Pages

Saturday, June 26, 2010

धर्म हे गतकालीन राजकारण आहे काय?

धर्म हे गतकालीन राजकारण आहे काय, या प्रश्नाची चर्चा करणे धर्मपंडितांएवढेच धर्मांची चिकित्सा करणाऱ्या राज्यशास्त्रज्ञांनीही आजवर टाळले आहे. मार्क्सने धर्माला अफूची गोळी म्हटले. झालेच तर साऱ्या चिकित्सेचा आरंभच धर्मचिकित्सेपाशी होतो असे सांगितले. पण मार्क्सच्या अगोदर दुसऱ्या कोणी ती केल्याचे दिसले नाही. त्याच्या पश्चात त्याच्या अनुयायांनाही ती करण्याचे धाडस झाले नाही. ही चिकित्सा लोकानुरंजनाविरुध्द जाण्याच्या भीतीमुळेही त्यांनी ती केली नसण्याची शक्यता अधिक आहे. लोकशाही मानणाऱ्या (म्हणजे मतांचे राजकारण करणाऱ्या) कोणत्याही नेत्याला, विचारवंताला वा अभ्यासकाला ती जमणे शक्यही नव्हते. लोकभयास्तव इतरांनीही त्या वाटेला न जाणेच श्रेयस्कर मानले. धर्मश्रध्दांची पकड आता सैल होत असली तरी धर्माचे राजकारण करणाऱ्यांनी त्यांना भयकारी स्वरुप आणल्यामुळेही तसे झाले असणे अशक्य नाही.
श्रध्दावानांना या प्रश्नाबाबत ठरवून अनभिज्ञता दाखविणे जमणारे असले तरी धर्माची ऐतिहासिक चिकित्सा करणाऱ्यांना ती करणे शक्य होते. स्वतःला धर्मनिरपेक्ष वा सेक्युलर म्हणविणाऱ्यांनाही तसे करता येणार होते. पण अफूची गोळी म्हणून धर्म बाद ठरविण्याचा जो एकारलेपणा मार्क्सने केला त्याच्या आसपासही फिरकरण्याचे धाडस दुसऱ्या कोणाला करता आले नाही. जगाच्या इतिहासात 14 हजारांहून अधिक लढायांची नोंद आहे. त्यातल्या निम्म्याहून अधिक लढाया धर्मांचे झेंडे नाचवून लढविल्या गेल्या. धर्मासाठी रक्त सांडणाऱ्या, अन्य धर्मीयांचे रक्त सांडत विजयाची पताका फिरविणाऱ्या आणि ती तशीच फडकती ठेवण्यासाठी अधूनमधून पुन्हा माणसे मारत राहणाऱ्या लोकांच्या मनात धर्मकारण आणि राजकारण एकच झाले होते काय? यातला धर्मविजय म्हणजे नेमका कशाचा आणि कोणाचा विजय होता? धर्मराज्य म्हणजे तरी नेमके कोणाचे राज्य होते?
ख्रिश्चन, मुसलमान, बुध्द आणि हिंदू हे जगातील चार प्रमुख धर्म आहेत. शिवाय शिंतो, ताओ, जैन, शीख यासारख्या धर्मांचाही त्यात समावेश आहे. आदिवासी समाजांच्या धर्मश्रध्दांची भर घातली तर ही संख्या आणखीही वाढणार आहे. यातील सारेच प्रमुख धर्म आशिया खंडात जन्माला आले आहेत. युरोपात, अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलिया या खंडांत ते का जन्माला आले नाहीत. विशेषतः ब्राझीलसारखे जे देश अजून प्राचीन संस्कृतींशी त्यांची नाळ जुळवून आहेत तेथे ते कां निर्माण झाले नाहीत, या प्रश्नांचीही चिकित्सा फारशी कुठे झाल्याचे दिसत नाही.
अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे तुलनेने नवे खंड आहेत. इंग्लंड आणि युरोपातून तेथे गेलेल्या लोकांनी त्यांना त्यांचे आजचे स्वरुप दिले. तेथे जाताना या लोकांनी आपल्यासोबत आपला ख्रिश्चन धर्म नेला शिवाय त्या भूमीतील मूळचे धर्म आणि धर्मश्रध्दा संपविण्याचे क्रूर समाजकारणही त्यांनी आरंभीच्या काळात केले. परिणामी त्या भूमीत नवे धर्म अंकुरण्याची शक्यताही नव्हती. आशिया हा तुलनेने आपली प्राचीन सभ्यता दीर्घकाळ सातत्याने टिकवून धरणारा खंड असल्याने येथे जुन्या संस्कृतींएवढेच जुने धर्म आपल्यात कालमानानुसार थोडेफार बदल करीत टिकले.
धर्म, अर्थ आणि काम हे ऐहिक पुरुषार्थ, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे आश्रम, धर्म, राज्य, समाज व कुटूंबासारख्या संस्था आणि व्यवहार व नीती यांची नियमावली या साऱ्यांना समान असणारे व त्या साऱ्यांवर नियंत्रण ठेवणारे सूत्र धर्माचे आहे. यापैकी प्रत्येकच अभिक्रमावर, अवस्थेवर, संस्थेवर आणि नियमावर धर्माची अधिसत्ता आहे. ही सत्ता धर्म या अमूर्त व्यवस्थेच्या वतीने कोण राबवितो वा राबवून घेतो? शिवाय जेथे सत्ता असते तेथे राजकारणही अपरिहार्यपणे येतच असते. या अधिसत्तेला कुठे ईश्वराच्या आज्ञेचा तर कुठे धर्मसंस्थापकाच्या शिकवणीचा आधार आहे. सगळे धर्मग्रंथ या सत्तेचे महात्म्य समाजाच्या मनावर बिंबविण्यासाठीच सिध्द झाले आहेत. त्यात सत्याचे कमी आणि सत्तेचे समर्थन अधिक आहे. पौर्वात्त्य धर्मांएवढाच पाश्चात्त्य धर्मांना, अगदी आदिम समूहातील धार्मिक नियंत्रणालाही हे वास्तव लागू होणारे आहे. धर्माची अधिसत्ता पारलौकिकाचे पाठबळ घेऊन उभी होत असल्यामुळे तिचे ऐहिक जीवनावरचे नियंत्रण सर्वंकष असते. ते राबवून घेणारे नियम असतात आणि त्या नियमांच्या भंगासाठी शिक्षाही सांगितल्या असतात. ही सारी राजसत्तेला कधी पोषक आणि कधी पर्यायी म्हणून उभी होणारी संरचना आहे. एकेकाळी धर्मग्रंथ हेच समाजकारणावरचेही ग्रंथ मानले जात. राज्यशास्त्रात आजही महाभारताकडे तसेच पाहिले जाते. राजाने फारसे काही करायचे नाही, त्याने धर्मनियमांचे अधिपालनच तेवढे प्रजेकडून करून घ्यायचे अशी शिकवण राजपुत्रांच्या मनावर एकेकाळी ठसविलीही जात असे... पुन्हा प्रश्न हा सत्तासंस्कार कोण करतो वा करवून घेतो हा आहे.
सत्तेपुढे शहाणपण किंवा अर्थस्य पुरुषो दासः या म्हणी आणि वाक्प्रचार खरेच आहेत. पण सत्ता, शहाणपण आणि अर्थाधिकार हे सगळेच जर धर्मशरण असतील तर मग खरी सत्ता कुणाची असते? कधी ही सत्ता पोपच्या सत्तेसारखी दृष्य असते, कधी धर्मग्रंथांच्या शिकवणीसारखी ग्रंथबध्द असते तर कधी श्रध्देय ऋषींच्या अनुल्लंघ्य उपदेशातून साकारत असते. सार्वभौम सत्तेची राज्यशास्त्रात केलेली व्याख्या 'सर्वांवर चालणारी अमर्याद सत्ता' अशी केली जाते. जरा सूक्ष्म विचार केला तर ही व्याख्या राजसत्तेहून या दृश्य वा अदृश्य धर्मसत्तेलाच अधिक लागू पडते.
इतिहास हे गतकालीन राजकारण आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. राजे, त्यांची घराणी, त्यांनी केलेल्या लढाया, तह, वाटाघाटी, साम्राज्यांची उभारणी, पडझड, नव्या राज्यांची निर्मिती इ..इ.. इतिहासात सर्वाधिक नोंदी याच आहेत आणि या नोंदी तत्कालीन राजकारणाच्या आहेत. या राजकारणाला समाजजीवनाच्या इतर अंगांसोबत कवेत घेणाऱ्या धर्माच्या नोंदीही इतिहासात आहेत. धर्माने केवळ राजकारणच नव्हे तर समाजकारण, अर्थकारण आणि संस्था व संघटनांसोबत कुटूंबकारणही आपल्या ताब्यात ठेवले आहे. इतिहासातल्या बहुसंख्य नोंदीही अशा की त्यांचा संबंध राजकारणाशी आहे की धर्मकारणाशी हे नेमकेपणाने इतिहासकारालाही सांगता येऊ नये. खलिफांची सत्ता राजकीय असते की धार्मिक?, रोमचे साम्राज्य धार्मिक होते की राजकीय?, छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य राजकीय असते की दिल्लीत स्थायिक झालेल्या इस्लामी राजवटीविरुध्द एका हिंदू तरुणाने केलेले धार्मिक धाडस? भारतावर झालेली मुस्लीम आक्रमणे धार्मिक होती की राजकीय? तराजू घेऊन भारतात आलेल्या इंग्रजांनी पुढे तलवार हाती घेतली आणि नंतरच्या काळात आपली धार्मिक शिकवणही येथे आणली. धर्मसत्तेचे एकूण जीवनावरील असे अधिपत्य एकोणिसाव्या शतकापर्यंतही कायम असल्याचे सांगणारे हे चित्र आहे की नाही? या प्रश्नांची उत्तरे एवढया वर्षानंतरही देता येत नाहीत याचे कारण धार्मिक जीवन आणि ऐहिक जीवन यांच्यातील वेगळेपण हा उत्तरकालीन व आधुनिक विचारसरणीचा भाग आहे. मुळात धर्मजीवन आणि ऐहिक जीवन यातले वेगळेपण कोणत्याही धर्माला मान्य नाही. त्यातून आरंभीचा समाज एकजिनसी व समूहकेंद्री असल्याने त्यावरची धर्माची पकडही सर्वंकष राहिली. भारतावर झालेले इंग्रजी आक्रमणच तेवढे इंग्लंडचा राष्ट्रध्वज हाती घेऊन आले. त्याआधीची सगळी आक्रमणे धर्माचे झेंडे घेऊनच आली होती. त्यांना तोंड देताना एतद्देशीय राजांनीही धर्माचीच निशाणे फडकावीत नेली होती. धर्मांनी राज्य केले आणि राज्यांनी धर्म चालविले हे वास्तव थेट आदिम जमातींमधील गायता (जमातप्रमुख) हाच त्यांचा धर्मप्रमुख असण्याच्या प्रथेतूनही स्पष्ट होते. राजाने अन्याय केला तरी धर्माकडे न्याय मागता येणे यातून शक्य होत नाही आणि धर्माच्या जुलूमाविरुध्द राजाकडेही तक्रार नेता येत नाही. एका सर्वार्थाने बंदिस्त असणाऱ्या समाजव्यवस्थेची ही उभारणी असते.
इतिहासाने साऱ्यांच्या लक्षात आणून दिलेले एक धर्मविषयक सत्य हे की धर्म राजाश्रयाने वाढतात आणि विस्तारतात. तो आश्रय संपला की ते गळाठतात आणि कोमेजतात. येशू ख्रिस्ताने धर्मस्थापना केली तेव्हा त्याच्या अनुयायांची संख्या जेमतेम बारा होती. अखेरच्या काळात त्यातलाही एक त्याच्याशी द्रोह करून दूर झाला होता. पुढे (तीन शतकांनंतर) कॉन्स्टंटिनोपल राजाने त्याच्या धर्माचा स्वीकार करून त्याला राजधर्माचा दर्जा दिला व आपल्या साम्राज्यातील साऱ्या प्रजाजनांनी त्याचे पालन केलेच पाहिजे असा आदेश काढला तेव्हा येशूचा धर्म रोमन साम्राज्याच्या सीमांएवढा रुंदावला. या साम्राज्याने जग पादाक्रांत करण्याची आकांक्षा धरून ते जिंकायला सुरूवात केली तेव्हा हा धर्मही जग जिंकत निघालेला इतिहासाने पाहिला. आपल्याकडे सम्राट अशोकाने बौध्द धर्माचा स्वीकार केला तेव्हा, तोपर्यंत भिक्षु संघांपुरता मर्यादित असलेला तो धर्म विस्तारायला सुरूवात झाली. अशोकाने कॉन्स्टंटिनोपलसारखी प्रजेवर धर्माची सक्ती केली नसली तरी राजाचे अनुकरण करण्याच्या सहजप्रवृत्तीला अनुसरून त्याच्या राजवटीतील अनेकांनी बुध्द धर्माची दीक्षा घेतली. अशोकाने धर्मप्रचारार्थ भिक्षुंचे मोठमोठे तांडे देशातच नव्हे तर भारताबाहेरही पाठविले. या भिक्षुंनी कुठे वादविवाद जिंकत कुठे आर्जवे करीत आपला धर्म वाढविला. तो वाढवीत असतानाच त्यांनी त्यांच्या मूळ प्रेरणा स्थानाचा राजकीय प्रभावही विस्तारण्याचे कार्य केले.
अशोकाच्या पश्चात त्याचा वंशज असलेला सहदेव हा पुष्यमित्र शुंगाच्या हातून मारला गेला. शुंगाने गादीवर येताच बुध्दधर्माचा आश्रय काढून घेतला व यज्ञ संस्थेचे पुनरुज्जीवन करून वैदिक धर्माची ध्वजा पुन्हा फडकावली. परिणामी भारतात तोवर बऱ्यापैकी बस्तान बसविलेला बुध्दधर्म लयाला गेला आणि वैदिक धर्माची उपासना पुन्हा उजागर झाली. इस्लामची राजवट दिल्लीत अधिकारारुढ झाली आणि भारताचे क्रमाने इस्लामीकरण होत गेले. पुढे इंग्रजांची राजवट आली तेव्हा येथे ख्रिस्तीकरणाचे वारे वाहिले. सारा आफ्रिका खंड ख्रिस्ती वा इस्लाममय कां झाला याचे उत्तरही या चर्चेत गवसणारे आहे.
इस्लामच्या प्रेषिताने धर्म आणि राज्य यांच्या विस्तारासाठी तलवारच हाती घेतल्याने त्या धर्मात धर्मकारण आणि राजकारण यात अंतरायच उरला नाही. तसाही कोणता धर्म राजकारण हे धर्मकारणाहून वेगळे असण्याला मान्यता देत नाही. धर्म सर्वव्यापी असल्यामुळे त्याचा समाजाच्या व व्यक्तीच्या सर्वांगीण जीवनावर अधिकार असतो अशीच धर्माची धारणा असते. त्याला राजकारण किंवा समाजजीवनाचे दुसरे एखादे अंग त्यापासून मुक्त असण्याची कल्पना नुसती अमान्यच नाही तर ती धर्मद्रोही वाटणारीही आहे. धर्माचे नियंत्रण तिन्ही लोकांवर आहे. अगदी स्वर्गावरही त्याचेच अधिराज्य आहे अशी ही श्रध्दा आहे. पवित्र प्रेषिताच्या पश्चात गादीवर आलेले सगळे खलिफा एकाचवेळी सम्राट आणि धर्मगुरूही होते. आपल्याकडील शीख धर्म एकाच वेळी दोन ध्वज उभारतो. एक रोहानियतचा (धर्मकारणाचा) आणि दुसरा सियासतचा (राजकारणाचा). राज करेगा खालसा या घोषणेचा अर्थही नेमका या दोन क्षेत्रांचे एकीकरण सांगणाराच आहे.
धर्म आणि सत्ता यांचा संबंध एकतर्फी नाही. राजाश्रयाने धर्म वाढतो एवढाच या विवेचनाचा अर्थ नाही. धर्माच्या आधाराने राजसत्ताही बळकट होत जातात ही त्याची दुसरी बाजू आहे. धर्माने सत्ता आणि सत्तेने धर्म यांना आधार देऊन बळकट करायचे असा हा परस्पराश्रयी व्यवहार आहे. राजा हा ईश्वराचा अंश आहे ही गोष्ट हिंदू धर्मात वैवस्वत मनुच्या कथेतून आली. मी ईश्वराचा अंश आहे आणि माझी आज्ञा हीच ईश्वराची आज्ञा आहे असे सांगणारा इंग्लंडचा पहिला जेम्स हाही याच व्यवहाराचा प्रतिनिधी आहे. या व्यवहाराला वेदोपनिषदांचे, पुराणकथांचे किंवा आपल्याकडील धर्मसमजुतींचे जसे पाठबळ आहे तसे ते बायबल आणि कुराणासह रोमच्या धर्मसत्तेचेही आहे. प्रजाजनांनी आपल्या उत्पन्नाचा किती वाटा सत्तेला द्यायचा याचा हिशेब आपल्या धर्मग्रंथांनी वेळोवेळी मांडला तर 'गीव्ह अन् टू सीझर व्हॉट ईज सीझर्स' अशी शिकवण प्रत्यक्ष येशूनेही लोकांना दिली. आपल्याकडील राजसूय किंवा अश्वमेध यासारखे यज्ञविधी सत्तेच्या विस्ताराचे आणि दसऱ्याचे सीमोल्लंघनही त्यासाठी तर तिकडचे युध्दारंभी करावयाचे धर्मविधीही त्याचसाठी असतात.
कपिलवस्तू हे बुध्दाचे नगर विदुदभा या अजातशत्रूच्या म्हणजे प्रत्यक्ष बुध्दाच्याच शिष्याच्या मुलाने जाळले. त्यातल्या स्त्रीपुरुषांची, अगदी लहानसहान मुलांचीही त्या क्रूरकर्म्याने कत्तल केली. हा सारा प्रकार बुध्दाला उघडया डोळयाने पहावा लागला. मात्र विदुदभ्याच्या राजसामर्थ्यापुढे त्याच्या धर्मसत्तेचे उघड असलेले दुबळेपण त्याला काही करू देणारे नव्हते. हे ऐतिहासिक वास्तवही या साऱ्या व्यवहारावर प्रकाश टाकणारे ठरावे. धर्म आणि सत्ता या व्यवस्था जोवर एकमेकींना साथ देतात तोवर त्यांचे सहचालन टिकते. त्यापैकी कोणतीही एक बाजू वरचढ होऊ लागली की त्यांच्यात वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू होते. तिची परिणती सत्तेने धर्मव्यवस्थेचे नियंत्रण झुगारण्यात किंवा धर्मव्यवस्थेने शासनाधिष्ठित सत्ताधाऱ्याला पराभूत करण्यात होते हे सांगायला युरोपचे सारे मध्ययुगच पुरावा म्हणून उभे होणारे आहे. इंग्लंडच्या राजाने स्वतःकडे देशाचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरूपद (हेड ऑफ द ब्रिटीश चर्च) घेऊन रोमचे सारे निर्बंध नाकारले. आजही इंग्लंडची राणी हीच त्या देशाची सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आहे. युरोपातील राजे रोमच्या धर्मसत्तेकडून मान्यता घेत. त्याच्या मोबदल्यात रोमच्या मागण्या मान्य करीत. ज्या सत्तांना रोमचे वर्चस्व झुगारणे जमले त्यांनी ते झुगारले. त्यासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्यात प्रत्यक्ष युध्देही झाली. युरोपची धर्मसत्ता लष्करी बळाने सज्ज असल्याने तिच्या वाटयाला भारतातील धर्मसत्तांचे दुबळेपण आले नाही एवढाच काय तो यातला फरक. रोमच्या धर्मसत्तेएवढे लष्करी बळ भारतीय धर्मसत्तांना उभे करणे जमले नसले तरी त्यांच्या मागे प्रसंगी राजसत्ता त्यांच्या राजकीय हितसंबंधांसाठी उभ्या मात्र राहिल्या.
या फरकाचे एक कारण भारतातील धर्मकारण ज्यांच्या हाती होते तो ऋषीमुनींचा, भिक्षुंचा किंवा भिक्खुंचा वर्ग शस्त्रसज्ज नव्हता हे आहे. येथील वर्णव्यवस्थेने हिंदूंच्या पुरोहितांना शस्त्र वर्ज्य ठरविले. त्याचाच परिणाम जैन आणि बुध्दधर्मांच्या आचार्यांवर आणि धर्मातील व्यवस्थांवर झाला. तथापि, जेथे या धर्मांना आपल्या रक्षणासाठी लढावे लागले तेथे मात्र त्यांनी शस्त्र हाती घेतले व त्यासाठी बलोपासनाही केली. कुंग्फू, ज्युडो, कराटे किंवा जपानमधील भिक्षुसंघात झालेली बलोपासना यासंदर्भातच पहावी लागते.
जगभरच्या तत्त्वज्ञानांनी आणि धर्मव्यवस्थांनी तीन तऱ्हेच्या मानवी बलस्थानांची महती सांगितली आहे. सत्व, रज आणि तम हे तीन गुण भारतीय चिंतन परंपरेत त्यांचे प्रतिनिधीत्व करतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी पहिल्या तीनांचा संबंध यांच्याशी जुळवून पाहता येणारा आहे. ज्ञानाधिकार, सत्ताधिकार आणि अर्थाधिकार हा भारतातील त्रैवार्णिकांच्या (ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य) व्यवस्थेशी जुळणारा संदर्भही येथे चपखलपणे लागू व्हावा. तिकडे प्लेटोने त्याच्या आदर्श राज्याच्या व्यूहरचनेत तत्वज्ञ, सेनाधिकारी आणि व्यापारी (मेन ऑफ गोल्ड, मेन ऑफ सिल्व्हर आणि मेन ऑफ लीड) अशी त्रिवर्णाची संरचना मांडून त्याला सामान्य नागरिकांचा समूह जोडला. (प्लेटोच्या व्यवस्थेत आपल्या वर्णव्यवस्थेत न बसणारा एक पाचवाही वर्ण आहे. त्याचे स्वरुप गुलामांचे आहे आणि त्याची संख्या वरील त्रैवार्णिकांच्या संख्येहून जवळजवळ दुपटीने मोठी आहे.) वरिष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ असे समाजरचनेचे स्वरुप आजच्या जगातही सर्वत्र आहे. अगदी मार्क्सचा विचार जरा पातळ करून पाहिला तर त्यातही असे वर्ण आढळणारे आहेत.
यातल्या सर्वात कनिष्ठ वर्गाचे बळ त्याच्या कष्टात, चौथ्या व सामान्य नागरिकांचे सामर्थ्य त्याच्या संख्याधिक्यात, तिसऱ्याचे त्याच्या अर्थसंपदेत, दुसऱ्याचे शस्त्रबळात तर पहिल्या क्रमांकाच्या वरिष्ठाचे त्याच्या ज्ञानाधिकारात आहे किंवा असल्याचे मानले गेले. वरचे तीन वरिष्ठ वर्ग परस्परांना कधी सांभाळून घेत तर कधी एकमेकांवर कुरघोडी करीत सत्तेवर आपले नियंत्रण ठेवण्याच्या स्पर्धेत राहिले. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांचा यासंदर्भातील आपल्याकडील इतिहास अधिक डोळसपणे पहावा असा आहे.
यातल्या क्षत्रियांचे बळ पुन्हा शस्त्रांत, वैश्यांचे पैशात तर पुरोहितांचे ज्ञानात (किंवा धर्मात) एकवटले होते. धर्माचा जीवनावर इतिहासात कायम झालेला सर्वंकष अधिकार हा पुरोहितांच्या या वर्गाने आपल्या ज्ञानबळाच्या किंवा त्याआधारे उभ्या केलेल्या कल्पनाजगताच्या जोरावर निर्माण केला काय? या बळाचा वापर आपल्या सत्तेसाठी करणे आवश्यक झाले तेव्हा तो सत्ताधाऱ्यांनी केला काय? ज्यावेळी त्या बळाचे मूळ धारक आपल्यावर कुरघोडी करताना दिसले त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी त्यांना मोडून काढण्याचे राजकारण केले काय? हीच बाब अर्थावर ताबा असणाऱ्यांबाबतही घडली असणार. पैशाची गरज राज्याएवढीच धर्मसत्तेलाही होतीच. त्यातून सधनांचे वर्ग राजी राखण्याचा प्रयत्न जुन्या सत्ताधाऱ्यांएवढाच धर्माधिकाऱ्यांनीही केला. (आजचे राजकारण जर तो करीत असेल तर जुन्या आणि धर्म व ईश्वर यांच्याच भाषेत बोलणाऱ्या जगभरच्या समाजव्यवस्थांमध्येही तो झाला असणारच.)
राज्य दशरथाचे असले तरी त्याचा कारभार त्याचा सल्लागार असलेल्या वसिष्ठाच्या सल्ल्यानुसार चालत असेल, पांडवाचे राजतंत्र कृष्ण नावाच्या ज्ञानी पुरुषाच्या मार्गदर्शनानुसार पुढे जात असेल आणि राजपदावर बिंबिसार किंवा अजातशत्रू यातले कोणीही असले तरी ते बुध्दाच्या सूत्रानुसार वागणार असतील तर मग राज्यावर आणि राजकारणावर खरे नियंत्रण कोणाचे असते? चंद्रगुप्त हा सम्राट थोर आणि खराही. पण त्याला सम्राट बनवून यशस्वी करण्याचे श्रेय आर्य चाणक्याकडे जात असेल त्या साम्राज्याचा खरा अधिपती कोण असतो? नंतरच्या काळात वैदिक धर्माची ध्वजा पुन्हा एकवार उंचावणारा पुष्यमित्र शुंग हा राजा असला तरी त्याचा कारभार पतंजली या योगाचार्याच्या तंत्रानुसार चालणार असेल तर राजा शुंग असतो की पतंजली? फिलीप आणि अलेक्झांडर हेही सम्राटच होते. मात्र त्यांचे प्रशिक्षण ऍरिस्टॉटल या ज्ञानी पुरुषाच्या नियंत्रणात झाले आणि आपल्या यशाचे श्रेय त्या सम्राटांनीही त्याच्या प्रशिक्षणालाच दिले असेल तर त्यांच्या साम्राज्याचा मूळ निर्माता कोण होतो? इतिहासातील या कथा आणखीही सांगता येतील.
युरोपातील सगळया मध्ययुगीन सत्ता पोपच्या नियंत्रणात व आज्ञेत राहून आपला कारभार करीत होत्या. जगभरचे मुसलमान राज्यकर्ते खलिफाच्या मान्यतेसाठी जीव टाकत आणि त्याच्या आज्ञेत रहात. हिंदू राजांना साधूसंतांचे पाठबळ मोलाचे वाटे. चीन आणि जपानच नव्हे तर ब्राझीलमधील आणि पूर्वीच्या रोम-ग्रीकांच्या सत्तांनाही पुरोहितांच्या माध्यमातून येणारे ईश्वरी पाठबळ मोठे वाटे. ग्रीकांमध्ये ज्ञानाचा गौरव मोठा होता. मात्र डेल्फिच्या दैवतांचा तेथील पुरोहितांनी आणलेला संदेश त्यांच्यासाठी ज्ञानाहूनही मोठा ठरायचा. अशावेळी समोर दिसणारे सत्ताधारी सिंहानाधिष्ठित असले तरी खरी सत्ता मागे राहून त्यांच्या मनमेंदूवर ताबा ठेवणाऱ्या धर्मव्यवस्थेचीच असते की नाही?
राज्यशास्त्रात महाराजा रणजीतसिंगाचे उदाहरण आदर्श राज्यकर्ता म्हणून सांगितले जाते. ते त्याच्या पराक्रमासाठी नसून त्याने त्याच्या हयातीत एकही स्वतंत्र राजाज्ञा काढली नाही यासाठी. सर्व तऱ्हेचा कायदा धर्मग्रंथातच आला असल्याने राजाला वेगळी आज्ञा काढण्याची गरज नाही असे तो म्हणायचा. धर्मग्रंथांमधून आज्ञा शोधून त्यांचा पुरवठा सत्तेला पुन्हा धर्मगुरूंकडूनच केला जायचा. सुलतानाने कोणताही नवा कायदा करू नये, शरियतची (इस्लामी कायद्याची) अंमलबजावणी करणे एवढेच त्याचे पवित्र कर्तव्य आहे या विधानाचा अर्थही याहून वेगळा नाही. राज्य राजाचे असले तरी कायदा मनुचा, याज्ञवल्क्याचा, बुध्दाचा, पोपचा, शरियतचा किंवा अकाल तख्ताचा असेल तर पुन्हा सत्ता धर्मगुरूंची की राजांची हा प्रश्न उभा होतो. या दोन्ही सत्ता एकमेकींना सांभाळून, प्रसंगी एकमेकींवर ताबा ठेवून त्यासाठी कधी परस्परांवर कुरघोडी करीत तर कधी एकमेकींना शरण जात आपली हुकूमत कायम करीत. कारण त्यांना उरलेल्या मोठया समाजावर नियंत्रण ठेवून आपले वर्चस्व कायम राखायचे असे.
व्हॉल्टेअर म्हणाला, या जगावर पुस्तकांचे राज्य आहे. ही पुस्तके लिहिणारी माणसे पराक्रमी वा पैसेवाली नव्हती तशी ती अडाणी वा गुलामही नव्हती. धर्म आणि ज्ञान यांच्यावर ज्यांचा अधिकार होता त्यांनी ती लिहीली होती.... नेपोलियन म्हणाला, बंदुकांच्या गोळयांनी सरंजामशाही संपविली. पुढच्या काळात शाई हे जगातले सर्वश्रेष्ठ हत्यार असेल. या हत्यारावरचे नियंत्रण आज ज्ञानाचे व पूर्वी धर्माचेच राहिले आहे की नाही?
अखेर विचारायचा प्रश्न हा की, मनु, बुध्द, येशू किंवा पैगंबर यातले कोणी आज जन्माला आले तर ते धर्म संस्थापना करतील की राजकीय पक्षाची उभारणी?

No comments:

Post a Comment