Monday, August 29, 2011
अनंतराव
1963 मध्ये अहमदनगर येथे भरलेल्या अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी अनंतराव भालेराव होते. तेव्हाचे मुख्यमंत्री मा.सां. कन्नमवार उद्धाटक म्हणून यायचे होते. अनंतरावांच्या छापील अध्यक्षीय भाषणात सरकारचे वाभाडे काढणारा भाग बराच होता. ते भाषण कन्नमवारांनी मागवून घेऊन वाचले आणि त्यांच्यातला मुख्यमंत्री संतापला. 'अनंतराव आपले भाषण जसेच्या तसे वाचणार असतील तर मी उद्धाटनाला येणार नाही' असा निरोप मुख्यमंत्र्यांनी सर्किट हाऊसवरून पाठविला आणि 'मी माझ्या भाषणातला कोणताही भाग गाळणार नाही' असे उत्तर त्याला अनंतरावांच्या गोटातून गेले.
अधिवेशनाला आलेले प्रतिनिधी आणि संयोजक या तणावाने गोंधळून गेले आणि एवढे भव्य आयोजन करूनही अखेर ते नीट पार पडते की नाही हाच प्रश्न संमेलनाच्या आवारात चर्चेचा विषय बनला. बरीच खलबते, चर्चा आणि वाटाघाटी झडल्या. मुख्यमंत्री आले आणि त्यांनी अधिवेशनाचे उद्धाटन करणारे प्रदीर्घ भाषण केले. अनंतरावांनी त्यांचे भाषण त्यातला कोणताही भाग न गाळता वाचले. पुढचे अधिवेशनही मग सुरळीतपणे पार पडले.
'मी एक स्वातंत्र्य सैनिक आहे आणि तुम्हीही स्वातंत्र्यासाठी कष्ट उपसले आहेत. आपण एकमेकांच्या विचारस्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. मी संपादक मागाहून झालो, तुम्हीही मुख्यमंत्रीपदावर नंतर आलात. आपण दोघेही प्रथम स्वातंत्र्याचे उपासक आहोत' ही अनंतरावांची भूमिका कन्नमवारांनी मनोमन स्वीकारली आणि एका स्वातंत्र्यसैनिकाने दुसऱ्या स्वातंत्र्यसैनिकाचा मतभेद राखून सन्मान केला.
अनंतरावांच्या कणखर व्यक्तिमत्त्वाची ओळख अशी जाहीररित्या पटल्यानंतर त्याच अधिवेशनात निवडल्या गेलेल्या पत्रकार परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीवर माझी निवड झाली आणि अनंतरावांच्या भेटी नियमितपणे होऊ लागल्या. त्यावेळी बी.ए. च्या दुसऱ्या वर्षाला असणारा मी कार्यकारिणीत वयाने सर्वात लहान असल्याने अनंतरावांना माझ्याविषयी विशेष आस्था होती. नंतरच्या काळात ती वाढतही गेली. पुढे लगेच झालेले चंद्रपूरचे पत्रकार परिषदेचे अधिवेशन, साहित्य संमेलने, भाषणे, परिषदा आणि अखेर आणीबाणीतील चौदा महिन्यांचा एकत्र अनुभवलेला नाशिकचा कारावास या टप्प्यांनी त्यांचा जिव्हाळा आणि प्रेम माझ्या वाटयाला आले.
चेहऱ्यावर एक सुस्त बेफिकीरी. त्यावरून ते थकले आहेत की उत्साहात हे काही कळू नये. रापलेला काळा वर्ण, शेतावर राबणाऱ्या शेतकऱ्यासारखा राकट देह असे बरेचसे ओबडधोबड व्यक्तिमत्त्व. त्यावर खादीचा जाड आणि बराचसा मळकट वर्णाचा शर्ट व धोतर असे वस्त्रप्रावरण. कपडा कोणताही घाला त्याची किंमत उतरून देणारी काही माणसे असतात. अनंतराव त्यातले एक.
हा माणूस हैदराबादच्या मुक्तीसंग्रामात एका हाती शस्त्र आणि दुसऱ्या हाती शीर घेऊन लढलेला शूर क्रांतीकारक होता. मराठवाडयाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा विचारी संपादक होता. अनेक चळवळींचा प्रणेता आणि कार्यकर्ता होता. वैचारिक ग्रंथांपासून ललित वाङमयापर्यंत सगळया साहित्याचा चोखंदळ आणि रसिक वाचक होता. त्याला संगीताची चांगली जाण असणारे कान आणि मन होते हे त्यांच्याकडे पाहून कोणाला खरे वाटू नये. सौम्य, मंजूळ असे त्यांच्यात फारसे काही नव्हते. सगळी क्रिया-प्रतिक्रिया गडगडाटाची. कौतुक धबधब्यासारखे आणि टीका अण्वस्त्रांसारखी. सगळा थाट वैदर्भी भाषेत सांगायचे तर गावठी स्वरुपाचा. अनंतराव मैफली रंगवीत. तासन्तास नस ओढत आपल्या भोवतीच्या स्नेह्यांना किस्से ऐकवीत, हंसवत अन् खिळवून ठेवत. गुणांना दाद देत, कुरुपतेवर हल्ला करीत आणि हे सारे करीतच या माणसाने मराठवाडयात विचाराचे अखंड जागरण हे आपले आयुष्यभराचे व्रत बनविले.
हा माणूस सत्तेच्या राजकारणाला मानवणारा नव्हता हे या वर्णनावरूनही साऱ्यांच्या लक्षात यावे. सत्तेला हवे असलेले मचूळ भाषण, त्याहून बेचव स्मित आणि निरर्थक वाजवायच्या टाळया यातला एकही उपयुक्त सद्गुण त्यांच्यात नव्हता. परिणामी हैदराबादच्या मुक्तीसंग्रामातला हा लोकप्रिय नेता त्या संग्रामाच्या यशस्वी सांगतेनंतर कधी सत्तेच्या जवळपास फिरकला नाही. मात्र त्यांच्या लढवय्या व्यक्तिमत्त्वातली दाहकता एवढी जबर की तिने सत्तेला कधी स्वस्थही बसू दिले नाही. परिणामी स्वतंत्र भारतातही विचारस्वातंत्र्याच्या आग्रहासाठी त्यांना तुरूंगवास घडतच राहिला. कधी चळवळीपायी तुरूंग तर कधी लेखणीसाठी तुरूंग. होमी तल्यारखान हे महाराष्ट्राचे अन्न व पुरवठा मंत्री असताना त्या खात्यातील साखरेच्या गैरव्यवहाराचे अनंतरावांनी जे वाभाडे काढले त्यातून त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला गेला. तल्यारखानांच्या मागे सरकार तर अनंतरावांच्या मागे सारा मराठवाडा उभा राहिला. अनंतरावांना तुरूंगवासाची शिक्षा झाली.
त्या तुरूंगातली त्यांची एक आठवण त्यांनी आणीबाणीच्या तुरूंगवासाच्या वेळी आम्हाला सांगितली. त्या काळात ते बायबल आणि इतर ख्रिस्ती धर्मग्रंथांचा अभ्यास करीत होते. तुरूंगखात्याचे एक वयस्क व वरिष्ठ अधिकारी तुरूंगाला भेट द्यायला आले. ते धर्माने ख्रिश्चन होते. अनंतराव तुरूंगात असल्याचे समजल्यावर ते त्यांच्या भेटीला आले. तिथली ख्रिस्ती धर्माची पुस्तके पाहून ते अनंतरावांना म्हणाले, 'ही पुस्तके कशाला वाचता? एकटा गांधी वाचा. सगळया ख्रिस्ती धर्माचे सार त्याच्या जीवनात तुम्हाला सापडेल' गांधीजी येरवडा तुरूंगात असताना ते त्या तुरूंगाचे अधिकारी होते. तुरूंगातल्या गांधींच्या आठवणी सांगताना त्या किरीस्तावाचे डोळे पाण्याने कसे भरून आले ते सांगताना अनंतरावांचाही कंठ रुध्द झाला होता.
हैदराबादचा मुक्ती लढा हा भारतीय स्वातंत्र्याला आणि भौगोलिक सलगतेला पूर्णता प्रदान करणारा अखेरचा उग्र लढा होता. या सशस्त्र लढयाचे नेतृत्त्व स्वामी रामानंद तीर्थ या संन्याशाकडे होते. त्या लढयाचे सगळे सैनिक त्याचमुळे स्वतःला संन्याशाचे सैनिक म्हणवून घेत. या अनुयायांत गोविंदभाई श्रॉफ यांच्या मार्क्सवादी विचाराचा गट अतिशय मोठा व प्रभावी होता. हैदराबाद मुक्तीनंतर हा गट सरदार पटेलांच्या धोरणावर रुष्ट होऊन सत्तेपासून जो एकदा दूर झाला तो अखेरपर्यंत दूरच राहिला. आपल्या समाजवादाच्या आग्रहाखातर ही माणसे सत्तेपासून दूर राहिल्यामुळे प्रत्यक्ष लढयाच्या काळात मुत्सद्दीपणाच्या नावाखाली कातडीबचाऊपणा करीत राहिलेल्यांच्या हाती हैदराबादची सत्ता आली. त्यामुळे या लढयाच्या खऱ्या पाईकांच्या मनात एक कायम आणि प्रखर अशी होरपळ अखेरपर्यंत राहिली. गोविंदभाईंपासून अनंतरावांपर्यंत अनेकांनी हे विष त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत पचविले.
हैदराबाद मुक्तीनंतर तेथील राजवटीच्या उस्मानशाही खुणा पुसून टाकण्याचा आग्रह स्वामीजींसकट त्या लढयातल्या सर्व नेत्यांनी धरला. परिणामी निजामशाही राज्याचे चार वेगळे भाग करून ते महाराष्ट्र, आंध्र, मद्रास आणि कर्नाटक या राज्यांना जोडले गेले. महाराष्ट्र राज्य एकसंध होण्यात हैदराबादच्या लढयातील नेत्यांचे हे योगदान तेव्हासारखेच आजही उपेक्षित राहिले आहे हेही येथे नमूद केले पाहिजे. यातून मराठवाडयाचा प्रदेश महाराष्ट्रात आला आणि या लढयातील नेत्यांचे हैदराबाद हे लक्ष्यच संपले. पुढच्या काळात सत्तेशी तडजोड न जमल्याने आपल्या वैचारिक निष्ठांखातर गोविंदभाईंचा सगळा गट सत्तेच्या विरोधात समाजवादाचे अपयशी राजकारण करीत जगला. त्यातल्या पराभवात आनंद मानत मराठवाडयाचे मागासलेपण हे त्यांनी आपल्या आयुष्याचे नवे लक्ष्य मानले व त्यासाठी आपली सगळी शक्ती आणि बुध्दी खर्ची घातली.
उमरी बँकेवरील दरोडयाचे प्रकरण हे हैदराबादच्या लढयातले अतिशय उग्र असे पर्व आहे. त्या दरोडयातल्या प्रमुख सूत्रधारांत अनंतराव होते. बँकेवर छापा घालून त्यात मिळविलेली सगळी रक्कम मुक्तीलढयाच्या नेत्यांच्या स्वाधीन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. स्वतःचे प्राण धोक्यात घालून अनंतरावांनी ती जोखीम पूर्ण केली. रानावनातून लपतछपत, उपासमार सहन करीत आणि आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवीत पार पाडलेल्या त्यांच्या या कामगिरीचे वर्णन हा हैदराबाद आंदोलनातील अतिशय तेजस्वी असा भाग आहे. अनंतराव सांगतात, बँकेतील 21 लाखांची रक्कम पोत्यात भरली गेली. फक्त खुर्दा राहिला. रघुनाथ नावाचा सोबतचा मुलगा म्हणाला,'यह कचरा काहे को साथ ले जा रहे हो.' ही रक्कम पोलिसांचे पहारे चुकवीत बैलगाडयांमधून उमरखेडला आणली गेली. पुढे गोदाजी राव मुखऱ्यांच्या गाडीतून ती पुण्याला नेत्यांपर्यंत पोहचविण्यात आली. 'एवढी रक्कम आम्ही कधी पाहिली नव्हती. सगळया वाहतुकीत 162 रुपये हरवले. गोदाजीरावांनी ते स्वतःजवळून भरून देण्याची तयारी दाखविली. एवढा पैसा आणला, आमच्यातले फार थोडे सुशिक्षित आणि ध्येयवेडे होते. या छाप्यात भाग घेणाऱ्यांपैकी अनेकजण एवढे गरीब की त्यांना दहा-पाच रुपयेही जास्त होते. पण यातल्या कोणालाही त्या रकमेला शिवण्याचा मोह झाला नाही.'
एवढे सांगून अनंतराव पुढे म्हणतात, साऱ्या देशाच्या स्वातंत्र्यलढयात उमरी बँकेचा दरोडा हेच एक असे प्रकरण आहे की ज्यातल्या पै न् पैचा हिशेब देशाला देण्यात आला. हे इमान आता सार्वजनिक क्षेत्रातून हद्दपार झाल्याचे दुःख अनंतरावांनी त्या प्रसंगाचे वर्णन करतानाही अनेकवार तळमळीने व्यक्त केले आहे. त्या लढयाच्या काळात अनंतरावांनी खूप प्रसंग अनुभवले आणि खूप माणसे जवळून पाहिली. त्यांच्या हृदयद्रावक आणि बोधप्रद कथांचे भांडारच त्यांच्याजवळ होते.
हैदराबाद मुक्त झाल्यानंतर पं. नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद हे तिन्ही नेते औरंगाबादला आले आणि उस्मानशाहीत रझाकारांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांची माहिती घ्यायला त्यांनी त्या परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात अनंतरावांना या तिन्ही नेत्यांचे जे दर्शन घडले ते त्यांच्यावर कायम परिणाम करून गेले. नाशिकच्या तुरूंगात असताना स्वतः अनंतरावांनीच हा अनुभव आम्हाला सांगितला. बीदर या गावी हे नेते पोहचले तेव्हा शेकडो मुस्लीम स्त्रियांचा एक मोर्चा रडतओरडत त्यांना भेटायला आला. या स्त्रियांपैकी अनेकींचे नवरे हैदराबाद विरुध्दच्या भारत सरकारच्या पोलिस कारवाईत ठार झाले होते. पोलिसांनी आमच्या नवऱ्यांना आमच्या डोळयादेखत कसे ठार केले याची वर्णने त्या स्त्रियांनी रडतरडत सांगायला सुरूवात केली. मौलाना आझादांचे मन द्रवले आणि त्यांनी भारतीय जवानही रझाकारांएवढेच दुष्टासारखे वागल्याबद्दलचा संताप व्यक्त करायला सुरूवात केली. डोळयात अश्रू आणून ते पंडितजींना त्या अत्याचाऱ्यांविरुध्द कारवाई करायला सांगू लागले. पंडितजींनी त्यांचे सांत्वन करीत गंभीरपणे म्हटले, 'मौलानासाहेब, या एकाच घटनेवरून आपण आपले मत बनविणे अन्यायाचे ठरेल. आपला दौरा पूर्ण होऊ द्या.' या साऱ्या काळात सरदार पटेल एकदाच आपल्या निवासाबाहेर आले आणि त्या रडणाऱ्या स्त्रियांकडे एक कोरडा कटाक्ष टाकून आत गेले.
पुढच्या प्रवासात एका शहरात रझाकारांच्या अत्याचाराचे बळी ठरलेल्या हिंदू स्त्रियांचा मोर्चा या नेत्यांच्या भेटीला आला. आपली तान्ही अर्भके रझाकारांनी दगडांवर आपटून कशी मारली त्याची वर्णने त्यांनी रडत, आक्रंदत सांगितली. मौलानांचे सात्विक मन येथेही द्रवले. त्यातल्या एका रडणाऱ्या स्त्रीला पोटाशी धरून ते म्हणाले, 'कशाचा इस्लाम धर्म आणि कशाचा हिंदू धर्म? अत्याचारी माणसांना थांबवू शकत नाही ते कशाचे धर्म?' मौलानांची ही प्रतिक्रिया पंडितजी शांतपणे समजून घेत होते. ते म्हणाले 'याचसाठी सगळा दौरा पूर्ण झाल्याखेरीज आपण कोणताही अभिप्राय देऊ नये असे मी म्हणत आलो.' सरदार पटेल याही जागी एकदाच बाहेर आले आणि पूर्वीच्याच कोरडेपणी आत गेले.
अनंतराव म्हणाले 'या तीन महान नेत्यांच्या भिन्न संवेदनशीलतेचे, प्रकृतीचे आणि निर्धाराचे ते दर्शन मला नेहमीच अंतर्मुख करीत राहिले.' हैदराबादच्या उस्मानशाही राजवटीविरुध्द तिथली सामान्य जनता प्राणपणाने संघर्ष करीत असताना विदर्भ व मराठवाडयातले जे नेते निजामाकडून बढती व बक्षीसे मिळविण्यात गुंतले होते त्यांचेही अनंत किस्से ते सांगत. तुरूंगातून सुटून आल्यानंतर अनंतरावांनी मला लिहिलेल्या पहिल्या पत्रात सुचविले 'सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराचे जे दहा खंड नवजीवन प्रेसने दुर्गादासांकडून संपादित करून घेतले त्यातला हैदराबाद ऍक्शनचा खंड वाचा. अशा पुढाऱ्यांची बरीच माहिती त्या पत्रांत आली आहे.' कन्हैय्यालाल मुन्शी हे हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एजंट होते. त्यांना नेहरूंनी तार करून व अखेर विमान पाठवून तातडीने कसे परत बोलवून घेतले याचीही रोचक माहिती अनंतराव ऐकवीत. मात्र आपण व आपल्या सहकाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेचे स्वतंत्र भारतात चीज झाले नाही याची साधीही खंत मी त्यांच्या बोलण्यात कधी ऐकली नाही. आपल्या वाटयाला आलेले काम आपण केले ही साध्या कार्यकर्त्याची तृप्त भावनाच त्यांच्या बोलण्यातून प्रगट होत राहिली.
नाही म्हणायला हैदराबाद मुक्ती संग्रामाला स्वातंत्र्यलढा म्हणून देशाची मान्यता मिळायलाच स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव उजाडावा लागला. तोपर्यंत त्या लढयाकडे स्वातंत्र्यलढा म्हणून पहायला भारत सरकारही उघडपणे तयार नव्हते. स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाच्या वेळी हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना ताम्रपत्रे देण्याचा निर्णय पंतप्रधान इंदिरा गांधींनी जाहीर केला तेव्हा ते ताम्रपत्र स्वीकारायला गोविंदभाईंनी नकार दिला. ज्या नेत्याच्या नेतृत्वात हैदराबादचे भारतातील विलीनीकरण पूर्ण झाले त्यानेच असा नकार दिल्यानंतर त्या संग्रामातील इतरांनीही तो तसाच दिला. नंतरच्या काळात देशाच्या पंतप्रधानपदावर आलेले पी.व्ही.नरसिंह राव त्यावेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होते. गोविंदभाईंच्या भूमिकेचा आदर करून त्यांनीही ते ताम्रपत्र स्वीकारण्याचे नाकारले. हैदराबादचे भारतातील विलीनीकरण हा संस्थानाच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेचा भाग आहे ही भारत सरकारची त्याविषयीची भूमिका सरदार पटेलांनी निश्चित केली होती. त्यांनी गृहखात्याला त्याविषयी दिलेल्या एका सूचनेत म्हटले आहे की 'हैदराबाद आंदोलन सशस्त्र स्वरुपाचे आहे. आम्ही सशस्त्र आंदोलन केले असे सत्ताधारी पक्षाने कधी म्हणू नये. असे म्हणणे लोकशाही रुजविण्याच्या संदर्भात अडचणीचे ठरणार आहे. ज्यांनी लोकशाही पध्दतीने राज्य चालवायचे त्यांनीच आम्ही काल बंदुका कशा हाताळल्या, माणसे कशी मारली हे जाहीरपणे सांगायला सुरूवात केली तर तो धमकी देण्याचा भाग ठरेल.' सरदारांनी ही सूचना विलीनीकरणाच्या काळातच केली आणि ती ठाऊक असणाऱ्या हैदराबाद लढयाच्या नेत्यांनी नंतरच्या काळात आपल्या सशस्त्र कर्तृत्वाची जाहीर वाच्यता निर्धारपूर्वक टाळली.
ताम्रपत्र नाकारतानाची गोविंदभाईंची भूमिका, स्वातंत्र्य लढा म्हणून मान्यता नसलेल्या लढयातील कामगिरीचे ताम्रपत्र कसे स्वीकारायचे अशी व सरदारांच्या भूमिकेशी जुळणारीही होती. मात्र त्याचवेळी हैदराबादचा लढा हा भारताच्या स्वातंत्र्यलढयाचाच एक भाग आहे व तो तसा मान्य केला जावा अशी त्यांच्याएवढीच त्या संग्रामात सहभागी झालेल्या सर्व सैनिकांची, सत्याग्रहींची व जनतेची इच्छा होती. मात्र जोवर अशी मान्यता मिळत नाही तोवर हे ताम्रपत्र नको असे त्यांचे म्हणणे. हा सगळा प्रकार स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाचे प्रगल्भपण सांगणारा व साऱ्यांना नम्र करणारा आहे. नंतरच्या काळात इंदिरा गांधींनीच गोविंदभाईंची भूमिका मान्य केल्यामुळे हा प्रश्न निकालात निघाला आणि गोविंदभाई व नरसिंहरावांपासून अनंतरावांपर्यंतच्या सगळया कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून शासनाने अधिकृतरित्या गौरविले.
आदर्श पत्रकार हा जनतेचा वकिल असावा लागतो. अनंतरावांनी ही वकिली जन्मभर केली. मराठवाडयातल्या सगळया लोकलढयांशी त्यांची लेखणी एकरुप होऊन गेली. ती लढयाएवढीच तिखट राहिली. पण लढयात तीव्रता नसेल तर उगाच फुकटच्या प्रखरतेचा आव तिने आणला नाही. लढयांच्या काळात तलवार होणारी ती लेखणी इतर वेळी कलात्मकतेत रमणारी होती.
शालेय जीवनात ते बुध्दीमान विद्यार्थी असल्याचे अनेकांकडून ऐकले. पण त्यांनी तसले तेजोवलय स्वतःभोवती कधी मिरवले नाही. चार माणसे खुशालचेंडू वृत्तीने गप्पा मारायला एकत्र यावी तसे त्यांच्याभोवतीच्या मैफलीचे स्वरुप असे. मात्र एखाद्याने आपली विद्वत्ता जरा जादाच दाखवायला सुरूवात केली की त्याचे मस्तवालपण सहजपणे उतरून द्यायला अनंतरावांना फारसे काही करावे लागत नसे. त्यांनी अभ्यासलेल्या ग्रंथांची नावेही आपल्याला ठाऊक नाहीत हे त्या विद्वानांच्या लक्षात अशावेळी येत असे. तुरूंगात असताना मी त्यांच्याजवळ एक ललित पुस्तक मागितले. निकॉस काझिन झाकीसची 'द लास्ट कन्फेशन' ही आयुष्यभराची समृध्दी देणारी कादंबरी त्यांनी मला दिली आणि ललित पुस्तकांची त्यांची जाण पाहून मी धास्तावून गेलो. अनंतरावांनी दारिद््रय अनुभवले. उपेक्षा, कुचंबणा व अपयशांशीही त्यांची ओळख होती. पण त्यांना कधीही कुणी दीन झालेले पाहिले नाही. ताठ मान, बेदरकारपणा आणि त्या जोडीला एक सर्वस्पर्शी रसिकता सोबत घेऊन ते जगले.
स्वातंत्र्यकारण, राजकारण, समाजकारण आणि वृत्तकारण असा जीवनाच्या विविध अंगांचा समरसून अनुभव घेणारा माणूस एकांगी व एकाकी नसणार हे उघड आहे. तो कोणत्याही वैचारिक चौकटीत घट्टपणे बसविता येण्याजोगा नसणार हेही ओघानेच येणार. स्वाभाविकच आपल्या चौकटींना घट्ट धरून राहणाऱ्या मंडळीना तो पूर्णपणे अमान्य होणारा नसला तरी पूर्णपणे मान्य होणाराही नसणार हे स्पष्ट आहे... आम्हाला विचारांचा आणि विचारवंतांचा, कार्याचा आणि कार्यकर्त्यांचा आदर निश्चितच वाटतो. मात्र तो विचार आणि ते विचारवंत, तसेच ते कार्य आणि तो कार्यकर्ता नेहमीच आम्हाला अनुकूल बोलणारा व वागणारा असावा अशी आमची अपेक्षा असते. अनंतरावांसारखा कार्यकर्ता अशी अपेक्षा पूर्ण करणारा असणार नाही हेही अतिशय स्वच्छ होते. परिणामी त्यांच्या विचारांच्या जवळ असणारी माणसेही त्यांच्यावर प्रसंगी रागवत व रुष्ट होत राहिली. सगळया स्वतंत्र विचार करणाऱ्यांचे हे प्राक्तन अनंतरावांच्या वाटयालाही आले. त्यांनी आपल्या स्वभावातील बेडर बेफिकीरीने ते लीलया पेलले आणि त्याची किंमतही आयुष्यभर मुकाटयाने चुकविली.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर सरळसरळ विरोधाची भूमिका घेतल्यामुळे अनंतरावांनी सगळया दलित समाजाचा रोष आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात स्वतःवर ओढवून घेतला. त्यांच्या मुस्लीमविषयक भूमिकांमुळे त्यांच्यावर रुष्ट असलेल्या प. महाराष्ट्रातील त्यांच्याच समाजवादी मित्रांनीही त्यांच्याशी याच काळात दुरावा धरला होता. परिणामी पुरोगामी मूल्यांच्या आग्रहाखातर वेचलेल्या त्यांच्या संबंध आयुष्याचा निकाल त्या एकाच कसोटीवर लावणाऱ्या मित्रांच्या दुराव्याने एरव्ही पहाडासारखा खंबीरपणे जगलेला हा शूर माणूस अखेरच्या काळात खोलवर जखमी होऊन गेलेला साऱ्यांना दिसला. गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव आणि नरहर कुरूंदकर ही तीन मोठी माणसे तेव्हा अनेकांच्या संतापाचे लक्ष्य बनलेली दिसली. त्यांना तसे बनवणे सामाजिक कारणांखातर सोपेही होते. सारे आयुष्य या तिघांनी समाजवादी निष्ठा जपल्या. मात्र समाजवाद्यांचे नेतृत्त्व पुण्यात होते आणि हिंदू-मुस्लीम प्रश्नासंबंधीचे त्या नेतृत्त्वाचे आकलन अशोक मेहतांच्या 'जातीय त्रिकोण' (कम्युनल ट्रँगल) या भाबडया मांडणीने झाकोळले होते. उलट मराठवाडयातील भालेरावांसारख्या समाजवाद्यांची त्याविषयीची भूमिका हैदराबादेतील आसफशाही राजवटीच्या प्रत्यक्ष अनुभवाने घडविली होती. भूमिकांमधील या अंतरामुळे पुणेकर समाजवादी मराठवाडयातील समाजवाद्यांना प्रतिगामी लेखत होते. मराठवाडी मंडळीचे इस्लामी राजकारणाविषयीचे परखड प्रतिपादन त्या बुळयांना मानवणारेही नव्हते. त्यातून स्वामीजी, श्रॉफ व भालेरावादिकांनी गांधी व नेहरूंना आपले नेते मानल्याचाही एक सूक्ष्म रोष पुणेकरांच्या मनात होता.
अनंतराव समाजवादी प्रवाहासोबत राहिले पण समाजवादी मंडळीच्या इस्लामविषयक भूमिकांबाबत ते नेहमीच साशंक राहिले. इस्लामी सत्तेचे प्रत्यक्ष चटके सहन करणाऱ्या या कार्यकर्त्याला समाजवाद्यांची इस्लामविषयक मते नेहमीच भाबडी, अज्ञानमूलक आणि धोरणी वाटत राहिली. आरंभीचे सगळे शिक्षण उर्दूतून झाल्यामुळे इस्लामी वाङमय व धर्मग्रंथ यांचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्यांची इस्लामविषयक मते अधिक डोळस होती आणि म्हणूनच त्यांचा एकजात साऱ्या मुसलमानांवर घाऊक रागही नव्हता. उर्दूतील चांगल्या वाङमयकृतींवर ते आवर्जून बोलत व इस्लाममधील चांगल्या प्रवृत्तींची मुक्त कंठाने तारीफही करीत. अशोक मेहतांच्या ग्रंथाने घडविलेल्या समाजवाद्यांच्या इस्लामविषयक भूमिका चुकीच्या गृहितांवर उभ्या आहेत असे ते त्यांच्या सभेत सांगू शकत आणि हिंदुत्ववाद्यांनी मुसलमानांचा चालविलेला घाऊक द्वेष विचारशून्यतेचा निदर्शक आहे असेही त्यांना म्हणता येई. हे सारे राजकारण त्यातला सहभागी कार्यकर्ता म्हणून अनुभवणाऱ्या अनंतरावांचे व्यक्तीमत्व सर्वांगी प्रगल्भ असणार हे उघड आहे. मी अनंतरावांचा उल्लेख कार्यकर्ता असा करतो. कारण ते अखेरपर्यंत कार्यकर्ते राहिले, तसेच वागले आणि तसेच बोललेही.
इस्लामी राजवटीविरुध्द हाती शस्त्र घेतलेल्या या कार्यकर्त्यावर मराठवाडयासकट सगळया मराठी मुलूखातील इस्लामच्या बंद्यांचा राग होता. नामांतराविषयी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठवाडयाएवढाच महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील वर्गही त्यांच्यावर उखडला होता. ज्या सामाजिक समतेसाठी लेखणी आणि आयुष्य या दोन्ही गोष्टी पणाला लावल्या त्या समतेचे सैनिकच या काळात त्यांच्यावर तेव्हा चालून जाताना दिसले. अल्पसंख्य दूर, आंबेडकरी संतप्त आणि ज्यांच्याकडे नेतृत्वासाठी पहायचे ती माणसे उपरणी झटकून बाजूला झालेली. अनंतरावांच्या वाटयाला त्या काळात आलेले एकाकीपण असे होते.
त्यांच्याविरुध्द उठलेला संतापाचा कहर असा की त्यांच्या भूमिकांमागची कारणे विचारण्याची व लक्षात घेण्याची गरज कोणाला वाटली नाही. मराठवाडा विद्यापीठाला आपले नाव देऊ नका ही खुद्द बाबासाहेबांची भूमिकाच साऱ्यांच्या विस्मरणात गेली. त्या विद्यापीठाच्या नावामागे असलेला हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास कोणाला लक्षात घ्यावासा वाटला नाही आणि त्या लढयाच्या काळातील अंजुमन पस्त अक्वामसारख्या (मुक्तीलढा आणि आंबेडकरी चळवळ यांना सारखाच विरोध करणाऱ्या) संघटनांच्या कारवायांनी मराठवाडयाच्या मानसिकतेवर केलेल्या परिणामांची चौकशी करावी असेही कोणाला वाटले नाही. लोकक्षोभाला विवेक नसतो आणि येथे तर क्षोभाच्या ज्वाळा चोहोबाजूंनी उभ्या झाल्या होत्या. त्यात अनंतरावांचा समाजवाद हरला, दलित-पिडीतांसाठी त्यांनी उपसलेले कष्ट हरवले आणि धर्म व जातीनिरपेक्ष मूल्यांसाठी आपल्याच माणसाशी त्यांनी पत्करलेल्या वैराचीही कुणी आठवण ठेवली नाही. त्यातून आलेले एकाकीपण त्यांनी बहिष्कृतासारखे अनुभवले. घराशेजारचे आयुष्यभराचे सोबती-सवंगडीही, मैत्र सोडा पण शेजारधर्मही विसरलेले दिसले आणि पुरोगामीपणाच्या नुसत्याच शाली अंगावर घेतलेली जवळची माणसे शिव्याशाप देताना त्यांना पहावी लागली.
मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर ही तत्वबदलाची किंवा निष्ठांतर सांगणारी बाब नव्हती. तो समाजाने घडविलेला व स्वीकारलेला कालोचित बदल होता. अनंतरावांचा यातला दोष एवढाच की अशा कालोचित बदलामुळे तत्वांतर किंवा निष्ठांतर घडून येत नाही ही बाब त्यांनी घ्यावी तशी ध्यानात घेतली नाही. शंभर चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारी सामाजिक मानसिकता अशा व्यक्तीचा क्षुल्लकसाही प्रमाद खपवून घेत नाही हे वास्तवही त्यांनी तेव्हा घ्यावे तसे लक्षात घेतले नाही. आज एवढया वर्षांनंतर त्या एका बाबीवरून त्यांच्या आयुष्याचा निकाल करणे हा मात्र सामाजिक कृपणपणा ठरणार आहे.
आपल्या राजकारणाचे जे प्रवाह स्वातंत्र्याच्या लढयापासून कटाक्षाने दूर राहिले त्यांनी नंतरच्या काळातही त्या लढयाविषयी, त्यातून प्रगटलेल्या मूल्यांविषयी आणि त्याच्या नेतृत्त्वाविषयी सदैव अनास्थाच दाखविली. त्या लढयाचा गौरव सोडा पण त्याचा उल्लेख करणेही त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. पुढे जाऊन त्याची जमेल तेवढी कुचेष्टा करण्यात आणि त्याच्या नेतृत्त्वाला कमी लेखण्यात त्यांनी धन्यता मानली हेही अशावेळी लक्षात घ्यावेच लागते... हैदराबाद मुक्तीलढयाचे सरसेनापती स्वामी रामानंद तीर्थ यांचे दि. 23 जानेवारी 1973 ला हैदराबादमध्ये देहावसान झाले. तेव्हाच्या आंध्र सरकारने स्वामीजींची अंत्ययात्रा साऱ्या सरकारी इतमामानिशी काढली. मात्र स्वामीजींचे जे सहकारी तेव्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते त्यांच्यातील एकानेही त्यांना श्रध्दांजली वाहायला त्या यात्रेत सामील होण्याचे कष्ट घेतले नाही. त्यातल्या एका ज्येष्ठ मंत्र्याला त्याविषयी एका न्यायमूर्तींनी खाजगी चर्चेत छेडले तेव्हा, 'त्याबाबतचे माझे मौन समजून घ्या' एवढेच सांगून ते गप्प झाले... आपल्या उपकारकर्त्यांविषयीची राजकारणाचीच नव्हे तर समाजकारणाचीही अशी वृत्ती हादेखील आपल्या परंपरेने आपल्याला दिलेला एक कुरूप वारसाच आहे.
एरव्ही सारेच दिवस कारण असताना वा नसताना अश्रू गाळणाऱ्या जीवांच्या दुःखाने कोणी भोवंडून जात नाही. पण इतरांच्या दुःखात पाठिशी उभे राहणाऱ्या अनंतरावांच्या त्या काळातील दुःखाने त्यांना समजून घेणारी जवळची सगळी माणसे पार विव्हळ होऊन गेली होती. याही काळात मी अनंतरावांना भेटलो. मित्रांनी केलेल्या जखमा मनात ठेवून त्यांचे ग्रंथ वाचन शांतपणे सुरू होते. अनंतरावांसारख्यांच्या जीवनाचे यशापयश सत्तेच्या संदर्भात मोजता वा जोखता येत नाही. त्यांच्या वाटयाला किती सन्मान आले हेही त्या यशाचे गमक मानता येत नाही. पदरी आलेल्या उपेक्षेच्या आणि पराजयाच्या कसोटीवरही त्याचा निर्णय करता येणार नाही.
स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून विकासाच्या लढयापर्यंत मराठवाडयातील प्रत्येक लढयाचे एक अविभाज्य अंग बनलेल्या अनंतरावांच्या जीवनाचे यशापयश त्या भागातील राजकीय आणि सांस्कृतिक लोकजागरणाच्या निकषावर करावे लागेल. उस्मानशाही अंधारात सगळे जीवन धार्मिक आणि राजकीय गुलामीत काढणाऱ्या या भागातले आजचे राजकीय व सामाजिक जागरण हे त्यांच्या, त्यांनी चालविलेल्या दै. 'मराठवाडा'च्या आणि त्यांच्या लढाऊ व्यक्तिमत्त्वाच्या यशाचे निदर्शक असेल. त्यातून अनंतराव संघटनेत रमणारे नव्हते हे लक्षात घेतले तर ते त्यांच्या प्रेरणादायी, एकहाती व एकटाकी कर्तृत्वाचेही निदर्शक ठरेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment