Monday, August 29, 2011
सविता डेका
1980 चा एप्रिल महिना. तारीख बहुदा 22 असावी. रात्रीचे दहा वाजून गेले आहेत. हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरल्या माझ्या खोलीच्या गॅलरीत उभा राहून रस्त्याने येणारी प्रत्येक मोटार मी निरखतो. दुपारच्या पावसानं धुऊन स्वच्छ झालेल्या सडकेवर अजून कुठंकुठं पाणी जमलं आहे. त्यातच सडकेच्या लाल दिव्यांचे ओले प्रतिबिंब.
सडकेपलिकडे दक्षिणोत्तर पसरलेली लांबचलांब पण अरुंदशी बाग आणि पलिकडे ब्रह्मपुत्र नदाचे विशाल पात्र. नजर जाते तोवर पाणीच पाणी. त्या प्रवाहाला ओढ फार आहे. त्याचा रोरावणारा आवाज वातावरणात घुमणारा. दूर पलिकडल्या काठावर क्वचित कुठे एखाददुसरा दिवा मिणमिणताना दिसतो. हवेत खूप ओलसर गारवा आहे.
उत्तरेकडच्या उतारावरून एक पांढरी ऍम्बेसॅडर घरंगळत आल्यासारखी येऊन हॉटेलच्या दाराशी थांबते. एकजण उतरून आत येताना दिसतो अन् लगेच माझ्या खोलीतला फोन वाजतो.
'वुई आर हिअर'
'चहा घेऊन जाऊ या का' मी.
'रास्ते मे लेंगे, काफी दूर जाना है'
गेले दहा दिवस मी आसाम आंदोलनाच्या बातम्या देत गोहत्तीच्या परिसरात भटकतो आहे. आंदोलनाचा नेता आणि आसूचा अध्यक्ष प्रफुल्ल महंतो भूमीगत आहे आणि गाडीतली माणसं मला त्याच्या भेटीला नेणार आहेत. गेले आठ दिवस त्याच्या भेटीसाठी माझा आटापिटा सुरू आहे. आसूचं कार्यालय, गणसंग्राम परिषदेचे नेते, आता परिचयाचे झालेले पत्रकार, आसाम साहित्य परिषद या साऱ्यांकडे मी चौकशी करतो. ंमहंताचा माग कुणी सांगत नाही. तो कोणाला ठाऊक असल्याचेही दिसत नाही.
तो भूमीगत आहे एवढंच सारे सांगतात. माझ्यासारख्या लांबून आलेल्याचा त्यांना विश्वासही वाटत नसावा. अफवा उठत असतात. प्रफुल्ल आसूच्या कार्यालयात येऊन गेला इथपासून पान बाजारातल्या कुठल्याशा पानाच्या ठेल्यावर तो पानासाठी थांबला होता इथपर्यंत...आंदोलनातल्या ज्या कुणाला मी महंताच्या भेटीचे विचारतो तो मला न दुखवता उत्तर देतो, 'प्रफुल्लला भेटणं धोक्याचं आहे... त्याच्यासाठी.'
माझ्या भेटीगाठी सुरू असतात. आसूच्या कार्यालयात बहुदा मी रोजच जातो. तिथले सारे अतिशय आस्थेनं बोलतात. त्यांना माझा विश्वास केव्हा वाटू लागला कुणास ठाऊक. आज दुपारी मला बाजूला नेऊन त्यातला एकजण म्हणाला 'आज कुठं जाऊ नका. आमची माणसं तुम्हाला घ्यायला येतील. रात्री दहापर्यंत'
सायंकाळी बातम्यांच्या तारा देऊन मी घाईनंच हॉटेलात परततो. आठ वाजल्यापासूनच फोनशी थांबतो. नऊपासून माझे आतबाहेर सुरू होते...
सारा आसाम 144 कलमाखाली आहे. शिवाय आसाम डिर्स्टब्ड एरिया ऍक्ट 1955, आर्मड फोर्सेस ऍक्ट 1958 आणि त्यांच्या जोडीला आता प्रतिबंधक स्थानबध्दता अधिनियम 1980 चाही त्यावर अंमल आहे. कर्फ्यु हा जीवनाचा नियमित भाग झाला आहे. कमालीची शांत अन् सौम्य वृत्ती असणारे 'लाहे लाहे' (हळू हळू) प्रकृतीचे आसामी लोक त्यांच्यावर एवढे निर्बंध लादण्याजोगे बेगुमान का झाले? राज्य सभेचे समाजवादी सभासद अजितकुमार शर्मा म्हणाले, 'आम्हा राजकारणी माणसांनी आपल्या स्वार्थापायी गेली तीस वर्षे केलेली फसगत व त्यातून आसामच्या खऱ्या अस्तित्त्वाला निर्माण झालेला धोका याची झालेली विदारक जाणीव हे जनतेच्या आजच्या संतापाचे कारण आहे.' ... दुसरे खासदार दिनेश गोस्वामी म्हणाले, 'लोकांना राजकारणी माणसांची ऍलर्जीच झाली आहे.'.... आसूच्या कार्यकारणीचा एक तरुण सभासद संतापून म्हणाला 'एकटे गोपीनाथ बारडोलोई सोडले तर नंतरच्या साऱ्या राजकारण्यांनी आसामचा विश्वासघात केला.'
आसामातल्या या गुन्हेगार राजकारण्यांची यादी फार मोठी आहे. त्यात राष्ट्रपती आहेत, पक्षाध्यक्ष आहेत, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, विरोधी पक्षांचे नेते असे सारेच आपापल्या शिरावरच्या गुन्ह्यांच्या ओझ्यांसह या यादीत समाविष्ट आहेत. 'आमच्या चळवळीपासून दूर रहा' असा करडा इशारा आंदोलकांनी त्यांना दिला आहे. आमदार-खासदारांना गोहत्तीत व आसामात उजळमाथ्याने फिरण्याची सोय नाही भवेंद्र शर्मा नावाचे आमदार माझ्याशी बोलताना म्हणाले 'आम्ही वाळीत टाकल्यागत आहोत. आमच्या जुन्या व आताच्या पुढाऱ्यांच्या पापाचे प्रायश्चित्त आम्ही भोगत आहोत.'
आसूच्या कार्यालयात एक वयस्क महिला येणाऱ्या जाणाऱ्यांना चहा देताना मी पाहतो. सारा दिवस त्यांना तेथे पाहून माझे कुतूहल चाळवते. तिथल्या कार्यकर्त्यांकडे चौकशी करतो तेव्हा कळते, त्या अमोहा चलिया आहेत. आसामच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी.
'हे आंदोलन साऱ्या राजकारण्यांविरुध्द सुरू असताना तुम्ही या कार्यालयात कशा?' मी नम्रपणे त्यांना विचारतो.
'राजकारणी गुन्हेगार आहेत म्हणून मी या मुलांसोबत आहे.' त्या उत्तर देतात.
'या राजकारणी माणसांत तुमच्या यजमानांचाही समावेश आहे असे आंदोलकांचे म्हणणे आहे' मी.
'त्यांचे म्हणणे खरे आहे.' त्या प्रांजळपणे सांगतात.
...तेराव्या शतकापासून आहोम राजांच्या राजवटीत राहिलेला आसाम 1826 मध्ये यांदाबूच्या तहाने ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. कंपनी सरकारची राजधानी त्यावेळी कोलकात्यात असल्याने व तेथले बंगाली बाबू सरकारी नोकरीत प्रथम शिरल्याने त्यांचा सरकारात वरचष्मा राहिला. आसामचा प्रदेश मागासलेला व अशिक्षित म्हणून तिथल्या शासनाची धुरा सांभाळायला कंपनी सरकारने शेकडो बंगाली बाबू आसामात पाठविले. कोलकात्याचे ज्येष्ठ बंगाली पत्रकार असीमकुमार मित्र म्हणाले, 'आसामी लोकांत बंगाल्यांविषयीची द्वेषभावना निर्माण व्हायला आमच्या लोकांची त्यांच्या क्षेत्रातील बाबूगिरीच कारणीभूत झाली.'
या बंगालीबाबूंनी असमिया भाषेवर प्रशासकीय बंदी लादून बंगाली ही त्या प्रदेशाची भाषा केली. पुढे जाऊन असमिया लिपीवरही त्यांनी बंदी आणली. याच काळात बंगालमधून आसाममध्ये येऊन वास्तव्य करणाऱ्यांची संख्या वाढू लागली. बंगाल्यांचे हे अतिक्रमण रोखण्यासाठी आसाम सरकारने 1916 पासूनच कायदे करायला सुरूवात केली. मात्र येणारे लोंढे थांबले नाहीत. तेव्हाचा पूर्व बंगाल, नंतरचा पूर्व पाकिस्तान व आताचा बांगला देश या प्रदेशातून होणारी ही घुसखोरी प्रामुख्याने मुसलमानांची होती. 1921 च्या जनगणना अहवालातच अतिक्रामकांचे आसामात येणे वेगाने सुरू असून ते मोठया प्रमाणावर जमिनी बळकावत आहेत असे म्हटले आहे. 31 चा अहवाल या आगमनाचे आक्रमण (इन्व्हेजन) असे वर्णन करणारा आहे. 1937 साली ही तक्रार स्थानिक जनतेने पं. नेहरूंजवळ केली. याच काळात आसामचा संपूर्ण प्रदेश पाकिस्तानला मिळावा यासाठी बॅ. महंमद अली जीना प्रयत्नशील होते व आसामच्या मुख्यमंत्रीपदावर असलेले मुस्लीम लीगचे सर महंमद सादुल्ला त्यांना साथ देत होते.
फाळणीनंतर या प्रकाराला पायबंद घालण्याचा पहिला व खंबीर प्रयत्न तेव्हाचे गृहमंत्री व देशाचे उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी केला. इन्फ्लक्स फ्रॉम पाकिस्तान कंट्रोल ऍक्ट 1947 हा कायदाच त्यांनी तेव्हा संसदेत मंजूर करून घेतला. 231 कि.मी. लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर त्यासाठी त्यांनी 80 चौक्या बसविल्या. 1950 मध्ये पूर्व पाकिस्तानातून घुसखोरी करून आलेल्यांना हुसकावून लावण्याची तरतूद असणारा इमिग्रंट्स एक्सपल्शन फ्रॉम आसाम ऍक्ट मंजूर करण्यात आला. या कायद्यातील एक तरतूद अतिक्रामकांपैकी हिंदू, बौध्द व अन्य मुस्लीमेतरांना संरक्षण देणारी होती. मात्र एवढे कायदे होऊनही आसामवरील पूर्व बंगाल्यांचे आक्रमण थांबले नाही.... 1980 चा आसामी जनतेचा लढा या आक्रमणाविरुध्द सुरू होता.
1911 ते 51 या काळात दर दहा वर्षांनी 19 टक्क्यांनी वाढणारी आसामची लोकसंख्या 51 ते 61 या काळात 35 टक्क्यांनी वाढली व पुढे ती तशीच वाढत राहिली. बांगलादेशच्या निर्मितीच्या काळात एकटया आसामात 11 लक्ष निर्वासीत आले. प्रफुल्ल महंतच्या मते हा आकडा 20 लाखांवर जाणारा आहे. 1979 मध्ये झालेल्या मंगलडोई लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्या एकाच मतदारसंघात 70 हजार घुसखोरांची नावे मतदार यादीत आली असल्याचे आढळले. पूर्व पाकिस्तान व नंतरचा बांगला देश यातून घुसखोरांना आणून आसामात वसवण्यात तेथील चहा मळेवाल्यांचा वाटा मोठा होता. त्यांच्या मतांवर निवडणुक लढवणाऱ्या पुढाऱ्यांनाही ते यायला हवे होते. देवकांत बरुआ हे काँग्रेसचे एकेकाळचे अध्यक्ष जाहीरपणे म्हणत 'अलीकुली बेंगाली, नाक चेपटा नेपाली हे आमचे मित्र आहेत...'
हा प्रकार एवढयावर थांबणारा नाही. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जुल्फीकार अली भुट्टो त्यांच्या 'द मिथ ऑफ इन्डिपेन्डन्स' या ग्रंथात म्हणतात 'भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर हा एकच प्रश्न नाही. आसामचा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे.' त्याहूनही महत्त्वाची व धक्कादायक वाटावी अशी बाब ही की बांगलादेशचे निर्माते शेख मुजीबुर रहमान हे त्यांनी एकेकाळी लिहिलेल्या 'पूर्व पाकिस्तान, लोकसंख्या व अर्थशास्त्र' या पुस्तकात म्हणतात 'पूर्व पाकिस्तानच्या लोकसंख्येला विस्तारासाठी प्रदेश हवा आणि तो प्रदेश आसाम हाच आहे.'
आसामातील जनतेचा व विद्यार्थ्यांचा लढा या अनाम आक्रमणाविरुध्द सुरू होता. दहा महिने चाललेल्या या आंदोलनाचे अतिशय विपर्यस्त आणि विकृत चित्र राष्ट्रीय पातळीवरील व विशेषतः बंगालमधील बडया वृत्तपत्रांनी देशासमोर उभे केले. हे आंदोलन बंगाली लोकांविरुध्द असल्याचा कांगावा त्यांनी केला. जे आंदोलन परकीय घुसखोरांची नावे मतदार याद्यांमधून काढून टाकण्याच्या मागणीतून सुरू झाले ते प्रादेशिक, भाषिक, संकुचित आणि धर्मनिरपेक्षताविरोधी ठरविण्याचाच प्रयत्न या मंडळीने केला.
मी आसामात गेलो तेव्हा एकटया गोहत्तीत अटक झालेल्या आंदोलकांची संख्या सात लाखांवर गेली होती. (गोहत्तीची लोकसंख्या तेव्हा पाच लक्ष होती हे लक्षात घेतले की एकेका आंदोलकाने स्वतःला किती वेळा अटक करून घेतली असावी ते लक्षात येते) साऱ्या राज्यात 24 लाख लोक कधी ना कधी तुरूंगात जाऊन आले होते. बिरेंद्रकुमार भट्टाचार्यांसारखा ज्ञानपीठ विजेता या आंदोलनात अकरा वेळा पकडला गेला होता. तरीही हे आंदोलन शांततामय होते. ब्रह्मपुत्राचा प्रवाह निघावा तसे महामोर्चे गोहत्तीत निघत होते. पण कोणताही दुकानदार त्याचे दुकान बंद करताना कधी दिसला नाही. दगडफेक नाही, शिवीगाळ नाही, आरडाओरड नाही आणि कोणत्याही पक्षाचा झेंडा समोर नाही. साऱ्या मिरवणुकीत राष्ट्रध्वज आणि म. गांधींची चित्रे असलेले फलक दिसत. आचार्य विनोबा भावे यांनी रा.कृ. पाटलांच्या नेतृत्त्वात पाठविलेले गांधीवाद्यांचे एक शिष्टमंडळ आसूच्या नेत्यांकडे पाठविले तेव्हा मी त्यांच्या कार्यालयात होतो. महंत भूमीगत आणि भृगु फूकन तुरूंगात. अठरा वर्षे वयाचा भारत नराह हा विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्त्व करीत आसूचे कार्यालय सांभाळत होता. 'आपले आंदोलन शांततेने चालवा असा विनोबांचा तुम्हाला निरोप आहे ' असे या शिष्टमंडळाने म्हणताच तो म्हणाला, 'आम्ही या आंदोलनाला अजून संघर्षही म्हटले नाही.'
.... अशा विलक्षण पार्श्वभूमीवर मी महंतोच्या भेटीला निघालो होतो.
खांद्यावर शबनम अडकवत मी लगबगीनं खाली रस्त्यावर येतो. मघाशी आत आलेला तरुण कारचं मागलं दार उघडतो. आतल्या अंधारात डोळयांना चष्मा लावलेली एक तरुण मुलगी आहे. तो तरुण पुढे बसताच गाडी चालू लागते. अन् जरा वेळानं नौगावच्या दिशेनं ती वेग घेते. बाहेर पाऊस पडत असतो. मी गाडीची काच चढवतो. आठ दहा मिनिटे जातात. कुणीच काही बोलत नाही. बाहेर अंधारातलं काही दिसत नाही. अन् गाडीतलं वातावरण गंभीर आहे.
शेजारी बसलेल्या मुलीचा चेहरा मी बघतो. ती सरळ समोर पहात आहे. सावळया वर्णाच्या, कॉलेजच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला असलेल्या या मुलीच्या चेहऱ्यावर कमालीची उत्कटता आहे. जरा वेळानं ती स्वतःहून बोलायला लागेल असं हेरून मी मागे रेलतो आणि....
'माझं नाव सविता. सविता डेका.' ती म्हणते.
सविता डेका ही लॉ कॉलेजात शिकणारी मुलगी. आसूच्या महिला विभागात काम करणारी. तिचं वक्तृत्त्व प्रभावी असल्याचं मी अनेकांच्या तोंडून ऐकलं आहे. तिच्या धाडसाच्या आणि कल्पकतेच्या एकदोन कथाही माझ्या संग्रही आहेत. चांदमारी चौकात झालेल्या गोळीबारात एक युवक जखमी झाला तेव्हा त्याच्या रक्ताच्या थारोळयाभोवती तिनं भारताचा नकाशा रेखाटला होता आणि हजारोंच्या संख्येनं लोकांना त्यावर फुलं वहायला लावली होती.
अशी ही सविता एवढया अकस्मात भेटल्याचा आनंद मी बोलून दाखवतो. ती पिंजारल्या केसाची आहे. उंचीनं, अंगानं मध्यम, जाड काळया फ्रेमचा चष्मा डोळयावर आहे आणि साधी सुती, सामान्य मराठी डोळयांना न भावणाऱ्या भडक रंगांची साडी ती नेसली आहे.
'आमच्या आंदोलनाविषयी तुम्हाला काय वाटतं?' तिनंच बोलायला सुरुवात केली.
'स्वातंत्र्यानंतर देशात झालेल्या सगळया आंदोलनात तुमचं आंदोलन मोठं, तरुण आणि अधिक शांततापूर्ण आहे. तुम्ही जयप्रकाशांवरही मात केली आहे.' मी माझं मत सांगतो.
आजवर देशात झालेली अन्यत्रची आंदोलने प्रामुख्याने शहरी होती. आसामचं आंदोलन बोंगाईगावपासून दिब्रुगढपर्यंत शहरात आणि खेडयात सारख्याच तीव्रतेनं लढवलं जात आहे. 1980च्या मार्चपर्यंत त्यात 24 लाख लोकांनी स्वतःला अटक करून घेतली असा आसूचा दावा आहे आणि एवढं प्रचंड आंदोलन क्वचित एखाददुसरा अपवाद सोडला तर कमालीचं शांततापूर्ण आहे.
'वीस तारखेचा कर्फ्यु तुम्ही पाहिला का?' सविता विचारते.
'होय.' अन् माझ्या डोळयापुढे कर्फ्युचे ते दृष्य उभे होते. पहाटेपासून पोलीस आणि निमलष्करी दलाच्या वाहनांनी कर्फ्युचा आदेश गोहत्तीभर गर्जून सांगितला असतो. आदेश तोडणाऱ्याला दिसेल तेव्हा गोळी घालण्याचे आदेश जारी झाले असतात. सकाळी सहा वाजताच मी हॉटेलच्या गॅलरीत येतो, हाती चहाचा कप घेऊन. साडेसहापर्यंत सारं सामसूम असतं. आणि मग अचानक स्त्रियांचे जत्थे कर्फ्यु तोडून रस्त्यावर येताना दिसू लागतात. एकेका घरापुढे उभे राहून त्या महिला घोषणा देताना दिसतात. 'असमिया उलायाहा उलायाहा' (असामी माणसा, बाहेर पड, बाहेर पड) अन् माणसं घराबाहेर पडून त्यांच्यात सामील होऊ लागतात. साऱ्या शहरातून ते लहान जत्थे एकत्र येतात आणि पाहता पाहता ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहासारखा जनांचा प्रवाहो चालू लागतो. मीही त्यांच्या मागोमाग चांदमारी चौकात येतो. तोवर तेथे कर्फ्यू तोडून आलेल्यांची संख्या अडीच लाखावर गेली असते. राज्यपालांचे सचिव पोलिसांना आदेश देताना दिसतात. 'कर्फ्यु तोडणाऱ्यांना पकडा' आणि पोलिस अधिकारी म्हणतात 'एवढे सारे लोक पकडून न्यायचे कुठे?'
मग सरकारलाच कर्फ्युचा आदेश मागे घ्यावा लागतो. शांत आंदोलकांपुढे सत्ता कशी नमते याचा साक्षात्कार मी अनुभवला असतो.... त्याच दिवशी दुपारी खासदार अजितकुमार शर्मा आणि त्यांच्या पत्नी किरण्मयीदेवी यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरी मी जेवायला गेलो होतो. आंदोलनावर बोलत अन् जेवत असतानाच रेडिओवर बिरेंद्रकुमार भट्टाचार्यांना ज्ञानपीठ ऍवॉर्ड जाहीर झाल्याचे आम्ही ऐकतो. बिरेंद्रदांची अजितकुमारांशी मैत्री आहे. त्या आनंदात जेवण अर्ध्यावर टाकून आम्ही तिघेही बिरेंद्रदांच्या डोंगर उतरणीवर असलेल्या नव्या घरी पोहचतो. हिरव्यागार आणि उंचच उंच डोंगराच्या पायथ्याशी ब्रह्मपुत्राचा प्रवाह आणि त्या डोंगरावर वसलेले ते छोटेखानी एकमजली घर. बिरेंद्रकुमार आपल्या घराभोवती फिरत अन् स्वतःशीच त्याचे कौतुक करीत असतात. आम्ही त्यांचे अभिनंदन करतो तेव्हा ते म्हणतात, 'बरे झाले, या पुरस्काराने या घराचे कर्ज फेडायला आता मला मदत होईल.'
त्या भेटीत मी त्यांना म्हणालो, 'गांधीजींनी ब्रिटीशांच्या बंदुका कशा नमवल्या असतील ते मला आजच्या कर्फ्युने दाखविले.'
बिरेंद्रजी त्यावर म्हणाले, 'आज अगर बापू होते तो वे इन बच्चों से कहते की बेटा, अरे आप तो मुझसेभी आगे निकल गये' ....
शांततेने चालणारे प्रत्येकच आंदोलन दुबळे वा उथळ ठरवण्याची देशाच्या राजकारणाला असलेली सवय जुनी आहे. आसामी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची अशी चेष्टा तेव्हा बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनीही केली. गॉगल घातलेल्या आणि मेकअप केलेल्या मुलामुलींचे आंदोलन अशा शेलक्या शब्दात ते प्रौढ नेते त्याचे वर्णन करताना तेव्हा दिसले.
'केंद्राला आसामच्या आंदोलनाची प्रकृती समजलीच नाही. एकतर त्याला हे समजून घ्यायचे नाही किंवा समजले असले तरी त्याला काही करता येत नसावे.' बिरेंद्रकुमार सांगत असतात.
'सात महिने चाललेले हे आंदोलन सरकार दडपून टाकील काय' मी विचारतो.
'एवढे जनआंदोलन ते कोणत्या तुरूंगात घालणार? विद्यार्थ्यांनी हिंसाचार केला असता तर सरकारने ते दडपलेही असते. पण ही मुले सरकारला तशी संधीच देत नाहीत.' जरा वेळाने ते म्हणाले, 'आता साहित्यिक म्हणून नव्हे, पत्रकार म्हणून सांगतो, सरकारला या घुसखोरांना बाहेर घालवायचेच नाही. राजकीय पक्षांनाही त्यांना घालवण्यात रस नाही. या घुसखोरांनी लोकसभेच्या एकेका मतदारसंघात दहा ते चौदा टक्क्यांएवढा मताधिकार आता मिळवला आहे आणि त्या मतांवर साऱ्यांची नजर आहे.'
.... मी सविताला बिरेंद्रकुमारांची ही प्रतिक्रिया सांगतो आणि आसाम आंदोलनाच्या तरुण नेतृत्त्वावर मी लुब्ध असल्याचेही बोलून दाखवतो.
'आमच्या भूमिकांविषयी तुम्हाला काय वाटते?'
'तुमचा लढा देशभक्तांचा आहे आणि तुमची भूमिका राष्ट्रीय आहे.'
'हे तुम्ही लिहिणार काय'
'अर्थात, का'
'आजवर तिकडल्या पत्रांनी आम्हाला कधी न्याय दिला नाही. त्यांनी आमचं आंदोलन प्रादेशिक ठरवलं. त्याला मुस्लीम विरोधाचा रंग दिला. आम्ही परकीयांना हाकला म्हणतो. त्यांनी आमचं आंदोलन भारतातल्याच अन्य प्रांतीयांविरुध्द आहे असं रंगवलं.'
तिच्या बोलण्यातला आवेश आणि आवाजातली व्यथा मला जाणवू लागते.
'आमच्या वीस लाखांवर माणसांनी आजवर स्वतःला अटक करून घेतली. एक वर्षापासून शाळा कॉलेजे बंद आहेत. सरकारचे तुरूंग अपुरे पडले म्हणून आमच्या माणसांना ते बंगाल अन् बिहारच्या तुरूंगात नेत आहेत. शाळांचे जेल झाले आहेत. इथला व्यापार आणि जनजीवन ठप्प आहे...लोकांनी निवडणुकांवर बहिष्कार घातला. लोकसभेच्या चौदा जागांपैकी बारा जागांवर साधा उमेदवारी अर्ज भरायलाही कुणी पुढे आले नाही... एवढं आंदोलन होऊन आमच्या हाती काही नाही. आम्ही गांधींचं नाव घेतो. शांतीच्या मार्गानं जातो, म्हणूनच ना?..... दीड अन् दोन लाखांचे मोर्चे निघतात पण कधी कुणी दगडफेक करीत नाही. साधी मुर्दाबादची घोषणा दिली नाही आम्ही... एकच सांगा, आमच्या आंदोलनाची सरकारने उपेक्षा चालवली हे आम्ही समजू शकतो पण या देशानंही आमची दखल घेऊ नये काय?'
इथं तिचा आवाज कापरा होतो. आपण अस्वस्थ होऊ लागल्याचं माझ्या लक्षात येतं. ही मुलगी आपल्या काळजालाच हात घालत आहे हे ध्यानात येतं.
'असं आंदोलन बिहारात झालं असतं, तुमच्या महाराष्ट्रात झालं असतं तर सारा देश पेटून उठला असता. कारण बिहारी अन् मराठी माणसे या देशाला आपली वाटतात. आम्हा आसाम्यांविषयी या देशाला कुठं आपलेपण आहे?... आम्हीच दुर्दैवी आहोत. आम्ही स्वतःला भारतीय म्हणवतो. या देशाला आमचं भारतीयत्व कुठं जाणवलं आहे?.... '
'सविता प्लीज... ' मी तिला थांबवण्याचा प्रयत्न करीत म्हणतो आणि त्याच क्षणी आपला प्रयत्न दांभिक असल्याचंही माझ्या लक्षात येतं. क्षणभर, एका प्रचंड राष्ट्रीय अपराधाचे आपण एकटेच धनी असल्याचं मनात येऊन स्वतःच्या गालफडात मारून घ्यावसं वाटतं.
पुढं ती आणखीही बोलत राहते... सारा प्रवासभर. कधी त्वेषानं, कधी संतापानं तर कधी रडतसुध्दा.
माझी तडफड निवत असते आणि मी माझ्या राष्ट्रीयत्वाची सीमा कोणत्या प्रांताच्या किनाऱ्यावर खऱ्या अर्थाने संपते याची रुखरुख लपवत सारं निर्विकारपणे ऐकत असतो.
-----------------------------
1985 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रफुल्ल महंतो यांच्या नेतृत्त्वातील आसाम गण परिषदेने बहुमत मिळविले. परिणामी आसामात जगातले पहिले विद्यार्थ्यांचे सरकार सत्तारुढ झालेले देशाने पाहिले. एवढया क्रांतीकारी घटनेचीही या देशाने वा जगाने दखल घेतल्याचे तेव्हा व नंतरही कधी दिसले नाही.
महंतो सरकारच्या शपथविधीला मी निमंत्रीत म्हणून हजर होतो. सविता डेका ही या निवडणुकीत कुठल्याशा मतदार संघातून निवडून आली असल्याचे मला सांगितले गेले. मात्र त्या समारंभात ती मला कुठे दिसली नाही. आमदारांसाठी राखून ठेवलेल्या जागांवरही ती नव्हती. ज्यांना मी तिच्याविषयी विचारले त्यांनीही ती बहुदा वेळेवर उपस्थित राहू शकली नसावी असेच सांगितले... मात्र तिच्याविषयी विश्वासाने माहिती देणारे त्या समारंभात कुणी भेटले नाही. नंतरच्या काळातही सविताविषयी मला कधी काही कळले नाही.
मात्र जेव्हा कुठे आसामचा विषय निघतो आणि तिथल्या आंदोलनाची चर्चा सुरू होते तेव्हा मला ती आठवते आणि 'या देशाला आमच्याविषयी काहीच कसे वाटत नाही' हा तिचा जीवघेणा प्रश्न मनाची कालवाकालव करतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment