Pages

Thursday, March 25, 2010

आमचे मन थांबले की बुध्दी?

मार्क्सवाद, गांधीवाद, हिंदुत्ववाद आणि आंबेडकरवाद या चार विचारप्रवाहांनी भारताचे विसावे शतक ढवळून काढले. मार्क्सवादाला समाजवादाची व पुढे गांधीप्रणीत समाजवादाची पालवी फुटली. पण त्यातील प्रत्येक अवस्थेत त्या प्रवाहाचे जुने स्वरुप शिल्लकच राहिले. गांधीवादाचा विस्तार विनोबांच्या सर्वोदय विचारात झालेला दिसला. मात्र त्यातले गांधी विचाराचे स्थान अढळच राहिले. हिंदुत्ववादाचे सावरकर आणि संघ असे दोन भिन्न विचार प्रवाह झालेले दिसले. पण त्या दोन्हीची हिंदुत्वाविषयीची श्रध्दा तशीच राहिली. आंबेडकरी विचारांना मार्क्सवादाची जोड देण्याचा प्रयत्न काहींनी केला. पण कर्मठ व जुन्या आंबेडकरवाद्यांनी तो फारसा यशस्वी मात्र होऊ दिला नाही. तात्पर्य, विसावे शतक भारतापुरते तरी या चार विचारप्रवाहांचे शतक बनले.
या प्रवाहांनी चळवळीचे स्वरुप राखावे, त्यांची मांडणी अंतिम मानली जाऊ नये आणि त्या विचारांचे वाद होऊ नये अशीच त्यांच्या जनकांची इच्छा होती. 'माझा विचार अजून पूर्ण झाला नाही, तो प्रयोगावस्थेतच आहे' असेच गांधी अखेरपर्यंत म्हणत राहिले. आंबेडकरांनीही बुध्दाच्या भाषेत 'माझ्यापाशी थांबू नका, पटले तरच घ्या आणि पुढे जा' असा उपदेश आपल्या अनुयायांना आणि समाजाला केला. हिंदुत्वाची परंपरा एवढी मोठी आणि गुंतागुंतीची की त्याची एकारलेपणात परिणती होणे अशक्यच होते. मार्क्स स्वतः विरोधविकासवादी होता. प्रत्येकच सिंथेसिसचे (अंतिम अवस्थेचे) रुपांतर कालांतराने थिसिसमध्ये (प्राथमिक अवस्थेत) होते असे तो मानत होता. त्यामुळे विचार माझ्यापाशी थांबतो असा दावा या चौघांपैकी कोणीही केला नाही. तो करायला त्यांचे अनुयायी पुढे आले. विचार थांबला की त्याचा वाद होतो. मग मूर्तीचे शिल्प व्हावे तसे विचाराचे निर्माल्य होते. त्याची उपासना थांबते आणि ते एक नुसते प्रेक्षणीय स्थळ होते. मार्क्सवाद, गांधीवाद, हिंदुत्ववाद आणि आंबेडकरवाद या अशा विचारांची शिल्पे झालेल्या बाबी बनल्या. या वादांची ओझी अंगावर घेतलेल्या अनुयायांच्या वर्गांनी त्यांना फार थोडया कालावधीत तशी शिल्पकळा आणली.
हे चारही विचार प्रवाह 1930 पूर्वी या देशात जन्माला आले. त्यामुळे कोणताही तटस्थ विचार करू पाहणाऱ्याला आता पडणारा प्रश्न हा की गेल्या 80 वर्षात या देशात कोणताही नवा विचार जन्माला कां आला नाही वा कां येऊ नये हा आहे.
1960 च्या दशकात जगाच्या समाजकारणाने कूस बदलली असे म्हटले जाते. समाज समूहकेंद्री मानसिकतेकडून व्यक्तीकेंद्री मानसिकतेकडे वळला. याच काळात धर्मापासून राजकारणापर्यंत आणि समाजकारणापासून कुटूंबकारणापर्यंतच्या सर्व क्षेत्रात सत्तेच्या विकेंद्रीकरणाला सुरुवात झाली. संघटनांचे नेते व त्यांचे अधिकार यांचा दबदबा कमी होऊ लागला आणि साध्या व सामान्य माणसांचे महात्म्य वाढलेले दिसले. देव, पुरोहित, पुढारी आणि मार्गदर्शक यांचे महत्त्व ओसरले आणि सामान्य माणूसच समर्थ होत राहिला. एवढे मोठे सामाजिक परिवर्तन होऊनही भारतीय विचार मात्र उपरोक्त चार प्रवाहांतच घुटमळत आणि अडकून राहिला, असे कां झाले?
हा प्रश्नविचार येथेच थांबत नाही.
सोळा, सतरा, अठरा आणि एकोणीस या चार शतकात युरोपात सव्वाशेहून अधिक तत्त्वज्ञ जन्माला आले. कान्ट, शॉपेन हॉवर आणि नित्शे-हेगेलपासून रसेल आणि आईन्स्टाईनपर्यंतची त्यांची संख्या याहूनही मोठी भरावी. त्यात चेतनवादी आहेत, जडवादी आणि विज्ञानवादी असे सारेच आहेत. विज्ञानातून तत्त्वज्ञानाकडे आणि गणिताच्या आधारे तत्त्वविचारांपर्यंत पोहचणारे सारे आहेत. त्यात बेकन आहे तसा कान्ट आहे आणि देकार्त आहे तसा हॉब्स आहे. मार्क्स आणि फ्राईडही त्यात आहेत. याच काळात या देशात गणिती, मानसशास्त्र आणि समाजाविज्ञानाचे श्रेष्ठ निर्माते जन्माला आले आहेत.
येथे प्रश्न हा की तत्त्वज्ञांच्या या भाऊगर्दीत ज्याचे नाव समर्थपणे घेता यावे असा एकही भारतीय तत्त्वज्ञ का नाही? परकीयांची हुकूमत, त्यांनी केलेले धर्म व संस्कृतीचे दमन आणि विचार व आचार स्वातंत्र्यावर लादलेले निर्बंध या अवस्थेत भीती आणि संशयच जन्माला येणार. भारतात नेमके तेच होते आणि संशय तत्त्वचिंतनाला जन्म देतो हे सर्वमान्य ठरलेले चिंतन आहे. एवढया साऱ्या संशयचक्रात राहूनही येथे नवा तत्त्वविचार, नवे चिंतन किंवा नवी दिशा जन्माला कां आली नाही? एखादा बेकन, एखादा कान्ट किंवा हेगेल भारतीय कां नव्हता? ते सारे चेतनकारणवादी म्हणून बाजूला सारले तरी कोणताही जडवादी विचार येथे नव्या रुपात कां जन्माला आला नाही? बृहस्पती, चार्वाक आणि त्यांची प्रबळ परंपरा येथे असताना तसे कां घडले नाही? आपला विचार थांबला की चिंतन अडकले?
ज्ञानाची थोर व प्राचीन परंपरा असलेल्या आपल्या देशात आद्य शंकराचार्यांच्या पश्चात एकही तत्त्वज्ञ कां जन्माला येऊ नये? वेदोपनिषदातील तत्त्वविचार, महावीर आणि बुध्दाचे तत्त्वचिंतन आणि त्या साऱ्यांना समांतर असलेला चार्वाक विचार या साऱ्या पुन्हा इसवी सनापूर्वीच्या गोष्टी आहेत... नंतरच्या काळात त्यांचे टीकाकार झाले, भाष्यकार आणि अर्थवाहक आले. पण मूळ विचारांहून वेगळे व सर्वथा स्वतंत्र असे तत्त्वचिंतन पुढे आले नाही. शंकराचार्यांचा विवर्त विचार नवा होता आणि त्या विचारव्यूहात त्यांनी सारा विश्वाचार बसवून दाखविण्याची अद्भूत किमयाही केली. (तरीही त्या श्रेष्ठ तत्त्वज्ञाने स्वतःला तत्त्वचिंतक न म्हणता भाष्यकार म्हणण्याची नम्रता दाखवली हे त्याचे मोठेपण) आपल्या विचाराच्या मांडणीसोबत तोवर जन्माला आलेल्या सर्व तत्त्वपरंपरांवर त्यांनी अधिकारवाणीने भाष्ये लिहिली. आपल्या विचाराचे अजिंक्यत्व प्रस्थापित करताना बाकीच्या विचारपरंपरा बुध्दीची सगळी आयुधे वापरून त्यांनी खोडून काढल्या. त्यांना समन्वयवादी तत्त्वज्ञ म्हटले जात असले आणि त्यांच्यावर 'प्रच्छन्न बुध्द' असा आरोप केला जात असला तरी आपल्या विचारांच्या मांडणीसाठी त्यांनी इतरांच्या विचारांचे केलेले खंडनही अतिशय प्रभावी ठरले. त्यांच्या विचारसामर्थ्याचा प्रभाव एवढा की त्यांच्याहून मूलतः वेगळा विचार करायला कोणताही विद्वान पुढे धजावला नाही. नंतरच्या काळात झालेल्या ज्ञानी पुरुषांनीही आपली वाटचाल 'भाष्यकाराते वाट पुसतु' असे म्हणतच केली. (या विषयावरील एका चर्चासत्रात भाग घेताना प्रस्तुत लेखकाने भारतात नवा तत्त्वविचार कां जन्माला आला नाही असा प्रश्न पुढे केला असता त्या सत्राच्या अध्यक्षपदी असलेले एक नामांकित विद्वान म्हणाले, अद्वैत वेदांत मांडून झाल्यानंतर नवे सांगण्यासारखे काही उरतच नाही. यावर तरीही मार्क्स आणि फ्राईड उरतातच असे या लेखकाने म्हटले तेव्हा त्यांचाही समावेश आपल्या विचारात आहे एवढे सांगून त्यांनी ते सत्रच थांबविले होते)
असे एक उदाहरण पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासातही आहे. प्लेटो आणि ऍरिस्टॉटल यांच्या तत्त्वचिंतनाचा त्या क्षेत्रातील प्रभाव एवढा प्रदीर्घ आणि दांडगा की त्यांच्या चिंतनातील चुका पाहू शकणाऱ्यांनाही त्या सांगणे दीर्घकाळ जमले नाही. ऍरिस्टॉटलच्या विचारपरंपरेतील दोष त्याच्या पश्चात सतराशे वर्षांनी झालेल्या लायब्नित्झला कळले होते. पण ऍरिस्टॉटलचा त्या काळावरचा प्रभाव एवढा जबर होता की आपली मते जगासमोर मांडण्याचे धाडस त्याला करता आले नाही. पुढे ती कामगिरी विसाव्या शतकात बर्ट्रांड रसेलला करावी लागली. जो प्रकार ऍरिस्टॉटलच्या प्रभावामुळे पाश्चात्त्य तत्वपरंपरेत घडला तो शंकराचार्यांच्या प्रभावामुळे भारतात घडला काय?
ज्या सत्याचा शोध घ्यायचा, अखेरचे ज्ञान म्हणून जे सांगायचे किंवा ज्यामुळे परमोच्च कल्याणाचा मार्ग मोकळा होतो असे म्हणायचे ते सारे पूर्वीच सांगून झाले आहे. त्यात आणखी नवे शोधण्याजोगे वा सांगण्यासारखे काही उरले नाही या व अशा मानसिकतेमुळे असे घडले असावे काय? भारतात हा अपराध सगळयाच तत्त्वपरंपरांनी केला आहे. या परंपरांचे आरंभकर्ते तसे म्हणाले नाहीत. मात्र त्यांच्या दर्शनांवर पुढल्या काळात ज्यांनी आपली मक्तेदारी थाटली त्या साऱ्यांनी तसे केले आहे. 'ग्रंथालये जाळून टाका, सारे ज्ञान कुराणात आले आहे' या इस्लाममधील धर्मवेडाच्या आवृत्त्या प्रसिध्द आहेत. मात्र त्याच सारख्या अन्यत्र निघालेल्या फतव्यांच्या परंपरांची चर्चा फारसे कुणी करीत नाही.
इसवी सनाच्या चौथ्या शतकात रोमचा सम्राट कॉन्स्टंटिनोपल याने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. त्याने व त्याच्या वारसदारांनी सारे शिक्षण चर्च या धर्मसंस्थेच्या हाती सोपविले. चर्चने बायबलातील विचारांविरुध्द वा वेगळया जाणाऱ्या सगळया विचार परंपरा नाकारल्या. एवढेच नव्हे तर त्यांच्या अध्ययन-अध्यापन व चर्चेवरही बंदी घातली. 549 मध्ये सम्राट जस्टिनियनने ग्रीसची राजधानी अथेन्समधल्या सगळया शाळा बंद केल्या आणि धर्मविचाराखेरीज दुसरे काही नव्या पिढयांपर्यंत पोहचणार नाही अशीच व्यवस्था केली. बायबलमधील श्रध्दा विचार हाच अखेरचा कल्याणमंत्र ठरल्यामुळे ग्रीकांची महान तत्त्वपरंपरा हे पाखंड ठरविले गेले. परिणामी थेल्स आणि पायथॅगोरसपासून प्लेटो-ऍरिस्टॉटलपर्यंतचे सगळे अध्ययन नाकारले गेले.
धर्म आणि तत्त्वज्ञान या दोन परस्परभिन्न बाबी आहेत, धर्म ही व्यवस्था तर तत्त्व हा ज्ञान प्रकार आहे. धर्माचा संबंध श्रध्देशी तर तत्त्वज्ञानाचा जन्मच संशयातून होतो. शरणागत मन आणि प्रश्न विचारणारी बुध्दी यांचे हे दोन वेगळे विषय आहेत... जे धार्मिक एकारलेपण कॉन्स्टंटिनोपलनंतर रोमच्या साम्राज्यात अतिशय क्रूरपणे अमलात आणले गेले त्याचा परिणामही तेवढाच भीषण होता. बायबलच्या सूचना व शिकवणच नव्हे तर चर्चच्या आज्ञांचे उल्लंघन वा त्याहून वेगळा विचार हाही दंडनीय अपराध ठरविला गेला. चौदा, पंधरा व सोळाव्या शतकात 'स्वतंत्र विचार करणाऱ्या स्त्रिया या चेटकिणी आहेत आणि प्रत्येक चेटकीण ही मृत्यूदंडाला पात्र आहे' अशी आज्ञाच रोमच्या चर्चने काढली. या काळात युरोपातील जिवंत जाळलेल्या स्त्रियांची संख्या कित्येक लाखांच्या पुढे जाणारी आहे.
ग्रीक तत्त्वपरंपरा रोमने अशी निकालात काढली तेव्हा ती जिवंत ठेवण्याचे व तीत नवी भर घालण्याचे काम अरब देशातील तत्त्वज्ञांनी व विचारवंतांनी केले. नवव्या आणि दहाव्या शतकात बगदाद हे मध्यपूर्वेतील फार मोठे ज्ञानकेंद्र होते. त्या शहराच्या एकाच रस्त्यावर ग्रंथविक्रेत्यांची शंभरावर दुकाने असल्याची नोंद इतिहासात आहे. खलिफा अल्-मामुनपासून सुरू होणारी ही ज्ञानपरंपरा अल्-किंदी, इब्न-हतवल, अबू अल्-हसन, इब्न रश्द, इब्न सीना, अल् क्वाझिमनी आणि उमर खय्याम इत्यादींनी पुढे नेली. याही परंपरेचा इस्लामच्या बंद्यांनी पुढे विनाश केला. पवित्र कुराणापलिकडे ज्ञान असूच शकत नाही. सबब, बाकी सारे विचार धर्मविरोधी व खोटे आहेत असे सांगून या बंद्यांनी या परंपरेच्या मुसक्या आवळल्या. परिणामी युरोपसारखेच अरबांचे ज्ञानविश्वही धर्मश्रध्देच्या अंधारात लुप्त झाले.
वेद ही ज्ञानाची मुळाक्षरे आहेत आणि त्याची अंताक्षरेही तीच आहेत ही सगळया वैदिकांची श्रध्दा बायबल व कुराणावर श्रध्दा ठेवणाऱ्यांहून प्राचीन आहे. तिचे स्वरुपही त्या श्रध्दांहून वेगळे नाही. वेद ही ईश्वराची संस्कृत भाषेतील निर्मिती आहे. ते अपौरुषेय आहेत. त्यात बदल वा दुरुस्ती होणे नाही ही भाषा पुढच्या काळात बायबल आणि कुरणाबाबतही वापरली गेली. तोराहविषयीची ज्यूंची श्रध्दाही याच पातळीवरची आहे. पुढे प्रत्येकच धार्मिक ग्रंथाविषयी ती वापरली गेली आहे. महाभारताविषयी 'हा जय नावाचा इतिहास आहे' असे खुद्द व्यासांनीच सांगून टाकल्यानंतरही 'जगात आहे ते सारे महाभारतात आहे आणि महाभारतात नाही ते जगातही कुठे नाही' असे म्हटले गेले. एखाद्या ग्रंथाचे महात्म्य वाढवून सांगण्यासाठीच केवळ असे म्हटले जात नाही. त्या ग्रंथाला ईश्वरीपण चिकटवण्यासाठी व तो ज्ञानाचा पूर्णविराम आहे हे सांगण्यासाठीच तसे म्हटले जाते. मग वेद अखेरचे ठरतात, उपनिषदे शेवटची होतात आणि गीता हा ज्ञानाचा पूर्णविराम होतो....त्यावर टीका येतात, भाष्ये लिहिली जातात, त्यांचे अर्थ आपापल्या कुवतीनुसार सांगणारे ज्ञानी पुढे होतात. मात्र त्याहून वेगळे सांगणारे पुढे येत नाहीत... झालेच तर या ग्रंथांनी तेव्हा तसे 'कां' सांगितले ते सांगायलाही कोणी धजावत नाही. धर्मात 'काय सांगितले' हा प्रश्नच तेवढा महत्त्वाचा असतो, 'कां सांगितले' हा प्रश्न पाखंडी ठरविला जातो.
एकटया वैदिक वा हिंदू धर्माबाबतच हे घडले असे नाही. बौध्द व जैन यासह देशात पुढे झालेल्या इतर धर्मपंथांबाबतही हे खरे आहे.. अमूक एक गोष्ट खरी कां, तर ती बुध्दाने सांगितली म्हणून. तमूक गोष्ट चुकीची कां, तर तसे महावीराने सांगितले म्हणून. 'बाबा वाक्यंम्' हा प्रकार फक्त वैदिकांनाच लागू होत नाही. देश विदेशातील सगळया धर्मपरंपरांना तो लागू होतो. नव्हे तोच त्या परंपरांचा आधारही होतो. गौतम बुध्दाच्या पश्चात नागार्जुनासारखे मोठे धर्मवेत्ते जन्माला आले. त्यांच्या परंपरने आठव्या व नवव्या शतकापर्यंत धर्माची पताका उंचावत ठेवली. मात्र बुध्दाच्या शिकवणीहून वेगळे असे त्या परंपरेतील कोणीही सांगितले नाही. महावीराच्या पश्चात आलेल्या जैन तत्त्वचिंतकांचीही स्थिती अशीच आहे. आपल्या धर्माच्या संस्थापकाने जे सांगितले तेच वेगवेगळया संदर्भात व परिमाणात नंतरच्या अनुयायांनी कित्ता गिरविल्यासारखे गिरविले आहे. मूळ शिकवणीविषयी शंका घेण्याचे, तिच्या खरेपणाविषयी प्रश्न विचारण्याचे किंवा या शिकवणीव्यतिरिक्त आणखीही वेगळे काही असू शकते आणि ते चांगलेही असू शकते असा विचार करण्याचा प्रयत्न या शिष्य परंपरेत कोणी केल्याचे कधी दिसले नाही.
परिणामी वेद, बुध्द, महावीर या साऱ्यांच्याच शिकवणी चाकोरीबध्द व बंदिस्त झाल्या. त्याहून वेगळा विचार पाखंड ठरविला गेला. अशा पाखंडांवर चार्वाकमताचे शिक्के उमटवून त्या अनैतिक व त्याज्य ठरविल्या गेल्या. एखादे धर्मचिंतन आत्मा अमान्य करते आणि तरीही पुनर्जन्म मान्य करते यातली विसंगती सांगण्याचेही धाडस अनुयायांच्या परंपरांना कधी करता आले नाही. यातून विचारांचे स्वातंत्र्य संपले आणि त्यांचा प्रवासही थांबला. धर्मश्रध्दांनी युरोप आणि मध्य आशियातील विचार परंपरा नाहिशा केल्या. भारतात याहून वेगळे काही झाले नाही. असलेच तर भारतातील तत्त्वचिंतनाचे रुपांतर कालांतराने धर्मश्रध्दांत होणे एवढेच ते वेगळेपण आहे. युरोपात आधी तत्त्वचिंतन व पुढे त्यांना मारक ठरलेल्या धर्मश्रध्दा असा प्रवास तर आपल्याकडे तत्त्वचिंतकच धर्मवेत्ते झाल्याने विचार त्यांच्यापाशी जन्माला आला व त्यांच्याचपाशी थांबल्याचे चित्र निर्माण झाले. चार्वाकांची चिंतन परंपरा आपले सगळे ग्रंथ कां गमावून बसली आणि विज्ञानाच्या जवळ जाणारा त्यांचा विचार अनैतिक कां ठरविला गेला या प्रश्नांच्या उत्तरात या विचारविरोधी धर्मपरंपरांचे अनिष्टपण सापडणारे आहे.
धर्म श्रध्दांहून वेगळा विचार करण्याचे व धर्माबाहेर काही चांगले असू शकते असे मांडण्याचे धाडस एकोणीस आणि विसाव्या शतकापर्यंतही भारतातील फार थोडयाच तत्त्वचिंतकांना करता आले आहे.
युरोपात प्रबोधनाचे युग 16 व्या शतकात सुरू झाले. औद्योगिक क्रांतीचा पायाही याच सुमाराला घातला गेला. जुन्या धर्मश्रध्दांचा पगडा कमी होणे आणि वैज्ञानिक विचारधारा क्रमाने प्रबळ होत जाणे याच काळात सुरू झाले. सरंजामशाहीची जागा औद्योगिक अर्थव्यवस्थेने घ्यायला याच काळात सुरूवात झाली. फ्रान्सिस बेकन आणि रेने देकार्त यांचा काळही हाच आहे. हे सहज घडले नाही. क्रांतीकारी नवविचारांच्या उद्गात्यांना त्यासाठी त्यांचा बळीही द्यावा लागला. पण विज्ञान आणि सत्याचे संशोधन यासोबत नवचिंतन वाढीला लागले आणि त्या जगाचा वैचारिक कायापालट काही काळातच झाला. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुध्द आणि फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेल्या नव्या मूल्यांनी या विचार स्वातंत्र्याला जबर चालना दिली. मानवी मूल्ये आणि वैज्ञानिक सत्यांच्या वाटाच त्यामुळे खुल्या झाल्या. चर्चचे प्राबल्य कमी झाले आणि पाश्चात्य जगाने धर्मनिरपेक्ष व मानवी मूल्याधिष्ठित समाज जीवनाचा व राज्यपध्दतीचा स्वीकार केला.
भारतात प्रबोधनाचे युग इंग्रजी राजवटीच्या प्रस्थापनेच्या काळात सुरू झाले. त्यावेळी प्रथमच जुनी मूल्ये, प्रथा, परंपरा, रुढी आणि श्रध्दांच्या बरेवाईटपणाची चर्चा सुरू होऊन त्यांना आव्हाने उभी होऊ लागली. राजा राम मोहन रॉयांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचे बुध्दीवादी विचारमंथन त्यातूनच पुढे आले. स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या लोकनेत्यांनी व विशेषतः त्यातील सत्याग्रही प्रवाहाला दिशा देणाऱ्या गांधीजींच्या कार्यशैलीने समाज ढवळून निघाला. शिक्षणाची दारे खुली झाली आणि त्यातून पुढे स्वातंत्र्य आले तेव्हा विचारही मुक्त झाला... गेल्या 60-70 वर्षांत विचार वाढला, विकसीत झाला. पण नव्या मूल्यांचा व विशेषतः तत्त्वचिंतनाचा जागर अद्यापही देशात सुरू होऊ शकला नाही. आजच्या राजकारणाचा व समाजकारणाचा भर समतेच्या आग्रहावर आहे. समतेचा हा विचारही आजचा नाही, तो जुना आहे. जेथे तो जन्माला आला तेथे त्याला ममत्वाच्या पातळीवर जाऊन पोहचणे जमले आहे. आता विचारांवर बंधने नाहीत, त्यांच्या अभिव्यक्तीला मर्यादा नाहीत. पण आजवर झालेला विचार पाश्चात्य तत्त्वविचारांच्या अनुकरणापलिकडे गेला नाही. तत्त्वज्ञान सोडा, पण राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र यासारख्या सामाजिक शास्त्रातही आमचा विचार स्वतंत्रपणे उभा झालेला कुठे दिसला नाही. साध्या सौंदर्यशास्त्रालाही स्वतःचे देशी वळण सापडले नाही.
आमचे राजकारणही धर्मश्रध्दांच्या गुंत्याबाहेर पडले नाही. प्रबोधनाचे युग सुरू होऊन दोनशे वर्षांचा काळ लोटला तरी आमच्या मनाभोवतीची जुनी तटबंदी तशीच कां राहिली? तू ब्रह्म आहेस, स्वतःला ओळख, अत्त दीप भव असे सांगणारी ज्ञानपरंपरा अजून आठव्या शतकाजवळ कां थांबली? तिचे आदर्श आजही सोळा सतराव्या शतकातलेच कां राहिले? आमचे मन थांबले की बुध्दी? की आम्हाला आहे तीच स्थिती मानवते? उद्याची भीती कां आणि स्वातंत्र्याचे भय कशासाठी? नव्या क्षितिजांचे भय म्हणून जुनीच कुंपणे मजबूत करण्याची ही मानसिकता आहे की उद्याच्या न पाहिलेल्या सूर्याहून आज ओळखीचा झालेला अंधार आम्हाला अधिक विश्वसनीय वाटतो?

No comments:

Post a Comment