Pages

Wednesday, March 31, 2010

प्रेम आणि राजकारण

'तुला कित्येक युगांपासून पाहिले नसल्याची जाणीव मला सारखी छळत असते. येत्या गुरुवारी माझा वाढदिवस आहे आणि तो मी मोरोक्कोत साजरा करणार आहे. तू येऊ शकणार नाहीसच. पण लवकरच, जमले तर येत्या आठवडयातच मी तुला भेटेन...तुला लक्ष लक्ष (खरेतर दशलक्ष दशलक्ष) चुंबने' एका जगप्रसिध्द आणि सत्ताधारी असणाऱ्या व्यक्तीला लिहिलेले असे पत्र कुणाच्या हाती पडले वा कुणाला वाचता आले तर त्यामुळे जागतिक पातळीवर हलकल्लोळ होईल की नाही? त्यातून ती व्यक्ती प्रेम आणि प्रणयाच्या रंगात बुडून जाऊन नुसत्याच निथळणाऱ्या फ्रान्ससारख्या देशाची अध्यक्ष असेल तर? झालेच तर ते पत्र स्वतः अध्यक्ष आपल्यासोबत थेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत नेत असतील आणि त्याचे चित्रीकरण तेथे सज्ज असणारी यंत्रणा करीत असेल तर? दि. 12 सप्टेंबर या दिवशी फ्रान्सच्या मंत्रीमंडळाची बैठक आटोपून अध्यक्ष निकोलास सर्कोझी बाहेर पडले आणि नेमक्या त्यावेळी त्यांच्या हातात असलेल्या या पत्राचे चित्रीकरण त्यांच्यासकट केले गेले. हे पत्र अध्यक्षांनी आपल्या हाती धरले असल्यामुळे त्याचा बराचसा भाग या चित्रीकरणात चित्रीत झाला नाही. ते पत्र कोणी कोणाला लिहिले हेही त्यामुळे स्पष्ट होऊ शकले नाही. तरीही 'द डेली टेलिग्राफ' या सभ्य वृत्तपत्राने त्या पत्राची बातमी 'हे पत्र कुणाचे असावे?' असा प्रश्न विचारून प्रकाशित केली. 'चोक' या चावट नियतकालिकाने हे पत्र अध्यक्षांच्याच 'कुणा एका मैत्रीणीने' त्यांना लिहिले असल्याचे जाहीर करून साऱ्या फ्रान्समध्ये गहजब उडवून दिला. फ्रान्सचे राज्यकर्ते कर्तबगारीएवढेच त्यांच्या रंगेलपणाविषयीही सुप्रसिध्द असल्यामुळे 'चोक'च्या बातमीवर त्या देशाचा विश्वास बसायला वेळही लागला नाही. 'द पॅरिशियन' तिसऱ्या दैनिकाने ते पत्र सर्कोझींना लिहिलेले नसून त्यांच्या पत्नी सेसिला सर्कोझी यांना लिहिले गेले असल्याचे व ते लिहिणारी व्यक्ती पुरुष नसून स्त्री असल्याचे सांगून या गोंधळात आणखीच रंगतदार भर घातली. इझाबेला बाल्कनी या पॅरिसच्या सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या स्त्रीने हे पत्र सेसिलाला लिहिले असून त्या दोघींची एकमेकींशी घट्ट मैत्री आहे असे या 'पॅरिशियनचे' म्हणणे आहे. मात्र त्याचवेळी त्या पत्राची भाषा, व्याकरण व स्पेलिंग पाहता ते पुरुषाला लिहिले गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी मेखही त्याने मारून ठेवली आहे. तिकडे ती इझाबेला नावाची स्त्री 'तिच्या' पत्राने राजकारणात उडविलेल्या गोंधळावर आणि त्याने तिला मिळवून दिलेल्या प्रसिध्दीवर विलक्षण खूष आहे. 'हंसता हंसता मरायचेच तेवढे बाकी राहिले' अशी तिची या साऱ्या प्रकारावरची प्रतिक्रिया आहे.
एवढा सारा काळ अध्यक्ष सर्कोझी मात्र याबाबत गप्प राहिले आहेत. तसले 'स्फोटक' पत्र त्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत कां न्यावे, नेलेही तरी त्याचे चित्रीकरण होईल असे त्यांनी ते कां धरावे असे अनेक प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारले. पण त्या मुत्सद्दी माणसाने त्याविषयीचे आपले मौन काही सोडले नाही. आणि सोडतील तरी कसे? सर्कोझी हे काही आपल्या भारतीय राज्यकर्त्यांसारखे कोरडे दिसणारे व बहुदा कोरडेच असणारे राज्यकर्ते नाहीत. दोनच वर्षांपूर्वी आपल्या पत्नीपासून दूर जाण्याचा व 'ल फिगारो' या वृत्तपत्रात लिहिणाऱ्या ऍने फुल्डा या फटाकडया पत्रकारिणीसोबत रहायला गेल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. सेसिला ही त्यांची पत्नीही याबाबतीत त्यांना तोडीस तोड आहे. निकोलास यांनी फुल्डाशी मैत्री जोडण्याच्या काळात सेसिलानेही रिचर्ड अटियास या धनवंत व्यावसायिकासोबत उघडपणे संबंध ठेवण्याचा व त्याच्यासोबत एकत्र राहण्याचा पराक्रम केला आहे. फ्रान्समध्ये अध्यक्षीय निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि त्या दोघांनाही आपल्या राष्ट्रीय व कौटुंबिक कर्तव्याची जाणीव झाली. मग आपापल्या मित्र-मैत्रीणींना बाजूला सारून त्या दोघांनी पुनः एकवार त्यांचे 'घर' वसविले. हा इतिहास अलिकडचा व ताजा आहे. त्यामुळे ते पत्र कुणासाठी याविषयीचा संशय त्या देशात अजून कायम आहे. सर्कोझी यांच्याविरुध्द अध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या समाजवादी पक्षाच्या पराभूत उमेदवार सेगोलाईन रॉयल यांचेही चरित्र याहून वेगळे नाही. त्यांनी पाच मुलांना जन्म दिला आहे आणि तरीही त्या आजवर अविवाहित राहिल्या आहेत. मात्र फ्रान्सची जनता एवढी प्रगल्भ आणि सूज्ञ की साऱ्या निवडणुकीच्या काळात तिने ही मुले कुणाची असा प्रश्न रॉयलबाईंना कधी विचारला नाही. सर्कोझीसाहेबांनाही 'तुम्ही सध्या कुणासोबत राहता' असा छद्मी प्रश्न विचारावा असे तिला वाटले नाही. तुमचे खाजगी आयुष्य तुम्ही कसे जगता याविषयी आम्हाला कर्तव्य नाही. तुमची राष्ट्रीय जबाबदारी तुम्ही कशी पार पाडता एवढेच आम्ही पाहणार आहोत असे या जाणकार जनतेचे म्हणणे आहे. फ्रान्स हा तसाही जगात लोकशाही मूल्यांची मुहूर्तमेढ रोवणारा देश आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मानवी मूल्ये त्यांच्या आधुनिक अर्थानिशी फ्रेंच राज्यक्रांतीनेच जगाला दिली आहेत. झालेच तर तो स्त्री-पुरुष संबंधांबाबतही बऱ्यापैकी मोकळी मते असणाऱ्यांचा देश आहे. त्याएवढी मानसिक व बौध्दिक प्रगती करायला भारताच्या राजकारणाला आणखी किती वर्षे लागतील? आणि आपल्या राज्यकर्त्यांना आपल्या मैत्रीसंबंधात खुलेपण आणायला आणखी किती काळ लागेल? आपल्या आत्मचरित्रात 'तसल्या' संबंधांविषयी अतिशय स्पष्टपणे लिहिण्याचे धाडस फ्रान्स आणि युरोपसह अमेरिकेतील राज्यकर्त्यांनी आजवर अनेकदा दाखविले आहे. या देशांतील जनतेनेही या धाडसाकडे पुरेशा प्रगल्भपणे व तटस्थपणे पाहण्याची मानसिकता वेळोवेळी प्रगट केली आहे.
मध्यंतरी अटलबिहारी वाजपेयी या भारताच्या माजी पंतप्रधानांनी 'आपण ब्रम्हचारी नसून अविवाहित आहोत' असे जाहीरपणे सांगून मौज उडविली होती. तशी कबुली देताना त्यांच्यात जराही अपराधगंड कुणाला आढळला नाही. वाजपेयी हे संघाच्या कर्मठ संस्कारातून आलेले अतिशय जुने कार्यकर्ते असल्यामळे त्यांच्या त्या धाडसाला तेव्हा एक चांगली चवही आली. बाकी आपले सारे नेते आणि पुढारी त्यांचे गंभीरपण अकारण जपणारे व बरेचसे थंड आणि काहीसे बथ्थडही दिसणारे आहेत. सर्कोझीसारख्या बातम्या उद्या आपल्या मुख्यमंत्र्यांविषयी किंवा पंतप्रधानांविषयी प्रकाशित झाल्या तर आपल्याकडली नीतीसुधारवादी माणसे त्याचा कसा गहजब करतील? भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या पत्नी लेडी माऊंटबॅटन या पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंवर मनोमन प्रेम करीत असत असे गेली साठ वर्षे कधी उच्चरवात तर कधी कानात सांगितले जायचे. माऊंटबॅटन यांची कन्या डोरोथी हिने आता त्या दोघांच्या मैत्रीत प्रेमाचा धागा होता असे स्वतःच सांगून टाकले आहे. आमच्या शेजारचे बंडोपंत यज्ञोपवित हे सद्गृहस्थ डोरोथीच्या त्या गौप्यस्फोटामुळे भयंकर अस्वस्थ झाले आणि 'शोभते काय हे असे या मोठया माणसांना' अशी जोरकस तक्रार घेऊनच आमच्याकडे आले. त्यांची समजूत काढत आम्ही म्हणालो, 'जाऊ द्या, बंडोपंत. लेडी माऊंटबॅटनना मैत्री वा प्रेम करावेसे वाटलेच असेल तर त्यासाठी पंडितजींएवढा उमदा आणि कर्तबगार माणूसच त्या शोधतील की नाही? ती स्वरुपसुंदर स्त्री आपल्यासारख्यांवर प्रेम थोडीच करणार आहे?' मात्र आमच्या उत्तराने बंडोपंतांचे समाधान झाले नाही. असो. प्रेम, मैत्री, सार्वजनिक जीवनातील जबाबदारी आणि व्यक्तीगत जीवनातील खाजगी व्यवहार यांच्यातील वेगळेपण ओळखायला आम्हाला अजून किती वर्षे लागतील? ज्या अनेक पराक्रमी पुरुषश्रेष्ठांच्या कथा आपण खाजगीत चघळत असतो त्या फ्रान्ससारख्या देशात वृत्तपत्रातून प्रकाशित होत असतात. तेवढे प्रगल्भपण येईपर्यंत सर्कोझीसारख्यांच्या कथा आपण नुसत्याच वाचायच्या आणि आपला चेहरा आंबट होणार नाही असा प्रयत्न करायचा.

No comments:

Post a Comment