Pages

Saturday, March 27, 2010

हळहळ !

राहूल महाजन या प्रमोद महाजनांच्या दिवटया चिरंजीवाचे प्रसिध्दीमाध्यमांनी चालविलेले कौतुक आणि लाड आपल्या सांस्कृतिक अभिरुचीने गाठलेला खालचा स्तर दाखविणारे आहेत. प्रमोद महाजन या तडफदार व कर्तृत्त्वशाली मराठी नेत्याच्या घरात जन्माला येणे एवढा एक गुणविशेष सोडला तर या राहूलजवळ दाखविण्याजोगे वा नाव घेण्याजोगे काही नाही आणि जे आहे ते सांगण्याजोगेही नाही. प्रमोद महाजन हयात असतानाच त्याच्या कर्तृत्त्वाच्या काळया निशाण्या सर्वत्र लागल्या होत्या. प्रमोद महाजनांचा खून झाल्यानंतर त्यांच्या अस्थी विसर्जित करायला जातानाही त्याच्या व्यसनाधीनतेला आवर नव्हता. महाजनांचा सचिव विवेक मोईत्रा याच्यासोबत महाजनांच्या दिल्लीतील बंगल्यावर त्याने जे थेर केले त्यांची माहिती महाराष्ट्राएवढीच साऱ्या देशाला तोंडपाठ आहे. हवे ते ड्रग्ज मिळाले नाहीत म्हणून घातलेला धिंगाणा, ते मिळाल्यानंतर थेट मरणपंथाला लागेपर्यंत त्यांचा त्याने घेतलेला भोग आणि त्या धुंद अवस्थेत मोईत्राला आलेला मृत्यू हे सारे जेवढे घृणास्पद तेवढेच राहूलचे दवाखान्यातून बाहेर पडतानाचे व्हिल चेअरवरचे दृश्य भेसूर होते. त्यानंतर त्याने केलेले लग्न, पुढे त्याने बायकोला केलेली अमानुष मारहाण आणि अखेर तिने त्याला दिलेला घटस्फोट याही गोष्टी जनतेच्या स्मरणात ताज्या आहेत. याच काळात त्याला अटक, तुरुंगवास आणि जमानत असे सारे झाल्याचे लोकांनी पाहिले. आज त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आणि अनेक न्यायालयांत त्यांची सुनावणी सुरू आहे. त्याच्या अशा कीर्तीचा परिणाम त्याच्या बहिणीला, पूनम राव हिला निवडणुकीत अनुभवावा लागला आणि त्याच्या गैरकृत्यांनी दुखावलेल्या त्याच्या कुटूंबियांच्या व्यथाही महाराष्ट्राने पाहिल्या. याच काळात एका वाह्यात वाहिनीने त्याला 'ब्रेक' देण्याच्या नावाखाली आणखी एका खालच्या पातळीवर नेले. या वाहिनीवर हा प्रमोद महाजनांचा हा लेक उघडया बायकांच्या पाठी चोळताना आणि त्यांचे पाय दाबताना लोकांना दिसला. गोपीनाथ मुंडे या त्याच्या नातेवाईक नेत्याने त्यासाठी त्याची जाहीर निर्भत्सना केल्यानंतरही त्याच्या त्या सेवेत खंड पडला नाही. पुढे त्याच वाहिनीने त्याचे स्वयंवर रचले. राखी सावंत या निर्लज्ज नटीने तिच्या स्वयंवराचे जे सोहळे समाजाला दाखविले ते दाखवून याने आपली तीही हौस भागवून घेतली. या काळात त्याच्याविरुध्द खटले चालविणारी न्यायालये, ते दाखल करणाऱ्या पोलिसांच्या यंत्रणा आणि समाजाच्या सांस्कृतिक आरोग्याची काळजी वाहणाऱ्या नीतीमान संघटना मख्ख राहिल्या. प्रसिध्दीमाध्यमांनी त्याचे अपराध विसरून आणि त्याच्या प्रत्येकच हालचालीची बातमी बनवून आंबटशौकिनांचे चोचले पुरविले व आपला टीआरपी वाढवून घेतला.
हा सारा आपल्या समाजाच्या सांस्कृतिक स्वास्थ्याविषयीची चिंता वाटायला लावणारा प्रकार आहे. यातील स्त्रियांची विटंबना आणि मराठी तरुणाईची मानहानी जेवढी बेशरम तेवढीच संतापजनक आहे. राहूलसारखी बेताल माणसेच आपले आदर्श ठरणार किंवा ठरविली जाणार असतील तर तो सामाजिक अधोगतीचा प्रकार आहे हे स्पष्टपणे नोंदविले पाहिजे. एका आदरणीय कुटूंबात जन्म घेतला एवढयाच कारणाखातर अशा माणसांचे अपराध क्षम्य ठरत नाहीत आणि त्याचे वर्तन सभ्यही ठरत नाही. अशा व्यवहाराला आळा घालायला कुटूंबातली माणसे पुढे होत नाहीत, मित्र समोर येत नाहीत, त्याच्याशी संबंध असलेल्या संघटना व पक्ष त्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करतात आणि समाजही ते सारे नाईलाज म्हणून खपवून घेतो. नेमक्या अशाच वेळी सरकार नावाच्या यंत्रणेने सामाजिक नितीव्यवस्थेच्या रक्षणासाठी या प्रकाराला आळा घालायला समोर येऊन हे निर्लज्ज चाळे थांबविले पाहिजे. घर फिरले की घराचे वासेही फिरतात असे म्हटले जाते. प्रमोद महाजनांचा खून प्रवीण महाजन या त्यांच्या सख्ख्या भावाने केला तेव्हा त्यांचे वय अवघे 56 वर्षांचे होते. भाजप या राष्ट्रीय पक्षाचे सरचिटणीस पद व महाराष्ट्राचे प्रभारी पद याखेरीज देशाच्या संरक्षण व दळणवळण या महत्त्वाच्या खात्यांची मंत्रीपदे त्यांनी भुषविली होती. वक्तृत्व आणि नेतृत्व या दोन्हीत त्यांनी संपादन केलेल्या प्राविण्यामुळे वाजपेयी आणि अडवाणी यांच्यानंतरचे भाजपाचे तिसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून देश त्यांच्याकडे पाहू लागला होता. पक्षाने त्यांना प्रवक्तेपद दिले तशी त्यांच्यावर अनेक गुंतागुंतीच्या राजकीय समस्या सोडविण्याची कामगिरीही वेळोवेळी सोपविली होती. बाळासाहेब ठाकऱ्यांसारख्या विलक्षण प्रवृत्तीच्या नेत्यालाही तेच सांभाळून घेत होते. पक्षाचे अर्थकारण सांभाळणे ही त्या काळात त्यांचीच जबाबदारी होती. अडवाणींच्या नाराजीमुळे त्यांच्यावर विजनवास आला असतानाच त्यांना त्यांच्या भावाच्या हातून मृत्यू आला आणि त्यांच्याविषयी मराठी समाजाएवढयाच देशाला वाटणाऱ्या आशांचाही शेवट झाला. त्यांच्यावर गोळया झाडणाऱ्या प्रवीण महाजनने आपल्या कृत्याचे कोणतेही कारण न्यायालयात सांगितले नाही. त्याविषयी लोकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका-कुशंकाही यथावकाश आपोआप विरल्या. प्रवीणने जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना 'माझा अल्बम' या नावाचे एक स्फोटक पुस्तक लिहिले. त्याच्या तीन हजारांवर प्रती हातोहात खपल्या. या पुस्तकात प्रवीणने प्रमोद महाजनांएवढेच त्यांच्या कुटुंबातील इतरांचे जे चित्र रंगविले ते फारसे चांगले नाही. हे चित्र वाजपेयी-अडवाणींपासून संघाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत साऱ्यांना आपण सांगितले होते असे प्रवीणने या पुस्तकात म्हटले आहे. आता प्रवीण या जगात नाही. त्यामुळे त्याच्या अल्बमचे खरेखोटेपणही त्याच्यासोबतच नाहिसे झाले आहे. स्वकर्तृत्वावर राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळविलेल्या एका नामांकित मराठी कुटुंबाची, कुणालाही हळहळ वाटायला लावणारी ही दुर्दैवी शोकांतिका आहे. याच दरम्यान प्रमोद महाजनांच्या मुलीने पक्षाकडे लोकसभेचे तिकीट मागितले. ते तिला मिळाले नाही. गोपीनाथ मुंडयांची नाराजी नको म्हणून पक्षाने तिला पुढे विधानसभेचे तिकीट दिले. त्या निवडणुकीत तिचा पराभव झाला. याच काळात एअर इंडियात पायलट असलेल्या राहूलच्या पत्नीने स्वत:च्या शरीरावरील नवऱ्याने केलेल्या मारहाणीच्या खुणा जगाला दाखवून त्या कुटुंबाचा समाजाला ठाऊक नसलेला चेहराही लोकांसमोर आणला. कोणत्याही सहृदय माणसाला हतबुध्द करणारी व प्रसंगी स्वत:वरचा विश्वास कमी करायला लावणारी ही कथा आहे.
एवढयावर महाजन कुटुंबाचे धिंडवडे थांबायला हवे होते. मात्र ते तसे व्हायचे नव्हते. त्याच्या साऱ्या लक्तरांसह ते दूरचित्रवाहिनीच्या पडद्यावरून देशाला दाखविण्याचे काम राहूल महाजन या प्रमोद महाजनांच्या चिरंजीवाने गेले काही महिने सातत्याने केले आहे. ते करताना आपण एखादा पराक्रम करीत असल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर असल्याचे देशाने पाहिले आहे. प्रमोद महाजनांचे वडील एक सरळ मनाचे साधे शिक्षक होते. त्यांच्या कुटुंबावर परंपरेएवढाच संघाचा संस्कार होता. महाविद्यालयात शिकत असतानाच प्रमोद महाजनांनी आपले राजकीय आयुष्य परिश्रमपूर्वक घडवायला आणि त्याचवेळी आपले वेगळेपण साऱ्यांच्या मनांवर ठसवायला सुरुवात केली होती. अंबेजोगाईसारख्या लहानशा गावात एका शिक्षकाच्या पोटी जन्माला आलेल्या प्रमोद महाजनांनी अल्पकाळात घेतलेली प्रचंड झेप साऱ्यांना अवाक् करणारी व त्यांच्या सामर्थ्याविषयीचा दरारा उत्पन्न करणारी होती. हा तरुण एक दिवस देशाचा पंतप्रधान होईल अशी भाषा त्या काळात राजकारणाचे राष्ट्रीय जाणकार बोलू लागले होते. आता तो सारा इतिहास झाला आहे. प्रमोद महाजन यांचे आयुष्य प्रवीण महाजन या त्यांच्या भावाने त्यांच्यावर गोळया झाडून संपविले. त्यांच्या मुलीला त्यांचा मोठा वारसा सांभाळता आला नाही. राहूल महाजन या त्यांच्या मुलाने त्याही पलिकडे जाऊन प्रमोद महाजनांनी मिळविलेल्या मान्यतेला व प्रतिष्ठेला प्रसिध्दीच्या हव्यासापायी पार मातीमोल केले. एवढया मोठया शोकांतिकेने खरे तर कोणत्याही सहृदय माणसाला अंतर्मुख करावे आणि परंपरा व संस्कार यांच्या सामर्थ्याएवढेच त्यांचे दुबळेपण याविषयीचा विचार करायला प्रवृत्त करावे. मात्र प्रसिध्दी तंत्रात शिरलेल्या धंदेवाईकपणाने या विषण्ण करणाऱ्या वाटचालीची नको तशी जाहिरात मांडली. दु:ख याचे की ही जाहिरात करायला खुद्द महाजनांचे चिरंजीवच पुढे झाले. प्रमोद महाजनांच्या नावाने महाराष्ट्रात जागोजागी संस्था उभ्या होत असताना त्यांच्या कुटूंबाच्या वाटयाला असे प्राक्तन यावे याएवढे दुर्दैवी व हळहळ वाटायला लावणारे चित्रही दुसरे नाही.