Pages

Sunday, March 28, 2010

पाडगावकरांची खंत

मंगेश पाडगावकर हे सन्मानासाठी हपापलेले कवी नाहीत. कोणत्याही कवीला वा कलावंताला मिळणारा सर्वोच्च पुरस्कार त्याला त्याच्या रसिकांनी दिलेल्या पसंतीच्या पावतीचा असतो. पाडगावकरांकडे अशा पावत्या लाखोंच्या संख्येने जमा आहेत. साहित्य संस्था, समाज आणि सरकार यांनी त्यांच्यावर सन्मान आणि पुरस्कारांचा पाऊस पाडला आहे. साहित्य संमेलनांची चालून आलेली अध्यक्षपदे विनम्रतेने नाकारण्यापर्यंत त्यांची तीही हौस भागली आहे. तरीही आपल्याला पद्मपुरस्कार न मिळाल्याबद्दलची खंत त्यांच्या मनात असेल तर तो त्या पुरस्काराचा मोठेपणा सांगणारा आणि तो देणाऱ्यांच्या दृष्टीचा कृपणपणा उघड करणारा प्रकार आहे. 1949 मध्ये पुण्याच्या साहित्य संमेलनात त्यांनी आपली पहिली कविता सादर केली आणि संमेलनाध्यक्ष वि. द. घाटे यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांना पहिला पुरस्कार दिला. 'पहिल्या हिरव्या तृण पात्याच्या' त्या सत्कारापासून सुरू झालेले पाडगावकरांचे 'धारानृत्य' आजतागायत तसेच तालासुरात आणि लयीत चालू राहिले आहे. त्यांच्या मनात असलेला 'जिप्सी' त्यांना स्वस्थ राहू देत नाही आणि थांबूही देत नाही. काव्यनिर्मितीपासून कवितेच्या जाहीर सादरीकरणापर्यंतचे अनेक वेगवेगळे छंद त्यांच्या नावावर आहेत आणि त्यातल्या प्रत्येकच उपक्रमाला महाराष्ट्राने डोक्यावर घेतले आहे. 'गाणे हेच जीवन' मानणारे अनेक कवी महाराष्ट्राने पाहिले. पण ज्याच्या रोमरोमात गाणे भरले आहे असे पाहताक्षणी वाटावे असा पाडगावकर हा दुर्मिळ कवी आहे. 1980 मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 2008 मध्ये ते 'महाराष्ट्र भूषण' झाले. दरम्यान कवीवर्य कुसुमाग्रज या त्यांना वंदनीय वाटलेल्या कविश्रेष्ठाच्या नावे दिल्या जाणाऱ्या 'जनस्थान' पुरस्काराने ते विभूषित झाले. पुरस्कारांची मोठी रासच या काळात त्यांच्यासमोर रिती झाली. त्यांची कविता महाराष्ट्राला मुखोद्गत झाली. तिला चाली लावण्यात संगीतकारांनी आपले सारे कसब पणाला लावले आणि ती गाऊन महाराष्ट्रातील सारे मोठे गायकही धन्य झाले. पाडगावकरांनी फक्त स्वतःचीच कविता रसिकांच्या हाती दिली नाही. देशाने व जगाने ज्यांच्या प्रतिभेसमोर मान झुकवली त्याही कवींच्या कविता मराठीत आणून त्यांनी रसिकांच्या स्वाधीन केल्या. आचार्य काका कालेलकरांच्या सहवासात राहून त्यांनी हिंदी भाषा व तिच्यातील उत्कृष्ट वाङ्मय आत्मसात केले. त्यातून 1965 मध्ये त्यांच्या 'मीरा' या अनुवादित काव्यसंग्रहाचा जन्म झाला. श्रीकृष्णाच्या प्रेमाने वेडी झालेल्या मीरेची नेमकी ओळख त्या संग्रहाने महाराष्ट्राला झाली. 1997 मध्ये त्यांनी 'कबीर' मराठीत आणला तर 1999 मध्ये 'सूरदास' या जन्मांध कवी संताला त्यांनी मराठीची वाट दाखविली. अगदी अलिकडे पाडगावकरांनी 'बायबल'चा मराठी अनुवाद करून येशू ख्रिस्तालाही मराठीच्या अंगणात आणून उभे केले. एवढे सारे प्रातिभ पराक्रम नावावर असलेल्या या कवीश्रेष्ठाला पद्मपुरस्कार देताना बाजूला सारणाऱ्यांच्या अधू दृष्टीची खरेतर कीवच केली पाहिजे. मराठी माणसे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची वाच्यता करण्यासाठी फारशी प्रसिध्द नाहीत. त्यामुळे पद्मपुरस्कारांबाबत मराठी माणसांवर आजवर झालेल्या अन्यायाविषयीची फारशी चर्चाही त्यांनी कधी केली नाही. स्वतः पाडगावकरांनीच आता ती केली असेल तर ती त्यांची व्यक्तिगत खंत मानण्याचे कारण नाही. आपल्या त्या उद्गारांनी त्यांनी मराठी माणसांच्या मनात खदखदणारे दुःखच उघड केले आहे.
आयर्व्हिंग वॅलेस या कादंबरीकाराने आपल्या 'प्राईझ' या कादंबरीत जागतिक कीर्तीचे नोबेल पुरस्कार कसे दिले जातात याचे अतिशय रोचक व रसभरीत वर्णन केले आहे. विसाव्या शतकाच्या आरंभापासून दिला जाणारा हा जगातील सर्वश्रेष्ठ व सर्वाधिक मोलाचा पुरस्कार देतानाही राजकीय व सामाजिक संदर्भ कसे लक्षात घेतले जातात याची या कादंबरीत अतिशय उद्बोधक चर्चा आली आहे. सर्वाधिक नोबेल जर्मनांनाच कां दिले गेले, साम्यवादी विचारांचा अंगिकार केलेल्या रशियन लेखकांना या पुरस्कारांपासून दूर कसे ठेवले गेले आणि तिसऱ्या जगातील मान्यताप्राप्तांना ते थोर असतानाही या पुरस्काराच्या वितरकांनी साधे विचारातही कसे घेतले नाही याचा ज्ञानवर्धक वृत्तांतच या कादंबरीत आला आहे. या सहस्रकाच्या आरंभी 'युनायटेड स्टेटस् एक्सप्रेस' या जग्प्रसिध्द नियतकालिकाने जगभरातील दहा हजार विद्वज्जनांना 'विसाव्या शतकाने जगाला दिलेली सर्वश्रेष्ठ व्यक्ती कोण?' असा प्रश्न विचारला होता. या विद्वज्जनांत जगभरचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, सेनापती, अणुशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, विचारवंत, कुलगुरू अशा मान्यताप्राप्तांचा समावेश होता. या विद्वत्समुहातील 8 हजार 886 जणांनी एकमुखाने म. गांधी या थोर पुरुषाची विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून निवड केली. मात्र नोबेल पारितोषिक देणाऱ्या समितीने गांधीजींचे नाव पाचवेळा त्या पुरस्कारासाठी समोर येऊनही बाजूला सारले. भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रज सरकारची नामर्जी ओढविण्याच्या भीतीनेच त्या समितीला तसा बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला होता. नोबेल पारितोषिकांची कथा अशी असेल तर आपल्या पद्मपुरस्कारांची कहाणी कशी असू शकेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. या पुरस्कारांसाठी नावे सुचविणाऱ्यांमध्ये एस.डी.ओ.च्या पातळीवरील अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंतच्या अनेकांचा समावेश असतो. ही नावे सुचविताना पोलिसखात्याचीही ना-हरकत प्रमाणपत्रे घेतली जातात. साऱ्या देशातून येणाऱ्या अक्षरशः हजारो नामांकनांमधून पुरस्कारप्राप्तांची अखेर निवड केली जाते. ही निवड नेहमीच न्याय्य असते असे नाही. आपली अशी निवड नाकारणारी माणसेही बरीच आहेत. भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष पं. हृदयनाथ कुंझरू यांनी भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पद्मपुरस्कार नाकारला होता. 1993 मध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि ज्योती बसू या दोहोंनाही पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्याचे सरकारने निश्चित केले होते. त्यातील ज्योती बसूंनी तो पुरस्कार विनम्रपणे नाकारला होता. पुरस्कार नाकारणाऱ्यांची ही आदरणीय यादी आहे. ते मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या महाभागांची सूची याहून फार मोठी आहे. ज्यांच्या नावांची या पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली आणि जी नावे वर्षानुवर्षे फलिताची वाट पहात तशीच पडून आहेत ती पुढे मागे जाहीर झालीच तर तो देशाच्या मनोरंजनाएवढाच ज्ञानवर्धनाचाही भाग ठरणार आहे. 'आम्ही अमुकतमुकांचे नाव पद्मपुरस्कारासाठी सुचविले आहे' असे जाहीर सभेत सांगून टाळया मिळविणाऱ्या मंत्र्यांची व पुढाऱ्यांची नावेही वृत्तपत्रांना ठाऊक आहेत. मंत्र्यांच्या तशा जाहीर आश्वासनांवर विसंबून राहून आयुष्य कंठणाऱ्या आशाळभूतांचीही यादी फार मोठी आहे.
गांधीजींना नोबेल पुरस्कार मिळाला नाही ही बाब गांधीजींना कमीपणा आणणारी नाही. असलीच तर ती त्या पुरस्काराची महती कमी करणारी आहे. यावर्षी दिले गेलेले पद्मपुरस्कार अनेक कारणांनी आत्ताच वादग्रस्त झाले आहेत. कोणा चटवाल नावाच्या इसमाला दिलेला हा पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी एका मराठी पुढाऱ्यानेच केंद्र सरकारकडे केली आहे. आपल्या अभिनयसामर्थ्याने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रेखा नावाच्या नटीला पद्मश्री देणारे या पुरस्काराचे वाटपकर्ते गेल्या पाच-सहा वर्षात पुढे आलेल्या नटांना पद्मभूषण देऊन गौरवताना याच वर्षी आपण पाहिले आहेत. ज्यांच्या नावावर रुग्णांना गंडविणारे रॅकेट्स चालविण्याचा आरोप आहे अशा डॉक्टरांनाही हे पुरस्कार याआधी दिले गेले आहेत. अशा घटनांमुळे या पुरस्कारांचे मोल कमी होत नसले तरी त्यांच्या वाटपकर्त्यांच्या निवडबुध्दीविषयीची शंका मात्र निश्चित निर्माण होत असते. आपल्याला पद्मपुरस्कार न मिळाल्याची खंत पाडगावकरांनी व्यक्त केल्यामुळे हे पुरस्कारपुराण एवढया विस्ताराने येथे लिहावे लागले. पाडगावकर हे कोणत्याही पुरस्काराहून मोठे असलेले मराठी कवी आहेत. त्यांच्या अंगावर पुरस्कार चढल्याने त्यांची ऐट वा दिमाख वाढत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील मुळातली ऐट आणि दिमाख एवढा देखणा की असे पुरस्कार त्यावर चढले तर त्या पुरस्कारांनाच जास्तीची झळाळी यावी. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, 'माणसाने एकटे असावे. स्वतंत्र असावे. दुसऱ्याचा चष्मा आपल्या नाकावर चढवू नये. असे चष्मे आणि झेंडे घोकलेल्या घोषणा ओकायला लावतात. प्रसंगी त्या खांद्यावर बंदुकाही घ्यायला लावतात.' घोकलेल्या घोषणा द्यायला फक्त चष्मे वा झेंडेच कारणीभूत होत नाहीत. अनेक पुरस्कारही तेच करीत असतात.