Pages

Thursday, April 15, 2010

सुरेश द्वादशीवार यांचे 'वर्तमान'

राजकीय जीवनाचे
चित्तवेधक चित्रण

ग.प्र. प्रधान

'वर्तमान' या सुरेश द्वादशीवारांच्या कादंबरीमध्ये 2000 ते 2002 या दोन वर्षातील भारताच्या राजकारणाचे आणि राजकीय नेत्यांचे मार्मिक चित्रण आहे. परंतु हे स्थूल चित्रण नाही. राजकारणातील अंत:स्थ, प्रकाशात न आलेल्या कानाकोपऱ्यांवर (शॅडोओ इंटिरिअर्सवर) अज्ञात वादळांवर आणि नेत्यांच्या मानसिक आंदोलनांवर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे.
संघर्ष हा नाटयाचा आत्मा असतो आणि संघर्ष हाच राजकारणाचा स्थायीभाव असतो. त्यामुळेच राजकारण हे नाटयपूर्ण असते आणि त्यामध्ये प्रत्यक्ष न गुंतलेल्यांनाही ते चित्तवेधक वाटते. मात्र जीवनातील प्रत्येक महत्त्वपूर्ण घटनेतही काही व्यवहाराचा गद्य रुक्ष भाग असतोच. त्याचप्रमाणे राजकारणातही काही दैनंदिन चाकोरीतून जाणारा भाग असतोच. मात्र त्या वरवर रटाळ वाटणाऱ्या घटनांचाही राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या सत्ता संघर्षाशी संबंध असतो. आपण सर्वजण वृत्तपत्रातून बहुतेक बातम्या वाचतो आणि जेथे आपण राहतो त्या प्रदेशातल्या काही घटना आपल्याला जवळून दिसतात. वृत्तपत्रांतील बातम्या, वर्णन आणि लेख यांच्यामधून राजकीय नेत्यांच्या आणि राजकीय पक्षांच्याही प्रतिमा जनमानसात रूढ होतात आणि ज्यावेळी या प्रतिमांशी सर्वथैव विसंगत असे काही घडते त्यावेळी आपल्या मनातील रूढ प्रतिमांना तडा जातो. जाणत्या माणसांना काही गोष्टीचा फेरविचार करावासा वाटतो. काही नेत्यांना त्याच्या वृत्तपत्रातील वरवरच्या वर्णनामुळे आपण समजतो त्यापेक्षा ते वेगळे आहेत, हे या जाणकारांच्या लक्षात येते. द्वादशीवार यांच्या कादंबरीतून घटनांच्या मागील राजकीय प्रवाहांचे, विचारांचे, नेत्यांच्या निर्णयामागील त्यांच्या मनातील संघर्षाचे चपळ चित्रण आहे.
इ.स. 2000 ते 2002 या कालखंडातील भारताच्या राजकारणाचे वास्तवचित्र द्वादशीवार यांनी रेखाटले आहे. मात्र हे छायाचित्र नाही. या कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणामध्ये राजकीय क्षेत्रातील एक अगर दोन घटना, त्या घटनेच्या अगर घटनांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या राजकीय नेत्याची भूमिका, त्याचा अन्य नेत्यांशी आणि काहीवेळा प्रभासकुमार या ज्येष्ठ पत्रकाराशी होणारा संवाद आणि मुख्यत: या सर्वांमधून व्यक्त होणारे त्या नेत्याचे मानस दाखविणे हे द्वादशीवारांचे उद्दिष्ट असते. सदर उद्दिष्ट ते कुशलतेने साध्य करतात. हे करताना द्वादशीवार यांनी नेत्यांची आणि अन्य व्यक्तींचीही नावे बदलली असली तरी त्यांची ओळख आपल्याला सहज पटावी इतके ते बदल अल्प आहेत. द्वादशीवार यांनी प्रत्येक प्रकरण लिहिताना त्या विशिष्ट प्रदेशाची राजकीय पार्श्वभूमी इतकेच नव्हे तर त्या प्रदेशाची ऐतिहासिक आणि सामाजिक माहितीही अत्यंत मार्मिक रीतीने सांगितल्यामुळे या सर्व लेखनात कलात्मकता आणि समाज जीवनाचे आणि राजकारणांचे तपशील यांचा सुंदर मिलाफ झाला आहे. द्वादशीवार यांचा व्यासंग, त्यांचे भारतीय राजकारणाचे आकलन, प्रत्येक महत्त्वाच्या घटनेची नेमकी माहिती देताना त्या घटनेमागे असलेले राजकीय प्रवाह, वेगवेगळया राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्यांच्या गटातील ताणतणाव, राजकीय नेत्यांच्या मनातील वादळे, निकटच्या सहकाऱ्यांशी त्यांचे होणारे मतभेद आणि सूक्ष्म संघर्ष या सर्वांवर लेखकाने टाकलेल्या प्रकाशामुळे 'वर्तमान' ही कादंबरी चित्तवेधक झाली आहे. जाणकारांना या कादंबरीत पुन: प्रत्ययाचा आनंद मिळेल आणि राजकारणापासून दूर असणाऱ्या पण त्यामध्ये रस घेणाऱ्या वाचकांना ही कादंबरी वाचल्यावर भारतीय राजकारणाच्या गेल्या दोन वर्षांमध्ये प्रकर्षाने जाणवलेल्या वैशिष्टयाचे सम्यग् दर्शन होऊ शकेल.
भारतातील राजकीय घडामोडींचे चित्र रेखाटताना दिल्ली आणि पंतप्रधान हे केंद्रस्थानी असणारच. द्वादशीवार यांनी प्राचीन काळापासून दिल्लीने कोणकोणत्या राजवटी पाहिल्या. या राजधानीचे वैशिष्टय काय हे विस्ताराने सांगून आपल्या देशाच्या राजधानीचे व्यक्तिमत्त्व बरोबर उभे केले आहे. देशाची नौका हाकारताना पंतप्रधानांच्या मार्गात सतत येणाऱ्या अडचणी, त्यांची मानसिक आंदोलने हे सारे नेमकेपणाने सांगून द्वादशीवार यांनी पंतप्रधानांची व्यक्तिरेखाही अचूक रंगविली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये भारतात लोकांच्या जीवनाला हादरे देणाऱ्या ज्या घटना घडल्या, त्यांचेही वर्णन या कादंबरीमध्ये आहे.
ओरिसामधील कुष्ठरोग्यांमध्ये आयुष्यभर काम करणारे फादर स्टीफन्स आणि त्यांची दोन लहान निरागस मुले यांना जाळण्याच्या प्रकाराचे वास्तव वर्णन करून त्यावर लेखकाने भेदक प्रकाश टाकला आहे. राजस्थानमधील माधोपूर येथील सती प्रकरणांतून मनुवादी, अंधश्रध्दाळू हिंदू समाज किती निर्घृण होतो हेही द्वादशीवार यांनी दाखविले आहे. त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्रात अधिकारी असलेल्या कांचीचे शंकराचार्य आणि उदारमतवादी इमामसाहेब यांच्या संयमशील भूमिकेचाही द्वादशीवार यांनी औचित्यपूर्ण परिचय करून दिला आहे. बिहारमधील रंजन प्रसादांच्या (प्रत्यक्षातील लालूप्रसादांच्या) भूमिकेचे विपर्यस्त चित्रण न करता त्यांच्या आत्मविश्वासाचे आणि खास शैलीचीही वैशिष्टये द्वादशीवार यांनी रेखाटली आहेत. स्वातंत्र्यपूर्ण काळात म.गांधींच्या सत्याग्रही स्वातंत्र्य संग्रामात एकत्र असलेले दोन कार्यकर्ते पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक कसे बनतात, हे राजकारणातील नाटय केरळमधील के.आर. आणि बी.आर. या दोन नेत्यांच्या व्यक्तिरेखांद्वारे लेखकाने बहारीने रंगविले आहे. त्यामानाने कलकत्त्यातील कम्युनिस्ट नेत्यांनी केलेला त्यांच्या भूमिकेचा फेरविचार, आसाममधील एका मंत्र्यांचे प्रेमप्रकरण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तारेवरची कसरत, महाराष्ट्रातील राजकारण ही काही प्रकरणे नीरस झाली आहेत. काश्मीरमधील परिस्थितीच्या आवर्तात सापडून अतिरेकी बनलेला फारुख, तसेच खलिस्तानवादी वर्तुळात सामील झालेला सुबेगसिंग आणि तेलंगणातील पीपल्स वॉर ग्रुपमधील गोपण्णा आणि राजी यांच्या अंतरंगाचे अत्यंत सहृदय चित्रण द्वादशीवार यांनी केले आहे. 'वर्तमान' या कादंबरीतील हा माझ्या मते सर्वोत्कृष्ट भाग आहे. फारुखचे काश्मीरवरील प्रेम, मौलाना आझादांच्या कुरणविषयक सत्यशोधनाची त्याने दाखविलेली जाण, त्याचबरोबर त्याची स्पष्ट वैचारिक भूमिका, फारुखची दोन्ही बाजूने झालेली कोंडी, शासनाचा त्याला आलेला कटू अनुभव, दहशतवादाच्या वादळात सापडलेले त्याचे मन, त्याच्या उमद्या व्यक्तिमत्त्वाची होरपळ हे सारे वाचताना आपण अस्वस्थ होतो. सुबेगसिंग व त्याचा खलिस्तानी कमांडर साहिबसिंग या अतिरेक्यांमधील संवाद असो, तेलंगणातील जमीनदार आणि पोलिस यांच्या अत्याचारांमुळे पेटून उठलेला गोपण्णा असो, की जिला बळजबरीने नवऱ्याच्या चितेवर ढकलण्यात आले आणि मृत्यूनंतर जिचे सती म्हणून मंदिर बांधले जाईल ती माधोपूरमधील जयमती असो, या घटना बधिर मनाच्या हिंदू समाजाला ऐकू येणार नाही, हेही द्वादशीवार यांना ठावुक आहे; तरीही भारताच्या, कानाकोपऱ्यातील वर्तमानकालीन वादळांचे, उद्रेकांचे, उत्पात, व्यतिपातांचे, भान, उत्कट भान त्यांना आहे, याचे मला समाधान वाटते. हे त्यांनी लिहिले नसते तर 'वर्तमान' अगदीच अपुरे राहिले असते.
'वर्तमान' या कादंबरीमध्ये 2000 ते 2002 या काळातील भारताच्या राजकीय जीवनाचे चित्रण सुटया-सुटया प्रकरणातून करताना लेखकाने एक सुंदर आकृतिबंध रेखाटला आहे. कॅलिडोस्कोपमध्ये तीन काचांच्या साह्याने एकत्र ठेवलेल्या सुटया तुकडयांमधून अनेक डिझाईन्स दिसतात, तसे भारताच्या राजकारणाचे हे कॅलिडोस्कोपिक दर्शन आहे. राजकारण हा वरवर गद्य वाटणारा विषय द्वादशीवार यांनी कलापूर्ण रीतीने हाताळला आहे. परंतु अशा विविध रंगीबेरंगी आकृती दाखविणे हे केवळ द्वादशीवारांचे उद्दिष्ट नाही. गेल्या दोन वर्षातील राजकारणात पंतप्रधानांना केंद्रातील आघाडीचे शासन चालविताना सत्ता टिकविण्यासाठी ज्या तडजोडी कराव्या लागल्या, त्यांच्यामधून आजच्या राजकारणाचे चित्र स्पष्टपणे रेखाटणे हे द्वादशीवार यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे करण्यासाठी प्रभासकुमार या ज्येष्ठ पत्रकाराची व्यक्तिरेखा, त्यांची जीवनशैली, त्यांची कार्यपध्दती आणि त्यांचे महत्त्वपूर्ण अग्रलेख या सर्वांचा वापर द्वादशीवार यांनी फार कुशलतेने केला आहे.
एका बाबतीत मात्र ही कादंबरी अपुरी पडली आहे. देशाच्या जनतेच्या जीवनाच्या घडणीच्या दृष्टीने शासनाचे आर्थिक धोरण हे सर्वात अधिक महत्त्वाचे असते. आजच्या जगाच्या नव्या आर्थिक घडीमध्ये ग्लोबलायझेशनच्या नावाखाली मुख्यत: अमेरिका आणि अन्य सधन देशांनी भारतासारख्या विकसनशील देशाला खच्ची करून, त्याचे पराकोटीचे आर्थिक शोषण करावयाचे हे धोरण स्वीकारले आहे. भारताला आर्थिकदृष्टया गुलाम करून टाकण्यासाठी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यांचे जाळे अमेरिकेने पसरले आहे. या नव्या आर्थिक आवर्तातून सुटणे आज तरी भारतीय राज्यकर्त्यांना आणि प्रमुख राजकीय पक्षांनाही अशक्य वाटते. ग्लोबलायझेशन पासून पूर्ण फारकत घेणे कठीण आहे आणि त्याचवेळी भारताच्या गळयाभोवती आर्थिक गुलामगिरीचा फास आवळला जात आहे. बेकारीमुळे तरुणपिढीचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. या भीषण संकटांचे चित्रण द्वादशीवार यांनी केलेले नाही. या संदर्भातील ओझरते उल्लेख अगदी अपुरे असून, या दाहक सर्वनाशी संकटाची नीटशी दखल द्वादशीवार यांनी घेतलेली नाही, ही 'वर्तमान' या कादंबरीतील फार मोठी उणीव आहे. राजकीय, आर्थिक आणि सामाजिक जीवन याची एक गुंफण असते आणि त्यातून देशाचे जीवन घडत असते. हा तिपदरी गोफ कसा विणला जात आहे हे 'वर्तमान'वरून मुळीच समजत नाही. सुरेश द्वादशीवार यांनी त्यांचे लक्ष केवळ राजकारणावर केंद्रित केले आहे आणि त्या राजकारणातील वैचारिक प्रवाहांपैकी हिंदुत्वाचे स्वरूप त्यांनी स्पष्टपणे रेखाटले असले तरी सामाजिक न्याय आणि समता या मूल्यांच्या आधारे केल्या जाणाऱ्या 'नर्मदा बचाओ' सारख्या संघर्षाची त्यांनी दखलही घेतलेली नाही. त्याचप्रमाणे कम्युनिस्ट राजवटीत झालेल्या बदलाची त्यांनी पूर्ण उपेक्षा केली आहे. ग्रामीण जनतेचा पुरुषार्थ जागृत करणाऱ्या विधायक प्रयत्नांकडेही त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. बदलत्या परिस्थितीत आजवर उपेक्षित राहिलेले तळागाळातील समाज, त्याचप्रमाणे स्त्रिया, यांच्या जागृत होणाऱ्या आकांक्षा आणि सत्तेत सहभागी होऊन आपण आपले जीवन बदलले पाहिजे याची त्यांच्यातील वाढती जाणीव यांच्या चित्रणाशिवाय भारतातील वास्तवस्थितीचे खरेखुरे स्वरूप मांडताच येणार नाही म्हणून 'वर्तमान' ही कादंबरी लिहून 2000 ते 2002 या काळातील भारताच्या राजकीय स्वरूपावर प्रकाश टाकण्यात सुरेश द्वादशीवार यशस्वी झाले असले तरी भारतीय जीवनाचे व्यापक वास्तव त्यांनी रेखाटले नाही. मी हे मान्य करतो की लेखकाने कशावर लिहावयाचे हा त्याचाच अधिकार असतो. ते सांगण्याचा अधिकार समीक्षकांचा नाही. सुरेश द्वादशीवार यांनी 'वर्तमान'मध्ये भारताच्या राजकीय जीवनाचे चित्र रेखाटावयाचे ही लेखनाची कक्षा निश्चित केली आहे आणि या त्यांच्या चित्रणामध्ये वास्तवता आणि कलात्मकता यांचा विलोभनीय संगम झाला आहे. भाऊसाहेब माडखोलकर हे मराठीतील पहिले राजकीय कादंबरीकार त्यांच्यानंतर नागपूरचे वसंत वरखेडकर आणि अमरावतीचे अरुण साधू यांनी वैशिष्टयपूर्ण आणि प्रभावी राजकीय कादंबऱ्या लिहिल्या. सुरेश द्वादशीवार यांनी ही परंपरा चालविताना 'वर्तमान' ही कादंबरी लिहून मराठीतील राजकीय कादंबरीचे दालन अधिक संपन्न केले याबद्दल मी त्यांना मन:पूर्वक धन्यवाद देतो.

'वर्तमान'
- सुरेश द्वादशीवार
प्रकाशक - विद्या विकास पब्लिशर्स
धंतोली, नागपूर
किंमत - चारशे रुपये

No comments:

Post a Comment