या मन्वंतराचा आरंभ 1960 च्या दशकात झाला. जेव्हा झाला तेव्हा त्याचे तसे होणे अनेकांच्या लक्षात आले नाही. पुढे 1980 च्या दशकात 'टाईम' या अमेरिकी नियतकालिकाने तसा प्रश्न जगातल्या समाजशास्त्रज्ञांना विचारला तेव्हा जगाने त्यावर आपल्या मान्यतेचे शिक्कामोर्तब उमटविले. 'या जगाने आपली कूस पालटली असे वाटावे असा काळ कोणता' असा प्रश्न या नियतकालिकाने तेव्हा जगभरच्या एक हजारावर समाजशास्त्रज्ञांना विचारला. त्याचे उत्तर देताना त्यातल्या बहुतेकांनी तो काळ 1967 च्या मागेपुढे येऊन गेल्याचे मत नोंदविले.
त्या काळात जगावर परिणाम करून गेलेल्या अनेक घटना एकाच वेळी घडल्या. अमेरिकेत काळया अमेरिकी जनतेचे नेते मार्टिन ल्यूथर किंग आणि अध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे रॉबर्ट केनेडी या दोन नेत्यांचा खून झाला. युरोपात कोहन बेंडिट या युवकाच्या नेतृत्त्वात झालेल्या उठावामुळे तेथील अनेक सरकारे कोसळली. रशियातील पोलादी पडदा सैल व्हायला याच काळात आरंभ झाला. एकटया इस्रायलने चौदा अरब देशांचे संयुक्त आक्रमण या काळात नुसते परतूनच लावले नाही तर त्याचा निर्णायक पराभवही केला. त्याच वर्षी भारतात झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाचा पहिला हादरा बसलेला साऱ्यांनी पाहिला. याच सुमारास जपानमधील तरुणांनी जुन्या पिढयांचा निषेध करणारा एक विलक्षण प्रयोग साऱ्या देशात संघटित केला. 'तुम्ही आमच्यासाठी मागे ठेवलेले जग फारसे चांगले नाही' हा त्या निषेधाचा सूर होता. 'तुम्ही आमच्या हाती माणसांचा समूळ संहार करणारी शस्त्रे सोपविली आणि ती वापरण्यासाठी लागणारी द्वेष आणि तिरस्काराची भावना आमच्या मनात रुजविली. श्रीमंतांसमोर लाचार आणि गरीबांसमोर उद्दाम होण्याचा संस्कार तुम्ही आमच्यावर केला. माणसामाणसांतले भेद आणि त्यातला दुष्टावा तुम्हीच आमच्या मनात पेरला. स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्याचा आणि त्यांना दुबळे मानण्याचा संस्कारही तुम्हीच आमच्यावर केला... सबब, तुमचा निषेध असो' (आदर्श समाज घडवायचा असेल तर नव्या पिढयांवर जुन्या पिढयांच्या संस्कारांची सावलीही पडू नये या प्लेटोच्या शिक्षणविषयक भूमिकेची येथे आठवण व्हावी) केवळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातच हे बदल घडले असे नाही. सांस्कृतिक क्षेत्रातही त्याचे पडसाद उमटले. साऱ्या व्यवस्थांचा निषेध करत जगभर हिंडायला निघालेले हिप्पींचे तांडे याच काळातले आणि संगीताच्या क्षेत्रात नव्या वाटा शोधणारे बिटल्सचे गाणेही याच सुमाराचे.
या साऱ्या घटना दूरदूरच्या आणि तुटक दिसणाऱ्या असल्या तरी त्यांच्या मागे असणारे सूत्र समान आहे. एकाच वेळी जगात वेगवेगळया भागात घडलेले या घटनांमागचे समाजशास्त्रज्ञांनी सांगितलेले सूत्र 'समूहकेंद्री मानसिकतेच्या समाप्तीचे आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे' आहे. सारी मध्यवर्ती सत्ताकेंद्रे दुबळी होत जाणे आणि समूहकेंद्री मानसिकतेची जागा व्यक्तीकेंद्री मानसिकतेने घेणे हा या घटनाचक्रांमागील सूत्रांचा अर्थ या अभ्यासकांनी लावला. अधिकार केंद्रेच नव्हे तर सत्ताधाऱ्यांचे वर्ग आणि सामर्थ्यसंपन्न देशांचा दबदबा या साऱ्यांविषयीच जगात व माणसांच्या मनात असलेला दबदबा कमी होणे आणि आपल्याला आलेले आत्मभान प्रत्येकच घटकाने गर्जून सांगायला सुरुवात करणे ही या बदलाची लक्षणे होती. वरिष्ठांनी धमकावायचे, सामर्थ्यशाली वर्गांनी दरारा दाखवायचा, धनसंपन्नांनी महात्म्य सांगायचे आणि तोवर आदरणीय वाटलेल्या साऱ्यांनीच आपला तोरा मिरवायचा, या विषम व्यवस्थेला ओहोटी लागण्याची ही सुरुवात आहे.
कालपर्यंत न बोलणारी माणसे बोलू लागली, परवापर्यंत दबलेले वर्ग कुठे संघटितपणे तर कुठे प्रतिक रुपाने जुन्या वरिष्ठ-कनिष्ठत्वाच्या व्यवस्थेला आव्हान देऊ लागले आणि अभाव व दारिद््रय यातही एक सुप्त सामर्थ्य दडले असल्याची जाणीव त्यांनी ग्रासलेल्या समूहांमध्ये येऊ लागली. यामागे कोणतीही जुनी वा ग्रांथिक विचारसरणी किंवा तत्त्वविचार यासारख्या गोष्टी नव्हत्या. समाज आणि जग यांनी गाठलेल्या उर्ध्वगामी परिवर्तनाच्या एका अटळ टप्प्याची ती सहज परिणती होती.
आजवर आपल्याला दबून राहिलेल्या दक्षिण अमेरिकेच्या अस्तित्त्वाची दखल उत्तर अमेरिकेला, तोवर पायाखाली ठेवलेल्या पूर्व युरोपातील राष्ट्रांची दखल रशियाला आणि व्हिएतनामच्या अस्तित्त्वाची दखल चीनला घेणे नंतरच्या काळात भाग पडले. सामर्थ्याश्रयी किंवा धनाश्रयी राहून मिंधेपणाने वागणाऱ्या देशांच्या व वर्गांच्या लक्षात सामर्थ्यशाली व धनवंतांचे देश आणि समूह यांचे बळ आपल्या आज्ञाधारक मिंधेपणावरच उभे असल्याची जाणीव होताना दिसली. हे मिंधेपण झुगारण्याचा त्यांनी नंतरच्या काळात केलेला निश्चयच साऱ्या जुन्या राजकीय व सामाजिक संकल्पनांना हादरे देणारा ठरला.
हे जागतिक राजकारणात किंवा धर्मकारणातच केवळ झाले नाही. समाजातील उपेक्षितांच्या आणि वंचितांच्या वर्गांनाही त्यांच्या राजकारण व समाजकारणावर परिणाम करू शकणाऱ्या बळाचे भान या काळात आले. दारिद््रय व निर्धनता यांच्या फेऱ्यात अडकलेल्यांना काही गमावण्याचे भय नसते. मग एखादा इराक, इराण किंवा कोरियासारखा देश अमेरिकेला आव्हान देतो. कामगार आणि शेतमजुरांचे वर्गच व्यवस्थेविरुध्द उभे होतात असे नाही. त्यातल्या व्यक्तीही त्यासाठी लागणारे आत्मबळ एकवटताना दिसतात. ज्यांना आजवर गृहित धरता आले त्यांना तसे धरण्याचा काळ संपला असल्याचे व तशा बदलासाठी जग तयार होत असल्याचे प्रस्थापित व्यवस्थेला सांगणारे हे लक्षण आहे.
धनवंतांचा दरारा, सत्ताधाऱ्यांचे भय, समाजातील प्रतिष्ठितांविषयी वाटणारा जुना आदर हे सारे जाऊन, आम्हीही तुमच्याच बरोबरीचे आणि माणूस म्हणून सारखेच आहोत. तुम्हाला आमच्याहून जास्तीचे कळते असे समजू नका. तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी, जी माहिती आणि जे ज्ञान पोहचत असते ते नव्या व्यवस्थेत आता आमच्यापर्यंतही पोहचले आहे. तुमच्याजवळची साधने मोठी आहेत एवढयाच खातर तुम्ही आज इथवर पोहचले आहात. पण या साधनांवर ताबा मिळविणे आता आम्हालाही अवघड नाही. सबब आपल्यात अंतर नाही आणि आज जे दिसते तेही काही काळानंतर दिसणार नाही. हा आजवरच्या उपेक्षितांच्या फळीत आलेला आत्मविश्वास जुन्या व्यवस्थांएवढाच जुन्या समजुतींनाही धक्के देणारा आहे. यातून ज्यांचे आजवरचे प्रस्थापित हितसंबंध अडचणीत आले त्यांना हा भयग्रस्त करणारा प्रकार ठरला. या उलट ज्यांना त्यातून काही गमावायचे नव्हते त्यांच्यात त्यामुळे सबलीकरणाची भावना निर्माण झाली. सबलीकरणाची ही भावना नेहमीच खऱ्या बळावर उभी असते असेही नाही. ती बरेचदा सबलीकरणाच्या खोटया समजुतीमुळेही निर्माण होत असते. कालपर्यंतच्या बलवंतांच्या दुबळया जागा ठाऊक झाल्यामुळेही ती निर्माण होते. ओसामाच्या हस्तकांनी अमेरिकेवर चढविलेला विमान हल्ला हे या प्रकाराचे जागतिक स्तरावरचे उदाहरण ठरावे. समाजातील कनिष्ठ मानल्या गेलेल्या वर्गांनी वरिष्ठांना दिलेले आव्हान हे त्याच्या सामाजिक स्तरावरचे तर कुटूंबासारख्या संस्थांमधील नव्या पिढयांनी जुन्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणे वा त्यांच्यासोबत चर्चेत सहभागी होण्याचा आग्रह धरणे हे त्याचे संस्थात्मक पातळीवरचे उदाहरण ठरावे. हे आव्हान कुठे सहभागाची, कुठे आज्ञाधारकपणाच्या मर्यादा ओलांडण्याची तर कुठे थेट बंडाची रुपे घेणारे आहेत. राज्यकर्ते आणि प्रजाजन, नेते आणि अनुयायी, जातीधर्मांचे प्रमुख आणि त्यातले सामान्यजन, कुटूंबप्रमुख आणि इतर, फार कशाला नवरा आणि बायको यांच्या संबंधात गेल्या साठ वर्षात झालेले सत्ताविषयक व मानसिक पातळीवरचे बदल या संदर्भात तपासून पहावे असे आहेत. ते खरोखरीच तसे असतील तर त्या नात्यांवर याआधी बेतलेले नियम आणि परंपराही यापुढच्या काळात बदलाव्या किंवा सोडाव्या लागणार आहेत. तेवढयावर न थांबता त्यावर आधारलेल्या सगळया जुन्या समजुती दुरुस्त करणे आणि त्यांना कालानुरूप नवी नावे देणेही आवश्यक ठरणार आहे.
माणसांमाणसातील जातीधर्म व देश यांनी निर्माण केलेले निर्बंध धूसर आणि पुसट व्हायलाही याच काळात सुरूवात झाली. आंतरजातीय विवाह रुढ व्हायला लागले आणि आंतरधर्मीय विवाहांचेही कोणाला अप्रूप राहिले नाही. आंतरभाषिय, आंतरराष्ट्रीय लग्नांविषयीचे कुतूहल आता संपले आहे. समलैंगिक विवाहांना न्यायालयांची व कायद्याची मान्यता मिळाली आणि स्त्रीचा विवाहावाचूनच्या मातृत्त्वाचा अधिकारही कायद्याने मान्य केला. काळ आणि कायदा जसा झपाटयाने बदलतो तशा सामाजिक समजुती बदलत नाहीत. त्यातले बदल कमालीच्या मंदगतीने होतात. मात्र पूर्वीच्या तुलनेत या समजातील बदलांनाही आता वेग आला आहे. या बदलांच्या तुलनेत त्यांना द्यावयाची नावे आणि त्यांच्या नव्या स्वरुपाचा बोध होईल अशी अर्थवाही शब्दरचना आता अधिक वेगाने निर्माण होणे गरजेचे आहे. नाम आणि रुप यांच्यात अंतर येण्याने निर्माण होणारा सांस्कृतिक गतीरोध (कल्चरल लॅग) आता बऱ्यापैकी अनुभवाला येऊही लागला आहे.
नव्याने जागे होणारे समूह नवे बदल जसे तात्काळ आत्मसात करतात तसे परंपरेत मुरलेल्या जुन्या समूहांचे होत नाही. जुन्या समजुती व परंपरांमध्ये गुंतलेले त्यांचे सामाजिक व इतर हितसंबंध त्यांना अडचणीचे ठरू लागले तरी त्या गुंतवणुकीत अडकलेले त्यांचे मन त्यातून सहजासहजी बाहेर येत नाही. हा वर्ग लहान नसतो. शिवाय तो समाजाच्या कोणत्याही एका थरापुरता मर्यादितही नसतो. या वर्गाला नव्या बदलाविषयीचे कुतूहल असते आणि त्याच वेळी होणारा बदल आपल्या आजच्या सुरक्षिततेला बाधा उत्पन्न करील काय या भयाने त्याला ग्रासलेही असते. थोडक्यात तो परिवर्तन आणि सुरक्षितता यांच्यातील मानसिक पातळीवरच्या संघर्षाचा भाग ठरतो. येथे एक गोष्ट स्पष्टपणे नोंदविणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांच्यातील वाद जुना आहे. मात्र सुरक्षिततेच्या अतिरिक्त जाणिवेने स्वातंत्र्याला कायमचे वा दीर्घकाळ कोंडून ठेवले असे इतिहासाने कधी पाहिले नाही. स्वातंत्र्याचे एक पाऊल नेहमी पुढे असणे आणि त्या पावलाभोवती सुरक्षेच्या नव्या भिंती उभ्या झाल्या की पुन्हा त्याचे नवे पाऊल पुढे येणे अशीच जगभरच्या समाजांची आजवरची वाटचाल राहिली आहे.
ईश्वर, धर्म, जात, वंश, कुटूंब किंवा पुढारी यांच्यामुळे मिळणाऱ्या मानसिक सुरक्षिततेवर अवलंबून राहणाऱ्यांचाही एक वर्ग सदैव असतोच. या वर्गाच्या मनात असलेली असुरक्षिततेची भावना वापरणे व त्यावर आपल्या हितसंबंधांची उभारणी करणे हा समाजातील धूर्त व चतुर माणसांचा नित्याचा उद्योग राहिला आहे. 'माणसांच्या मनात खऱ्या वा खोटया भितीचा बागुलबुवा उभा करणे आणि तो तसा उभा झाला की त्यापासून आम्हीच तुमचे संरक्षण करू शकतो असे त्यांना सांगणे याचे नाव राजकारण' असे हेन्केन या अमेरिकन पत्रकाराने म्हटले आहे. असे सांगायला राजकारणातलेच नेते पुढे येतात असे नाही. धर्मकारणापासून समाजकारणापर्यंतच्या सर्व क्षेत्रात आपल्या पुढारगिरीची दुकाने मांडून बसलेले सारेचजण या वर्गात येणारे आहेत.धर्म धोक्यात आहे, भाषा बुडायला लागली आहे, संस्कृतीला ओहोटी आली आहे आणि देश संकटात आहे असे वेळीअवेळी कारण नसताना ओरडून सांगणारे लोक फक्त राजकारणातच असतात असे नाही. ते समाजाच्या सर्व क्षेत्रात पाहता येणारे आहेत. अगदीच काही नसले तर समाजाची नैतिकता खालावली आहे असे म्हणून ही माणसे समाजाची दिशाभूल करीत असलेली आपण पाहत असतो. या माणसांच्या ढोंगांवर विसंबून राहणारी मानसिकता हा नव्या सबलीकरणाच्या प्रवासातील सर्वात मोठा अडसर आहे.
धर्मकारणातल्या अशा प्रतिगामी शक्ती आता दुबळया झाल्या आहेत. आपली अवज्ञा करणाऱ्यांना जिवंत जाळण्यापासून साध्या मृत्युदंडापर्यंतची कोणतीही शिक्षा सुनावू शकणाऱ्या या शक्तीचे दात आणि नखे आता गळाली आहेत. सरंजामदारांना आणि जमीनदारांनाही एकेकाळी असे अधिकार असत. ते वर्गही आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. जातींच्या पुढाऱ्यांचे बळ ओसरले आणि राजकारणातल्या एकेकाळच्या तशा सामर्थ्यवानांना आता गुंड व गुन्हेगार मानले जाऊ लागले आहे. संसद हे आजचे सत्तास्थान आहे आणि ते सामान्य माणसांचे प्रतिनिधीत्व करणारे आहे. त्यावर ईश्वराचा अंकुश नाही, धर्माचा ताबा नाही, धनवंतांचे नियंत्रण नाही आणि जातीपंथ वा वंशसमुहांच्या पुढाऱ्यांचे वर्चस्व नाही. सामान्य समजला जाणारा माणूस बहुमताने ज्याच्या मागे उभा राहील त्याचा त्यावर ताबा आहे आणि हा ताबेदार बदलण्याचा अधिकारही पुन्हा सामान्य माणसालाच प्राप्त झाला आहे.
या वास्तवाचा एक दृश्य परिणाम हा की कालचे बलशाली आज या सामान्य माणसाचा अनुनय करण्यात गढलेले दिसू लागले आहेत. सामान्यांनी असामान्यांकडे धाव घेण्याऐवजी ती तथाकथित असमान्य माणसेच आता सामान्यांकडे मान्यतेसाठी धाव घेताना दिसू लागली आहेत. अनुयायी सांभाळले तर पुढारकी राहते, भक्त सांभाळले तर बाबा जगतो आणि प्रवचनांना गर्दी जमविता आली तरच बापूही टिकत असतो... या बदलाचे परिणामही जुन्या व्यवस्थांच्या व त्यातल्या नियमांच्या संदर्भात समजून घ्यावे लागणार आहेत. झालेच तर एका विसंगतीकडेही यावेळी आपले लक्ष जावे लागणार आहे. संसद ही एकटीने साऱ्या बदलाचा भार वाहू शकणार नाही. राजकीय लोकशाही त्याचमुळे पुरेशी नाही. तिला सामाजिक लोकशाहीचे व पुढे आर्थिक न्यायाचे बळही जोडावे लागत असते. स्वतंत्र, सामान्य पण सबळ माणसांचे ते प्रातिनिधीक सदन होते तेव्हाच त्याची परिणामकारकता मोठी झालेली साऱ्यांना पाहता येणार असते. पुढाऱ्याभोवती पिंगा घालणाऱ्या, बाबा-बापूंच्या प्रसादासाठी रांगा लावणाऱ्या आणि मनातून सदैव भेदरलेल्या माणसांची पुढारगिरी करणारे उद्याचे हे सदन नसेल. तसे समर्थ स्वरुप त्याला प्रगत देशात आलेही आहे. ते आपल्याकडे यायलाही फार काळ जावा लागणार नाही. प्रगतीच्या मार्गावर पुढे असलेल्या समाजांनी व देशांनी ते प्रगल्भपण मिळविले आहे. बाकीचे समाजही त्याच मार्गावरून आता वाटचाल करीत आहेत.
भारतातील जातीपातीचे आणि धर्मवंशाचे राजकारण आता अपुरे ठरू लागले आहे. त्याचे आयुष्यही फारसे मोठे नाही. आताचे त्याचे डफावरचे रुप समाजातील अनेकांच्या दुबळेपणावर व त्यांना न आलेल्या आत्मभानावर उभे आहे. हे भान जसजसे वाढेल तसतशा या शक्ती क्षीण होत जातील. त्या क्षीण होणार असल्याची जाणीव त्यांच्यावर स्वार झालेल्यांना आता झालीही आहे. त्यांचे आताचे अवसान त्याविषयीच्या भयगंडातूनही आले आहे. आत्मभान असलेला एक माणूस हे लोकशाहीतले बहुमत आहे. या माणसाची भिती राजकारणाएवढीच इतर सर्व क्षेत्रातील अज्ञानाधिकाऱ्यांना आता वाटू लागली आहे.... एक गोष्ट मात्र येथे आणखी नोंदविली पाहिजे. आत्मभान येत असलेला हा माणूस नित्शेचा सुपरमॅन असणार नाही. तो अरविंदांचा सुपरमाईंडवालाही असणार नाही. तो साधा, सामान्य, निर्मळ आणि निर्भय माणूस असेल.
अखेरच्या परिच्छेदातील काही भाग अनेकांना इच्छाचिंतनासारखा वाटण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. मात्र या लिखाणाला बळकटी देणारे पुरावे आणि जग लहान व सपाट होत असल्याची प्रमाणे सर्वत्र पाहता येण्याजोगी आहेत. बराक ओबामा या काळया इसमाने गोऱ्या अमेरिकी जनतेचे अध्यक्ष होणे, बेनझीर भुट्टो किंवा हसीना वाजेद यांनी इस्लामच्या परंपरेविरुध्द जाऊन पाकिस्तान आणि बांगलादेशच्या पंतप्रधानपदावर येणे, बंद विचारांची चौकट तोडू पाहणाऱ्यांनी जुन्या सोव्हिएत युनियनचे अनेक देशांत तुकडे करणे आणि आपल्याकडील जातीपंथांच्या पुढाऱ्यांचे अल्पकाळात हास्यास्पद होणे या अशा सगळया अंतर्बाह्य बदलाच्या वास्तवाची कहाणी सांगणाऱ्या बाबी आहेत. आपल्या अवतीभवती साधी नजर टाकली तरी या बदलाचा प्रत्यय येऊ शकणारा आहे.... स्त्री बोलकी होणे, मुलांनी आपली मते सांगणे, अनुयायांनी पुढाऱ्यांना जाब विचारणे या एकेकाळी अशक्यप्राय वाटणाऱ्या बाबी आता नित्याच्या झाल्या आहेत. हा बदल क्रमाने होत गेल्याने त्याचे नवेपण जाणवले नाही किंवा जाणवल्यानंतरही आम्ही ते लक्षात न घेण्याचा आव आणला असणे हा आपल्या मानसिकतेचाही भाग आहे.
संकोच तसाही जाचक होतो. ज्यांना या नव्या बदलांपायी अशा संकोचाला तोंड द्यावे लागले त्यांनी त्याची वाच्यता न करणे किंवा तो बदखल ठरविणे हे समजण्याजोगेही आहे. अशा माणसांना या बदलाची ओळख पटविण्याचा एखाद्याने केलेला प्रयत्न हा इच्छाचिंतनाचा भाग आहे असे वाटणेही शक्य आहे.
No comments:
Post a Comment