प्रत्येक शतकाची एक भाषा असते आणि ती कालानुरुप बदलते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या शब्दांना आज आलेला अर्थ फ्रेंच राज्यक्रांतीनंतरचा आहे. त्या आधीही हे शब्द होते पण त्यांना आजचा अर्थ तेव्हा नव्हता. लोकशाही तक्षशीलेत आणि वैशालीत होती तशी अथेन्स आणि स्पार्टामध्येही होती. पण प्रौढ सार्वत्रिक मताधिकारावर आधारलेली आजची लोकशाही त्यात नव्हती. झालेच तर शब्दांना त्यांचा अर्थ ते कोण उच्चारतो त्यावरून प्राप्त होता. औरंगजेबाची धर्मसत्ता वेगळी आणि शिवरायांचे धर्मराज्य वेगळे... सर्वधर्मसमभाव ही कल्पना प्रत्यक्ष पैगंबराने मदिनेत स्थापन केलेल्या राज्यातही आरंभी होती. पण 'उम्मतूल वाहिदा'चे ते स्वरुप आजच्या सर्वधर्मसमभावाहून वेगळे होते.
मनु, बुध्द, येशू किंवा पैगंबर हे विसाव्या शतकात जन्माला आले असते तर त्यांनी धर्माऐवजी राजकीय पक्ष स्थापन केले असते काय, हा याआधीच्या एका लेखाच्या अखेरीस विचारलेला प्रश्न अनेकांना अस्वस्थ करणारा ठरल्यामुळे ही चर्चा आवश्यक झाली. मनु आणि बुध्द यांचा काळ तत्कालीन गणराज्यांचा आणि देशात नवी साम्राज्ये उभी होण्याचा आहे. महाभारतातील युध्दात 212 राजांनी भाग घेतल्याचा उल्लेख आहे. त्या युध्दाचा काळ चिंतामण राव वैद्यांनी सन पूर्व 2300 वर्षे हा ठरविला. तो कितीही पुढे आणला तरी सन पूर्व 1000 च्या इकडे ओढता येत नाही. भारताची लोकसंख्या 14 व्या शतकात 12 कोटी होती. इसवी सनाच्या पहिल्या शतकात ती 1 कोटीहूनही कमी असणार. त्या मागे आणखी एक हजार वर्षे गेलो की ती काही लाखात मोजता येणार. ही संख्या 212 राज्यात विभागली तर एकेका राज्यात कितीशी माणसे येतील? त्यातून तेव्हाच्या भारतात पेशावर आणि कंदाहारसह पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि ब्रह्मदेशाचा सारा प्रदेश समाविष्ट होता. झालेच त्या युध्दात भाग न घेणारे शिशुपालासारखे राजे आणि त्यांची राज्येही बरीच होती. बुध्दाचा काळ सनपूर्व 600 वर्षांचा. त्याही वेळची स्थिती याहून फार वेगळी नव्हती. हा सारा काळ साम्राज्यांच्या उभारणीचा आणि सम्राटांनी गणराज्ये बुडविण्याचाही आहे. महाभारतात मगध आणि हस्तिनापूरच्या सम्राटांनी गणराज्ये बुडविल्याचा वृत्तांत आहे. आपल्या सभोवतीची गणराज्ये कशी बुडवायची हे विचारायला अजातशत्रू हा सम्राट प्रत्यक्ष बुध्दाकडे गेला होता अशी कथाच बुध्दचरित्रात आहे. गणराज्यांचा आकार लहान, लोकसंख्या कमी व एखाद्या जमातीपुरती मर्यादित आणि त्यातील लोकांमध्ये जमातीत आढळणारा एकात्मभाव होता. या एकात्म व एकजिनसी भाववृत्तीमुळे त्यांचा पाडाव करणे अवघड असल्याचे बुध्दाने अजातशत्रूला ऐकविलेही आहे.
गणराज्यांत सारेच फार चांगले होते असे नाही. त्यांचा राजप्रमुख गणांमधून (कुटूंबप्रमुखांमधून) निवडला जात असे. कायदे आणि न्यायदान या गोष्टी गणांच्या सभेत होत. मात्र गणराज्यांमध्ये गुलामगिरी होती आणि ग्रीकांमधील गुलामांप्रमाणेच येथील गुलामांनाही अधिकार नव्हते. गणराज्यांच्या सीमा आजच्या राज्यांसारख्या आखीव नव्हत्या. गणांमधल्या लोकांना जेथवर शेती विस्तारता येत होती आणि त्यांना जेवढया भूमीचे रक्षण करता येत होते तेथेवरच त्यांची मर्यादा जाणारी होती. सम्राटांच्या वाढत्या साम्राज्यांच्या सीमाही कायम स्वरुपाच्या नव्हत्या. सततची युध्दे आणि त्यात होणाऱ्या कत्तली यामुळे सारे जीवनच अस्थिर व बेभरवशाचे होते. (तेव्हा आजचे स्वकीय वा परकीय नव्हते. सीमेच्या आतले ते स्वकीय व पलिकडचे ते शत्रू अशीच एकूण विभागणी होती.) उपजिविकेसाठी पावसावर अवलंबून रहावे लागत असल्याने दुष्काळ आणि रोगराई हेही नित्याचे होते. त्या स्थितीत सामान्य माणसांना दिलासा देण्याचे आणि असलेल्या सत्तांचे आसन बळकट करण्याचे काम कोणी करायचे? ते काम धर्माने केले. काही धर्मांनी अस्थिर व भेदरलेल्या जीवांना मृत्यूनंतरचे जीवन सुखमय असल्याचे सांगितले. तर काहींनी त्यांना पुनर्जन्माची आशा दाखविली. जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायमची सुटका करून घेण्याचे, मोक्षाचेही अभिवचन काहींनी दिले. समाजजीवनाची घडी त्या अस्थिर काळातही नीट राहावी यासाठी, हा जन्म नीट म्हणजे बिनतक्रार घालवला तर मृत्यूनंतरचे आयुष्य चांगले असेल आणि ती घडीच विस्कटणार असाल तर नंतरचेही आयुष्य वाईट मिळेल अशी भीती लोकांना घातली. ज्या धर्मांना पुनर्जन्माचा वा मृत्यूनंतरच्या आयुष्याचा आधार घ्यावासा वाटला नाही त्यांनी याच जन्मातल्या इच्छा आणि तृष्णा आवरा आणि स्वतःला जमेल तेवढे सुखी करून घ्या असा उपदेश केला. धर्मांना आणि त्यांच्या संस्थापकांना एवढेच करता येणे तेव्हा शक्य होते. (संतांनी समाजसुधारणा कां केली नाही किंवा नव्या समाजाची उभारणी न करता आहे त्याच आयुष्यात अध्यात्मसाधना कां सांगितली या 'आधुनिक व संतप्त' प्रश्नांची उत्तरे येथे मिळावी.)
याही अगोदरच्या काळात सारे जीवन निसर्गाधारित होते. पावसावर शेतीच नव्हे तर अरण्यातील पशुपक्षांचे जीवनही निर्भर होते. प्राचीन धर्मांची आरंभीची ऋत, वरुण, गो यासारखी दैवते निसर्गाशी आणि उपजिविकेशी त्याचमुळे संबध्द होती. जमातींच्या, भटक्या वा नुकत्याच स्थिरावू लागलेल्या समाजाकडून फार प्रगत वा आधुनिक धर्मसंकल्पनांची अपेक्षा बाळगण्यात अर्थही नसतो. अशा समाजात प्रथम निसर्गशक्तींशी वैर वा स्नेह, त्यातून यातुविद्या, मृत्यूनंतरच्या जगाची, स्वर्ग-नरकाची कल्पना, चांगल्या पुनर्जन्माचे आश्वासन आणि आजच्या आपत्तीतून सुखरुप बाहेर काढायला कधीतरी येणार असलेल्या अवताराची, तिर्थंकरांची आणि बोधीसत्वाची कथा याच गोष्टी जन्माला येणार. वरूणाची स्त्रोत्रे, इंद्राचे मंत्र, मरुद्गणांची पूजा या साऱ्या अशाच निसर्गाधारित श्रध्दा आहेत. यापुढे वैदिकांना जाता येत नाही आणि बौध्दांनाही त्यापुढे सरकता येत नाही. याच काळात मक्खली घोषाल आणि अजीत केशकंबली यासारख्यांच्या फसलेल्या संप्रदाय स्थापनेच्या कथाही यासंदर्भात मार्गदर्शक ठराव्या. कालाय तस्मैः ही म्हण परिस्थितीएवढीच धर्मांनाही लागू होते. हे धर्म आणि त्यांनी निर्माण केलेल्या उपासनेच्या परंपरा स्वातंत्र्य व समतेसारखी आधुनिक मूल्ये सांगणारही नाहीत. गुलामगिरी ही प्रथा परवापर्यंत फक्त अमेरिकेत होती आणि त्याआधी ती ग्रीकांमध्ये होती या समजात राहून आपण आपल्याही इतिहासावर फार प्रसन्न असण्याचे कारण नाही. गुलामगिरी हा जागतिक दुर्गुणविशेष आहे. तो जगात सर्वत्र होता तसा भारतातही होता. 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आणि ओरिसात गुलामांचे बाजार भरत. मीनाबाजारात स्त्रियांची विक्री चाले. इंग्रज सरकारने कायदे करून या दुष्ट प्रथा थांबविल्या नसत्या तर स्वतंत्र भारताच्या पहिल्या संसदेला तोच कायदा प्रथम करावा लागला असता.
मनु, बुध्द किंवा महावीर यासारख्या धर्मसंस्थापकांसमोर असणाऱ्या राजकीय अस्थिरतेच्या, सामाजिक विषमतेच्या आणि आर्थिक अभावाच्या परिस्थितीत असणारे पर्याय अर्थातच मर्यादित असणार आणि त्यातूनच त्यांना त्यांच्या मार्गदर्शक सूत्रांची निवड करावी लागली असणार... धर्म संस्थापकांएवढीच ही अडचण तत्कालीन राजांची आणि सम्राटांचीही आहे. त्यांच्याकडून आजच्या जगाच्या प्रश्नांची सोडवणूक करणारी उत्तरे येणार नाहीत आणि तशी अपेक्षा त्यांच्याबाबत बाळगण्यात अर्थही नाही.
भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर जन्माला आलेल्या ज्यू आणि ख्रिश्चन या धर्मांची आणि त्यांच्या संस्थापकांची कथाही याहून वेगळी नाही. त्यांच्या काळची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती त्यांना, त्यांनी निवडलेल्या मार्गाहून वेगळया रस्त्याने जाऊ देणारी नव्हती. ही सगळी माणसे पराकोटीची बुध्दीमान असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पुढच्या पर्यायांपैकी सर्वाधिक चांगले पर्याय निवडले एवढेच त्यांच्याविषयी म्हणता येणार आहे. बायबलच्या जुन्या करारात आलेल्या कथा, गणांच्या, जमातींच्या, कुळांच्या आणि कुलप्रमुखांनी गाजविलेल्या पराक्रमाच्या व नीतीधैर्याच्या आहेत. त्यात खलपात्रेही आहेत. त्या कथांचे स्वरुपही मानवी आहे. जुन्या करारात आलेली ईश्वरी पात्रे ज्यूंना पूज्य आहेत. तो त्यांचा 'तोराह' एवढाच वंदनीय धर्मग्रंथही आहे. त्यात ईश्वरी चमत्कार आहेत. मोझेस आपल्या शेकडो अनुयायांसह इजिप्तमधून इस्रायलकडे प्रयाण करतो तेव्हा त्याला समुद्राने दुभंगून जाऊन (कृष्णाला नंदाकडे नेणाऱ्या वसुदेवाला आपल्या यमुनेने करुन दिली तशी) वाट दिली असते. इजिप्तमधील सम्राटांनी (फॅरोहा) गुलाम म्हणून छळलेल्या ज्यूंचा हा वर्ग तेव्हा अतिशय लहानही असणार. (जगभरच्या ज्यूंची आजची 1 कोटी 35 लाख ही संख्या लक्षात घेतली तर दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वी ती कितीशी असावी याची कल्पना करता येते.) इजिप्तच्या सम्राटांनी केलेला छळ, वाटयाला आलेली गुलामगिरी, दारिद््रयाचे जीणे अशा साऱ्याच अभावात जन्माला येणारी धार्मिक शिकवण जशी असणे भाग आहे तशीच ती ज्यूंच्या धर्मग्रंथात आणि धर्मगुरूंच्या शिकवणुकीत आली आहे. जीझस हा 'देवपुत्र' दारिद््रयात जन्मला, त्यातच वाढला आणि तसाच वधस्तंभावरही चढविला गेला. त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी असली तरी अखेरच्या काळापर्यंत त्याच्या अनुयायांची संख्या बाराच्या पुढे गेली नाही. (त्यातलाही ज्युडास त्याला शेवटी सोडून गेला.) नंतरच्या तीनशे वर्षांच्या काळात त्याचे अनुयायी सर्वतऱ्हेचा छळ व संकोच यांना तोंड देत निष्ठेने त्याच्या शिकवणुकीचा आदर व प्रसार करीत राहिले. रोमचा सम्राट कॉन्स्टंटिनोपल याने जेव्हा त्या धर्माचा स्वीकार केला तेव्हाच त्याची त्या दूरवस्थेतून सुटका झाली. सत्ता विरोधात, समाज उपेक्षा करणारा, दारिद््रय पाचवीला पुजलेले आणि मागे कोणताही भक्कम आधार नसलेला या स्थितीत माणसे केवळ सेवाधर्मानेच जिंकता येणार होती. जीझसचे आणि त्याच्या शिकवणीचे मोठेपण त्यात आहे. मात्र त्याचमुळे त्याला आजच्या काळातल्या स्वातंत्र्य व समतेसारख्या मूल्यांचा स्वीकार न केल्याच्या दोषापासून मुक्तही करावे लागते. आहे त्या स्थितीत जे करता येणे शक्य होते ते जास्तीतजास्त चांगले केल्याबद्दल त्याला वंदनही करावे लागते.
इस्लामची आरंभीची स्थितीही याहून फारशी वेगळी नव्हती. सलिवुल्ला वसल्लम महंमद पैगंबर हे खादिजा या मक्केतील व्यापारी महिलेचे मुनीम होते. खादिजा या त्यांच्याहून पंधरा वर्षांनी वडील होत्या. त्यातून ते अडाणी आणि निरक्षर होते असे मुस्लीम परंपरेचे म्हणणे होते. असा इसम कितीही बुध्दीमान आणि प्रज्ञाशील असला तरी तेव्हाच्या समाजात त्याच्या वाटयाला आलेली वंचना, उपेक्षा आणि कुचेष्टा यांची कल्पना आजही करता यावी. तशी ती झाल्याचे त्यांच्या पवित्र चरित्रात नोंदविले गेलेही आहे. इ.स. 610 मध्ये त्यांच्यावर पहिला ईश्वरी संदेश अवतरला आणि त्यांनी तो सभोवतीच्या लोकांना सांगितला तेव्हाही साऱ्यांनी त्यांची टिंगलच केली. या संदेशांची संख्या वाढली तरी त्यांच्या मागे फारसे कोणी आले नाही. खादिजा हीच त्यांची पहिली धर्मानुयायी होणे या वास्तवाचा अर्थ या संदर्भात कोणालाही लावता यावा. मक्केच्या लोकांनी केलेल्या छळामुळेच त्यांना यथ्रेब (नंतरचे मदिना) येथे जावे लागले. तेथेही ज्यू बहुसंख्य, त्या खालोखाल ख्रिश्चन आणि मूर्तीपूजक होते. तेथे त्यांनी एक सर्वधर्मसमभावाचे राज्य प्रथम स्थापन केले. मात्र या राज्यावर होणारे परक्यांचे हल्ले वाढले तेव्हा त्यांनी तलवार हातात घेतली आणि जिहाद-बा-सैफचा आदेश आपल्या अनुयायांना दिला. हा इस्लामच्या जन्माचा आणि पवित्र प्रेषिताच्या चरित्राचा आलेख डोळयासमोर आणला की इस्लामच्या स्वरुपाचे रहस्यही उलगडू लागते. ते सेवाभावी आणि आक्रमक असे कां घडले याचीही उत्तरे हाती येऊ लागतात... प्राप्त परिस्थितीत बुध्दीमान व कर्तृत्त्वशाली माणसांनी शोधलेले जीवनमार्ग असेच या साऱ्या धर्मांच्या निर्मितीमागचे सूत्र असल्याचे मग लक्षात येते.
प्रश्न, ही माणसे आज असती तर त्यांनी काय केले असते हा आहे. तो कल्पित असला तरी त्याच्या उत्तरात आजच्या अनेक समस्यांचा उलगडा होऊ शकणार आहे. ज्या काळात या महामानवांनी जन्म घेतला त्या काळात समाजाला नीतीपर उपदेश करणे सदाचरण सांगणे आणि बऱ्यावाईटाचा निवाडा करण्यासाठी लागणारे मार्गदर्शन करणे एवढेच त्यांना शक्य होते आणि त्या साऱ्याला बळकटी येण्यासाठी त्यामागे होली घोस्ट, गॉड, अल्ला, ईश्वर, ब्रह्म किंवा अवतार, बोधीसत्व आणि पूर्वी झालेल्या तीर्थकरांच्या प्रभावशाली संकल्पना उभ्या करणे त्यांना आवश्यक होते. आजचे जगभरातील राजकीय पक्ष समाजाच्या आणि त्यातील वर्गांच्या सोडवणुकीसाठी अशाच थोरामोठयांनी स्थापन केले आहेत. इंग्लंड ही लोकशाहीसारखीच राजकीय पक्षांचीही जननी आहे. राजसत्ता आणि लोकाधिकार यांच्यात प्रथम संघर्ष उभा राहिला तेव्हा राजसत्तेचा कैवार घेणारे राऊंड हेड्स आणि लोकाधिकाराची बाजू घेणारे व्हिग्ज हे पक्ष तेथे संघटित झाले. पुढे तेच टोरी आणि व्हिग या नावाने विस्तारले. आताचे कॉन्झर्व्हेटिव्ह आणि लिबरल हे पक्ष हे याच जुन्या पक्षांची अवताररुपे आहेत. अमेरिकेत केंद्र सरकार सामर्थ्यवान असावे असे म्हणणाऱ्यांचा रिपब्लिकन तर राज्ये समर्थ असावी असे मानणाऱ्यांचा डेमॉक्रॅट असे पक्ष उभे राहिले. नंतरच्या काळात या पक्षांची ध्येयधोरणे विस्तारली. सगळया राजकीय, सामाजिक आणि आर्थिकच नव्हे तर जागतिक प्रश्नांची उत्तरे देण्याची धर्मांसारखीच व्यापक भूमिका त्यांनी स्वीकारली. प्रथम स्वातंत्र्यप्राप्ती आणि पुढे सर्वांगीण कल्याणाची आणि सर्वसमावेशकता राखण्यासाठी धर्मनिरपेक्षतेची भूमिका घेणारा आपल्याकडील काँग्रेस पक्ष, बहुसंख्य हिंदूंच्या हितरक्षणाची आपण भूमिका घेतो असे सांगणारा संघ व त्याने निर्माण केलेला भारतीय जनता पक्ष, मुसलमानांच्या हितरक्षणार्थ निर्माण झालेले मुस्लीम लीगसारखे आणि दलितांच्या उध्दाराचे कंकण सांगणारे बसपा किंवा रिपब्लिकन यासारखे आपल्याकडील इतर पक्ष. या साऱ्यांची आरंभीची उभारणी, पुढची संरचना, शिकवण आणि प्रचार-प्रसार यांची तुलना पूर्वीच्या धर्मसंस्थापनेशी, धर्मप्रसाराशी करता येते. या पक्षांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांच्या आघाडयांची तुलना भिक्खु आणि भिक्षुसंघांशी किंवा पूर्वीच्या आश्रमांशीही मनोमन करता येणारी आहे. धर्मांना लागतात तशी प्रतिकचिन्हे पक्षांनाही हवी असतात. मंदिरे, मूर्ती, झेंडे तेव्हाही होते आणि आताही आहेत. तेव्हा आश्रम होते आता कार्यालये आहेत. तेव्हा प्रवचने व्हायची आता जाहीरसभा होतात. पक्ष जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याची भूमिका आणि विचारसरणी मोठया धर्माएवढीच व्यापक आणि सर्वसमावेशक असते. छोटे व प्रादेशिक पक्ष विशिष्ट जागी वाढलेल्या पंथोपपंथांसारखे किंवा संप्रदायांसारखे काही विशिष्ट गोष्टींसाठी उभे होतात... मात्र कार्यप्रणाली, नेतृत्त्वावरची निष्ठा यासाऱ्या गोष्टी सर्वत्र सारख्याच असतात. 200 वर्षे ुउलटली तरी कम्युनिस्टांना दास कॅपिटलची पोथी तेवढयाच निष्ठेने वाचावी आणि अंमलात आणावी असे वाटते आणि कालबाह्य बनलेल्या धार्मिक समजुतींना चिकटून राहण्याची श्रध्दावानांची मानसिकता पक्षनिष्ठ म्हणविणाऱ्यांतही तेवढीच निकराची असल्याचे आढळते... पूर्वी धर्मविजय होत आता पक्ष विजय होतो. फरक एवढाच की पूर्वीच्या धर्मसत्तांमागे राजसत्तांचे बळ उभे असल्याने विजयी धर्माचे लोक जितांचे निर्दालन करीत. आताच्या लोकशाहीत साऱ्याच पक्षांच्या मागे कमी अधिक जनाधार उभा असल्यामुळे तसे होत नाही (किंवा तसे करण्याची सोय नाही.)
साधने वेगळी असली तरी धर्मकारण आणि राजकारण यांचे प्रयोजन, संरचनांचे स्वरुप आणि कार्यपध्दती यात फरक नाही. समूहमनाचे उन्नयन, त्यासाठी त्यावर नियंत्रण. त्या नियंत्रणांना नीतीमूल्यांचा मुलामा आणि त्या मागे उभी करावयाची काल्पनिक भीती वा लोकशक्ती. या सगळया गोष्टी दोन्हींना सारख्याच लागू पडणाऱ्या आहेत. कल्याणाची स्वप्ने, सुखांचे आश्वासन, संरक्षणाची हमी, त्यासाठी समुदायांनी आणि व्यक्तींनी आपापल्या परीने करावयाच्या प्रयत्नांचे मार्गदर्शन याबाबतही त्या दोहोत साम्य आहे. विचारसरणी, तत्त्वप्रणाली, श्रध्दा आणि श्रध्दास्थाने यांनीच त्या दोहोंना बळकटी दिली आहे... फरक असलाच तर तो धर्मांना असलेला पारलौकिकाचा सिध्द न करता येणारा अमर्यादा आधार हा तर राजकीय पक्षांना प्रत्यक्ष दिसणाऱ्या लोकशाहीच्या पाठिंब्याची मर्यादा हा आहे. धर्माला त्याचे स्वतःचेच बंधन लागू पडणारे तर पक्षांना कायद्याच्या मर्यादा आहेत. धर्माचे लोकांवर तर लोकांचे पक्षांवर नियंत्रण आहे. पक्षांना असतात तशा धर्मांना देशाच्या सीमा नाहीत. झालेच तर त्यातला एक फरक त्या दोहोंविषयीच्या आपल्या परंपरागत मानसिकतेचाही आहे.
राजकीय पक्षातले थिंक टँक, नेते, प्रशासक, कार्यकर्ते आणि त्यांचे मतदार ही उभारणी विचारांच्या बैठकीवर कितीशी आधारित असते? तीत श्रध्देचा आणि जयजयकाराचा भाग किती असतो? अनेक पक्षांना दैवतांचा, धर्मांचा आधार घ्यावासा अजूनही कां वाटतो? धर्मांची नावे घेणारे पक्ष अजूनही प्रगत म्हणविणाऱ्या पाश्चात्त्य देशात आपण पाहतोच. काही राजकीय पक्ष आपली उभारणी थेट धर्मसंस्थेच्या वळणानेच कशी करतात? त्यात विचारांपुढे श्रध्दाच कशा बलशाली ठरतात? पूर्वी सत्ताधाऱ्यांचे, त्यांच्या सहाय्यक साथीदारांचे हितसंबंध जपणाऱ्या श्रध्दा बळकट केल्या जात. आताच्या लोकशाही व्यवस्थेत सामान्य माणसांना त्यांच्या हक्कांची जाणीव झाल्याने त्यांच्या हितसंबंधांची चर्चा राज्यव्यवहारात समाविष्ट केली जाते. धर्माचे अनुयायी एकेकाळी जसे कडवे असायचे वा अजून आहेत तेवढे कडवेपण आजच्या राजकारणातही आपण पाहतो की नाही?
राजसत्ता आणि साम्राज्यसत्ता यात लोकमत घडविणे आणि संघटित करणे यासाठी जे करावे लागेल ते लोकशाहीत करावे लागणार नाही. समाजाच्या सर्वांगीण जीवनावर श्रध्देचा पगडा असताना जे मार्ग अनुसरायचे ते ज्ञानविज्ञानाच्या प्रकाशमान जगात अनुसरता येणार नाहीत. राजा मजबूत करणे आणि समाज बलशाली बनविणे यातला फरकही अशावेळी लक्षात घ्यावाच लागणार. राजा हा ईश्वराचा अंश आहे ही भाषा आजच्या पक्षीय राजकारणात नुसती कालबाह्यच नव्हे तर हास्यास्पदही ठरावी अशी आहे. आज जनतेलाच सार्वभौम मानावे लागणार. लोकशाही असो वा हुकूमशाही किंवा कडवी लष्करशाही, तिलाही जनतेचा अनुनय करावाच लागणार. अशा अनुनयासाठी पूर्वी धर्म राबले आता पक्ष संघटना राबत आहेत.
धर्म स्थापन होण्याच्या शक्यता आता संपल्या आहेत. एखाद्या प्रज्ञावान आणि शक्तीशाली माणसाला आपला विचार आजच्या व्यवस्थेत अंमलात आणावासा वाटला तर तो काय करील? आहे त्या पक्षांपैकी त्याला जवळचा असणारा पक्ष निवडील किंवा तसा पक्ष उपलब्ध होणार नसेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करील. तसे करण्यासाठी बंडखोर, अतिरेकी किंवा दहशतवादी होणे ज्यांना जमेल ते त्या मार्गाने जातील. तसे ते जात असलेले आपण पहातही आहोत. मात्र आपल्या विचारांमागे लोकांना आणणे ज्यांना जमेल ते त्यासाठी पक्षाच्या स्थापनेच्या कामाला लागतील.
No comments:
Post a Comment