ग्रीक तत्वज्ञानाने इंद्रियगोचर जग सत्य मानले. थेल्सपासून सुरू होऊन ऍरिस्टॉटलपर्यंत येणारी परंपरा जगत् सत्यम् म्हणणारी आहे. ज्ञात जगाला आधार मानून अज्ञाताचा वेध घेण्याची तिची धडपड आहे. तिने जग असुंदर किंवा दु:खमय मानले नाही. ते आहे तसे आहे आणि तसेच ते राहणारही आहे. आपल्या संशोधन आणि परिश्रम यांच्या आधारे ते अधिक सुंदर, सुसह्य, श्रीमंत आणि नीतीमान बनविण्याकडे त्याचा कल आहे. त्याचमुळे तेथे ज्ञानाएवढयाच विज्ञानाच्याही परंपरा निर्माण झाल्या. थेल्स आणि पायथॅगोरस हे गणिती होते, वैज्ञानिकही होते. त्यांनी त्या शास्त्रांच्या संशोधनाचा पाया घातला आणि ते आपल्या सामर्थ्यानुसार वाढवीतही नेले.
याउलट आपल्या ज्ञानपरंपरांनी अनुभवाला येणारे जग मिथ्या मानले. अनुभवाला न येणारा (वा प्रत्यक्ष समजून घेता न येणारा) ईश्वर आणि ब्रह्म या कल्पनाच तेवढया खऱ्या मानल्या. इंद्रियगोचर जगत् नाकारणे पूर्णपणे शक्य नसल्याने त्याचे वर्णन अनिर्वचनीय असे करून त्यांनी एक पळवाटही शोधली. आपल्यातील ज्या तत्त्वपरंपरांनी जगत् सत्य मानले त्यांनीही ते आनंदमय न ठरविता दु:खमय असल्याचे सांगितले. सर्वम् दु:खम्, सर्वम् क्षणिकम् असे म्हणून त्याच्या अस्तित्वाचे कुरूपपणच समाजाच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. मिथ्या व दुःखमय ठरविलेल्या जगापासून सुटका करून घेण्यासाठी एकाने संन्यासाचा तर दुसऱ्याने निर्वाणाचा मार्ग दाखविला... सारांश, ग्रीक परंपरांनी अनुभवाला येणारे जग आपले मानून ते प्रिय बनविण्याचा ध्यास घेतला तर आपल्या परंपरांनी ते मिथ्या वा दु:खमय ठरवून त्यापासून सुटका करून घेण्याचे मार्ग सांगितले. परिणामी आमचे ज्ञान थांबले आणि विज्ञानही विकसीत होऊ शकले नाही.
गणिताच्या, खगोलशास्त्राच्या व औषधी विज्ञानाच्या शोध परंपरा येथेही होत्या. त्या क्षेत्रातील मोठे आचार्यही इतिहासाला ज्ञात आहेत. पण त्यांचे ज्ञान मिथ्या किंवा दु:खमय विश्वाविषयीची आसक्ती वाढविणारे असल्याने त्याची वाढ थांबली... काहीसा असाच पण वेगळया प्रकारचा थांबा ग्रीकांमध्येही आला. थेल्सपासून डिमाक्रिटसपर्यंतची वैज्ञानिकांची व गणिततज्ज्ञांची परंपरा सॉक्रेटिसपूर्व आहे. त्या परंपरेने विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, कृषी, जलसंपदा इत्यादीचे महत्व जाणून तिचा मानवी जीवनाच्या कल्याणासाठी कसा उपयोग होऊ शकेल याचा विचार मांडला. सॉक्रेटिसने तो सारा बाह्य विकासाचा उपक्रम ठरविला. त्याच्या मते माणसाची नैतिक उंची वाढविते तेच खरे ज्ञान. त्याला सत्याच्या, नीतीच्या व चांगुलपणाच्या मार्गावर नेणाऱ्या ज्ञानाचा विचारच तेवढा महत्वाचा वाटला. गणित आणि विज्ञानासारख्या ज्ञानशाखा माणसाच्या माहितीत भर घालत असल्या आणि त्याची बाह्य समृध्दी वाढवीत असल्या तरी खऱ्या ज्ञानाचे ते प्रयोजन नाही असे त्याने मानले. माणसाचे मन, बुध्दी आणि आंतरिक सामर्थ्य यांची वाढच तेवढी त्याने महत्वाची ठरविली.
सॉक्रेटिसचा प्रभाव मोठा असल्याने त्याच्या अंतज्र्ञानाच्या शिकवणुकीमुळे विज्ञानाच्या परंपरा तेथेही थांबणे शक्य होते. परंतु सॉक्रेटिसचे टीकाकार आणि टवाळखोर त्याही काळात होते. त्यांनी त्याचे विडंबन करणारी नाटके लिहिली आणि ती लोकांसमोर आणली. ग्रीकांच्या लोकशाहीने त्याला मृत्यूदंडही दिला. प्लेटो आणि ऍरिस्टॉटल ही त्याची शिष्यपरंपरा त्याच्याएवढीच थोर पण स्वतंत्रपणे विचार करणारी होती. त्यांनी अकादमींची स्थापना केली. शेकडोंच्या संख्येने ग्रंथ लिहिले. मानसशास्त्रापासून विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंत आणि साहित्य व संगीतापासून कलेपर्यंतच्या सगळया क्षेत्रात स्वतंत्र संशोधन करणे जारी ठेवले. परिणामी मिथ्यावादाने किंवा दु:खवादाने आमच्या विज्ञान व संशोधनाच्या परंपरा जशा थांबविल्या तसे ग्रीसमध्ये झाले नाही. तिकडे त्या परंपरा प्रथम अलेक्झांडरच्या साम्राज्यपिपासेने आणि पुढे ख्रिश्चन धर्माच्या आंधळया उपासनेने थांबविल्या.
जग मिथ्या आहे हे एकदा ठरविले की त्यात रस घेण्याजोगे फारसे उरत नाही. त्याच्याविषयीची आस्था बाळगणे आणि त्याला आहे त्याहून सुंदर बनविण्याचे प्रयत्न करणे हेही निरर्थक व अकारण ठरते. तसेच ते केवळ दु:खमय आहे असे सांगून झाले की त्याविषयीच्या सगळया आशा संपतात. ते क्षणभंगूर आहे असे म्हटले की त्यात टिकवून धरायचेही काही उरत नाही. मिथ्या जगतापासून स्वत:ला सोडवून, न सापडणारे ब्रह्म जवळ करायचे असा ध्यास एकदा घेतला की अवतीभोवतीच्या जगाविषयीची उरलीसुरली आत्मीयता जाते आणि दु:खापासून मुक्ती मिळवायला इच्छा नुसत्या जिंकायच्या असे मनात आणले की सगळा प्रयत्नवादही संपत असतो. साऱ्या मानवी प्रयत्नांचा हेतूच मुळी काही तरी प्राप्त करणे हा असतो. आपल्या अध्यात्म विचाराचा हेतू इंद्रियगोचर जगापासून निवृत्ती वा निर्वाण हाच ठरल्यामुळे मानवी जीवनाचे प्रयोजनच त्या जीवनाकडे पाठ फिरविणे आणि ब्रह्मसन्मुख वा निर्वाणसन्मुख होणे हे ठरते. यातून जीवनाविषयीची अनास्था आणि निवृत्ती वा निर्वाणाविषयीचे आकर्षण उभे झाले की भौतिक प्रगतीच्या सगळया शक्यताच नाहीशा होतात.
हाच प्रकार पाश्चात्य जगात ख्रिश्चानिटीच्या स्थापनेनंतर झाला. तोराह आणि बायबल यांनी सांगितलेल्या धर्मसत्यांहून विज्ञानाने शोधून काढलेली वस्तुमानावर आधारित सत्ये वेगळी असतील तर ती नाहिशी करण्यावर आणि समाजापर्यंत पोहचू न देण्यावर चर्चचा भर राहिला. थेल्स-पायथागोरस-ऍरिस्टॉटल या परंपरेने मांडलेली ज्ञाननिष्ठ व विज्ञानशोधीत सत्ये या धर्मपरंपरेने नाकारली. युक्लीड आर्किमिडिझ आणि टॉलेमी यांचे संशोधनही तिने अमान्य ठरविले. त्यांची संशोधने जपण्याचे व त्यांच्या ग्रंथांचे भाषांतर करून ते ज्ञान जिवंत ठेवण्याचे काम अरब देशातील ज्ञानवंतांच्या परंपरेने केले. इब्न हैदान, अल् बिरुनी, अल् क्वारिझामी यासारख्या तत्त्वचिंतकांना त्याचे श्रेय जाते. मात्र याच काळात इस्लामच्या धार्मिकतेचे आक्रमण पुढे आले आणि कुराणाखेरीज सारेच अग्राह्य मानणाऱ्या त्या धर्मपरंपरेने थेल्स-ऍरिस्टॉटल ते हैय्यात आणि क्वारिझामीपर्यंतचे सारेच विज्ञान धर्मबाह्य व धर्मद्रोही ठरवून त्यांच्या अध्ययनावरच बंदी आणली.
भारतात विज्ञान होते; तसे ते चीनमध्येही होते. त्याही अगोदर बाबिलोनियन आणि सुमेरियन संस्कृतीत ते होते. सहा हजार वर्षांपूर्वी बाबिलोनियामध्ये (आताचा इराक) एक लाख लोकवस्तीची शहरे होती. अशी शहरे विज्ञानाच्या आधाराखेरीज उभी राहणारी नव्हती. आपल्याकडील हरप्पा- मोहेंजोदरोची मांडणीही वैज्ञानिक वास्तुशास्त्राच्या माहितीखेरीज उभी राहणारी नव्हती. इजिप्तचे पिरॅमिड्सही बांधकामशास्त्र व त्याला आवश्यक असलेले भौतिक विज्ञान यांच्याखेरीज उभे राहिले नाहीत. चीनने कागद आणि छपाईचा शोध व स्वीकार असाच फार पूर्वी केला. कणादाने त्याच्या अणुवादाची मांडणी आपल्याकडे केली तेव्हा ख्रिस्ताब्द सुरू व्हायचे होते. आर्यभट्टाने 'पाय'चे मूल्य 3.1416 हे ठरविले आणि वर्षात 365.58 दिवस असतात ही मांडणी पाचव्या शतकात केली. पृथ्वी गोलाकार असून ती सूर्याभोवती फिरते हे त्याला ज्ञात होते. अरब अभ्यासकांनी जसे ग्रीकांचे तत्त्वग्रंथ जपले तसे भारतीयांचे विज्ञानावरील ग्रंथ जपण्याचाही उपक्रम केला. अल्-मन्सूर या अरबी तत्त्वचिंतकाने ब्रह्मगुप्ताच्या खगोलशास्त्रावरील ग्रंथाचे सिंदहिंद या नावाने भाषांतर केल्याची नोंद इतिहासात आहे. कणादापासून आर्यभट्टापर्यंतची ही परंपरा, बांधकामशास्त्र ते आयुर्वेदातील औषधी विज्ञानाच्या या परंपरा पुढील काळात जगन्मिथ्या आणि निर्वाणसर्वस्व या विचारांच्या प्रभावाखाली लुप्त झाल्या. चर्चने जे पाश्चात्य जगात केले, इस्लामने जे अरब देशात घडविले तेच आपल्या धर्मपरंपरांनी आणि त्यावर विसंबून जीवनविन्मुख होण्याच्या केलेल्या संस्कारांमुळे भारतातही झाले.
पाश्चात्य देशात 16 व 17 व्या शतकात विज्ञानाने पुन: एकवार उभारी घेतली. विज्ञान आणि वैज्ञानिक सत्यांचा शोध ही प्रेरणा तशीही स्वस्थ राहणारी नव्हती. धर्मपरंपरांची हुकूमत, तिची तेव्हाच्या सरंजामी व्यवस्थेला असलेली साथ आणि जुलूमी राजेशाही या साऱ्यांची दडपणे झुगारून विज्ञान पुढे आले आणि त्याने नंतरच्या काळात त्या व्यवस्थांच्या दडपेगिरीचा पराभवच केलेला दिसला. कोपर्निकस-गॅलिलिओसारख्यांनी आरंभ केलेल्या या विज्ञान विजयाची परिणती पाश्चात्य जगात व साऱ्या दुनियेतच ज्ञानाच्या स्फोटाच्या स्वरूपात झालेली आपण पाहतो. आपले ऐतिहासिक दुर्दैव हे की ज्या काळात युरोपात विज्ञान उभे होत होते त्या काळात आपल्याकडे इस्लामच्या राजवटी प्रस्थापित व मजबूत होत होत्या. त्या राजवटींचा ज्ञानाएवढाच विज्ञानावरही रोष होता. स्वाभाविकच नव्या तत्त्वचिंतनाचा आरंभ किंवा विज्ञाननिष्ठेची कास धरण्याची वृत्ती या गोष्टी मध्ययुगात येथे निर्माण झाल्या नाहीत.
आपल्याकडील संतांची परंपरा या संदर्भात फार वेगळया अंगाने अभ्यासण्याची आता गरज आहे. 12 व 13 व्या शतकात सुरू होणारी ही परंपरा महाराष्ट्रात महानुभाव-ज्ञानेश्वरादि संतांची, उत्तरेत तुलसीदास-कबीरादिकांची आणि दक्षिणेत अळवार संतांची आहे. धार्मिक क्षेत्रात माजलेला भ्रष्टाचार, शरीरपूजेसारख्या अनिष्ट परंपरा आणि खऱ्या अध्यात्मसाधनेकडे झालेले एकूणच दुर्लक्ष यातून समाजाची अधोगती होताना पहावी लागणे ही तत्कालीन समाजव्यवस्थेची एक बाजू होती. तर दिल्लीवर होत असलेले इस्लामी आक्रमण आणि त्यापुढे धडाधड कोसळणाऱ्या आपल्या जुन्या व्यवस्था हे तिचे दुसरे अंग होते. समाजात माजलेल्या धार्मिक अनाचाराविरुध्द प्रत्यक्ष शंकराचार्यांनी केलेल्या शुध्दीकरणाचे तपशील इतिहासाला ठाऊक आहेत. तशा ज्ञानेश्वरादि संतांनी उत्तरेच्या केलेल्या यात्रेत इस्लामी आक्रमणाने केलेल्या पडझडींच्या कहाण्या प्रत्यक्ष पाहिल्याही आहेत. अखेर संत-महात्मेही आभाळातून पडत नाहीत. ते याच मातीत जन्माला येतात आणि तिच्यासोबत वाढत असतात. प्रत्येक विचारवंत (वा तत्त्वज्ञ) हा त्याच्या काळाचा पुत्र असतो असे त्याचमुळे म्हटले जाते.
समाजाची नैतिक पडझड आणि परकीयांचे अघोरी आक्रमण यांना तोंड द्यायला तत्कालीन राजकीय यंत्रणा व सामाजिक संघटना पुरेशा नाहीत आणि या आक्रमणासमोर आपली प्राचीन धर्मसंस्कृती टिकाव धरून उभी राहणेही शक्य नाही हे लक्षात आल्यामुळेच या संतपरंपरेने किमान खासगी जीवनात धर्म व संस्कृतीच्या जुन्या आणि चांगल्या परंपरा शिल्लक राहाव्या यासाठी नव्याने धर्मजागरण करण्याचे कार्य हाती घेतले. ते करण्यासाठी कर्मठांच्या जुन्या ब्राह्मणी परंपरांचे स्वरूप बदलण्याची तयारी करून त्यांनी संस्कृतातले धर्मज्ञान प्रादेशिक व लोकभाषांमध्ये आणले. धर्म व समाजव्यवस्था टिकविण्याची जबाबदारी त्रैवार्णिकांना पार पाडता येणार नाही हे ओळखून त्या व्यवस्थांशी स्त्रीशुद्रांसकट साऱ्या समाजाला जोडून घेण्याची त्यांनी शिकस्त केली. सारा समाज धर्माच्या एका छत्राखाली आला तरच त्याला आपल्या प्राचीन संस्कृतीचे एकजुटीने जतन करता येईल अशा जिद्दीने संतांचा हा वर्ग देशभर कामाला लागला. त्यातून परंपरा टिकल्या, धर्माचे नाव राहिले आणि त्याचमुळे आपल्या प्राचीनत्वावर हक्क सांगण्याचा आपला संस्कारही कायम राहिला.
ज्ञान-विज्ञानाच्या परंपरा लोपल्याने गमावलेले सामाजिक प्रगतींचे भान, या मंडळीच्या कामामुळे पुरेसे आले नसले तरी आलेल्या प्रतिकूल अवस्थेत टिकून राहण्याचे बळ त्याने आपल्याला तेव्हा दिले. संताच्या या कामाचे स्वरुप धार्मिक असण्याहून सामाजिकच अधिक होते काय, किमान त्यांच्या कार्याचा तो परिणाम अधिक मोलाचा होता काय, याचा विचार नव्याने होण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment