Pages

Wednesday, May 12, 2010

स्वयंपूर्ण व्यक्तींचा मैत्रीपूर्ण समाज

समुदायाची संमती, वर्गाची मान्यता किंवा समाजाचा एकूणच संदर्भ या साऱ्यांचे व्यक्तीजीवनातील महत्त्व कमी होत गेले आणि त्यांचा विचार करीत माझ्या आयुष्याचे निर्णय न घेता ते मी माझ्याच मर्जीनुसार वा विवेकानुसार घेईन असे प्रत्येकच व्यक्तीने ठरविले तर समाज म्हणून उभी असलेली सध्याची व्यवस्था आणि तिच्या व्यवहार नियमांचे व विशेषतः नीतीनियमांचे आजचे स्वरुप कायम राहील की बदलेल? आजच्या व्यवस्थेचा सारा विचारच सामाजिक संरचना व तिच्या व्यक्तीजीवनावरील वजन-महात्म्यावर आधारलेला आहे. समाजाचे एकूण मानसशास्त्रही या संदर्भात लक्षात घ्यावे असे आहे. मागासलेले व अविकसीत समुदाय कमालीचे संघटित व एकजीव असतात. त्यात व्यक्तीला फारसे महत्त्व नसते. जे असते ते समाजाचा घटक याच एका नात्यामुळे तिला प्राप्त होते. तो संदर्भ संपला की तिचे ते महत्त्वच केवळ जात नाही, तिचे अस्तित्त्वच त्या समाजापुरते संपत असते. वाळीत टाकणे किंवा बहिष्कृत करणे या एकेकाळच्या व आता कालबाह्य होऊ लागलेल्या सामाजिक शिक्षांचे बळच त्या समाजांच्या अशा एकजिनसी स्वरुपात दडले असते.
अशा स्वरुपाच्या एका तात्विक विसंगतीकडेही येथे लक्ष वेधावे असे आहे. -सर्वम् खल्विदं ब्रह्म- आणि -अहम् ब्रह्मास्मि- किंवा -बुध्दं सरणम् गच्छामि- आणि -अत्त दीप भव- ही महावाक्ये खरी आणि वंदनीय दिसली तरी ती परस्परविरोधी आहेत हे कधीतरी लक्षात घ्यावेच लागेल. यातल्या पहिल्या चरणात साऱ्या विश्वाच्या एकतेवर भर तर दुसऱ्या चरणात प्रत्येकाचे स्वयंभू ब्रह्म असणे सांगितले आहे. बुध्दाला शरण जात असतानाच आपल्या अंतरीचा दीप तेवता राखून त्याच्याच प्रकाशात वाटचाल करण्याची असलेली आज्ञा हा प्रकारही एका मोठया विसंगतीचा भाग आहे. जगाच्या पसाऱ्याचा एक अंश असणाऱ्याने त्या पसाऱ्याहून आपले वेगळे असणे लक्षात घेणे व त्या विसंगतीवर मात करून पुन्हा विश्वात्मैक्य साध्य करणे हा प्रकार असमान्य बुध्दीचातुर्याचा मानला तरी त्यातील आंतरविरोधाकडे दुर्लक्ष करणे अवघड आहे. त्याच प्रमाणे शरणागत मनाने बुध्दीप्रामाण्याचा आदर करणे यातील आंतरविरोधही लक्षात यावा असाच आहे. अहम् ब्रह्मास्मि आणि सर्वम् खल्विदं यात परस्पर विरोध कसा नाही आणि ती दोन्ही सत्ये परस्परपूरकच कशी आहेत हे सांगण्यावर आपल्या अध्यात्माची बहुतेक सारी चर्चा आणि ताकद खर्ची पडली आहे. पण विश्वाचे ऐक्य सांगत असताना जीवाच्या वेगळेपणाचा मेळ त्याच्याशी घालून देणे व तो विश्वसनीय वाटायला लावणे या चर्चेलाही श्रध्देच्या कुबडयांखेरीज न जमणारे आहे. या तुलनेत बुध्दं सरणम् आणि अत्त दीप यातील विसंगती अधिक उघड आणि स्पष्ट आहे. त्यात संघम् सरणम् हा चरण आणला की ही विसंगती आणखीही मोठी होणारी आहे.
समाज जसजसा प्रगत होतो तसतसा तो विकेंद्रीत होतो. तसे होताना त्याचे पूर्वीचे मागासलेपण जसे जाते तसे त्याचे एकजिनसी असणेही संपू लागते. सामाजिक महत्त्वाकांक्षांची जागा प्रथम गटांच्या व पुढे व्यक्तींच्या महत्वाकांक्षा घेऊ लागतात. आदिवासींचे समूह कमालीचे एकजिनसी असतात आणि अजून ते तसे राहिले आहेत. मात्र शिक्षण, सुधारणा आणि नव्या विचारांच्या आगमनाने त्याचे स्वरुप आता बदलू लागले व अनेक जागी ते पूर्णपणे बदललेही आहे. दलित समाजात आज उभे असलेले प्रचंड राजकीय हेवेदावे हेही याच विकेंद्रीत व स्पर्धात्मक बदलाच्या परिणामातून आले आहेत. गांधीजींनी -स्वयंपूर्ण ग्रामराज्यांचे संघराज्य- अशी एक भव्य कल्पना उराशी बाळगली होती. तीच आणखी पुढे नेऊन येणारा काळ -स्वयंपूर्ण व्यक्तींच्या मैत्रीपूर्ण समाजाचा -असेल असे म्हणता येईल. हा समाज आजच्या समाजाहून वेगळा असेल. तसा तो वरवर दिसणार नसला तरी त्याचे अंतरंग बदलले असेल. अमेरिकी व पाश्चात्त्य देशातील आजची सामाजिक संरचना या येणाऱ्या समाजाचे चित्र काही प्रमाणात आपल्यापुढे उभे करू शकेल. मात्र ते चित्र पूर्ण असणार नाही. कारण ज्या गतीने आपण बदलू त्याच गतीने ते आणखी बदलून आमच्याहून अधिक वेगळेही होणार आहेत.
व्यक्तीस्वातंत्र्याचा पूर्ण व प्रसंगी अतिरिक्त अनुभव व्यक्तीजीवनावर संकोच लादणाऱ्या जुन्या व्यवस्थेलाच नव्हे तर मानसिकतेलाही नकार देणारा असेल. उच्च-नीच भावाचा तो शेवट असेल आणि तू-मी-ते असे सारेच सारखे आहोत असाही तो भाव असेल. हा भाव पाश्चात्य देशात आजच रुढ आहे. धर्म हा तेथे विरंगुळयाचा तर ईश्वर हा मानसिक दिलासा देणारा भाग बनला आहे. सत्तेविषयीचे कुतूहल शिल्लक असले तरी तिचा दरारा लोपला आहे. समाजाला डॉक्टर हवे, वकील हवे तसे शासकही हवे एवढीच त्यांच्याविषयीची भावना आता उरली आहे. शासनकर्त्यांचे नेतेपण गेले, गरजच तेवढी मागे राहिली. कुटूंबाचे स्वरुप बदलले. त्यातला एकाधिकार जाऊन त्यात लोकशाही आली. पुरुषप्रधानतेची जागा स्त्रीपुरुष समतेने घेतली. पत्नीने साधा पाण्याचा ग्लास हाती दिला तरी नवऱ्याने तिचे आभार मानण्याची आताची मानसिकता त्यांच्यातील नव्या समतावादाने आणली. कुटूंब राहिले आणि घरही राहिले. मात्र त्याचे जुने घरपण गेले. वयात आलेली मुले आईबापांना घरात नकोत आणि वय झालेले आईबाप मुलांनाही डोळयासमोर नकोत. जॉर्ज वॉशिंग्टन या अमेरिकेच्या पहिल्या अध्यक्षाची जी भव्य तैलचित्रे त्या देशाच्या विधीमंडळाच्या इमारतीत अजून आहेत त्यांचे स्वरुप थेट ईश्वरी -----आहे. आताच्या बराक ओबामाला कोणी जीझससारखे वा मोझेससारखे रंगविणार नाही. त्या देशाचा साधा नागरिकही त्याला मि. प्रेसिडेंट म्हणून त्याच्याशी बोलणी सुरू करेल.
अशा समानच नव्हे तर सपाट समूहातील माणसांच्या परस्परसंबंधांना देवाधर्माचा, जातीपंथांचा किंवा कौटुंबिक परंपरांचा आधार नसेल. असलाच तर तो केवळ त्यांच्यातील विश्वासाचाच तेवढा असेल. हा विश्वास त्यांना एकमेकांच्या आलेल्या वा घेतलेल्या अनुभवातून मिळवावा लागेल. या विश्वासामागे हवाला म्हणून उभा करायला आणखी कोणी असणार नाही. असलीच तर ती कायद्याची अमूर्त यंत्रणाच तेवढी असेल. समान धाग्यांनी, हितसंबंधांनी आणि गरजांनी विश्वास ठेवून एकत्र आलेल्यांचे समूह हाही त्यांचा आधार होऊ शकेल. या समूहांना जोडणारी नाती रक्ताची, जातीची, वंश वा धर्माची नसतील. तशी ती भाषा व देश यांचीही नसतील. ती नाती फक्त तू एक माणूस-मी एक माणूस या समजावरची व त्याच मान्यतेवरची असतील. परंपरागत नात्यांचे व त्यांना असणाऱ्या समूहाधारित बळकटीचे वैय्यर्थ लक्षात आले की एवढेच पुरणारेही असते.
माणूस समुदायात असला आणि एकटा असला तरी त्याचे माणूसपण मात्र कायमच राहील. ते कुठे जाणार नाही. त्याच्या वाटयाला येणाऱ्या उपजत गोष्टींना नव्या व्यवस्थेतही जागा असेल. वात्सल्य, प्रेम, राग-लोभ, द्वेष, मत्सर, वैर हे सारे नव्या व्यवस्थेतही असेल. मात्र ते समूह पातळीवरचे नसेल. त्यामुळे ते आजच्या एवढे आक्रमक वा भयकारी असण्याची शक्यताही संपेल. करुणा कायम राहील. परोपकार व सहकार्य यांनी मिळणारा आनंद व कृतार्थभाव टिकेल. फक्त ते अमूक एका नातेवाईकासाठी, ज्ञातीबांधवासाठी, धर्मरक्षणार्थ वा जातीच्या संदर्भात असणार नाही.
पुढारी व नेतृत्त्व त्यांचे आधार पुन्हा एकवार तडफ, ज्ञान, गुणवत्ता हे असतील. जवळचे, जातीचे, धर्माचे वा भाषेचे असे त्याचे आजचे आधार जातील. मैत्र भाव हा साऱ्या व्यवहाराचा व व्यक्ती जीवनातील संबंधांचा आधार बनेल. बाकी आपपर भावाचा त्यांच्याशी आता असलेला संबंध संपेल. मैत्री ही त्यातली विधायक व कायदा ही त्यातली भयवजा बाजू असेल.
मैत्रीत आत्मीयता आहे. बंधन नाही. तिला स्थळकाळाएवढीच नातेधर्माची कसोटी नाही. कालचे आदर्श फारकाळ कुणाला भुलवू शकणार नाहीत. आताचा हितसंबंध आणि आताचा आनंद या आधारावरच मैत्री उभी होत असते. तीत द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही भाव असतात. एकात्मता आणि स्वातंत्र्यही असते. भाव एक आणि अनुभव अनेक असतात. मित्राशी असलेले नाते बळ देते, निर्बंध आणत नाही. सागराच्या पाण्याचा समुच्चय आणि पावसाच्या थेंबांचे वेगळेपण असा हा सारा अनुभव असेल.
अशा स्थितीत मी माझे बलस्थान आणि तो त्याचे बलस्थान. त्यात उच्चनीच नाही, वर्चस्व-दबलेपण नाही, मालक-नोकर हा भाव नाही. साधा व बरोबरीचा शेजारधर्म. 1958 मध्ये रशियाच्या कम्युनिस्ट पार्टीचे सचिव ख्रुश्चेव अमेरिकेच्या दौऱ्यात त्या देशाला उद्देशून म्हणाले, -तुम्हाला आमचा कम्युनिझम आवडत नाही. आम्हाला तुमचा कॅपिटॅलिझम मानवत नाही. सबब नाईलाज म्हणून का होईना आपण शेजारधर्म सांभाळून जगणे शिकले पाहिजे- तेव्हापासून रशियातला कम्युनिझम संपेपर्यंत आणि थेट आतापर्यंत आपले वेगळेपण जपत त्या दोन देशांनी एकाच जगात एकत्र राहणे सांभाळले आहे. हीच बाब धर्म व भाषांच्या संदर्भातही घडली आहे. आता ती आणखी वेगळया पायरीवर, व्यक्तीगत स्तरावर येताना दिसू लागली आहे. खऱ्या-खोटया वा बऱ्यावाईट धार्मिक आणि वांशिक एकात्मभावाची जागा प्रथम नाईलाजाच्या व पुढे गरजेच्या शेजारधर्माने घेणे आणि पुढे जाऊन तिने मित्रधर्मात रुपांतर होणे हा प्रवास समूहांचे व्यक्तीकरण होत असतानाच अनुभवाला येऊ लागला आहे. त्याचे व्यक्तीपातळीवरील स्वरुपही दिवसेंदिवस अधिक स्पष्ट होऊ लागले आहे.
या नव्या समाजातील नीती व्यवहाराला धर्म आणि धर्मशास्त्र यांचा आधार पुरणार नाही. ईश्वरी प्रसाद किंवा कोप यांचे भय या व्यवहारामागे जसे उभे राहणार नाही तसे स्वर्ग-नरक, पाप-पुण्य आणि पूर्व व पुनर्जन्म यांच्याही अस्तित्त्वाचे बळ या व्यवहारामागे असणार नाही. तसेही या साऱ्या गोष्टींचे वैय्यर्थ आणि नास्तित्व नव्या पिढयांच्या पुरेसे लक्षात आले आहे. या जन्मात असे केल्याने पुढचा जन्म चांगला मिळतो किंवा अमुक एका स्वर्गात जागा मिळते, तसे न वागले तर पुढचा जन्म वाईट मिळतो किंवा तमुक दर्जाच्या नरकात जागा मिळते या विषयी वाटणाऱ्या भयाच्या भरवशावर इतिहासात नीती कल्पना तरल्या हे येथे उल्लेखनीय. नव्या नीतीधर्माला समाजाच्या मान्यतेचीही गरज उरणार नाही. जोपर्यंत व्यक्ती समाजाच्या संदर्भात स्वतःचा विचार करते तोवरच समाजमान्यतेची महती कायम टिकते. स्वतःच्या संदर्भात ती समाजाचा विचार करू लागली की समाजाचे महात्म्य तिच्या लेखी ओसरले असते. या नीतीला कौटुंबिक मान्यतेची वा संमतीचीही गरज उरणार नाही. कुटूंबाच्या बंधनांची व्यक्तीवरची पकड तशीही आज सैल झाली आहे. 1975 च्या सुमाराला कोलकात्याच्या चार अविवाहित तरुणींनी त्या सरकारी नोकरीत असताना बाळंतपणाच्या रजेसाठी वरिष्ठांकडे अर्ज केला होता. विवाहावाचून येणाऱ्या मातृत्वाला तेव्हाच्या सरकारी नियमात मान्यता नसल्याने हे अर्ज वरिष्ठांनी नाकारले. या मुलींनी वरिष्ठांच्या नकाराला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्या न्यायालयाने वरिष्ठांचा व नियमांचा अधिकार मान्य करून हे अर्ज फेटाळले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा हा निकाल फिरवून विवाहावाचून मातृत्व प्राप्त करणे हा स्त्रीचा अधिकार असल्याचा निर्वाळा देऊन त्या चौघींची रजा मंजूर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आजपासून 35 वर्षांपूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल व्यक्तीच्या या स्वातंत्र्याधिकाराच्या बाजूने जाणारा व या अधिकाराला कुटूंब, धर्म, समाज इत्यादी व्यवस्थांच्या मान्यतेची गरज नसल्याचे सांगणारा आहे. (भारतीय घटनेने दिलेले मुलभूत अधिकार व्यक्तींना दिले आहेत. कुटूंबांना, जातींना, धर्मांना किंवा समुहांना ते दिले नाहीत. मुलभूत अधिकार व्यक्तीगत आणि रुढी, परंपरा, चालीरिती, सामाजिक नियम हे सारे समूहगत अशी ही विसंगती आहे आणि ती आपला समाज गेली काही दशके तणावासह अनुभवत आहे.) भारतात या व अशा तणावांची चर्चा होते. पाश्चात्त्य जगात असे तणावही प्रतिगामी मानसिकतेचे चिन्ह म्हणून पाहिले जातात.
नव्या नीतीव्यवहाराला या पुढील काळात राहू शकणारा एकमेव आधार कायदा हा असेल. कायद्याचा हा आधार संरक्षण देण्याएवढा मर्यादित असेल. तो प्रत्येक वेळी मानसिक बळ देईलच असे मात्र नाही. ते बळ ज्याचे त्याला मिळवावे लागेल. माणसाचा एक स्वभाव स्तुतीने सुखावण्याचा आणि विश्वासाने बळावण्याचा आहे. समुहात असतो तसा तो एकटे असतानाही कायम राहणारा आहे. समुदायाचे एकाजिवित्व संपले आणि समाज सैल झाला तरी त्यामुळे व्यक्तीचे गुणधर्म बदलण्याचे कारण नसते. एकत्र असणारा माणूसही प्रसंगी एकाकीपण अनुभवतो. समाजाने आणि समुदायाने दिलेले संरक्षण हरवल्याने प्रसंगी मनाने तो एकतऱ्हेचे असुरक्षितपणही अनभवू लागतो. गरज असुरक्षितपणातून येईल वा प्रशंसेच्या गरजेतून. एकाकी माणसांच्या समाजातही व्यक्ती भिन्न वा समविचारी माणसे जोडून ठेवतील. कधी उपजिविकेची गरज म्हणून एकत्र येणे भाग पडेल तर कधी मनाला येणारे असुरक्षिततेच्या पातळीवर जाणारे एकाकीपण घालविणे गरजेचे होते म्हणून. मात्र यातून एकत्र येणारी माणसे फक्त परस्परांविषयी वाटणाऱ्या विश्वासातून जवळ येतील. त्यांच्यात आत्मीयता निर्माण झाली तर ती खरीखुरी आत्मीयताही असेल. तिला नातेसंबंधांच्या वा धर्मसंबंधांच्या कुबडयांची गरज असणार नाही. खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण व्यक्तींचा तो मैत्रीपूर्ण समाज असेल.
हे आजही आपण अनुभवत नाही काय, असा प्रश्न याजागी अनेकांच्या मनात येऊ शकेल. मात्र आजचा अनुभव माणसांच्या सहवासात अनुभवण्याच्या शुध्द आत्मीयतेचा वा मैत्रीचा नाही हे त्या प्रश्नाचे उत्तर आहे. आताचा माणसामाणसांतील संबंध नात्यांवर, रक्तसंबंधांवर, आप्त स्वकीय असण्यावर, जाती वा धर्माचे बांधव असण्याच्या कसोटयांवर उभा आहे. त्यातील आत्मीयतेचा आधार आणि मर्यादा या दोन्ही गोष्टी या कसोटयांनी निश्चित केल्या आहेत. हे संबंध जेवढे सुखकारक तेवढेच प्रसंगी जाचक होणारेही आहेत. नातेसंबंधांतील किंवा ज्ञातीसंबंधातील जाचकता बोलून दाखविण्याएवढे मोकळेपण आपल्याकडे अजून यायचे आहे. ज्या समाजात ते आले आहे त्यात त्याची होणारी चर्चा जेवढी उघड तेवढेच त्याचे परिणाम अनुभवण्याची तयारीही पूर्ण आहे. पाश्चात्त्यांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण फार असल्याची ऊरबडवी चर्चा आपल्यात फार होते. न पटल्यामुळे वेगळी होणारी आणि स्वयंपूर्ण व सुखी होणारी तेथली माणसे (व स्त्रिया) अधिक आदरणीय की मन मारून, मार खाऊन, दरवेळी पडते घेऊन किंवा स्वतःचे अस्तित्व पार पुसून टाकून आहे त्याच अवस्थेत कशीबशी जगणारी आपल्याकडली, नेहमीच्या पाहण्यातली माणसे (व स्त्रिया) अधिक सामर्थ्यशाली, या प्रश्नाचा विचार येथे सुसंगत ठरावा. आपला समाज सर्वतोपरी पाश्चात्यांच्या वळणावर जाईल असे येथे सुचवायचे नाही. प्रत्येक समाजाची पुढे आणि वर उठण्याची दिशा आणि गती त्याच्या अंतर्गत रचनेने निश्चित केली असते. सारे समाज आणि सारी माणसे एकाच मार्गाने गेली तर त्याचे समाजपणच नव्हे तर माणूसपणही हरवणारे असते. याउलट स्वयंभू आणि स्वयंपूर्ण माणसांच्या जगात प्रत्येकाचे अंगभूत वेगळेपण प्रगट होण्याचीच शक्यता अधिक असेल आणि त्यामुळे अस्तित्वात येणारे रंगीबेरंगी जग आणखी देखणे व सुंदरही असेल.
यातून प्रश्न सुटतील काय, हा प्रश्न पुन्हा शिल्लक राहतोच. त्याचे उत्तर व्यक्तीचे, समुहांचे, समुदायांचे आणि समाजाचे प्रश्न अंतहीन असतात हे आहे. ते सुटत नाहीत, संपत नाहीत आणि कमीही होत नाहीत. त्यांचे स्वरुपच तेवढे बदलत असते. व्यक्तीच्या हाती फक्त दोनच पर्याय शिल्लक असतात. एक, असलेल्या प्रश्नाकडे पाठ फिरवणे आणि दुसरा, त्याच्या जुन्या व नव्या स्वरुपासोबत जगायला शिकणे.
प्रश्न संपले की जगणे संपते. म्हणून प्रश्न संपूही नयेत. कालपर्यंतचे प्रश्न समाजाचे, समुदायांचे आणि संस्थांचे होते. यापुढच्या काळात ते व्यक्तींचे असतील, त्यांचे स्वरुप समजुतींहून अनुभवांवर आधारले असेल शिवाय ते व्यवहाराएवढेच मानसिकतेलाही जवळचे असतील.

No comments:

Post a Comment