Pages

Tuesday, May 4, 2010

कविता पुरेशी नाही...

नुसत्या कवितेने मने जुळली असती तर राष्ट्रीय एकात्मतेपासून सामाजिक ऐक्यापर्यंतच्या सगळया समस्या सोडविण्यासाठी कवितेखेरीज दुसरे काही करावे लागले नसते. कविता मोहविते, भुरळ घालते, काही काळ वास्तवाचा विसरही पाडते. पण तिचा मोह जरा ओसरला आणि वास्तवाचे भान येऊ लागले की तिचा अनुभव कधीकाळी आवडलेल्या स्वप्नासारखा वाटू लागतो. महाराष्ट्राच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर अनेक कवींवर काव्याचा मोहर सध्या उमटला आहे आणि त्याच्या भव्यदिव्य इतिहासाचा त्यासाठी खर्ची पडलेल्या प्राणांचा आणि त्याने गाठलेल्या यशाच्या शिखरांचा गौरव करणारी अनेक सुश्राव्य कवने त्यांनी लिहायला घेतली आहेत. मुहूर्त पाहून गीते लिहिणाऱ्यांच्या कवितांत काव्याचा खराखुरा झरा नसतो असे म्हणणारे भलेही तसे म्हणोत. पण ठराविक मोसमात ठराविक तऱ्हेच्या कविता लिहिण्याचा सराव एकदा झाला की मग मुहूर्त कोणताही आणि कशाचाही असो ती सराईत माणसे कविता लिहून मोकळी होतात. त्यांच्या चाहत्यांनाही त्या कवितांमध्ये प्रतिभेचे उमाळे दिसायला लागतात. अशा कविता लिहिणारी आणि तिला भुलणारी माणसे बहुदा सुखवस्तू असतात. त्यांना आजची काळजी आणि उद्याची फिकीर नसते. कवितेतल्या खऱ्या खोटया उमाळयांनी मोहरणाऱ्या या मंडळीला वास्तवाशीही फारसे घेणेदेणे नसते. महाराष्ट्राने वयाची पन्नाशी पूर्ण केली आणि त्याच्या केसाच्या कडांना रुपेरी प्रगल्भपण आले एवढी एक बाब त्यांच्या प्रसन्नतेला पुरेशी होते. ही माणसेही बहुदा पुण्या-मुंबईतली म्हणजे भारनियमन नसलेल्या शहरातली असतात. त्या शहरातल्या वातानुकूलित सोयी कधी बंद पडत नाहीत, तळमजल्यावरून वर नेणारे तेथले विजेचे जिने कुठे थांबत नाहीत आणि तिथल्या नागरिकांना पाणीटंचाईचा जाचही फार काळ सहन करावा लागत नाही. ही शहरे सोडून जसजसे पूर्वेला जावे तसतसे भारनियमन वाढते. ते कुठे पाच तर कुठे चौदा तासांचे होते. वातानुकूलन नाही, पंखे नाहीत, जिने बंद आणि पाणीपुरवठाही अपुरा. अशा रखरखीत आणि कोरडया वातावरणात प्रतिभेचे मळे कसे फुलणार आणि तेथे कविता वाचावी असे तरी कुणाला वाटणार? तेथली माणसे तशीच उन्हात राबतात आणि बायका डोक्यावर माठ घेऊन मैलोगणती पाणी शोधत निघतात आणि त्यांची मुले कायद्याविरुध्द जाऊन विटांच्या जळत्या भट्टयांभोवती राबतात. तेवढे करूनही त्यांच्या घरांना पडलेली दारिद्रयाची छिद्रे उघडीच असतात.
मग शेतकरी आत्महत्या करतात आणि सरकारातले पुढारी या आत्महत्या दारिद्रयामुळे झाल्या नसून व्यसनांधतेपायी झाल्याचे सांगतात. (आणि वातानुकूलित सुखासीनांना ते खरेही वाटू लागते) आदिवासी पाडयांवरची पोरे शेकडोंच्या संख्येने कुपोषणाने मरतात आणि तसे मरणाऱ्यांची टक्केवारी मागल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोनने कमी झाल्याचे सरकारी अधिकारी जाहीर करतात. (वातानुकूलितांना ती टक्केवारी अशी 68 वरून 66 वर आली याचे समाधान पुरेसे असते) तिकडे गडचिरोलीच्या अरण्यप्रदेशात नक्षली पुंडाव्यात दरदिवशी एक-दोन माणसे गळे कापून किंवा हातपाय तोडून मारली जातात आणि आम्ही नक्षल्यांच्या बंदोबस्ताची तयारी पूर्ण करीत आणली आहे असे सरकारकडून सांगितले जाते. (त्या संकटापासून दूर असलेल्या सुरक्षितांना ते आश्वासनच मग दिलासा देणारे ठरते) मरणारे मरतात का याचा विचार कुणाला करावासा वाटत नाही. 'हे राज्य व्हावे ही श्रींचीच इच्छा' असेल तर त्यातली पोरे अन्नावाचून कशी राहतात या प्रश्नाने कुणाला भंडावलेले दिसत नाही आणि आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात देशातले पहिल्या क्रमांकाचे राज्य म्हणून मिरवणाऱ्या महाराष्ट्रात दिवसाढवळया नागरिक आणि पोलिस त्यांचे गळे कापून मारले का जातात याची चर्चाही कोणाला करावीशी वाटत नाही. ज्यांना प्रश्न नाहीत त्यांना असे प्रश्न असतात याची जाणीव नाही आणि उरलेल्यांना त्यांचे लहानसे प्रश्नही एवढे मोठे वाटतात की याहून आणखी काही मोठे प्रश्न आपल्याच मराठी भूमीत असतील याची काळजी करायला वेळ उरत नाही. ज्यांना या प्रश्नांनी भेडसावले असते त्यांना राज्याच्या मायबाप सरकारने काही करावे यासाठी त्यावर दडपण आणावे, निदान तेवढयासाठी संघटित व्हावे असेही वाटत नाही. निवडून आलेले सत्तेच्या गुर्मीत आणि पडलेले उद्या निवडून कसे येऊ या चिंतेत. सारा ग्रामीण भाग पाण्याच्या टंचाईने ग्रासला आहे. गाईगुरांचे पाण्यावाचून तडफडणे तेथे उघडया डोळयांनी पाहावे लागत आहे. नद्यांचे नाले झाले आणि वर्धा व वैनगंगेसारख्या महानद्या आटल्याने त्यांच्या किनाऱ्यांवरची गावे तहानेने व्याकूळ झाली आहेत. मुंबई-पुण्यात राज्याच्या सुवर्ण महोत्सवाचा जल्लोष आहे. नटया नाचताहेत आणि धनवंत खेळाडू राज्याच्या समृध्दीच्या कथा लोकांना ऐकवत आहेत. पोटासाठी काही एक करावे न लागणारे समाजसेवक तुमच्या दारिद्रयाला आणि कुपोषण-उपोषणाला तुम्हीच जबाबदार कसे ते मरणाऱ्यांना समजावून सांगत आहेत. तशातच या स्फूर्तीदायक कवितांनाही बहर आला आहे. त्या कविता गौरवाच्या आणि यशोगाथेच्याच असणार. त्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पोरांचे कुपोषण, आदिवासींच्या हत्या आणि नक्षली हिंसाचारापासून सुखासीनांचे संरक्षण करताना दीडशेवर पोलिसांनी जवळ केलेले वीरमरण यासारख्या आजच्या आनंदावर विरजण घालणाऱ्या कुरूप गोष्टींना स्थान मिळणारही नाही. अनुशेष आणि तोही विकासाचा, असमतोल तोही समृध्दीचा आणि विषमता तीही प्रादेशिक या साऱ्या कविताबाह्य गोष्टी आहेत. त्यांना काव्याच्या बाजाराएवढेच रसिकांच्या हृदयातही स्थान नाही.
शब्दांनी मने जुळत नाहीत, तसे कवितेनेही समाज एकसंध होत नाही. त्याला सुखदुःखाच्या प्रत्यक्ष देवाणघेवाणीची गरज लागते. ज्यांची दुःखे सारखी आणि सुखे समान त्यांच्यातच ऐक्यभाव खऱ्या अर्थाने निर्माण होतो. मुंबईतील भाग्यवंतांचे दरडोई वार्षिक उत्पन्न 80 हजारांच्या पुढे आणि गडचिरोलीतील अभाग्यांचे 17 हजारांहून कमी असेल तर सुखदुःख समानतेच्या गोष्टी या राज्यात कोणी आणि कशा करायच्या? त्या करणाऱ्यांवर विश्वास तरी कोणी ठेवायचा? मुंबईहून जसजसे पूर्वेला जावे तसतसे हे राज्य अधिकाधिक दरिद्री होऊ लागते. अशा राज्यात विकासाची गंगा पश्मिमेकडून पूर्वेकडे वाहणे हाच अंत्योदयातील न्यायाचा मार्ग होतो. दुर्दैव हे की महाराष्ट्रातल्या नद्याही पूर्वेकडून पश्मिमेकडेच वाहणाऱ्या आहेत. राज्याचे नेतृत्व दीर्घकाळ पश्मिम महाराष्ट्राकडे राहिले. त्या खालोखाल विदर्भ व मराठवाडयाकडेही त्याची खुर्ची आली. काही काळ ते भाग्य मुंबईच्याही वाटयाला गेले. मात्र खुर्चीवरचे नेतृत्व कुठलेही असले तरी त्याची दृष्टी मात्र मुंबई-पुणे व नाशिक या त्रिकोणावरच खिळलेली राहिली. हा प्रदेश ज्या प्रमाणात समृध्द झाला त्या प्रमाणात राज्याचे बाकीचे विभाग माघारलेले राहिले. राज्याने पन्नाशी गाठली तरी विकासाच्या या असमतोल व अन्याय्य वाटपाचा गंभीरपणे विचार करावा असे त्याच्या नेतृत्वाला कधी वाटले नाही. जे प्रदेश विकासात मागे राहिले त्याचे नेतृत्व कुचकामी असे म्हणून या असमतोलाकडे दुर्लक्ष करण्यावरच मराठी नेतृत्वाचा भर राहिला. मागे राहिलेले प्रदेश आपण केलेल्या उपेक्षेमुळे तसे राहिले याची साधी जाणीवही या नेतृत्वाने कधी ठेवली नाही. पुढारी कार्यक्षम नाहीत म्हणून अविकसित प्रदेशांवर अन्याय लादत राहणे हे प्रगल्भ राजकारणाचे व खऱ्या नेतृत्त्वाचे लक्षण नव्हे. महाराष्ट्राच्या थोरवीची आणि मराठी भाषेच्या उज्ज्वल परंपरेची नुसती गाणी म्हणून दुरितांचे तिमीर जाणार नाही आणि राज्याच्या दूरवर्ती प्रदेशात वसणाऱ्या वंचनेच्या भावनेचा शेवटही होणार नाही. त्या प्रदेशांना सुवर्ण महोत्सवाच्या झगमगाटाने दिपवून त्यांची उपेक्षा विसरायला कशी लावता येईल? या महोत्सवात व्यासपीठावर वावरणारी आणि नाचणारी माणसेही पुन्हा मुंबई-पुणे-नाशिक याच त्रिकोणातून आलेली असतील तर त्याचा संकोचही अविकसीत महाराष्ट्रावर अन्याय करणारा असेल असे या सोहळयाची आखणी करणाऱ्या शहाण्या माणसांच्या मनातही येऊ नये काय? सोहळयांनी समाज संघटित होत नाहीत. त्यासाठी कविता उपयोगाच्या नाहीत. तेथे खराखुरा व समान आर्थिक हितसंबंधच कामी येणार आहे.

No comments:

Post a Comment