जगाचा इतिहास एखाद्या मोठया नकाशासारखा डोळयांसमोर आणला की लक्षात येते, या इतिहासाच्या आरंभीच्या शतकांवर ईश्वरांच्या आणि धर्मसंस्थापकांच्या मुद्रा अंकित आहेत. हे प्रभु रामचंद्राचे, ते भगवान श्रीकृष्णाचे आणि नंतरचे गौतम बुध्दाचे अशी त्या त्या ईश्वरामुळे किंवा पुढे ईश्वररुप बनलेल्यांच्या वास्तव्य वा प्रभावामुळे प्रकाशमान झालेली शतके नजरेत भरतात. महावीर, येशू आणि नंतर मोहम्मद अशी धर्मसंस्थापकांची शतके त्यापासून म्हटले तर वेगळी करता येतात, न केली तरी त्यांच्या आणि ईश्वरी शतकांच्या मूळ स्वरुपात फारसा फरक नसतो. त्यानंतर येणारी शतके सम्राटांची आहेत. आपल्याकडे मौर्य आणि गुप्त सम्राटांची, मध्यपूर्वेत अलेक्झांडरच्या आक्रमणाची, सिझर आणि रोमच्या सत्ताकाळाची. उत्तरेत चंगेजखानादिकांची ही झंझावाती शतके आहेत. हा काळ थेट बाबर-औरंगजेबापर्यंत आणि विजयानगरच्या सम्राटांपर्यंतही पुढे आणता येतो. नंतरची शतके संतांची, महात्म्यांची, साधूपुरुषांची आणि समाज जागरणांची. त्याहीपुढे आलो की येणारी शतके समाजधुरिणांची, महापुरुषांची आणि लोकनेत्यांची दिसतात. इतिहासाचे हे स्थूलमानाने पहायचे विभाग आहेत. ते सर्वथा अन्यवर्जित नाहीत. त्यांच्या मर्यादाही पुसट, धूसर आणि बऱ्याच जागी एकमेकीत मिसळल्या आहेत.
या नकाशावर नजर फिरवीत 1950 च्या दशकापर्यंत पोहचलो की प्रथम लक्षात येणारी बाब ही की आता ईश्वर जन्माला येत नाहीत. धर्मस्थापनेच्या शक्यता संपल्यामुळे धर्मसंस्थापक येण्याची शक्यताही आता उरली नाही. आताच्या काळात सम्राटही गादीवर येणे नाही. आणखी सावधपणे पाहिले की ध्यानात येते, आता महात्म्यांनीही आपली साथ सोडली आहे. पूर्वेकडच्या जपानपासून पश्चिमेच्या अमेरिकेपर्यंत नजर दौडविली की ज्याला महापुरुष म्हणावे असे कोणी तीत भरत नाही.
हे असे कां झाले? आमची नजर कोती झाली की खरोखरीच त्या ईश्वरादिकांनी आमच्याकडे लक्ष न देण्याचे ठरविले?... जरा गंभीर होऊन विचार केला की ध्यानात येते समाजाच्या ज्या मानसिकतेत ईश्वर आणि धर्म जन्माला येतात, व्यक्ती आणि समूह यांची जी मानसिकता माणसांना सम्राट आणि महापुरुषांच्या मागे सक्तीने वा श्रध्देने नेऊन उभी करते ती मानसिकताच जगाने आता टाकली आहे. जग लहान झाले असे सारेच म्हणतात. पण जग लहान होण्याचे खरे कारण दळणवळणाची साधने गतीमान झाली हे नाही, ज्ञानाचा स्फोट हेही त्याचे मुख्य कारण नाही, जग लहान होण्याचे खरे कारण माणूस मोठा झाला हे आहे.
आजचे शतक ईश्वरांचे, धर्मसंस्थापकांचे, सम्राटांचे वा महात्म्यांचे नाही. हे सामान्य म्हणविल्या जाणाऱ्या माणसांचे शतक आहे. या शतकातला माणूस एकेकटाही स्वयंभू आहे आणि समूहवजाही सामर्थ्यवान आहे. त्याची ईश्वराची गरज संपली. धर्माचे संरक्षण घेण्याची आवश्यकता मागे पडली. सम्राटांचे नियंत्रण त्याला जाचक वाटू लागले आणि मार्गदर्शनासाठी कोणा मोठया माणसाकडे जावे असेही त्याला वाटेनासे झाले... माझा निर्णय मला घेता येईल, त्यासाठी या साऱ्या गोष्टींवर विसंबून राहण्याची किंवा त्यांच्याकडे डोळे लावून बसण्याची माझी तयारी नाही, अशी ही मानसिकता आहे. ती एकाच वेळी सामान्य आणि महानही आहे. यातली जी माणसे बेपर्वा वा बेफिकीर दिसतात त्यातल्या साऱ्यांना आत्मनिर्भरतेचा नेमका अर्थ कळत नसेलही कदाचित. पण त्या स्वयंभूपणाचा ही माणसे नकळत कां होईना अनुभव घेत असतात. ज्यांना या स्वयंनिर्भरतेचा अर्थ अनुभवानिशी व नेमका कळत असतो त्यातले अनेकजण त्यामुळे धास्तावलेही असतात. स्वातंत्र्याचे भय या नावाचीही एक प्रसिध्द मानसिकता आहे. माझा भर माझ्यावर आणि माझे निर्णय माझेच, असे एकदा निश्चित झाले की माझ्या कृतीचे फळ आणि प्रायश्चित्तही माझेच होते. या विधानाच्या आरंभीच्या भागाचे प्रत्येकालाच आकर्षण तर पुढच्या भागाचे भय भेडसावणारे होते.
माणसे स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होऊ लागली की फक्त ईश्वर, धर्म, सम्राट आणि महात्मेच लोप पावू लागतात असे नाही. त्यांनी जन्माला घातलेल्या आणि त्यांच्यावर आधारीत असलेल्या सर्व व्यवस्था आणि संरचनाही दुबळया होऊ लागतात. त्यांनी माणसांवर घातलेले निर्बंध सैल होतात आणि त्यांचे आजवर वाटत आलेले भयही ओसरू लागते. हा परिणाम केवळ धार्मिक वा सामाजिक क्षेत्रातच होत नाही. तो राजकारणाच्या आणि जीवनाच्या इतर क्षेत्रातही दिसत असतो. धर्मकारणापासून कुटूंबकारणापर्यंत या नव्या मनुने घडवून आणलेले असे परिवर्तन उघडया मनाला आणि खुल्या दृष्टीला जाणवणारे आणि दिसणारेही आहे. माणसे खुल्या मनाने बोलत वा मान्य करत नसली तरी हा बदल मनोमन त्यातल्या बहुतेकांनी जाणला आहे. त्यातल्या अनेकांना त्याने सुखावले तर काहींना धास्तावले आहे.
1960 च्या दशकात पुरीच्या शंकराचार्याविरुध्द, त्याने दलितांविषयीची आक्षेपार्ह विधाने केल्याचा देशात निषेध होत होता. त्या वक्तव्यांसाठी त्याला अटक करावी अशी मागणी संसदेत झाली तेव्हा लोकनायक बापूजी अण्यांसारखा सूज्ञ आणि अधिकारी विचारवंत लोकसभेत म्हणाला, शंकराचार्यांना अटक झाली तर देश पेटून उठेल. त्या घटनेला 40 वर्षे झाली तेव्हा तामिळनाडू सरकारच्या पोलिसांनी कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्याला त्याच्या उत्तराधिकाऱ्यासह बेडया ठोकल्या आणि तुरूंगात डांबले. त्या घटनेची साधी प्रतिक्रियाही कुठे उमटली नाही. जी थोडी उमटली तिचे राजकीय स्वरुपही साऱ्यांच्या लक्षात येऊन चुकले... पं. नेहरू, शास्त्रीजी किंवा इंदिरा गांधी यांची साधी नावे उच्चारतानाही एकेकाळी माणसे गंभीर होत. त्या आधीच्या नेत्यांची नावे घेताना ती नम्रही होत. नंतरच्या काळात विश्वनाथ प्रतापसिंगांपासून जे अनेकजण पंतप्रधानपदावर आले त्यांची नावे ओळीने कोणाला आता आठवायचीही नाहीत... जातींच्या पुढाऱ्यांचा दबदबा ओसरला. शाही इमामाच्या फतव्याचे बळ कमी झाले. निवडणूक म्हटली की जातींच्या पुढाऱ्यांना पकडणे, त्यांना तिकिटे देणे, त्यांची मनधरणी करणे आणि कसेही करून त्यांना सोबत घेणे एवढाच राजकारणाचा भाग असे. आता जाती आणि धर्म बहुमुखी आणि बहुकेंद्री झाले आहेत. एकाच जातीत किंवा धर्मात एकाहून अधिक प्रवाह आले, जेवढे प्रवाह तेवढे त्यांचे पुढारी झाले, पुढे पुढे एकाच प्रवाहात नव्हे तर एकाच घरात तू पुढारी की मी पुढारी असे कलह उभे झाले... हा सारा जुन्या संरचना दुबळया होण्याचा परिणाम आहे.
सर्वच क्षेत्रातील सत्तेचे विकेंद्रीकरण आणि समूहकेंद्री मानसिकतेच्या जागी व्यक्तीकेंद्री मानसिकतेचे आगमन ही आताच्या या परिवर्तनाची दिशा आहे. हे थेट कुटूंबाच्या पारंपारिक व्यवस्थेतही घडले आहे. एकेकाळी कुटूंबप्रमुखाचा शब्द त्यात प्रमाण असे. तो म्हणेल ती पूर्व ठरे. आताच्या विकेंद्रित आणि लोकशाही कुटूंबात 'घरच्या बाईंनाही जरा विचारून घ्या' असे म्हटले जाते. घर जास्तीचे सुसंस्कृत असेल तर 'घरातल्या सुनांचेही मत घ्या' असे चर्चेत येते. त्याही पुढच्या पायरीवर हा परिणाम पाहता येणारा आहे... सत्तेचे विकेंद्रीकरण आणि मानसिकतेचे व्यक्तिकेंद्री स्वरुप यांच्या जोडीला हा ज्ञानाच्या स्फोटाचाही काळ आहे. 18 व्या शतकापर्यंतचा ज्ञानाचा प्रवास मंदगतीचा होता. अगोदरच्या शतकापर्यंतचे ज्ञान त्या काळातील समाजाला तेव्हा पुरेसे वाटायचे. 19 व्या शतकात ते अपुरे वाटू लागले. दर काही वर्षांनी ज्ञानाच्या क्षेत्रात पडणाऱ्या नव्या भरीमुळे गेले दशकच नंतर जुने वाटू लागले. 21 व्या शतकात ही गती आणखी वाढली. आता कालचा विषय आजच जुना ठरू लागला आहे.
आपल्याकडील जुन्या पिढया रामायण-महाभारत, बुध्द-ज्ञानेश्वरांच्या गोष्टींवर आणि पुढे साने गुरुजींच्या संस्कारांवर वाढल्या. त्यात आई-वडील, गुरुजन हे सारेच पूज्य होते. आताची अवस्था जरा डोळे उघडून पाहिली तर या साऱ्या प्रकाराला छेद देणारी आहे हे लक्षात येते. दहाव्या वर्गात गेलेल्या मुलाला आणि मुलीलाही आपल्या आईला काही कळत नाही असे वाटू लागते. बारावीतल्या पोरा-पोरींचा बापांविषयीही तोच समज होतो आणि कॉलेजात एकदोन वर्षे घालविली की आपल्या शिक्षकांनाही पूर्वी वाटायचे तेवढे फारसे कळत नाही या निर्णयावर ही मुले येतात... पिढयांमधील अंतरामुळे हे झाले नाही, नवी पिढी बिघडल्याचाही हा परिणाम नाही. असलाच तर तो ती लवकर वयात आल्याची परिणती आहे.
जग लहानच नव्हे तर सपाट होऊ लागले आहे. त्यातली अंतरे कमी झाली तसे त्यातल्या माणसांच्या उंचीचे कमीअधिकपणही कमी होऊ लागले आहे. सत्ताधाऱ्यांविषयीचा भीतीयुक्त आदर संपला. धर्माधिकाऱ्यांविषयीचे धास्तावलेपण इतिहासजमा झाले. वडिलधाऱ्यांविषयीच्या आदराची जागा मैत्रीने घ्यायला सुरुवात केली आणि इतरांच्या संदर्भात स्वतःचा विचार करण्याची वृत्ती जाऊन स्वतःच्या संदर्भात इतरांचा विचार करण्याची वृत्ती स्थिर झाली.... माणूस समूहगत न राहता व्यक्तीगत झाला.
या अवस्थेचे परिणाम उघड आहेत. आपल्या आजवरच्या व्यवस्थाच नव्हे तर विचारसरणीही समूहगत आहेत. धर्म, जाती, राज्य या साऱ्या समूह मानसिकतेतून जन्माला आलेल्या बाबी आहेत. सगळया रुढी, परंपरा, चालीरीती आणि जीवनशैलीशी संबंध असलेल्या साऱ्या आपल्या सवयीही समूहधार्जिण्या आहेत. त्याही पुढे आपले परंपरागत विचारधनही समूहकेंद्री दृष्टीकोनानेच घडविले आहे. व्यास-वाल्मिकी आणि बुध्द-शंकराचार्यच नव्हे तर प्लेटो-ऍरिस्टॉटल, येशू-पैगंबर या साऱ्यांपासून अलिकडच्या काळातील मार्क्स आणि एंजल्सपर्यंतच्या साऱ्यांनी व्यक्तीला कमी तर समुदायाला अधिक महत्त्व दिले. जाती व वर्गाचा विचार करणाऱ्यांनीही नेमकी अशीच वाटचाल केली. समाजाच्या कल्याणाचा आणि सामुहिक उत्थानाचा विचार करणाऱ्या तत्त्वज्ञांची आणि त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या महापुरुषांची दृष्टीही अशीच समूहाधारित राहिली. त्यामुळे 'समाज, देश आणि वर्ग यांच्या हितासाठी स्वहिताकडे दुर्लक्ष कर, प्रसंगी त्याचा बळी द्यायला सिध्द अस' असा एकेकाळी तेजस्वी वाटणारा उपदेश करणारे लोक समूहमार्गी असतील तर त्याचे आश्चर्य वाटू नये.
आताचा प्रश्न आजच्या नव्या व्यक्तीकेंद्री आणि व्यक्तीगत अवस्थेत समूहाधारित व्यवस्था आणि विचारसरणी कितपत मार्गदर्शक ठरू शकतील आणि टिकतील हा आहे. नव्या समाजाला नवी व्यवस्था आणि अनुरुप विचारसरणी लागणार असेल तर आजवरच्या परंपरा आणि चिंतनाचे प्रवाह तिला जाचक ठरतील की नाही?
या आधीच्या विचारप्रवाहात व्यक्तिगत आणि आत्मकेंद्री विचारसरणी नव्हत्याच असे नाही. सुखवाद्यांचे वर्ग आणि जडवाद्यांचे काही प्रवाह तसे होते. अहं ब्रह्मास्मि किंवा अत्त दीप भव् यातून मिळणारे मूळ मार्गदर्शनही समूह पातळीवरचे नाही. कमालीचे व्यक्तीगत व तेही आत्म किंवा स्वज्ञानप्रधान आहे. मात्र हे विचारप्रवाह साऱ्या समाजावर आपला प्रभाव टाकण्याएवढे सामर्थ्यवान तेव्हाही नव्हते. त्यांचा अंगिकार केलेली माणसेही एकाकी आणि दूरची व फारतर उपदेशकाची भूमिकाच बजावत राहिली. ऍरिस्टॉटल किंवा नागार्जुन मार्गदर्शक होतो, नेता होत नाही. त्यातला जो कोणी धर्माचा आधार घेईल त्याचा विचार आत्मगत राहिला तरी आचार पुन्हा समूहगत होत असतो.
प्रत्येकच स्थित्यंतराच्या काही मागण्या असतात. तशा त्या याही बदलाच्या आहेत. ईश्वर, धर्म, जात, विचारसरणी आणि समूहशीलता यातून व्यक्तीला एक संरक्षक कवच प्राप्त होते. त्याचे स्वरुप मानसिक असले तरी ते माणसाला सुरक्षेचा दिलासा देत असते. या व्यवस्था गळून पडल्या की येणाऱ्या स्वातंत्र्यासोबतच एक असुरक्षितपणही येत असते. आपले निर्णय ईश्वरावर, धर्मावर, जातीच्या पुढाऱ्यावर किंवा विचारसरणीच्या छापील पुस्तकावर सोपवून चालणारे नसते. परंपरागत समजांवरही ते सोपविता येत नाहीत. या स्थितीत आपल्या निर्णयाच्या चांगल्या-वाईट परिणामांचे धनी स्वतःलाच व्हावे लागते. त्याचे श्रेय वा अपश्रेय इतरांवर सोपवून मोकळे होण्याची सोय या व्यवस्थेत उरत नाही. स्वातंत्र्य ही नुसती सुखावह बाब नाही, असुरक्षिततेचे भय सोबत आणणाराही तो मूल्यव्यवहार आहे.
या भित्र्या मानसिकतेतून बुवाबाजांचाही जन्म होतो. काही काळ देवळांत आणि प्रार्थनाघरांत जाणाऱ्यांची गर्दी वाढते. बाबा आणि बापू यांच्या प्रवचनांतून दिलासा मिळविणाऱ्यांचे वर्ग वाढतात. दैवी अंगठया, अंगारे-धुपारे यांचे महात्म्य बळावते. पण तो प्रकारही सार्वत्रिक नसतो. बुवाबाबांच्या मागे जाणाऱ्या आईबापांची पोरे त्यांच्या मागे जातीलच असे नाही. ती आईबापांना वेडयात काढत नसतील असेही नाही. परदेशात गेलेल्या एकाकी पोरांना आपले देवधर्म जरा जास्तीचे जवळचे वाटू लागलेले दिसतात तेव्हा त्या मागेही हीच भित्री मानसिकता दडलेली असते.
समूहकेंद्री भूमिकांच्या मागे पडण्याची एक परिणती आपण आजच अनुभवत आहोत. अशा भूमिकांत आणि विचारांत ज्यांचे हितसंबंध दडले आहेत ती माणसे आपापली आयुधे व अनुयायी घेऊन नव्या प्रवाहांविरुध्द उभी होताना याच काळात दिसत आहेत. धर्माचा ताबेदार, सत्तेचे दावेदार आणि संपत्तीचे रखवालदार या साऱ्यांनाच नव्या व्यक्तिगत क्रांतीमुळे आपले बळ कमी होत असल्याचे लक्षात आले आहे. ते फिरून मिळविण्यासाठी कधी देश संकटात असल्याच्या, कधी धर्म आपत्तीत सापडल्याच्या तर कधी परंपरागत संस्कृती बुडायला आल्याच्या घोषणा करीत ते आपली जाऊ पाहणारी सत्ता स्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या साऱ्यांना आर्थिक बळ देणारे धनवंतांचे वर्ग त्यांच्याकडून आपले हितसंबंध जमेल तेवढे सुरक्षित करून घेतानाही दिसत आहेत.
आपण पुन्हा आचार-विचाराच्या एका नव्या वळणापर्यंत आलो आहोत काय? ते वळण ओलांडून जाण्याचे धाडस आपण करणार आहोत काय? की त्या वळणापलिकडच्या विश्वदर्शनाचे भय मनात आणून इकडेच थांबायचे ठरविणार आहोत? कोणतेही मन्वंतर साऱ्या व्यवस्था एकाएकी बदलत नाही. त्याच्यासोबत स्वतःला बदलून घेणे साऱ्यांना जमणारेही नसते. काहीजण पुढे जातात, काही तिथेच रेंगाळतात तर काही मागे राहतात. एक वर्ग अजिबात न बदलण्याची जिद्द राखणाऱ्यांचाही असतो... मन्वंतर व्हायचे ते थांबत नाही. बदलणारे, न बदलणारे आणि रेंगाळणारे यांच्यामुळे जुने तणाव नव्या स्थितीतही काही काळ टिकून राहतात... मन्वंतर थांबत नाही, बदलणाऱ्यांची धास्ती थांबत नाही आणि न बदलणाऱ्यांचे कासावीस होणेही सुरूच राहते.
No comments:
Post a Comment