Pages

Wednesday, November 2, 2011

आर्ट ऑफ पोलिटिकिंग..

गंगेचे पाणी विकून झाले, मंदिराच्या विटा मिरवून झाल्या, मंदिर उभारले नसले तर मशिद पाडून झाली, रामदेवबाबाच्या योगाचा फालुदा करून झाला आणि अण्णा हजार्‍यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलनही वापरून झाले. त्यानंतर संघ-भाजपाच्या हिकमती पुढार्‍यांनी श्री श्री हे डबल बॅरलवाले बिरुद लावणार्‍या रविशंकरांना आपल्या राजकारणाला जुंपले असल्याचा आरोप दिग्विजय सिंगांनी केला आहे. कॉंग्रेस पक्षाचा किल्ला लढविणारे ते एकटे एक शिलेदार आहेत. कोणत्याही लढाऊ माणसाची आरंभीची कवायत जेवढी आक्रमक वाटावी तेवढी त्यांचीही वक्तव्ये पूर्वी अनेकांनी टाकाऊ ठरविली. मात्र अण्णांच्या तथाकथित कोअर ग्रूपमधील एकेक सभासद त्याच्या गैरव्यवहारापायी व राजकीय खुळेपणापायी गारद होताना देशाने पाहिला तसतशी दिग्विजय सिंगांची वक्तव्ये प्रतिष्ठित होताना दिसली. बुवा, बाबा, बापू, अण्णा, भगवान किंवा श्री श्री अशी बिरुदे लावणार्‍या पांढर्‍या व भगव्या वांतल्या माणसांविषयीची पूज्यबुद्धी समाजात आहे. त्याचमुळे एखाद्या पुढार्‍याजवळ जमा होणार्‍या संपत्तीची चविष्ट चर्चा करणारी माणसेही या बुवाबाबांच्या मिळकतीविषयी दबल्या आवाजातच बोलताना दिसतात. लोकांच्या या संकोचाचा फायदा घेत ही बाबा माणसे जेव्हा राजकारणाच्या छुप्या युद्धात उतरतात तेव्हा मात्र त्यांची संभावना राजकीय परिभाषेतच करावी लागते. संत मोजायच्या मोजपट्टीने पुढारी मोजू नये तसे पुढार्‍यांच्या फूटपट्टय़ांनी हे बुवाही मोजू नयेत हे खरे असले तरी एकादा बाबा वा श्री श्री त्याच्या भगव्या वा शुभ्र श्वेत वाआड राजकारणाची शे परजत निघाला असेल तर त्याचे मोजमापही राजकारणाच्या फूटपट्टीनेच करावे लागते.
दिग्विजय सिंगांनी नेमके हे केले आहे. बाबा रामदेवाचे बाईच्या वातले पलायन योग्याचे नव्हते, राजकारण योगशुद्ध करण्याचा आव आणणार्‍या खुज्या माणसाचे ते भित्रेपण होते. सहकार्‍यांचे खोटारडेपण उघड होताना मौन धारण करण्यामागेही तापस नसते, गळाठलेले राजकारणच असते. आपला राजकीय वापर होऊ शकतो हेही ज्याला कळत नाही त्याच्या ज्ञानाधिकाराविषयी तरी काय म्हणायचे असते? आपला शब्द समाजाची दुखणी बरी करतो असा फसवा आत्मविश्वास मिरविणारी ही माणसे मग शेतकर्‍यांच्या आत्महत्या प्रवचनांनी थांबविण्याची आश्वासने देतात आणि भ्रष्टाचाराचा महाराक्षस आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगने आवळला जाईल अशा भ्रमात वावरतात.. त्यांच्या भ्रमाचा वापर करायला सज्ज असलेले राजकारण मग त्यांच्या मागे त्यांच्या कळत वा नकळत प्रायोजक म्हणून उभे होते. दिग्विजय सिंगांनी श्री श्रींच्या मागे दडलेल्या या प्रायोजकांकडेच सार्‍यांचे लक्ष वेधले आहे. संत म्हणविणारी माणसे फक्त अध्यात्मकारण वा ईश्वरकारणच करतात अशी ज्यांची समजूत असते त्यांना अशावेळी बसणारा धक्का सकारण तर त्यांच्या मागे दडलेल्या प्रायोजकांची ज्यांना माहिती असते त्यांचा असा धक्का कांगावखोरीचा असतो. आपले अनेक पुढारी भ्रष्टाचारासाठी बदनाम होऊन कारावास भोगत असल्याची जाण असलेले पक्ष भ्रष्टाचाराविरुद्ध स्वतर्‍ बोलण्याऐवजी श्री श्रींसारख्या मुखवटय़ांना बोलायला राजी करतात आणि भ्रष्टाचाराचा संबंध केवळ सत्तारुढांशीच असतो असा समज करून घेतलेल्यांचा रोष ते सत्ताधार्‍यांकडे वळवितात. अण्णांच्या आंदोलनाच्या सांगतापर्वात देशाने हे पाहिलेही. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा असे आरंभी सांगणारे अण्णा पुढे कॉंग्रेसविरुद्ध लढा म्हणू लागले.
दिग्विजय सिंगांचा रोख नेमका या गोष्टींवर आहे. अण्णा, बाबा, बापू किंवा श्री श्री यांच्या आरोपबाजीला उत्तर द्यायला आजवर कोणी धजावत नव्हते. सारे राजकारणच त्याच्या तशा संकोचामुळे आपल्याला वचकते असा एक जास्तीचा भ्रम स्वतर्‍कडे देवत्व घेणार्‍या या माणसांतच त्यामुळे निर्माण झालेला दिसला. परिणामी त्यांच्यातले काही थेट राजकारणावर बोलू लागले. 1980 च्या दशकात स्वतर्‍ला साधू म्हणविणार्‍या अनेक आखाडेबाजांना राजकारणाची अशी भाषा बोलतानाच नव्हे तर बरळताना देशाने पाहिले आहे. त्याच सुमारास नागपुरात एका व्याख्यानासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रस्तुत लेखकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, -या साधूसंतांना आणि बैराग्यांना राजकारणात आणणे वा सोबत घेणे ठीक नाही. त्यांना राजकारण कळत नाही आणि समाजकारणाचाही फारसा गंध नाही. त्यांना डोक्यावर घेता येते मात्र खाली उतरविता येत नाही.- आपण आपले म्हणणे पक्षाला सांगत नाही काय असा प्रश्न त्यावेळी त्यांना विचारला असता, -सध्या पक्षात माझे म्हणणे कुणी ऐकत नाही - असे उत्तर त्यांनी दिले होते. अडवाणींच्या रथयात्रेचा काळ असल्याने व देशात त्यामुळे एक उन्मादी वातावरण निर्माण झाले असल्याने वाजपेयींचा तेव्हाचा नाईलाज समजण्याजोगाही होता. ते तेव्हा लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते होते आणि सरकारने पद्मविभूषण या राष्ट्रीय किताबाने त्यांचा तेव्हा सन्मानही केला होता.. अटलबिहारींनी तेव्हा जे हंसून म्हटले तेच दिग्विजय सिंग आता ठासून सांगत आहेत.
श्री श्रींसारख्या पूज्यपादांविषयी असे बोलणे त्यांच्या भाबडय़ा भक्तांना न रुचणारे आहे. मात्र राजकारणी माणसांनी केलेल्या करचुकवेगिरीची वा अवैध मार्गाने मिळविलेल्या संपत्तीची जेवढी चर्चा होते तेवढी ती या बाबांविषयी होताना दिसत नाही. कोणत्याही नागरिकाएवढाच राजकारणात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भाग घेण्याचा त्यांना असलेला अधिकार कोणी नाकारण्याचे कारण नाही. मात्र ज्या आरोपांची उत्तरे ती राजकारणी माणसांकडे मागतात ते आरोप त्यांच्यावर झाले तर त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष करण्याचे, तसा आरोप करणार्‍याचे ते स्वातंत्र्य आहे असे मानभावीपणे म्हणण्याचे कारण नाही. दिग्विजय सिंगांना तसा आरोप करण्याचे स्वातंत्र्य आहे असे मानभावीपणे म्हणून हे उत्तर देता येणारे नाही. राजकारण जसा अधिकार देते तसे ते प्रत्येकाची जबाबदारीही निश्चित करते. रामदेवबाबांची बाराशे कोटींची, एका बापूची दोन हजार कोटींची, दक्षिणेतील एका महंताची दीड लक्ष कोटींची मालमत्ता जेवढा उघड झाली तेव्हा त्यांचीही चौकशी करा असे म्हणायला आपली माणसे त्यांच्याविषयीच्या भक्तीभावाने पुढे येताना दिसली नाहीत. पण हे महंत राजकारणाला स्वच्छतेचा उपदेश करीत उद्या त्यात उतरली तर त्यांनाही त्यांच्या संपत्तीविषयीची व मागेपुढे उघड वा छुपेपणे उभे असणार्‍यांची शहानिशा करण्याचा हक्क राजकारणालाही असेल हे त्यांनी नीट समजून घेतले पाहिजे. त्याचवेळी आपले खरे पाठिराखे व छुपे प्रायोजक त्यांनीही लक्षात घेतलेच पाहिजेत.

No comments:

Post a Comment