Pages

Wednesday, November 2, 2011

नलिनी जनार्दन

तिचा चेहरा अजून डोळयासमोर येतो. तसाच हुबेहूब. तांबूस, गव्हाळ वर्णाचा. किंचित लंबगोलाकार. जरा काळसर अन् जरा तांबूस असलेल्या मऊशार केसांचा. त्यांचा भांग काढून मागे मानेवर सैलसर अंबाडा घातलेला. कमालीच्या कमानदार भुवयांखालची जरा निळसर झाक असणारे टोकाच्या तीक्ष्ण नजरेचे मोठे डोळे. त्यात खूपदा स्मितांची हलकीशी झुळूक. साजेसं सरळ नाक. नाजूक अन् रूंद जिवणी. हनुवटीची ठेवणही लक्षात रहाविशी. चेहऱ्याच्या बैठकीला आदराचा आधार देणारी.
ती उंच अन् सडपातळ होती. बहुदा पांढऱ्या रंगाचे पायघोळ पातळ ती नेसायची. तलम अन् मऊसूत... ती देखणी दिसायची. हसरी असायची. डोळयातले भाव बदलायची. क्वचित कधी रागाची छटा, क्वचित कधी अश्रूंची दाटी. पण ते सारं क्षण दोन क्षणच टिकणारं. आपल्याच माणसाला आपलं मन मोकळं करून सांगता, दाखवता न येण्याचं दु:ख अनुभवताना भोगावा लागणारा दाह ती अनुभवायची. पण त्या व्यथेवर पुन्हा तिचं हळवेपणच लाघवी मात करायचं.
मी तिला वैभवात पाहिलं. दारिद्रयातही पाहिलं. सजीवपणी पाहिलं अन् मृत्यूनंतरही पाहिलं. मला ती कधी वेगळी दिसली नाही. नेहमीच सारखी प्रसन्न. निळसर डोळयांत सुस्नात असलेली.
नलिनी जनार्दन ही पूर्वाश्रमीची नलिनी जोशी (बुजोणे.) तिच्या लहानपणीही तिने फारसे आनंद अनुभवले नसावे. तिची आई वेडी होती. तिच्याविषयी ती क्वचितच बोलायची. माझ्याशी ती तसं काही बोलल्याचे माझ्या स्मरणात नाही. ती सारी गोष्ट मला फार नंतर तिच्या माहेरच्या माणसांकडून समजली. नलिनीच्या जन्माआधीच तिची आई वेडसर वागायची. तिच्या जन्मानंतर ते वेड वाढलं. कदाचित त्या घराण्याला हवा तो मुलगा वारस म्हणून न दिल्याच्या अपराधगंडानं तिला घेरलं असावं. ती नलिनीला बघायची, घ्यायची नाही. ती आपली कुणी नसल्यासारखी वागायची. पुढे तिचा वैताग वाढला. तेव्हा तिनं धाकटया नलिनीचा जाच सुरू केला. त्या लहानग्या जिवाला ती मारायची, आपटायची.
तिच्या वडिलांनीच मग तिचा ताबा घेतला. नलिनीचा पायगुण चांगला होता असे तिचे वडील म्हणायचे. ते पूर्वी साधी भिक्षुकी करायचे. त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन गावालगत होती. नलिनी घरात आली आणि त्यांना त्यांच्या वाणीचा आणि मोजक्या गायकीचा साक्षात्कार झाला. भिक्षुकी करणारा आबा बुजोणे मग गावात किर्तन करू लागला. पुढे आजुबाजूच्या गावची आमंत्रणे येवू लागली. नाव वाढलं आणि आवकही वाढली. जुनं घर पाडून त्यांनी नवं बांधायला घेतलं. ते बांधून झाल्यावर त्याला सोबत म्हणून आणखी शेजार बांधायला घेतला. साधी, त्या काळातली घरं.
गावाच्या मध्यभागी असलेल्या खोलगट जागेत ते घर आणि त्यांचा शेजार उभा राहिला. शेजारची घरं भाडेकरूंच्या बिऱ्हाडांनी भरली. एक दिवस आबा बुजोण्यांनी त्या शेजाराभोवती सलग भिंत बांधली. त्याचा दरवाजा चांगला दिंडी दरवाजासारखा मोठा. आत आठ-दहा बिऱ्हाडं. मध्यभागी असलेल्या मोठया घरात आबा बुजोणे, त्यांची आई, वेडसर बायको आणि नलिनी.
आवारात मोठं अंगण आणि त्याच्या एका कोपऱ्यात कडे नसणारी भरपूर पाण्याची खोल विहीर. वाडयासारख्या त्या बंद शेजारातली माणसं तिचं पाणी प्यायला अन् कामाला वापरायची. त्याची खारट चव मला अजून आठवते. गावात नळ येऊन त्याची धार सुरू होईपर्यंत सारे तेच पाणी प्यायचे आणि ते पाचक असल्याचं एकमेकांना समाधानानं सांगायचे. नळाला पाणी आलं आणि मग विहीर फक्त वापरायच्या पाण्याची झाली. तिचं पाचकपणही मग संपलं.
आबा बुजोणे हा फार देखणा माणूस होता. लालबुंद अन् गोरापान. मध्यम उंचीचा अन् अंगाने भरलेला. डोळे पाणीदार अन् भेदक. शिवाय त्यात सदैव एक मिस्किल झाक. बहुतेक किर्तनकार बोलतात तसा तो विनोदी बोलायचा. त्यात खूपदा चावटपणही मिसळलेलं असायचं. डोक्यावरचे केस विरळ अन् अकाली पांढरे झालेले. तो पांढरं तलम धोतर नेसायचा. अंगात शुभ्र बंगाली सदरा अन् डोक्यावर पांढरी टोपी. क्वचित कधी अंगावर उपरणं घ्यायचा.
पायात करकरणाऱ्या वहाणा घातलेला आबा बुजोणे झपझप चालायचा. त्याच्या एका हाती एक बाक असलेली वेताची पिवळीधमक काठी असायची अन् दुसऱ्यात नेहमीच एक पिशवी. तीत पंचांग, पोथ्या, उद्बत्ती, कापूर अन् फुलं असायची. लोक त्यांच्याशी आदराने बोलत. तो आपली आब अन् ऐट राखून त्यांच्याशी वागे ..... दसऱ्याची गावपूजा त्याच्या हातून व्हायची अन् ती झाल्याशिवाय लोकांचे सिमोल्लंघन पूर्ण व्हायचे नाही.
आपल्या आयुष्यात आलेलं ऐश्वर्य नलिनीच्या पायानं आल्याचं तो मानायचा. तिचे लाड करायचा. लग्न होवून सासरी गेलेल्या नलिनीचे तसेच कौतुक करताना त्याला मी पाहिले आहे. नलिनीला तो ताई म्हणून हाक मारायचा. त्याच्या आवाजात एक आर्जवी मार्दव होतं. मलाही प्रेमानं तो -श्रीमंत- म्हणायचा.
आबा सारं मायेनं करतो अन् आपली आई मात्र राग राग करते, ही बाब नलिनीच्या लहानशा मनावर ओरखडे उमटवून देणारी असावी. तीच मग तिच्या आईपासून दुरावत गेली. पुढे तिची आई फार वेडी झाली आणि नलिनी आबाच्या आधारानं वाढत गेली.
तिला आणखी एक आधार होता, आबाच्या आईचा. तिला सारे मायबाई म्हणत. मी तिला पाहिली तेव्हा ती कमरेतून वाकली होती. तिचा आवाज मृदू, शब्द मायेनं भरलेला आणि केस पांढरे होते. तिनं माझ्यावरही फार माया केली.
नलिनीची आई गेली तेव्हा ती शाळेत जाऊ लागली असावी. आबा बुजोण्यांनी दुसरं लग्नं केलं. या दुसऱ्या आईनंही नलिनीवर फार प्रेम केलं. तिला मूल झालं नाही आणि मग तिलाही नलिनीवाचून विरंगुळा उरला नाही. तिच्या बोलण्यातला नलिनीचा उल्लेख नेहमी माझी ताई असा यायचा .... फार करारी, ताठ मनाची आणि खंबीर वृत्तीची ती बाई पुढे खूप काळ राहिली. आबा गेले, नलिनी गेली, ती धिटाईने आणि एकटयाने सारे सांभाळत राहिली. तिच्या स्वभावातला हट्ट वाढत गेल्याचा आणि ती नको तशी तापट झाल्याचा अनुभव नंतर जवळच्यांना येत राहिला ..... पण ती नलिनीविषयी अखेरपर्यंत जिव्हाळयानं बोलली. तिनं मलाही खूप लळा लावला होता.
नलिनीचं लग्न जनार्दन पांडुरंगांशी झालं. त्याचा योगायोग गमतीदार होता. स्वातंत्र्याच्या लढयात सहभागी झालेल्या आणि त्यासाठी सात रुपये महिन्यावर मास्तरकी करणाऱ्या जनार्दन पांडुरंगांचा कल लग्नाकडे नव्हता. आपल्या धाकटया भावासाठी मुलगी पाहायला तो आबा जोशींच्या घरी गेला होता आणि नलिनीला त्यानं स्वत:साठी पसंत केली. ती गंमत मग नलिनी खूपदा सांगायची. तिच्या किर्तनकार बापाला तो विनोदी किस्सा सांगायला आवडायचा. जनार्दन पांडुरंग मात्र त्या विषयी कधी बोलल्याचं माझ्या आठवणीत नाही.
नलिनीचा पायगुण खरोखरच मोठा असावा. सात रुपयावर काम करणाऱ्या मास्तर जनार्दन पांडुरंगानं बँकेत नोकरी धरली. माल वाहतुकीचा व्यवसाय केला. त्याला पैसाही खूप मिळाला. तो आणि नलिनी स्वत:च्या मोटारीतून प्रवास करू लागले. पोरीचा पायगुण चांगला म्हणून किर्तनकार आबाही सुखावला. तेव्हा त्यालाही रेडिओवरच्या किर्तनांची आमंत्रणे येवू लागली होती. तो स्वत:ला ऑल इंडिया रेडिओ किर्तनकार असं म्हणायचा. आपल्या नावाखालीही तसं लिहायचा.
लहानपणचं विस्मरणात गेलेलं आईचं वेड आणि मरणाएवढीच दु:ख अनुभवलेली अन् जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलेली नलिनी नंतर नुसतीच सुखात आणि लाडात वाढली. सासरीही तिचं कौतुक असावं. तिचा पायगुण चांगला म्हणून आणि ती दिसायला सुंदर म्हणूनही. जनार्दन पांडुरंगांचं कर्तृत्वही नेमकं त्याच काळात भरभराटीला आल्यानं त्याच्या विषयीचा अभिमान साऱ्यांना होता. त्याचा दराराही साऱ्यांवर होता.
नलिनीला पहिलं मूल बरंच उशिरा झालं. ते दोन वर्ष जगलं अन् गेलं. तिचा दुसरा मुलगा मी. सुरेश जनार्दन.
मी अकरा वर्षाचा होईपर्यंत नलिनी जनार्दन आमच्यासोबत होती आणि एका बाळंतपणात ती गेली. ती अकरा वर्षे तिच्या, जनार्दन पांडुरंगांच्या आणि त्यांच्या घराच्या वाटयाला जे भोग आले ते शत्रूच्या वाटयालाही येऊ नयेत असे .... मृत्यू, फसवणूक, पोलिस स्टेशनच्या वाऱ्या, घरादाराचा लिलाव, जनार्दन पांडुरंगांसोबत नलिनीच्या कोर्टातल्या जबान्या, सारे अमानुष. त्यातच तिचे जाणे झाले.
पायगुण खरा असेल तर पायदोषही खरा असावा आणि तो माझा असावा. माझ्या अगोदर झालेले तिचे मूल अकालीच मृत्यूमुखी पडले होते. माझ्या मागून झालेली तिची इतर मुलेही जगली नाहीत. पपा सात वर्षांची होऊन गेली. दुसरे एक मूल जन्मत:च काही श्वास घेवून निवांत झाले. पुढे तिच्या अखेरच्या बाळंतपणात झालेले मूल प्रथम आणि नंतर ती स्वत: गेली. त्याच काळात त्या घरातून नियमितपणे निघणाऱ्या शवयात्रा तिनं अनुभवल्या होत्या. आजी, आजोबा, घरी रहायला असणारा एक दूरचा भाऊ. तिची आई तिनं लहानपणीच प्रथम अर्धवट आणि नंतर पुरती गमावली होती. तिला स्वत:चे भाऊ अथवा बहीण असे कुणी नव्हते.
पायदोषाची ही कहाणी मरणयात्रेपाशीच थांबत नाही. माझ्या वाढण्यासोबतच घराच्या वैभवाचे संपणेही तिला पहावे लागले होते. प्रथम जनार्दन पांडुरंगांचा व्यवसाय थांबला. घरापुढे हत्तीसारख्या झुलणाऱ्या मालमोटारींची संख्या रोडावत गेली. पंधराच्या दहा, मग दहाच्या दोन, पुढे ते मैदान मोकळेच झाले. मागच्या गॅरेजमध्ये असणारी कार प्रथम मोडीत निघाली आणि पुढे घराच्या आवाराबाहेर उन-पावसात भिजत जंगत तशीच खंगत राहिली. घरातलं सामान दिसेनासं होऊ लागलं. प्रत्येक जप्तीत अन् लिलावात ते घर रिकामं होत गेलं. नलिनीला दागिन्यांचा सोस नव्हता. ती तशीही कधी सोन्यानं मढली नसायची. पण जे थोडेसे अलंकार अंगावर होते ते नंतर लुप्त झाले.
एकच अलंकार अखेरपर्यंत तिच्याजवळ होता. तिच्या चेहऱ्यावरच्या मंद अन् क्वचित मिस्किल होत जाणाऱ्या स्मिताचा....
आईला मुलाचा पायदोष कळत असावा का की त्याचं येणं, असणं, हा तिला भाग्ययोग वाटत असावा. सुरेश जनार्दन हा लहानपणी नलिनीला आवडत असावा. ती त्याच्यावर रागवत चिडायचीही. ते रागावून झाले की तिला त्याच्याविषयीच्या मायेचं भरतं यायचं. तसंही तिला रागावून, रुसलेलं तिच्या कुणा नातेवाईकाच्या स्मरणात नाही.
माणसांना सहनशीलतेची आणि स्त्रियांना दुःखातून उठण्याची सवयच असावी. जनार्दन पांडुरंग सहन करायचे. पण त्या प्रकारात ते खचायचे. त्यांचा विश्वास संपायचा. मग ते आपलं नास्तिक्य विसरून देवाच्या दारात जायचे. श्रीराम जयराम जयजय राम या अक्षरांनी वहया भरून काढायचे. कधी एखाद्या योग्याला भेटून त्याचा सल्ला विचारायचे. त्यांचा तो शोध संपला की पुन्हा ते स्वत:पाशी येऊन थांबायचे. एक दिलासा त्यांना कायमचा आधाराला होता. ते ज्ञानेश्वरी वाचायचे. श्रध्देनं नव्हे, आस्थेनं. तीत ते स्वत:ला विसरायचे. नलिनी जनार्दनचं तसं नव्हतं. मुळात ती खचायची नाही. क्षणकाळ हरवल्यासारखी भांबावायची. पण काही क्षणात ती पुन्हा ती व्हायची. तिला रामाचा आधार लागायचा नाही की ज्ञानेश्वराची मदत लागायची नाही. वास्तवाच्या वणव्याची जाण असल्याने ती तशी असावी की मुळातच ती सामर्थ्यशाली असावी?
खचलेली माणसं नुसती दयनीयच होत नाहीत ती दुष्टही होतात. सगळया संबंधात आपलं दुबळेपण दडवायला ती नको तशा क्रूरतेचा आश्रय घेतात. जनार्दन पांडुरंग संतापत. पण त्यांचे क्रौर्य नलिनीच्या वाटयाला कधी आले नाही. त्या काळात तिनं त्यांना कसं सांभाळलं याचं कोडं आजही कधी उलगडलं नाही. त्यांनी तिच्या माहेरच्यांशी भांडण धरलं. आपत्तीच्या परिणामी जवळची माणसं तुटली. जवळचे म्हणणारे दूर गेले आणि मित्रांच्या डोळयात मैत्रीऐवजी सहानुभूतीचाच संतापजनक भाव. माणसानं स्वत:वरच चिडून उठावं अशी ही अवस्था. त्या अवस्थेतल्या जनार्दन पांडुरंगांची सोबत करणं ही किमया होती. नलिनी जनार्दनच्या या किमयेला तिच्या स्वभावातल्या हंसऱ्या गोडव्याची साथ होती.
आमची राहायची जागा मोठी होती. समोर मोठे घर, मध्ये बाग आणि शेवटी चांगले घर म्हणावे एवढे आऊट हाऊस. नलिनी त्या साऱ्यांत नेहमी प्रकाशाच्या लहरीसारखी वावरायची. त्यातल्या साऱ्यांना तिचा आधार होता. जनार्दन पांडुरंगांचे दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकणे, त्यांना इतरांपासून दूर नेणारे होते. ते चिडत अन् संतापत. त्यांच्याविषयीचा जिव्हाळा असणारी माणसंही मग त्यांच्याविषयीच्या आदरानंच वचकून दूर राहात. नलिनी मग त्यांना जवळची वाटे. आता आठवते ते हे की तिनं या माणसांना आधार दिला. पण तिला आधाराचं वाटावं असं कुणी नव्हतं. जनार्दन पांडुरंगांना सावरून ती स्वत: नीट राहायची.
घराभोवती देवांची गर्दी होती. अंगणाच्या उत्तरेला एक भलामोठा पिंपळाचा पार होता. तो पिंपळही खूप जुना. पानांची प्रचंड सळसळ करणारा. सापांना आणि कोणकोणत्या पाखरांना आश्रय देणारा. त्याच्या पारावर मारोतीचे एक छोटे पण देखणे देऊळ होते. सारी वस्ती त्या मारुतीच्या पाराशी एकत्र यायची. नलिनीला कधी त्या पाराच्या दिशेने फिरकावेसे वाटले नाही. पूर्वेला घराशेजारीच विठ्ठलाचे मोठे मंदिर होते. त्यात नित्यनियमाने आरती अन् पूजा चाले. किर्तने अन् भजने होत. स्त्रिया अन् माणसे तेथेही गर्दी करीत. नलिनीला मात्र कधी विठ्ठलाच्या दर्शनाला जावेसे वाटले नाही. घरामागे मातेचे मंदिर. त्याच्या शेजारी रस्ता ओलांडला की गणपतीचे मोठे अन् पुरातन देऊळ. त्यातली गणेशाची बैठक मारलेली मूर्तीही चांगली पुरुषभर उंचीची. पण नलिनी त्याही बाजूनं कधी फिरकली नाही. घरातल्या पूजेचं साहित्य ती देवघराच्या दारात ठेवून परत फिरायची. तिनं घरच्या देवालाही कधी नमस्कार केला नाही. आजोळी देवीचं मोठं नवरात्र बसे. शेंदराचा मोठा गोळा असल्यासारखी देवीची मूर्ती तिथं पुजेत असायची. आजोबा चांगली दोन तास तिची पूजा करायचे. पण नलिनी तिच्यासमोरही कधी वाकली नाही.
देवावाचून राहणारी माणसं मला नेहमीच निश्चयाची वाटत आली. इतरांना त्या न दिसणाऱ्या शक्तीचा आधार असतो. पण त्या आधाराकडे पाठ फिरवून राहणारी अन् आपली दु:खे एकटयानं अनुभवणारी माणसं त्यांचं बळ कुठून आणत असतील? त्यातही त्यांच्या चर्येवरचं समाधान अन् ओठांवरचं स्मित कसं येत असावं? ती गेली तेव्हाचा जनार्दन पांडुरंगांचा आकांत मी पाहिला आहे. त्यांना सारखी भोवळ येऊन त्यांची शुध्द जात होती. परमेश्वरानं फसवलेल्या त्या दीनवाण्या माणसाचा आधार त्या दिवशी हरवला असावा.
ती गेली त्या दिवशी मग आमच्या घराची ईश्वराची उरलीसुरली गरजही संपली. नंतर पुन्हा त्यात कधी आस्थेनं पूजा-अर्चा घडल्याचं माझ्या स्मरणात नाही.
मला ती आठवते तीच मुळी एका देवतेसारखी. खूप लहान असेन मी. जेमतेम चार पाच वर्षांचा. जनार्दन पांडुरंगांच्या वैभवाचे ते दिवस होते. बोटात चकाकणाऱ्या अंगठया आणि कौतुकाने शिवलेल्या काळया शेरवानीवर झुलणारी सोन्याची लखलखीत साखळी हे अजून स्मरणात आहे. कुणीतरी डोक्याला मंदिल बांधला गुलाबी, जरीकाठी. त्याचा शेला पाठीवर सोडलेला.
तो पोळयाचा दिवस होता. माझ्यासाठी मुद्दाम तयार करून घेतलेला खूप मोठ्ठा लाकडी बैल नव्यानं रंगवून आणलेला होता. त्याच्या पांढऱ्या शुभ्र पाठीवर चमकणारी चांदीची झूल होती. कुणा वडिलधाऱ्याने उचलून मला त्या बैलाच्या पाठीवर बसविले. त्याची शिंगे हातात धरून मीही त्याच्यावर स्वार झाल्याचा आव आणला आणि तेवढयात .... हातात निरंजनाचं चांदीचं मोठं तबक घेऊन ती पुढं आली. खूप देखणा आणि तजेलदार चेहरा घेऊन. त्यावर आनंदाचे, आशिर्वादाचे स्मित घेऊन. मला रंग आठवत नाही पण खूप भारी अन् जरीकाठी पातळ ल्यायलेली. दंडावर चमकणाऱ्या जरीचे ब्लाऊज घालून आणि गळयात नेहमीच्या सोन्याच्या माळांसोबत एक नवी मोत्याची सर असलेली.
आई हे देवतेचं रूप असेल तर तिचं प्रत्यक्ष दर्शन मी घेत होतो. तिनं मला कौतुकानं ओवाळलं. चेहऱ्यावरून प्रेमानं हात फिरवला. तो सोहळा पाहणाऱ्यांची गर्दीही त्या कौतुकात सहभागी होती. आताशा ही आठवण स्वप्नात येते. चांदण्यांच्या ओघळत्या धुळीत मग तो चेहरा दिसतो आणि लुप्त होतो.
पुढचा काळ तिच्या अंगावरचा एकेक दागिना नाहीसा होण्याचा. तिच्या पातळाचे तलमपण संपण्याचा आणि चांदीची तबकं आणि निरंजनं जप्त होऊन सरकारी खजिन्यात जमा होण्याचा. कारची मोडतोड होऊन तिचं प्रेत तसंच घरामागच्या मोकळया जागेत पडून राहिलं. घराचे रंग उतरत गेले आणि त्याच काळात घरातली माणसं हरवत गेली. काही तशीच दूर झाली आणि बरीचशी मृत्यूच्या दाढेत गेली.
आजी-आजोबा गेले. माझ्या पाठीवर एक बहिण होती चित्ररेखा. ती आईसारखी गोरी नव्हती. सावळी, किंचितशी थोराड. पण लहानपणापासून तिचा आवाज मोठया रानपोपटासारखा खणखणीत आणि वजनदार होता. ती बोलायचीही रुबाबात. साऱ्यांची लाडकीही होती. मला तिचा हेवा वाटायचा. पण ती मधूनच आवडून जायची. सारे तिला प्रेमानं पपा म्हणायचे. ती चांगली सात वर्षाची झाली.
एक दिवस नलिनीसोबत ती आजोळी गेली. आमच्या आजोळी देवीचं नवरात्र बसे. एका मोठया शेंदरानं मढवलेल्या देवीच्या मूर्तीची पूजा आबा करायचे. ती पूजाही खूप वेळ अन् साग्रसंगीत चालायची. त्या नवरात्रात त्यांनी त्यांच्या लाडक्या ताईला बोलावून घेतलं होतं. पपाही तिच्यासोबत गेली. काही दिवसांनी पत्रं आलं पपा आजारी पडल्याचं. जनार्दन पांडुरंग जाऊन आले. नेहमीसारखे बेफिकीर. मग मला पाठविलं. गावात देवीची साथ होती. पपा देवीच्या तापानं फणफणत होती आणि तिच्या सर्वांगावर मोठमोठे फोड उठले होते. एवढे की तिचे डोळेही त्यांनी झाकले होते. मला राहवलं नाही. मी परतलो.
काही दिवसांनी नलिनी एकटीच माहेराहून परतली. पपा गेली होती. शाळेतून घरी आलो तेव्हा नलिनी घराच्या दरात एकटीच रिकामी अन् शून्य होऊन बसली होती. मला खूप जवळ घेऊन बराच वेळ ती माझ्या पाठीवरून आपली लांबसडक बोटं फिरवत राहिली. नंतरच्या काळात ती मला कधी रागावली नाही की माझ्यावर कधी डोळे काढले नाहीत. जनार्दन पांडुरंगाच्या कोपाचा स्फोट झाला की ती मधे उभी राहायची. तिच्यातलं मीपण लोपलं होतं. दागिना नव्हता, कपडयांची श्रीमंती संपली होती. चेहऱ्यावरचं तजेलदार मार्दव मात्र तसंच कायम होतं.
तिनं एकदाच मला मारल्याचं अंधुकसं आठवतं. तिसऱ्या वर्गात असेन शाळेत न्यायला पुस्तकं नव्हती आणि ती विकत घ्यायला पैसे नव्हते. सुरुवातीचे काही दिवस तशाच पुस्तकांवाचून शाळेत जात होतो. पण शिक्षकांनी पुस्तकांचा आग्रह धरला. पुस्तकाशिवाय वर्गात न येण्याची आज्ञा केली. मग काय करायचं? घरून निघून महादेवाच्या देवळात बसून दिवस काढला. शाळा सुटायच्या वेळी घरी परतलो. एक दिवस, दुसरा, मग तिसरा, चौथ्या दिवशी मास्तरच घरी आले.
'माझ्याजवळ पुस्तकं नव्हती' एवढंच मी म्हणालो.
जनार्दन पांडुरंग गप्प राहिले. नलिनी मात्र संतापली.
'आहे ते सारं विकलं असतं' ती म्हणाली. तो तिचा प्रथम आणि अखेरचा उगारलेला हात. बाकी ती चंद्रासारखी शांत अन् शीतल होती. तशीच ती मनात उगवते आणि मावळते.
नंतरची आठवण तिच्या डबे शोधण्याची. सारे डबे ती हुडकायची. त्यात उरल्यासुरल्या तांदळाचा भात मांडायची. मग काळजी करायची. कधी कढी तर कधी नुसतंच ताक. जनार्दन पांडुरंगांनी पैसे आणलेच तर मग ती मनापासून सारा स्वयंपाक करायची. तिच्या हाताला चव होती. चवदार स्वयंपाक व्हावा एवढे जिन्नसच नसायचे. ती फार मानी होती. ती कुणाकडे अगदी सख्ख्या नातेवाईकांकडेही बसा-जेवायला गेल्याची आठवण मनात नाही. आल्या गेल्या पै-पाहुण्यांसाठी राबायची. राबतानाचा तिचा आविर्भाव सहज खेळ खेळल्यासारखा असायचा. एखादेवेळी तिच्या चेहऱ्यावर नाखुशी, यायची पण त्यावर नाईलाज पाहिल्याचं मला आठवत नाही.
माझे काका अन् काकू गावापासून लांब सहाएक मैलावरच्या खेडयात राहायचे. दिवसभर शेतीत राबायचे अन् सकाळ-संध्याकाळ घरातच मांडलेले छोटसं किराण्याचं दुकानं चालवायचे. त्या दोघांचा त्या काळात घराला आधार होता. नलिनी म्हणायची. 'आपण आपली कामे करतो ती दोघं त्यांची काम करून आपलीही करतात, त्यासाठी राबतात.'
काकू घरी आली की नलिनी तिचं प्रेमानं करायची. काकूला मूलबाळं नव्हतं. त्या दोघींचा मिळून मीच मुलगा. मग काकूही माझ्यावर माया करायची. नलिनी म्हणायची, 'तो तुमचाच मुलगा आहे.' मीही कधी हट्टानं तर कधी लोभानं त्यांच्या खेडयावर जायचा. दिवसचे दिवस राहायचा. खूप विश्वासाची नाती घरानं जपली होती. घराभोवतीचा शेजार अठरापगड जातीचा होता. समोर एक बोलभांड आजी राहत. त्या प्रेमळ होत्या, पण त्यांचा जिव्हाळा साऱ्या मोहल्ल्यात एकटया नलिनीच्याच वाटयाला यायचा. दुसऱ्या घरातल्या सुनाही 'वहिनी वहिनी' करत तिच्या मागे असायच्या. आणखी एका घरची बापडी आपली दु:ख सांगायला तिच्याजवळ यायची. घरामागे एक आक्का राहायची. ती मुलीसारखी तिच्या पदराला धरून असायची. मी फक्त नलिनीलाच कुणाजवळ भडभडून बोलताना कधी पाहिलं नाही, तिचा आनंद तिच्यापुरता आणि दु:खही तिची तिच्याच परिघातली.
तिच्या जिभेला फोड यायचे. इतके की जिभेची सालं निघायची. नुसत्या ताकानं व्हायचं नाही. खूप उपाय व्हायचे, पण सालं निघणं थांबायचं नाही. मग ती खाणंच थांबवायची. कुणी म्हणालं, 'तुम्ही नुसती जिलेबीच खा' पण जिलेबी आणायची तर... मग ती तशीच राहायची. सालं निघणं थांबलं म्हणायची. जनार्दन पांडुरंगही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यासारखे गप्प व्हायचे.
त्याही काळात तिच्या चेहऱ्यावरचं प्रसन्नपणं कधी मावळलं नाही. ती तसंच हसायची अन् सहजपणे बोलायची. एवढी वर्षे झाली ती जाऊन. पण आजही साऱ्यांच्या स्मरणात तिचं हसणंच राहिलं आहे. बोलणं सुरू व्हायचं ते हंसत. ते सुरू राहून संपायचंही तसंच. हसणारी माणसं कसलं तरी वरदान घेऊन येतात. नलिनीनं तसा आशीर्वाद सोबत आणला होता.
ती गेली तेव्हा घराचं नुसतं हसणंच हरवलं नाही, त्याचं घरपणच नाहीसं झालं. नंतर ते घर कुणाला आपलं वाटलं नाही. जरा काळानं आम्ही ते सोडलंच. गावाबाहेर एक जमिनीचा तुकडा होता. त्यावर छोटीशी बाग. त्या बागेत राहायला गेलो. एक दु:ख सोबत होतं. त्या बागेत राहायची इच्छा स्वतःसोबत घेऊन ती गेली होती. आम्ही राहायला गेलो तेव्हा तिची इच्छाच तेवढी आमच्यासोबत आली होती.
आज घरात तिचं काही नाही. आहे तो एक फोटो. त्यात तिचं देखणेपण आहे. चेहऱ्यावरचं निरागसपण आहे आणि हो, तिचं ते साधं सात्विक अन् प्रसन्न हंसणंही तसंच आहे....

No comments:

Post a Comment