राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेना यांच्यात सुरू झालेला आताचा वाद आज ना उद्या व्हायचाच होता. सबंध देश हे ज्या संघटनेचे कार्यक्षेत्र आहे तिचे मैत्र एका राज्यापुरते वा एका महानगरापुरते चिमुकले क्षेत्र ताब्यात ठेवू पाहणाऱ्या संघटनेशी फार काळ टिकणे शक्यही नाही. रा.स्व. संघाला पाऊणशे वर्षांचा इतिहास आहे आणि त्याचा शाखाविस्तार जम्मूपासून केरळपर्यंत आणि मुंबईपासून इम्फालपर्यंत झाला आहे. याउलट शिवसेना मुंबईत जन्मली, वाढली आणि बऱ्याच अंशी त्या शहरातच थांबून तुटली. प. महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तिला मिळालेले यश लक्षणीय नव्हते आणि तसे ते होण्याची शक्यताही आता उरली नाही. सेनेने कडव्या हिंदुत्वाचा पत्कर केला तेव्हा दिल्ली आणि राजस्थानातील काही कडव्या लोकांनी तिचे झेंडे आपापल्या भागात रोवले. परंतु हिंदुत्वाचा आग्रह धरला की आपले मराठीपण पातळ होते हे लक्षात येताच सेनेने हिंदुत्वाला आवर घालून आपले मराठीपण पुन्हा पुढे केले. विशेषतः सेनेच्या घरातच फूट पडून राज ठाकरे यांनी तिचा 'मराठी प्रयोग' लांबविला तेव्हा सेनेची बैठकच मोडल्यासारखी झाली. परिणामी कडव्या हिंदुत्वाकडून कडव्या मराठीपणाकडे तिचा कल वळला. तो तसा वळताना दिसताच दिल्ली व राजस्थानकडील शिवसैनिकांनी आपापल्या घरावर लावलेले सेनेचे झेंडे गुंडाळले. आताचे सेनेसमोरचे आव्हान महाराष्ट्रात व मुंबईत आपली पैठ राखणे हे आहे. राज ठाकरे यांच्या सवत्यासुभ्याने सेनेला मुंबईतच गारद केल्याचे विधानसभेच्या निवडणुकीत दिसले. महाराष्ट्राच्या इतर भागतही राज ठाकरे यांनी सेनेच्या आसनाखाली सुरूंग पेरल्याचे आढळले. त्यामुळे जमेल तसा महाराष्ट्र सांभाळणे आणि उरेल तेवढी मुंबई ताब्यात ठेवणे हे शिवसेनेसमोरचे अत्यंत मर्यादित उद्दिष्ट उरले. संघाची बाब वेगळी आहे. भाजप या अखिल भारतीय पक्षाचा राजकीय संसार त्याला सांभाळायचा आणि वाढवायचा आहे. गेली काही वर्षे भाजप आणि शिवसेनेने संयुक्तरित्या महाराष्ट्राचे राजकारण आखले व केले. त्यांच्या युतीने या राज्यात पाच वर्षे सत्ताही अनुभवली. मात्र महाराष्ट्रातील भाजप हा अ.भा.भाजपचा एक प्रादेशिक विभाग आहे आणि शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर अस्तित्व नाही. त्यामुळे साऱ्या देशावर स्थिरावलेली राजकीय दृष्टी आणि एका शहरावर खिळलेली बारीक नजर यांच्यात कधी ना कधी वितुष्ट यायचेच होते. तसे ते आता आले आहे.
शिवसेना व विशेषतः तिचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मुंबई ही त्यांची खासगी जहागीर असल्याचे गेल्या काही वर्षांपासून वाटू लागले आहे. त्यांची तशी समजूत करून देण्यात त्यांच्यावर छत्र-चामरे ढाळणाऱ्या त्यांच्या वरिष्ठ अनुयायांनीही फार मोठी भूमिका बजावली आहे. येथे याल ते आम्हाला विचारून, कराल ते आमच्या संमतीने आणि बोलाल ते आम्ही सांगू त्या भाषेत, ही त्यांची गुरकावणी मुंबईविषयीच्या त्यांच्या याच सरंजामी वृत्तीतून आली. तीत वाटा मागणाऱ्याला मुंबईबाहेरच नव्हे तर घराबाहेर काढण्याची त्यांची तयारी आहे व त्यांनी ती करूनही दाखविली आहे. याउलट संघाला त्याच्या हिंदुत्वाएवढेच आपले 'राष्ट्रीय' रूप जपायचे आहे. संघाच्या शाखेत हिंदी भाषिकांपासून तामिळ भाषा बोलणाऱ्यांपर्यंत आणि गुजरातीपासून असमिया भाषेपर्यंत साऱ्याच भारतीय भाषा बोलणारे स्वयंसेवक येणारे आहेत. संघाला धर्मदृष्टया संकुचित होणे जमणार असले तरी एकभाषीय होणे जमणार नाही. तशी भाषा त्याने नुसती उच्चारली तरी त्याच्या हिंदुत्वासमोर प्रश्नचिन्ह उभे होईल. त्यामुळे 'मुंबईत मराठी व फक्त मराठीच' ही भाषा ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने उच्चारताच संघाला आपली भूमिका स्पष्ट करणे भाग पडले आहे. 'तुम्ही स्वतःला राष्ट्रीय म्हणविता आणि तुमच्याशी युती करणारी सेना मात्र एकभाषीय हितसंबंधांचाच विचार करते' या विसंगतीवर भाजपलाही बोलणे आज ना उद्या भाग आहे. पण त्या पक्षाच्या हुशार पुढाऱ्यांनी ती जबाबदारी संघाच्या नेतृत्वावर सोपवून आपली सेनेसोबत असलेली युती धकविता येईल तोवर धकविण्याचे ठरविलेले दिसते. मोहन भागवत यांनी उशिरा का होईना या विषयाला सामोरे जाऊन 'मुंबई शहर हे साऱ्या देशाचे असल्याचे' तर जाहीर केलेच, शिवाय 'मुंबईत येणाऱ्या परभाषीयांना त्रास देणाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी सज्ज व्हा' असेही आपल्या स्वयंसेवकांना सांगून टाकले. त्यातून सेना परभाषिकांना थोपविणार आणि संघ त्यांना संरक्षण देणार असे त्यांचे सरळसरळ परस्परविरोधी पवित्रे उभे झाले. सेनेला असे आव्हान याआधी कोणत्याही राजकीय पक्षाने वा संघटनेने दिले नव्हते हे लक्षात घेतले तर सेनेच्या सामर्थ्याला पडलेल्या मर्यादांची जाणीव संघालाही पुरेशी झाली असावी हे स्पष्ट होते. 'राष्ट्रीय' संघाला सेनेची मुंबईवरील 'खासगी' मालकीही मान्य होण्याचे अर्थातच कारण नाही. संघाच्या या पवित्र्याला बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तर दिले नसले तरी मनोहर जोशी व उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या क्षीण आवाजात 'मुंबई मराठी माणसांचीच' असे भागवतांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तो भागवतांना अर्थातच मान्य होण्यासारखा नाही आणि ते तो मान्यही करणार नाहीत.
राष्ट्रीय पातळीवर विचार करणाऱ्या व साऱ्या देशाचा संसार मांडू पाहणाऱ्या संघटनांना व पक्षांना प्रादेशिक चूल बोळक्यांची भाषिक मांडणी तशीही मानवणारी नाही. स्वातंत्र्याच्या चळवळीचा राष्ट्रीय विचार अंगिकारणाऱ्यांना प्रादेशिक स्तरावर उंडारणारी माणसे तेव्हाही विरोध करीतच होती हे लक्षात घेतले की संघ वि. सेना या आताच्या तेढीचे स्वरूप आणखी स्पष्ट होऊ लागते. त्यांनी राष्ट्र म्हणायचे आणि यांनी धर्म, त्यांनी देशाचा विचार करायचा आणि यांनी जातीचा, त्यांनी राष्ट्रीय एकात्मता म्हणायचे आणि यांनी एकभाषीय अस्मितेचा पुकारा करायचा, या भूमिकांमध्ये काही काळ राजकीय तडजोडी होऊ शकल्या तरी त्यांच्यात कायमचे ऐक्य होणे शक्य नसते. जातपात, धर्मवंश, भाषा आणि त्यासारख्या जन्मदत्त कसोटयांचा आधार घेऊन आपल्या राजकारणाची मांडामांड करू पाहणाऱ्यांना राष्ट्रीय मूल्यांच्या फार जवळ जाता येत नाही, ती आत्मसात करणे मग दूरचेच राहते. राष्ट्राचा विचार आम्हीच करायचा काय ही त्यांची भाषाही अशावेळी तोकडी व राष्ट्राविषयीचे त्यांचे अजाणपण उघड करणारी ठरते. जातीपातीचे किंवा भाषेचे राजकारण काही काळ चमकदार वाटले तरी ते वाटणाऱ्यांचा वर्ग लहान असतो व त्या राजकारणाची चमकही अल्पजीवी असते. एका जातीचे वा भाषेचे राजकारण करून सत्तेवर आलेल्या पक्षांचे आणि संघटनांचे अल्पजीवीपण स्वतंत्र भारताच्या इतिहासातच सापडणारे आहे. ज्या संघटनांचे वा पक्षांचे आयुष्य पाऊणशे अन् सव्वाशे वर्षांचे आहे आणि ज्यांचा अखिल भारतीय प्रभाव आजही टवटवीत आहे त्यांचीही उदाहरणे देशात आहेत. मात्र देशकाळाचा विचार ज्यांना आपल्या हयातीपुरता, आपल्या कुटुंबाच्या वर्चस्वापुरता किंवा जातीवंशाच्या आकांक्षांएवढा मर्यादित राहूनच करता येतो त्यांना हा इतिहास सांगण्यात अर्थ नसतो. त्यांच्यासमोर देश नसतो. त्यांची भाषा वा जातच तेवढी असते. तीदेखील आपल्या मालकीहक्कांचे आरक्षण मजबूत करण्याएवढीच त्यांना लागत असते. सेनेचे नेमके असे झाले आहे. तिचे मराठीपण निर्विवाद असले तरी त्या मराठीपणाचे राजकारण संशयास्पद आहे. मराठीचे नाव पुढे करून आपले ठाकरी साम्राज्य सुरक्षित करण्यासाठी तिचा आटापिटा आहे. संघाच्या राजकारणाला एवढे संकुचित राहून चालणार नाही. हिंदुत्वाचे राजकारण करू पाहणाऱ्यांनाही त्या धर्माचे भाषिक तुकडे करू पाहणाऱ्यांचे राजकारण मानवणारे नाही. सबब, हा संघर्ष अटळ होता. तो कधीतरी व्हायचा होता. आता तो सुरू झाला आहे एवढाच त्यांच्यातील ताज्या विसंवादाचा अर्थ आहे.
No comments:
Post a Comment