'ज्याला कुणी नव्हते, त्याची किती माणसे झाली हो'
'ऐसा गा मी ब्रह्म, विश्वाचा आधार, खोलीस महाग, हक्काचिया' धर्मवचनांची थोरवी आणि पोकळपण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी दाखवून देणारी अनुभवसिध्द आणि वाचकांना अंतर्मुख करणारी ओवी लिहिणारे नारायण सुर्वे, आयुष्यावर बाजी उलटून गेले आहेत. जीवनातले दाहक वास्तव आणि कल्पनेतली नयनरम्य आतिषबाजी यात नसलेले नाते अनुभवत त्यांनी कविता लिहिली. ती महाराष्ट्राला भावली, गरिबांना आपली वाटली आणि धनवंतांनाही तिचे सांगणे नाकारता आले नाही. ती दाहक असून जाळणारी नाही आणि कठोर असून आघात करणारी नाही. जवळच्याने विश्वासात घेऊन भोवतीच्या वणव्याची जाणीव करून द्यावी आणि तोपर्यंत न समजलेल्या आपल्याच जीवनाच्या वेगळया बाजू लक्षात याव्या असा त्या कवितेचा प्रत्यय साऱ्यांना आला. एकाचवेळी अंतर्मुख व जीवनसन्मुख करणारी ही कविता होती. अभावात आयुष्य काढलेल्या सर्ुव्यांना समाजाच्या भव्यतेचे आणि माणसाच्या मोठेपणाचे आकर्षण होते. त्यामुळे डाव्या विचारांची बांधिलकी स्वीकारल्यानंतरही त्याच्या प्रतिभेने काटेरी झाडे वाढविली नाही व माणूसपणाला वाकुडेपण येणार नाही याचीही काळजी वाहिली. तसे आयुष्याचा आणि जगाचा राग धरावा असे त्यांच्या प्राक्तनात फार होते.
एेंशी वर्षांपूर्वी मुंबईतील गिरणी कामगारांच्या वस्तीतील एका खोपटाच्या दारासमोर नुकतेच जन्माला आलेले एक मूल कुणा अभागी आईने आणून ठेवायचे, त्यात राहणाऱ्या गंगाराम सर्ुव्यांनी व त्यांच्या पत्नीने ते पहायचे आणि मुलाची आस मनात असलेल्या त्या गरीब दांपत्याला मायेचा पाझर फुटायचा ही घटना महाकाव्यात शोभावी अशी आहे. पण सुर्वे दांपत्याने पोटच्या पोरासारखे वाढविलेल्या नारायणाच्या मनात कर्णाची कटुता आली नाही की त्याने कधी दुर्योधनासारख्यांचे पक्ष जवळ केले नाहीत. सर्ुव्यांच्या चाहत्यांचा वर्ग मराठी मुलुखाएवढा मोठा आहे. 'ज्याला कुणी नव्हते, त्याची केवढी माणसे झाली हो' हे त्यांचे धन्यतेचे उद्गार, एकाकीपणाकडून मनुष्यभावाकडे झालेल्या त्यांच्या प्रवासाचा प्रत्यय आणून देणारे आहेत. सुर्वे कामगार होते. त्या जीवनातील दुःखे आणि त्यावर मात करायला लागणारी आनंदाची साधने त्यांनी अनुभवली. मात्र त्यांचे मन माणसामाणसातील दुरावे घालविण्यावर आणि त्यांच्यात अद्वैत साधणारी नाती शोधण्यावर केंद्रित होते. त्यांची कविता माणुसकीच्या याच उमाळयातून जन्माला आली. ज्ञानेश्वर आणि तुकारामांना साधलेली ही किमया आहे. त्या परंपरेने केलेल्या माणुसकीच्या आराधनेला आलेले हे फळ आहे. सर्ुव्यांना लोकप्रियता लाभली. कुसुमाग्रज त्यांना मुलगा मानायचे. सगळया साहित्य विश्वातच त्यांचे आप्त होते. मात्र लोकप्रियतेसाठी मूल्यांपासून त्यांनी कधी फारकत घेतली नाही की, राबणाऱ्या माणसावरच्या निष्ठेत कधी अंतराय येऊ दिला नाही. गरिबीत दिवस काढले तेव्हा ते प्रसन्न होते. सुगीच्या दिवसांनीही त्या प्रसन्नपणाला जाडय आणले नाही. त्यांना जवळून पाहणाऱ्यांना त्यांचे आणखीही एक वैशिष्टय जाणवणारे होते. सुर्वे हा माणूस आतबाहेर एकच होता. त्यांचे मन, मेंदू, डोळे आणि प्रतिभा या साऱ्यांत सारखेपणच नव्हते तर एकात्मभाव होता. ते शांत असत आणि तसेच दिसत. एखाद्या थांबलेल्या ज्वालामुखीसारखे. आतली आग धुमसत असतानाही तो शांत दिसावा तसे. सर्ुव्यांनी अनुभवले खूप, भोगलेही खूप. त्या अनुभवांची नक्षी आणि भोगलेल्या क्षणांचे व्रण त्यांच्या मनावर होते. महाराष्ट्र सरकारने त्यांना मानधनाची मोठी रक्कम एकदा दिली. ती त्यांच्या घरी घेऊन जाणाऱ्यांना त्यांच्या पत्नी म्हणाल्या, 'माझ्या पश्चात यांचे अस्वस्थ असणे कोण सहन करील? देवाजवळ आता एवढेच मागायचे की यांनी माझ्या अगोदर जावे.' त्यांची प्रार्थना खरी झाली असली तरी सर्ुव्यांच्या अस्वस्थेची सवय जडलेल्या कृष्णावहिनींचे आता कसे व्हायचे? आपल्या माणसाची अस्वस्थता अनुभवणे हा समर्थ सहजीवनाचा भाग आहे. तो ज्याच्या वाटयाला आला त्याची तगमग मोठी की त्याचे भाग्य मोठे?
सारे आयुष्य पार्ल्याच्या कामगारचाळीत काढलेल्या सर्ुव्यांनी जगाचा प्रवास केला. अखेरच्या काळात त्यांना चांगले दिवसही आले. गोव्यात एकदा एक तरंगते कवी संमेलन झाले. समुद्राच्या लाटेवर हेलकावत जाणाऱ्या एका मोठया बोटीवर ते रंगले होते. त्यातल्या रसिकांची नजर समुद्रावर किंवा त्यावर चमकणाऱ्या दिव्यांवर नव्हती. आपली कविता सादर करणाऱ्या सर्ुव्यांच्या डोळयात रात्रीही तेजाळणाऱ्या तिरीपीवर होती. 'तुम्ही आजचे राजे असाल, आम्ही अनंतकाळाचे राजे आहोत' हे त्यांनी तिथल्या मंत्र्यांना ऐकविले होते. परभणीतील अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या शहराने त्यांच्या स्वागताची जी मिरवणूक काढली तीत पाऊण लाखांवर लोक होते. पाहणाऱ्यांच्या डोळयात पाणी उभे करणारे ते दृश्य होते. सुर्वे फर्डे वक्ते होते. त्यांच्या भाषणाने श्रोत्यांना एकाच वेळी धो धो हसवीत अंतर्मुख केले होते. आपल्या समाधानाच्या पायाखाली एक अंगार जागा असल्याची जाणीव त्यांनी श्रोत्यांना करून दिली. त्या संमेलनात त्यांचा उल्लेख 'धर्मनिरपेक्षच नव्हे तर जातीनिरपेक्ष प्रतिभावंत' असा गौरवाने करण्यात आला तेव्हा श्रोत्यांनी सारा सभामंडप टाळयांच्या गजराने भरून टाकला. सुर्वे समाजाच्या सगळया स्तरात वावरले. कुठेही त्यांना अंग चोरावे लागले नाही. आपली भाषाही संकोचाने वापरावी लागली नाही. म्हणायचे ते सरळ व पुरेशा स्पष्टपणे ते सांगत राहिले. त्यासाठी कुणाच्या नाराजीची फिकीर बाळगली नाही. तरीही सर्ुव्यांवर कुणाला औध्दत्याचा आरोप करता आला नाही. सांगायचे ते स्पष्ट असले तरी आपल्या माणसाला सांगत असल्याने ते काटेरी असू नये याची काळजी ते नेहमी घेत राहिले.
त्यांनी डाव्या चळवळींत भाग घेतला. त्यांच्या बोलण्यात ती धगही होती. तो विचार जवळचा असला तरी त्याचा बावटा त्यांनी खांद्यावर घेतला नाही. तशा विचारांच्या माणसांचा आक्रस्ताळेपणा त्यांच्यात नव्हता. त्यांच्यातला कामगार मोठा की कवी बलशाली असा प्रश्न पडावा अशी जादू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. सुर्वे अनेकांचा आधार होते. त्यांना गुरुस्थानी मानणाऱ्यात फक्त कवीच नव्हते. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही त्यांची मान्यता महत्त्वाची वाटत होती. सर्ुव्यांच्या जाण्याने त्यांचे आप्त जेवढे अनाथ झाले तेवढाच त्यांचा आधार वाटणारा हा मोठा वर्गही आज निराधार बनला आहे.
No comments:
Post a Comment