Pages

Monday, August 16, 2010

मार्क्स आणि माणुसकीची मैफल

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या निधनाने मार्क्स आणि माणुसकी यांची आजवर रंगलेली कवितेची मैफल संपली आहे. सुर्वे मार्क्सवादी होते आणि त्यांची कविताही त्या विचाराशी इमान राखणारी होती. मार्क्सच्या इतर अनुयायांप्रमाणे त्यांच्या कवितेची प्रकृती लढाऊ असली तरी तिचा चेहरा मात्र मानवी होता. समतेची लढाई माणुसकीसाठीच लढवायची असते आणि ती लढवायला तिला बंधुतेची जोड द्यावी लागते याची जाण सर्ुव्यांच्या कवितेत आणि व्यक्तिमत्त्वात होती. जीवनावर संतापावे असे ज्यांच्या आयुष्यात फार असते ती माणसे जेव्हा जीवनाविषयीची आस्था सांगत येतात तेव्हा त्यांच्या शब्दांएवढेच व्यक्तिमत्त्वातही संतत्व प्रगट होत असते. गावकुसाबाहेर घालवून दिलेला एखादा तरुण जेव्हा दुरितांचे तिमीर जावो असे विश्वाच्या कल्याणाचे गाणे म्हणतो तेव्हा त्याचे गावकुसाबाहेरचे जीणे सारे विसरतात. त्याचे विश्वात्मक व्यक्तिमत्त्वच तेवढे लक्षात ठेवतात. कोणा अज्ञात अभागिनीच्या पोटी जन्माला येऊन एका कामगार दांपत्याच्या प्रेमळ अंगाखांद्यावर दारिद्रयात वाढलेल्या जातीनिरपेक्ष नारायण सर्ुव्यांना जेव्हा साऱ्या दलित, शोषित आणि पीडितांच्या उत्थानाची कविता लिहिताना महाराष्ट्राने पाहिले तेव्हा त्यानेही सर्ुव्यांच्या व्यक्तिमत्त्वात त्याच वैश्विक संतत्वाचा अविष्कार पाहिला. त्यांच्या कवितेत दाहकता आहे पण ती प्रेरक आहे. त्यांचा शब्द टोकदार आहे पण तो रक्तबंबाळ करणारा नसून जागवणारा आहे. त्यांच्या प्रतिभेला डावी कडा आहे मात्र तिच्यावर प्रेम करणाऱ्यांचा वर्ग सर्वत्र आहे. अभाव आणि वंचना यांचेच प्राक्तन लाभलेल्या नारायण सर्ुव्यांनी समाजाला भरभरून प्रेम आणि प्रेरणा दिली. समाजाने व रसिकांच्या वर्गाने त्यांचा आदरही तसाच केला. सर्ुव्यांच्या वाटयाला सारे सन्मान आले. देशाने त्यांना पद्मश्री या राष्ट्रीय सन्मानाने गौरविले. मराठी समाजाने आपल्या अ.भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली. मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत त्यांना लाभलेल्या त्यांच्या आप्तांची संख्या व त्यांच्या विस्तारित परिवाराचा परिसरही फार मोठा होता. ज्याचे कुणीच नव्हते त्याची किती माणसे झाली हो, हे त्यांचे धन्यतेचे उद्गार त्यांच्या याच उपलब्धीची जाणीव सांगणारे होते. मात्र आरंभीच्या उपेक्षेने त्यांच्यात जशी कटुता आणली नाही तशी नंतरच्या उपलब्धीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अहंतेचा दर्पही येऊ दिला नाही. सुर्वे सर्वत्र सारखेच राहिले आणि त्यांच्यातला कवी सदैव संवेदनशील आणि प्रबळच राहिला. जीवनात वाटयाला आलेल्या दुःखांवर एवढी हंसरी मात क्वचितच कुणाला करता आली असावी. राजकारण, समाजकारण, कामगार चळवळी आणि साहित्यकारण या साऱ्या क्षेत्रांत सारख्याच सहजतेने वावरणारा हा अनुभवसमृध्द कवी मराठीतील अनेक जुन्या व नव्या प्रतिभावंतांचा मार्गदर्शक आणि पालक होता. प्रतिभेच्या क्षेत्रांत सध्या दिसणारी कृपणता पाहिली की आपले प्रातिभ ऐश्वर्य साऱ्यांवर उधळून देणारा नारायण सुर्वे हा कवी वेगळा दिसतो आणि त्याच्यातला माणूस कायमचा स्मरणातही राहतो.

No comments:

Post a Comment