Monday, August 29, 2011
शेवाळकर
राम शेवाळकर या नावाला कोणती उपाधी नको, कोणतेही बिरुद नको, त्याच्या साध्याच स्वरूपात महाराष्ट्राच्या मनावर कोरले जाऊन ते आता त्याचे झाले आहे. वक्ता म्हणून, लेखक म्हणून आणि एक सहृदय आप्त म्हणून. संस्कृत व मराठी साहित्याचा अधिकारी भाष्यकार, संत वाङ्मयाचा रसाळ समीक्षक आणि जुन्यांएवढाच नव्या लेखकांचा व कलावंतांचा आश्वासक पालक म्हणून. वेदोपनिषदांपासून भगवद्गीतेपर्यंतच्या आर्ष ग्रंथांवर अधिकारवाणीने भाष्य करणारा; भास, भवभुती आणि कालिदासाच्या वाङ्मय प्रदेशाचा प्रवास आपल्या श्रोत्यांना सहजपणे घडविणारा; ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंतच्या सर्व संतांच्या सहवासाचा त्यांना साक्षात्कारी प्रत्यय आणून देणारा आणि गांधी-विनोबांपासून सावरकरांपर्यंतच्या सगळया विभूतींना त्यांच्यासमोर जवळजवळ प्रत्यक्ष आणून उभे करणारा राम शेवाळकरांएवढा समर्थ वाणीभूषण महाराष्ट्रात दुसरा कोणी नसावा. पु.ल.देशपांडयांपासून नरहर कुरुंदकरांपर्यंतच्या भिन्न प्रकृतीच्या लेखक व पंडितांना एकाचवेळी आपला वाटणारा, आ. विनोबांपासून बाबा आमटयांपर्यंतच्या थोरामोठयांशी सारख्याच जवळकीने संवाद साधणारा आणि राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यापासून लता मंगेशकरांपर्यंत साऱ्यांनाच हवाहवासा वाटणारा राम शेवाळकर हा दुर्मिळ तरीही साऱ्यांना सदैव उपलब्ध असणारा माणूस होता. दादा धर्माधिकाऱ्यांसारख्या सेवाभावी विद्वानाचा त्यांच्यावर जीव होता आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशांसारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाचा लोभ त्यांनी संपादन केला होता. नानाजी देशमुख ते कॉ. सुदाम देशमुख असे व्यापक मैत्र जोडणाऱ्या राम शेवाळकरांनी अजातशत्रू हे विशेषण त्याच्या खऱ्या अर्थानिशी साकार केले होते. साहित्य आणि समाजसेवा व कला आणि संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात यशाची शिखरे गाठण्याच्या धडपडीत यशस्वी होणाऱ्या आणि पडणाऱ्या असंख्य मराठी तरुणांचे पालक ही शेवाळकरांची आणखी एक ओळख होती. 'मी नानासाहेबांमुळे उभा आहे', 'त्यांच्या शब्दांनी मला बळ दिले आहे' किंवा 'माझ्या साऱ्या यशाचे श्रेय त्यांना आहे' अशी त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारे तरुण विदर्भ व मराठवाडयाएवढेच मुंबई-पुण्यापासून पणजीपर्यंत गावोगावी आढळणारे आहेत. एखाद्याच्या शब्दोच्चारात माणूस जागविण्याचे मंत्रसामर्थ्य असते असे म्हटले जाते. ते खरे असेल तर ते शेवाळकरांच्या स्नेहवाणीत अनेकांनी अनुभवले आहे. आपल्या 78 वर्षांच्या आयुष्यात एवढी सारी क्षेत्रे त्यांनी आपल्या लेखणीने आणि वाणीने व्यापली. त्यांच्या निधनाने ही सारीच क्षेत्रे आणि त्यात वावरणारी असंख्य माणसे आता आपले काहीतरी गमावून बसली आहेत. त्यांच्या मृत्यूने अनेकांना अनाथ आणि पोरके वाटायला लागले तर अनेकांना आपला विश्वसनीय आधार गेल्याचे जाणवून दिले आहे
प्रत्येक माणसाला त्याचा असा एक खास गंध असतो. तो देहाएवढाच मनालाही लाभला असतो. काही माणसे अशी अंतर्बाह्य आपला खास दर्प घेऊन मिरवीत असतात. मनात आणले तरी त्यांना तो टाकता येत नाही. या दर्पांनीच त्यांचे वर्तुळ आखून दिले असते.
साध्या दिसणाऱ्या अनेकांना असे गंध नसतात असे म्हणतात. पण साधी म्हणून मिरविणारी जबरस्त दर्पयुक्त माणसे आपण पाहिली असतात. त्यांनी आपल्याला नकोसे केले असते. खरोखरीच्या साध्या माणसांनी मात्र स्वत:ला कुठल्याही वर्तुळात अडकवून न घेता माणसात हरवून टाकले असते. अशा साध्या माणसांपैकी एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाभोवती प्रासादिक दरवळ असेल तर तो माणूस आपल्या प्रेमाचा विषय होतो आणि त्याच्या दरवळाने आपलेही आयुष्य सुगंधित होऊन जाते. असा प्रासादिक दरवळ घेऊन माणसात हरवून गेलेले व्यक्तिमत्त्व नानासाहेब ऊर्फ राम शेवाळकरांना लाभले होते.
आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपल्या प्रेमाचेही ओझे होऊ नये म्हणून जपणारे हळूवार मन तर त्यांच्याजवळ होतेच, पण प्राचार्यपदी असताना सायकलवरून फिरणाऱ्या नानासाहेबांनी वातानुकूलित मोटारीतून हिंडतानादेखील आपल्या मनाचे हळवेपण तसेच कोवळे ठेवले होते. माणसांना ताठ व्हायला केवढया लहान गोष्टी पुरतात ते पाहिले की त्यांचे हे साधेपणच मला वेगळे वाटायचे.
अखेरच्या काळात नानासाहेबांना सारेच अनुकूल आणि उपलब्ध झाले आणि त्याचा लाभ आपल्याशी संबंधित असणाऱ्या संस्था व व्यक्तींना करून देण्याचा त्यांचा क्रमही चालू राहिला. संस्थांना हवी असणारी पुस्तके आपल्या खर्चाने प्रकाशित करून देणे, अप्रकाशित पण महत्त्वाच्या पुस्तकांच्या प्रकाशनाची आर्थिक जबाबदारी स्वीकारणे आणि सर्व सामाजिक व सांस्कृतिक म्हणून जोडलेल्या जबाबदाऱ्या स्वपैशाने पार पाडणे ही कामे त्यातलीच होती. पण आर्थिक परिस्थिती अनुकूल नसताना आणि केवळ वेतन हेच उत्पन्नाचे साधन हाती असताना त्यांनी अशी जी कामे केली, ती त्यांचा हाच मूळ स्वभाव असल्याचे सांगणारी होती.
आपल्या शिक्षण संस्था अडचणीत असताना पत्नीचे दागिने गहाण ठेवून संस्थेचा संसार रेटणारा राम शेवाळकर हा दुर्मिळ प्राचार्य होता. लोकनायक बापुजी अण्यांच्या जन्मशताब्दीचे वेळी शासनाच्या सहाय्यावाचून बापूंजीचे वाङ्मय स्वत:च्या खिशाला खार लावून प्रकाशित करणारा आणि त्या खर्चाची फेड पुढे कित्येक वर्षे पगारातून करीत राहिलेला राम शेवाळकर हा वाङ्मयीन कार्यकर्ताही आता अपवादानेच सापडणारा होता. आपल्या मरणासन्न मित्राला अखेरच्या काळात समाधान लाभावे एवढयाच एका हेतूने त्याचे अप्रकाशित लिखाण, त्याला कळूही न देता पुस्तकरूपाने छापणारा आणि ते पुस्तक त्या मित्राला देताना त्याला झालेल्या आनंदाने धन्य होणारा राम शेवाळकर हा मित्रही असा क्वचितच भेटणारा होता.
आपल्या मालमत्तेएवढाच आपल्या मिळकतीवरही समाजाचा हक्क आहे आणि आपण त्या मालमत्तेचे केवळ विश्वस्त आहोत ही भावना समाजात रुजविण्याचा एक भव्य प्रयत्न या देशात झाला. त्या प्रयत्नाला खरा प्रतिसाद धनवंतांकडून मिळण्याऐवजी मनवंतांकडूनच अधिक मिळाला. आपली मिळकतच त्यांनी समाजाच्या हक्काची मानली नाही, तर आपली प्रतिभा, लेखणी, वाणी, वाद्य, कुंचला हे सारे समाजाचे धन मानले आणि त्याच भावनेने त्यांनी या साधनांचा वापर केला. या भावनेला सांस्कृतिक विश्वस्तपणाची जाणीव म्हणता येईल. या जाणीवेचा गंडा नानासाहेबांच्या मनगटाला कायम बांधलेला होता.
धनवंतांना दानशूर होणे परवडणारे असते तसे संपत्तीचे विश्वस्तपद मिरवणेही जमणारे असते. पण कुटुंबाएवढयाच आपल्या आप्तमित्रांच्या आणि संस्थांच्या विवेचनांनी ग्रासलेल्या माणसाने प्रसन्नपणे वाहून नेलेले असे विश्वस्तपद ही त्याची जीवघेणी परीक्षा होते. या परीक्षेत दुबळी माणसे नापास होतात आणि शहाण्यांना तडजोडी जवळ कराव्याशा वाटू लागतात. या परीक्षेच्या सर्व निकषांवर अत्यंत प्रामाणिकपणे उत्तीर्ण होऊन दाखविणे ही नुसत्या सहनशक्तीची किमया नसते. तो आत्मसामर्थ्याचा विजय असतो. नानासाहेबांना असे अनंत विजय मिळवता आले आणि ते नम्रपणे पचवता आले. त्या विजयाची करपट ढेकर देताना त्यांना कधी कुणी पाहिले नाही.
या काळात त्यांच्या वाटयाला मानखंडना आली, मनस्ताप आले. संपत्ती हीच संस्कृती मानणाऱ्यांकडून अवहेलना आली. एका श्रीमंत घरी झालेल्या पाहुणचारात नानासाहेबांना जिव्हारी लागणारा अवमान मुकाटयाने गिळताना पाहावे लागण्याचे दुर्भाग्य माझ्या वाटयाला आले आणि ती. विजयाताईंच्या संतप्त अश्रूंचा विलक्षण साक्षात्कारही मी तेव्हा अनुभवला. बुध्दिवैभवाच्या बाबतीत आपल्या जवळपासही फिरकू शकण्याची लायकी नसणाऱ्या माणसाकडून झालेला हा प्रमाद दृष्टीआड करू शकणारे आणि अशा माणसाला सुसंस्कृत मन लाभावे म्हणून प्रार्थना करू शकणारे पारमार्थिक मन त्यांचेजवळ होते आणि ते आपल्याएवढेच विजयाताईंना आणि जवळच्या साऱ्यांना लाभावे असा त्यांचा थोर प्रयत्न होता.
सार्वजनिक जीवनात विरोध आणि उपहास यांना तोंड द्यावे लागणे ही प्रत्येक लहानमोठया कार्यकर्त्यांची गरज आहे. त्यासाठी लागणारे निबर मनही त्या क्षेत्रात आता तयार होत आहे. पण खाजगी आयुष्यातल्या अशा जखमा कायमचे पांगळेपण आणत असतात. त्या जखमा दाखविता येत नाहीत. आपले पंख कापून नेणाऱ्याविषयीची साधी तक्रारही करता न येणे हा दुर्दैवी भाग ज्यांच्या वाटयाला आला त्यालाच हे दुःख समजणारे आहे.
कै.ती. भाऊसाहेब शेवाळकर हे नानासाहेबांचे ईश्वरी श्रध्दास्थान आहे. आपला देह आपल्या गावी आपल्या उपासनेच्या मंदिरात पडावा ही त्या पुण्यात्म्याची साधी इच्छा पुरी करताना जो अनुभव नानासाहेबांनी, विजयाताईंनी आणि त्यांच्या जवळच्या साऱ्यांनी घेतला, त्याची आठवणही हृदय पिळवटून टाकणारी आहे. मरणाऱ्यांच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात काय, इथपासून मृत्यू काय कुठेही आलेला सारखाच अशी व्यावहारिक आणि आध्यात्मिक उत्तरे ऐकवून त्यांना गाडी देण्याचे टाळणाऱ्या महनीयांनी जे घायाळ केले त्यातून त्यांना अखेरपर्यंत सावरता आले नाही.
मात्र हे घायाळपण देणाऱ्यांकडे पुन्हा पूर्वीच्याच आप्तभावनेने पाहण्याचे मोठेपण त्यांच्यात होते आणि ते तसे सर्वात नसावे ही त्यांची खंत होती. असे आभाळाएवढे मोठे मन घेऊन जगणाराचे दुःख आभाळाएवढे आणि आनंदही आभाळाएवढाच असतो. त्या आभाळाच्या छायेत राहणाऱ्यांना त्यातून बसरणाऱ्या अमतृसरींचा अनुभव यावा, आभाळावरून डोकावणारा उन्हाचा आकांत त्यांच्यापर्यंत पोहचू नये असा त्यांचा प्रयत्न असतो.
आचार्य विनोबा आणि एसेम जोशी, खांडेकर आणि माडखोलकर, अत्रे आणि महाजनी, माडगूळकर आणि भावे, तर्कतीर्थ आणि कुरुंदकर अशा वाङ्मयीन आणि वैचारिक श्रेष्ठींसोबत दीर्घकाळ राहून व त्या भिन्न प्रकृतीच्या माणसांतील वेगळेपण डोळसपणे पाहून आपल्या व्यक्तित्वाचा वेगळा भाव कायम टिकविण्याची अवघड किमया नानासाहेबांना साधली होती. त्यांच्यासोबत प्रवास करताना यापैकी प्रत्येकाविषयीचे किस्से त्यांच्या तोंडून ऐकणे, हा माझ्यासारख्या अनेकांच्या आनंदाचा आणि उद्बोधनाचा भाग होता. त्यांच्यासोबत असा प्रवास मी खूप केला आणि त्यांच्याकडून खूप ऐकले. पण मला दरवेळी जाणवले ते त्यांचे अलवार तटस्थपण. सगळे प्रसंग त्यांच्या साऱ्या बारकाव्यांसह ते रंगवून सांगणार. त्या सांगण्यात त्या व्यक्तींविषयीचे गाढ ममत्व असणार. पण साध्या माणसांसोबत वागतानाचे त्यांचे हरवलेपण या जागी नसणार. प्रसंग विनोबांसोबत आचार्यकुलाबाबत केलेल्या चर्चेचा असो, नाही तर कुरुंदकरांबरोबर केलेल्या जाहीर वादविवादाचा. प्रत्यक्ष त्या जागी ते हरवलेपण निश्चित नसणार. त्यामुळे प्रत्येक प्रसंग, त्यापायी चकित होताना, दीपून जाताना आणि क्षणकाळ प्रभावित होताना त्यांनी पुस्तकासारखा सविकल्पच अनुभवला असणार. अत्यंत उत्कट क्षणीही निर्विकार होता येणे, आनंदाने फुलून येतानाही हे फुलणे अल्पजीवी आहे याचे भान राखणे आणि दु:खाने कोसळून जाण्याच्या क्षणीही हे म्हणजे जीवन नव्हे, याचे भान जागे असणे असे त्यांचे मन होते.
त्यांनी बांधलेल्या घराचे- 'माऊली'चे नूतनीकरण करून त्यांच्या मुलाने जेव्हा त्याचे 'मम्मी'त रूपांतर केले तेव्हाचा त्यांचा भाव, त्यांच्यासाठी पहिली वातानुकूलित गाडी त्याने आणली तेव्हाचा त्यांचा आनंद याच निर्लेप कुळातला होता. पूर्वीचे अभाव ज्या हसरेपणी स्वीकारले तेवढयाच आनंदाने त्यांना या उपलब्धीकडे पाहता आले.
नानासाहेबांना बेहोष होता येतच नसे असे मात्र नाही. ज्ञान नावाची अदृश्य गोष्ट त्यांना असे बेहोष करीत असे. तिचा प्रत्येक नवा प्रत्यय आणि साक्षात्कार त्यांना बेहोषीचा आनंद देत असे. पुस्तके, व्याख्याने, कविता आणि मैफिली अशा सर्व जागी या ज्ञानाचे कण शोधण्याचे त्यांना व्यसन होते. पण या ज्ञानासोबतच संस्कृतीचे भानही अटळपणे यायचे आणि ते या ज्ञानाची झिंगही सभ्यतेच्या मर्यादेपलीकडे चढू द्यायचे नाही.
आयुष्यभर जपलेले हे तटस्थपण त्यांना सर्वत्र सहजपणे नेता आले आणि तेवढयाच सहजपणे सगळया अनुभवांच्या जमाखर्चासोबत त्यांच्या पूर्वस्थानी पोहचवीतही आले. म्हणून त्यांचे वास्तव्य मुंबईत असो नाही तर वणी-चंद्रपुरात, व्यासपीठावर असो नाही तर कुटुंबाच्या खाजगी मैफिलीत, ते सदैव त्यांच्याचजवळ रहात व तोच त्यांचा खरा मुक्कामही होता.
अमरावतीच्या कॉ. सुदाम देशमुखांविषयी त्यांना विलक्षण आत्मीयता होती आणि संघाच्या रज्जुभय्यांच्या व्यक्तिमत्त्वातले मैत्र त्यांना सुखवून गेले होते. मात्र भाव्यांच्या स्नेहाने त्यांना हिंदुत्ववादी बनविले नाही आणि कुरुंदकरांच्या सहवासाने त्यांना समाजवाद्यांच्या गोटात नेले नाही. कीर्तनकार वडिलांचा वारसा लाभूनही समाजातील परंपरावादाला त्यांचा कृतिनिष्ठ विरोध राहिला आणि आक्रस्ताळया पुरोगाम्यांच्या एकांतिक भूमिका प्रतिक्रियांना जन्म देतात व अंतिमत: परंपरावाद संघटित करायला साह्यभूत होतात, असे ते बजावत राहिले. कोणत्याही बांधील वर्गात सामील न होता त्यातल्या प्रगतिशील तत्त्वांना उचलून धरीत त्यांच्यातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचे कामच त्यांनी सातत्याने केले. प्रत्येक भूमिकेतला माणुसकीचा भाग तेवढा स्वीकारायचा आणि त्यातल्या विचारांच्या चौकटीचा चोथा दूर ठेवायचा, अशी ही वाटचाल आहे.
सगळा सुधारणावाद नुसताच तोंडाळ होत चालल्याच्या वर्तमानात कीर्तनाकाराची परंपरा लाभलेल्या त्यांच्या घराने निर्मळपणे आधुनिकता स्वीकारली आणि ती सहजपणे आत्मसात केली. सतत व्यासपीठावर वावरणाऱ्या या माणसाने या गोष्टीची कधी वाच्यता मात्र केली नाही. एरवी, मी माझ्या मुलांच्या मौंजी केल्या नाहीत, ही बातमी प्रत्येकच येणाऱ्या-जाणाऱ्याला आठवणीने ऐकवणारे घर मनातून जातीपरंपरांच्या अहंता मिरवीतच असते.
स्वा. सावरकरांवर नानासाहेबांनी खूप व्याख्याने दिली. पण खुद्द रत्नागिरीत स्वातंत्र्यवीरांच्या अंतेवासीयांसमोर त्यांनी ओळीने दिलेली सात व्याख्याने त्या साऱ्यांवर कळस चढविणारी झाली. स्वातंत्र्यवीरांचा सगळा गौरव मांडून झाल्यानंतर त्या द्रष्टया समाजसुधारकाला या भूमीत भक्त तेवढे मिळाले, अनुयायी मात्र मिळाले नाहीत, ही खंत बोलून दाखविताना त्यांनी केलेले विश्लेषण मर्मग्राही होते. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी समुद्रात उडी घेणारा क्रांतिकारक सावरकर समाजाला भावतो, कारण आम्हाला त्यांच्या उडीचे अनुकरण करायचे राहिले नसते. पण पददलितांच्या उध्दारासाठी धडपडणारा विज्ञाननिष्ठ सावरकर आम्हाला आपला वाटत नाही कारण त्या निष्ठेचे अनुकरण करणे आम्हाला जमणारे असले तरी भावणारे नाही, असा परखड अभिप्राय या व्याख्यानात त्यांनी नोंदविला. त्या श्रोतृवर्गात उपस्थित असलेल्या एका वयोवृध्द सावरकरवाद्याने डोळयात अश्रू आणून व हाती पाच रुपयांची नोट ठेवून त्यांचे केलेले अभिनंदन ही त्यांच्या व्याख्यानयात्रेतली सर्वात हृद्य आठवण आहे. इतिहास आणि ऐतिहासिक व्यक्तींची चिकित्सा मांडताना त्यातील दोषांकडे आणि अन्यायाकडे त्यांनी जसे श्रोत्यांचे लक्ष वेधले, तसे राष्ट्राला अभिमान वाटावा, अशा त्या प्रवाहातल्या जागा दाखवून देत असताना त्यांच्या वक्तृत्वाला नेहमीच ओज चढले. या जागा जपता आल्या नाहीत तर राष्ट्र म्हणून काय जपायचे राहते असा त्यांचा यावेळी सवाल असायचा.
थोर माणसांच्या सहवासात आपले भान हरवून देणाऱ्यांमध्येही एक दर्पयुक्त आढयता मी पाहिली आहे. शेवाळकरांचे वेगळेपण पुन्हा असे की, त्यांना अशाही दर्पाची बाधा नव्हती. परिणामी एवढया सगळया माणसांत आणि परिवारात ते सहजपणे वावरले. त्यांचा विश्वास आणि जिव्हाळा त्यांनी मिळविला आणि तरीही त्यापैकी कुणाच्या विचारांसारखाच व्यक्तित्वाचा साचा त्यांनी स्वतःसाठी स्वीकारला नाही. मैत्रीसंबंध व जिव्हाळा कायम आणि आपल्या व्यक्तित्वाचे वेगळेपणही कायम, ते खुपणारे मात्र नाही.
नानासाहेबांनी रामायण-महाभारतातील व्यक्तिरेखांचे अतिशय मनोज्ञ दर्शन महाराष्ट्राला आपल्या वाणीने घडविले. त्याचे एक स्नेही (त्यांच्या भाषेत त्यांचे 'बुध्दिमत्त' मित्र) नरहर कुरुंदकर हेही या विषयांवर चिकित्सा मांडत. कुरुंदकरांची चिकित्सा ऐतिहासिक मार्क्सवादी पध्दतीची असे आणि बुध्दिवादी म्हणविणारांना ती चटकन आपलीही वाटे. कृष्ण आणि राधेची प्रेमकथा कृष्णाच्या मृत्यूनंतर काही हजार वर्षांनी रचली आहे. मुळात कृष्णाला असली कोणती राधा ठाऊकही नव्हती, असे ते दाण्दिशी, पुराव्यानिशी सांगू शकत. नानासाहेबांनी एकाच व्यासपीठावर त्यांचेसोबत वर्षानुवर्षे व्याख्याने दिली. पण त्यांना राधा अशी नाकारावीशी कधी वाटली नाही. त्यांना ती अमूर्त प्रेमाचे सर्वश्रेष्ठ प्रतीकच वाटत राहिली. इतिहासातल्या कृष्णाला राधा नसेल, पण जगभरच्या पूर्वीच्या आणि आजच्याही अनेक कृष्णांचे प्रेम राधा जर पालवीत असेल तर त्यांना ती भारताच्याच नव्हे तर जगाच्या सांस्कृतिक ठेव्याचा भाग वाटत राहिली. तिचे ऐतिहासिक स्थान निश्चित करणे, तिच्या सांस्कृतिक स्थानमहात्म्यापुढे त्यांनी महत्त्वाचे मानले नाही.
सुदैवाने या दोघांचाही सहवास आणि आत्मीयता मला लाभली. त्यांचेतील हा फरक साधा दृष्टीचा नसून प्रकृतीचा आहे हे तेव्हाही लक्षात येत होते. मी माझ्या भावनांना माझ्यावर कधी स्वार होऊ दिले नाही, असे कुरूंदकर म्हणायचे. नानासाहेब तसलं काही बोलल्याचे माझ्या स्मरणात नाही. पण जाणवले ते हे की त्यांनी त्यांच्या वैचारिक आग्रहांना आपल्या माणुसकीवर कधी मात करू दिली नाही. वादापेक्षा संवादावर त्यांचा भर अधिक राहिला. पृथक्करणाहून संश्लेषण त्यांना भावत आले. परस्परभिन्न भूमिकांचा विचार करतानाही त्यातली साम्यस्थळेच त्यांना प्रथम दिसत.
अशा माणसावर होणारा नित्याचा आरोप, संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करणारा असा आहे. सगळेच चांगले बघायचे ठरविले तर संघर्षच शिल्लक राहत नाही. पण चांगल्या बाजूने उभे राहायचे ठरविणे हा संघर्ष टाळण्याचा प्रकार नसतो. उलट संघर्ष मुलभूत बनविण्याचा तो आग्रह असतो. समन्वयाच्या वा संश्लेषणाच्या मोहापायी मूल्यविचारांचा त्यांनी कधी विसर पडू दिला नाही. त्यांची वैचारिक बैठक विद्यार्थीदशेपासून अखेरपर्यंत गांधी विचारांची राहिली. ही बैठकच त्यांना सगळया भूमिकांमधल्या चांगल्या बाजूंकडे वळवीत आली असावी. त्यांचा सौहार्दाचा आग्रहही गांधींच्या व्यापक समन्वयाच्या आणि निरागस माणुसकीच्या बैठकीतून आला असावा. ही गांधींची भूमिका म्हणजे निव्वळ निरागस गोडवा नव्हे. या देशाच्या जनसंघर्षाचेही गांधीच आद्यप्रणेते होते. 1975 मध्ये आणीबाणी लागू झाली आणि सरकारने सगळे मानवी हक्क गुंडाळून ठेवल तेव्हा स्वातंत्र्य आणि समतेवर उर फोडून भाषण करणारे आणि क्रांतीच्या नुसत्याच कविता लिहिणारे अनेकजण स्वातंत्र्य व समतेकडे पाठ फिरवून इंदिरा गांधींची स्तोत्रे लिहिण्यात आणि आणीबाणीचे वाढदिवस साजरे करण्यात गढून गेले होते. मूल्यांवरच्या निष्ठेची किंमत चुकविण्याचे भाग्यशाली आव्हान एखादेच वेळी जीवनात येते. एखाद दुसरा अपवाद वगळता मराठी प्रतिभेला हे आव्हान पेलणे जमले नाही.
त्या अंधारकाळात विदर्भातला राम शेवाळकर नावाचा प्रतिभावंत आणीबाणीला मराठीतील सगळया विचारवंतांनी आणि लेखकांनी संघटितपणे विरोध करावा यासाठी त्यांच्या दारी धरणे धरून बसला होता, याची आठवण आता फारच थोडया लोकांना उरली असावी. आणिबाणी मागे घ्या आणि स्वातंत्र्य-समतेचे हक्क पुन्हा प्रस्थापित करा अशी मागणी करणारे एक निवेदन त्या काळात त्यांनी राष्ट्रपतींना सादर केले. या निवेदनावर सह्या करण्याचे टाळताना मराठीतील ध्वनिक्षेपकी विचारवंतांनी त्यांना ज्या तऱ्हेने झुलविले तो सगळा अनुभव गिळता येणे आणि त्याविषयीची वाच्यताही नंतरच्या काळात टाळता येणे हे फक्त राम शेवाळकरांनाच जमू शकते. मला जमले ते मी करणार. तुम्हाला ते जमवायला सांगून पाहणार. पण तुम्हाला जमणारे नसले तर माझी त्याविषयी तक्रार असणार नाही. अशी मूल्यांखातर एकाकी आणि मूक किंमत चुकविणारी ही भूमिका आहे. आपल्या सुरक्षिततेचा आगाऊ अंदाज घेऊन स्वातंत्र्य-समतेवर फुकटची व्याख्याने देणाऱ्यांपेक्षा त्यासाठी पडेल तरी किंमत मोजणाऱ्या दुर्गाबाई, एसेम, यदुनाथ, नानासाहेब यांसारखी माणसेच त्या मूल्यांची प्रतिष्ठा खऱ्या अर्थाने राखत असतात.
आपल्या वाणीने सगळा मराठी मुलुख जिंकून घेणारा नानासाहेबांसारखा वक्ता दुसरा नव्हता. चिंतामणराव देशमुखांसारखा चतुरस्र विद्वान श्रोत्यांत बसला असताना, तर्कतीथर्ांसारखा महापंडित अध्यक्षस्थानी असताना त्यांनी व्याख्याने दिली आणि सामान्यांपासून ज्ञात्यांपर्यत साऱ्यांची प्रशंसा मिळविली. आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे आणि कुरुंदकरांसारखी दिग्गज माणसे नांदेडच्या नाटय संमेलनात व्यासपीठावर असताना त्यांनी आभारप्रदर्शनाचे भाषण तब्बल दीड तास रंगविले आणि सगळया संमेलनात मिळून झडल्या असतील एवढया टाळया गाठीला बांधून घेतल्या. गवयाच्या गळयातून येणाऱ्या देखण्या तानांना रसिकांची दाद जावी तशी त्यांच्या व्याख्यानातील पल्लेदार वाक्यांना श्रोत्यांची दाद उठताना मी पाहिली आहे. त्यांच्या वक्तृत्वावर लुब्ध झालेल्या एका रसिल्या मनाच्या विदुषीने त्यांच्यासाठी अविवाहित राहण्याचा केलेला संकल्पही मला ठाऊक आहे. (तिला त्या संकल्पापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचीही एक कादंबरी व्हावी.)
नानासाहेबांची खूप व्याख्याने मी ऐकली आणि दरवेळी त्यांच्यातल्या कलावंताने मला हरखून टाकले. श्रोत्यांचा वर्ग परिचित असो वा अपरिचित. आपण त्यांना सहजपणे आपले करू असा जबर आत्मविश्वास त्यांच्यात होता. एकदा सगळया रामायणविरोधी श्रोत्यांच्या संतप्त सभेत त्यांनी रामायणाची महती सांगितली. आधीचे सगळे वक्ते विरोधाचा सूर लावून गेले होते. त्याच सुरांचा परिणाम टिकविण्याची संयोजकांची जिद्द होती आणि नानासाहेब उभे राहिले. 'रामायणावर श्रध्दा असणारांपेक्षा त्यावर टीका करणाऱ्यांनीच त्याचा चांगला अभ्यास केलेला दिसतो' या पहिल्याच वाक्याने त्यांनी सभागृह ताब्यात घेतले. संयोजकांनी लाऊडस्पीकर बंद पाडला. शेवाळकर म्हणाले, 'माझा आवाज लाऊडस्पीकरशिवायही लोकांना ऐकू जाईल'. संयोजकांनी दिवे बंद केले. शेवाळकर म्हणाले,'मला पहायला तुम्ही आलेला नाहीत. महाकाव्याचा महिमा ऐकायला आला आहात'
सगळे व्याख्यान लाऊडस्पीकरवाचून गडद अंधारात आटोपले. सारा वेळ सभागृहात दोन आवाज उमटत राहिले. एक नानासाहेबांचा चढा आणि दुसरा त्यावर कडाडून उठणाऱ्या श्रोत्यांच्या टाळयांचा.
पौराणिक व्यक्तिरेखांवरची त्यांची बरीच व्याख्याने ऐकल्यानंतर एकदा मी त्यांना म्हणालो 'पाच हजार वर्षांपूर्वीच्या विषयावरची व्याख्याने आता खूप झाली. आता एकदम नव्या विषयावर, वर्तमानावर या' त्यांनी लगेच विषय दिला, डॉ. आंबेडकर ते बॅ राजाभाऊ खोब्रागडेः दलित चळवळीची महाराष्ट्रातील वाटचाल. चंद्रपूरच्या बॅ. खोब्रागडे स्मृती व्याख्यानमालेचा आरंभच त्या दोन व्याख्यानांनी झाला.
आपल्या व्याख्यानवेडापायी त्यांनी लिखाणाकडे दुर्लक्ष केले असा आरोप अनेकांप्रमाणे मीही त्यांचेवर केला. मुख्यतः त्यापायी त्यांनी आपल्या कवितेला कधीचे वाऱ्यावर सोडले. लेखनातील सर्जनशीलता अशी दवडल्याचा आरोप त्यांनाही अमान्य नव्हता. भाषणाचेवेळी श्रोत्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रतिक्रिया प्रत्यक्ष पाहण्याचे जे भाग्य वक्त्याच्या वाटयाला येते तसे ते लेखकाच्या वाटयाला येत नाही, हे या संदर्भातले नित्याचे उत्तर देऊन ते थांबत. मला जाणवायचे ते मात्र वेगळे. भाषणाचा सूर लागून विषयात हरवले की अनुभवाला येणारी झिंग (तिला किक् म्हणा हवे तर) त्यांना जादा मोहवीत असावी.
नानासाहेब वक्ते होते तसे लेखक, संपादक आणि कवीही होते. त्यांच्या रेघा या कवितासंग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेत कुरुंदकरांनी त्यांची एक मर्यादा स्पष्टपणे नोंदविली आहे. त्यांचा कवितेतला प्रणयही मुक्त-प्रणयानंदासाठीचा प्रणय नव्हता, त्याला पुत्रप्राप्तीची ओढ आणि त्यातून येणारी सामाजिक मर्यादा होती. त्यांच्यातला लेखक आणि कवी ही मर्यादा सांभाळत होता.
व्याख्यान हे व्रत मानणाऱ्या नानासाहेबांचा श्रोत्यांना होणारा एक अनुषंगिक फायदा असा की त्यांची व्याख्याने श्रोत्यांच्या पदरात फुकट पडणारी होती. कुरुंदकर काय किंवा ते काय, मानधन-प्रवासखर्च इ. ऐहिक गोष्टी आगाऊ ठरवून व्याख्यानाला जाणे हे त्यांच्या अध्यात्मात बसणारे नव्हते. परिणामी त्यांच्या अनेक प्रभावी व्याख्यानमाला अनेक संस्थांच्या दरबारात फुकट संपन्न झाल्या. लोकांचाही आनंद असतो. 'शेवाळकर काय बसने येतील, नच मिळाली तर ट्रकनेसुध्दा येतील आणि व्याख्यान देऊन परत जातील. त्यांना असल्या उपचारांची गरज नसते' असे आत्मविश्वासाने सांगणारे अनेक थोर कार्यकर्ते माझ्या परिचयाचे आहेत. सगळी रात्र एस.टी स्टँडवरच्या दगडी बाकावर बसून सकाळची बस शोधणारे, बसमधून तासन्तास उभ्याने प्रवास करणारे हे दोन्ही वक्ते मी पाहिले आहेत.
मी एकदा त्यांना म्हणालो,'व्याख्यान आणि सौजन्य यांना महाराष्ट्रात तुमच्याएवढे कुणी स्वस्त बनवले नाही' माझ्या या वाक्याला विजयाताईंनी दणदणीत दाद दिली आणि संतत्वाचा वारसा लाभलेल्या नानासाहेबांनी मी केवढया ऐहिक पातळीवर आहे हे जाणवून देणारे एक करुण हास्य केले.
भाषणाएवढीच संभाषणे रंगविण्यात त्यांना रस होता. कोटया करायचे, किस्से सांगायचे, सिनेमाची खूप जुनी गाणी गाऊन दाखवायचे. एका प्रवासात संस्कृत महाकवींनी लिहून अजरामर केलेली उत्तान शृंगाराची वर्णने त्यांनी ऐकवली तर दुसऱ्या एका मैफिलीत 'न ये चांद होगा' हे गाणे संघाच्या प्रार्थनेच्या चालीवर म्हणून दाखविले. मध्यंतरी एका पुस्तकासाठी मी स्त्री-पुरुष संबंधांवर, त्यातही विवाहबाह्य संबंधावर लिहायचे ठरविले तेव्हा त्या संबंधांच्या सगळया बाजूंवर त्यांनी गोव्यापासून मुंबईपर्यंतच्या टॅक्सीच्या प्रवासात अधिकारवाणीने एक अखंड भाष्य ऐकविले.
त्यांच्याकडे अनेक संस्थांचे पालकत्व होते. वाङ्मयीन संस्थांचे नेतृत्व होते आणि त्या संस्थांचा कारभार सचोटीचा आणि अधिकाधिक लोकभिमुख असावा असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांची चारणारी अविरत फिरस्ती आणि त्या संबंधातला एकूण जिव्हाळा यामुळे त्यांच्या नेतृत्वाला पालकत्वाचे आणि संस्थामधील संबंधांना कौटुंबिक सौहार्दाचे स्वरुप आले होते.
स्वतःचे साधेपण डोळसपणे जपणाऱ्या नानासाहेबांना इतरांच्या व्यक्तित्त्वातील झळाळणाऱ्या पैलूंचे मात्र विलक्षण आकर्षण होते. विशेषतः ही व्यक्तित्वेच तरूण असतील तर त्यांच्या अशा पैलूंना उजाळा मिळावा यासाठी त्यांची धडपड राहिली. आपल्या वक्तृत्वाला पहिली शाबासकी नानासाहेबांनी दिली, असे कृतज्ञतेने सांगणारी तरुण मुले आणि मुली विदर्भ-मराठवाडयात तर मी पाहिल्याच पण कोकण-गोव्यातही त्यांचे हे नातेवाईक मला भेटले आहेत.
बरीच मोठी माणसे इतरांविषयी बोलणे टाळतात. एखाद्याचे आपण जाहीररित्या कौतुक केले तर तो खरोखरीच मोठा ठरेल, अशीही अनेक बडयांची बऱ्यापैकी धारणा असते. एवढया वर्षात असल्या किरटेपणाने नानासाहेबांना ग्रासल्याचे मी कधी पाहिले नाही. कौतुक करायचे त्यांनी, प्रोत्साहन द्यावे त्यांनी आणि अपराध पोटात घ्यावे तेही त्यांनीच.
शेवाळकरांचे अखेरचे दिवस तृप्त व समाधानी होते. खूप सोसले आणि अनुभवले. जीवनात अटळपणे येणारे दु:ख व नैराश्याचे क्षण त्यांच्याही वाटयाला आले. जवळची माणसे दुरावलेली, उपकृत माणसे कृतघ्न झालेली आणि हाती वाढलेल्या संस्था, संघटनांना विषाची फळे आलेली पाहण्याचे भाग्य त्यांच्याही वाटयाला आले. अशा अनेक प्रसंगांचा मी साक्षीदार आहे. त्या साऱ्या प्रसंगांत प्रकर्षाने जाणवलेली बाब ही की विषादाच्या क्षणीही त्यांना विकारांचा आश्रय घ्यावा लागला नाही आणि त्यांच्या माणुसकीला क्षुद्रत्वाचा स्पर्शही कधी झाला नाही.
आयुष्याच्या प्रवासात मोठयांच्या छोटया गोष्टी आणि लहानांच्या महान कथा त्यांनी पाहिल्या व अनुभवल्या. त्यांची अतिशय बहारदार वर्णनेही त्यांनी ऐकवली. जीवनातल्या चांगल्या गोष्टींचा मोह असणे आणि त्यांचा गौरव सातत्याने मांडणे ही समाजाच्या आरोग्याला आवश्यक असणारी बाब आहे. मात्र अशा आरोग्यासाठी जीवनातील कुरुपतेची ओळख असणेही जरुरीचे आहे असे मला नेहमी वाटत आले. जीवनातल्या अशा कुरूप बाजू शेवाळकरांनीही पाहिल्या. त्या त्यांनी सांगितल्या पाहिजेत असे मी त्यांना नेहमी म्हणत आलो आणि त्यासाठी त्यांचा रागही अनेकदा ओढवून घेतला. यदुनाथ थत्ते आणि राम शेवाळकर यांच्यातले हे एक गोंधळून टाकणारे साम्यस्थळ होते. त्या दोघांनाही कुरुपता पाहण्याचा डोळा नव्हता. मुळात ही दोन्ही भटक्या जमातीतील माणसे. त्यांच्या भटकंतीत प्रवासातली धोक्याची अनेक अवघड वळणे आणि अपघाताच्या हमखास जागा त्यांनी पाहिल्या. त्याच रस्त्याने प्रवास करणाऱ्या नव्या वाटसरूंना त्यांनी अशा जागा दाखवून दिल्या पाहिजेत हा माझा आग्रह त्या दोघांनीही नेहमीच साने गुरूजींच्या सौजन्याने टोलविण्याचे कसब दाखविले. (आणि तरीही या कसबामागची सल त्यांनाही कायमचे अस्वस्थपण देत आली हे कुणाही जवळच्याला जाणवणारे होते) आपली जिव्हाळयाची ठिकाणे आपल्याला बळ देणारी असतात हे जीवनातले एक अर्धसत्य आहे. ही ठिकाणे याच आपल्या जीवनातील दुबळया जागाही असतात ही या अर्धसत्याची दुसरी बाजू आहे. अशी असंख्य बलस्थाने असणे हे आयुष्याचे मोठेपण आहे. शेवाळकरांची अशी शक्तीस्थाने खूप होती. स्व. भाऊसाहेब हे असे ठिकाण होते. सौ. विजयाताई ही अशी जागा होती. महाराष्ट्रभर पसरलेला मित्रांचा परिवार होता. त्यांना पालक मानणारी त्यांची अनेक मुले व मुली मला ठाऊक आहेत आणि मुलगा आशू व सून मनीषा यांच्या वाटयाला आलेला त्यांचा लोभ या त्यांच्या विस्तारलेल्या परिवारालाही नेहमीच लाभल्याचे मी अनुभवले आहे.
अखेरच्या दिवसात त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले होते. मात्र आपल्याकडे येणाऱ्या परिचित वा अपरिचित अशा कुणाही जवळ त्यांनी त्यांच्या दुखण्याची कधी वाच्यता केली नाही. तशाही स्थितीत ते आपले सामाजिक उत्तरदायित्व तरुणाईतल्या उत्साहानेच वाहून नेत राहिले. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांचे लेखन, वाचन आणि भाषण हे नेहमीच्या जोमानेच चाललेले दिसले. भाषणातील एखाद्या प्रसंगविशेषाचेवेळी त्यांचा आवाज जरा चढला की त्यांच्या प्रकृतीची माहिती असणाऱ्यांच्या काळजात कालवाकालव व्हायची. शेवाळकर मात्र आपले सर्वस्व समाजासाठी आहे आणि ते त्याला आपल्या साऱ्या सामर्थ्यानिशी द्यायचे आहे या भावनेने प्रत्येकच लहानसहान कार्यक्रमात समरसून बोलत आणि भाग घेत. वाणी हे आपल्याला लाभलेले सामर्थ्य आहे आणि समाजात सद्भाव उभा करण्यासाठी तिचा वापर करणे हे आपले कर्तव्य आहे अशी श्रध्दा बाळगूनच शेवाळकर अखेरपर्यंत बोलत राहिले. त्यांच्या तशा बोलण्यावर मराठी माणूस लुब्ध होता आणि त्या माणसाच्या तशा प्रसन्नतेत शेवाळकरांना त्यांची पारितोषिके दिसत होती. आता हे बोलणे थांबले आहे. आयुष्यभर सांगून झाल्यानंतरही सांगण्यासारखे शेवाळकरांजवळ आणखीही बरेच काही होते. त्याची प्रतीक्षा करणाऱ्या त्यांच्या श्रोत्यांचा आणि चाहत्यांचा वर्गही मोठा होता. या वर्गाची तृष्णा आता तशीच राहणार आहे. शेवाळकर अखेरच्या क्षणापर्यंत तृप्त आणि प्रसन्न होते. त्यांच्या चर्येवर समाजाला आपले सर्वस्व दिल्याचे समाधान होते. त्यांच्याभोवती जमलेल्यांच्या चेहऱ्यांवर मात्र सारे काही गमावल्याचे दु:ख होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment