वडिलधाऱ्यांच्या तुलनेत अर्थातच मोठे होते... आता तो सारा इतिहास झाला. त्याची खंत करावी तेवढी थोडी आणि त्यातल्या पुढाऱ्यांच्या करंटेपणाला नावे ठेवावी तेवढीही थोडीच.
त्या काळात हालअपेष्टा अनुभवलेल्या, तुरूंगवास भोगलेल्या आणि त्यातल्या ध्येयाने भारून जाऊन आपले सर्वस्व उधळून बसलेल्या हजारो तरुणतरुणींच्या आयुष्याचे खेळणे करणाऱ्यांना कोणती शिक्षा द्यायची असते? नंतरच्या काळातही त्यातली काही माणसे आपली उरलीसुरली कमाई राखून नको तशा तडजोडी करीत सत्तेवर राहिली. त्यांच्या मिळकतीत संपूर्ण क्रांती हरवली की तिच्या लखलखाटाने दिपून जाऊन सारे काही गमावून बसलेल्यांच्या रितेपणात ती दिसेनाशी झाली?



No comments:

Post a Comment