Pages

Sunday, March 28, 2010

मुंबईकरांचा विजय असो !

हुकूमशहांचा सारा जोर त्यांच्या दंभात असतो. त्यांची मग्रुरी, अरेरावी आणि आवेश हे सारे त्या दंभातून येत असते. जोवर तो टिकतो तोवर त्यांची दमबाजीही टिकते. हा दंभ एकदा निकालात निघाला की हुकूमशाहीचे सारे इमले ढासळतात आणि खुद्द हुकूमशहाही जमीनदोस्त होतो. त्यासाठी त्याच्या दंभाचा पराभव त्याच्याहून प्रबळ असलेल्या दुसऱ्या तशाच हुकूमशहाकडून होऊन तो चालत नाही. तो ज्यांच्यावर आपली हुकूमत गाजवितो त्या जनतेकडूनच तो व्हावा लागतो... बाळासाहेब ठाकरे नामक मातोश्रीस्थित हुकूमशहाचा असा पराभव झाला आहे आणि तो सरकार किंवा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला नसून मुंबईतील सामान्य मराठी माणसांनी केला आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांसाठी साध्या माणसांनी ठामपणे उभे राहण्याच्या केलेल्या निर्धाराचा तो विजय आहे.
आपण सांगू ती पूर्व दिशा, म्हणू तो कायदा आणि सरकार कोणतेही असले तरी अंमल मात्र आमचा, या दंभाने एकटया बाळासाहेबांनाच नव्हे तर सगळयाच ठाकऱ्यांना पछाडले होते. तो दंभ फुलविण्याचे काम त्यांच्यावर छत्र चामरे ढाळणाऱ्या मनोहर जोशींपासून दिवाकर रावत्यांपर्यंतच्या त्यांच्या भारदार चोपदारांनी जसे केले तसेच त्यांनी लाचार करून ठेवलेल्या अनेक दुय्यम व तिसऱ्या दर्जाच्या पुढाऱ्यांनीही केले. त्यात जास्तीची भर घालण्याचे काम त्यांचे जुने स्नेही असलेल्या शरद पवारांनी आणि त्यांच्या मुक्या सैनिकांनीही केलेले दिसले. सगळे ठाकरे मध्यवर्ती खर्ुच्यांवर बसले आहेत, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सेनेचे केंद्रातील व राज्यातील मंत्री त्यांच्या मागे नम्र चेहरे करून उभे आहेत आणि लोकसभेच्या सभापतीपदावर असलेला राष्ट्रीय सन्मानाने विभूषित असलेला पक्षाचा माणूसही थेट हनुमानासारखा हात जोडून त्यांच्यासमोर समोर उभा आहे हे श्रीरामपंचायतनाच्या चित्रात दिसणारे दृश्य शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकारणात उभे केले तेव्हाच लोकशाहीत हुकूमशाही कशी उभी होते ते मराठी जाणकारांच्या लक्षात आले होते. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचे केलेले 'संविधान बाह्य सत्ताकेंद्र' हे वर्णन त्यासाठी पुरेसे वा चपखल नाही. एका हुकूमशाहीने झुकविलेली लोकशाही हे त्याचे खरे वर्णन होते.
ही हुकूमशाही पराभूत करण्याचे काम आता मुंबईकरांनी केले आहे आणि त्यासाठी ते सारे अभिनंदनाचे धनी आहेत. येथे 'माय नेम इज खान' हा चित्रपट महत्त्वाचा नाही, शाहरुख नावाच्या अभिनेत्याचाही हा विजय नव्हे. तो मुंबईतील साध्या माणसांचा विजय आहे. त्याहूनही तो ठाकऱ्यांचा पराभव अधिक आहे. शाहरूख हा अभिनेता केवळ 'खान' आहे याचाच ठाकऱ्यांना राग आहे. तो, आमीर किंवा सलमान या तीन नटांनी मिळविलेली लोकप्रियता त्यांच्या 'खान' असण्यावरूनच ठाकऱ्यांना सलणारी आहे. 'आमच्या मराठी पोरींनाही आता मुसलमान पोरेच अधिक आवडू लागली आहेत' हे त्यांचे ओंगळ आणि मराठी तरुण-तरुणींचा अपमान करणारे उद्गार त्यांच्या मनातील याच धर्मद्वेषातून आले आहेत. त्यांना कोणत्या तरी बखेडयात अडकवायचे आणि उध्दव ठाकऱ्यांचे रखडलेले राजकारण पुढे धकवायचे हा त्यांचा खेळही याच द्वेषभावनेतून आला आहे. त्यासाठी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांचा आंतरराष्ट्रीय आधारही त्यांना घ्यावासा वाटला आहे. कारण जग आणि देश यात आपल्या होणाऱ्या मानहानीची ठाकऱ्यांना चिंता नाही. त्यांचे कार्यक्षेत्र, तालीम, मर्दुमकी आणि आवाका फक्त मुंबईपुरताच मर्यादित राहिला आहे. ते शहर ताब्यात ठेवायचे आणि त्याच्या बळावर महाराष्ट्राच्या आणि जमलेच तर देशाच्या राजकारणावर हुकूमत चालविण्याचा प्रयत्न करायचा ही त्यांच्या राजकारणाची कक्षा व दिशा आहे. त्यासाठी त्यांनी प्रथम भाजपाचा हात धरला आणि आता राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी त्यांच्या क्रिकेट बोर्डासह त्यांना हात दिला आहे.
जोवर मराठी माणसांसाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी सेनेचा लढा चालतो तोवरच त्याचे स्वरूप विधायक असते. मात्र जेव्हा हीच सेना 'हे करू नका, त्यावर बहिष्कार घाला किंवा आम्ही सांगू त्याला तुम्हीही वाईट म्हणा' असे फतवे काढू लागते तेव्हा तिचे स्वरूप नुसते विघातकच नाही तर विक्राळ होत असते. असे विक्राळपण काही काळ कौतुक म्हणूनही गौरविले वा दुर्लक्षिले जाणे शक्य असते. मात्र सेनेचे पुढारी सदासर्वकाळ आपला विक्राळ चेहराच लोकांना दाखवित असतील आणि त्यांना धमकावीत असतील तर 'लोक' या नावाच्या चेहरा नसलेल्या समुदायातही आत्मभान शिरते. आजवर बिनचेहऱ्याने राहिलेल्या या वर्गाची लोकशक्ती जागी झाली की मग हुकूमशहांनाही पळता भुई थोडी होते. हिटलर आणि मुसोलिनींची ज्या शक्तीने वाट लावली तिच्यापुढे मुंबईतल्या टिनपाट हुकूमशहांची आणि त्यांच्या साथीदारांची बिशाद चालणारीही नसते.
मुळात शिवसेना चित्रपटांवर घसरली याचे कारण तिच्याजवळ कोणता कार्यक्रम आता उरला नाही. ज्या दिवशी बाळासाहेबांनी पु.ल.देशपांडयांवर प्रहार केला त्याच दिवशी खरे तर त्यांच्या राजकारणाच्या अशा शेवटाची सुरूवात झाली. हेमंत करकरे यांच्या बायकोमुलांची धिंड काढू असे ठाकऱ्यांनी म्हटले तेव्हा तिच्या अगतिकतेचाही कडेलोट झाला. तिचे मराठीपण मनसेने हिरावले आणि भाजपच्या अजेंडयावर आहे तोवर हिंदुत्वावरही तिला आपला एकाधिकार सांगता येत नाही. तशात महाराष्ट्रात सेनेला ओळीने दोन पराभव पहावे लागले आहेत. परवाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत झालेला पराभव तर तिच्या जिव्हारी लागला आहे. हे असेच चालू राहिले तर आपल्याजवळ आहे ते सैन्यही शिल्लक रहायचे नाही या भीतीपोटी शिवसेनेने मग 'मुलायम लक्ष्ये' (सॉफ्ट टार्गेट्स्) शोधायला सुरुवात केली. मग एखाद्या पुस्तकातील ओळ, नाटकातले एखादे वाक्य किंवा चित्रपटातील एरव्ही कुणी लक्षात घेतले नसते असे दृश्य शोधणे आणि त्यावर आपल्या सैनिकांना तापवत ठेवणे यावर तिचा भर राहिला. या सैनिकांनाही बहुदा कामे नसावी. ठाकऱ्यांनी 'हल्ला' म्हटले की यांनी हल्ला चढवायचा, त्यांनी 'मार' म्हटले की मारायचे आणि त्यांनी 'थांबा' म्हटले की थांबायचे. मनोहर जोशांसारखे 'सर' असलेले लोक ठाकऱ्यांच्या दरबारात आपले मत बोलून दाखविण्याचे धाडस कधी करतात की नाही याचाच अशावेळी आपल्याला प्रश्न पडावा. हा शुध्द वेडाचार आहे, या कृतीची प्रतिक्रिया आपल्यावर उमटू शकते किंवा यातून झालेच तर आपले राजकीय नुकसानच अधिक होईल या साध्या माणसांनाही समजू शकणाऱ्या गोष्टी पुढारगिरी मिरविणारी 'सरां'सारखी माणसे लक्षात घेत नसतील तर त्यांच्या 'क्लासेस'चा उपयोग कोणता?
मग सचिन तेंडूलकरला 'फक्त क्रिकेटवर बोल' अशी आज्ञा करायची, 'राजकारण हे तुझे क्षेत्र नाही' हे अभिताभ बच्चनला ऐकवायचे आणि 'मुंबई या आमच्या अंगणात तुमचे काम कोणते' हे प्रथम दाक्षिणात्यांना आणि नंतर उत्तर भारतीयांना सुनावायचे. अशा शिवराळपणातून सेनेला येत गेलेल्या वैफल्याचेच नमुने लोकांना पहायला मिळाले. तशात सेनेला (माय नेम इज)'खान' हे कोलित मिळाले. त्यातून मुंबईवरील पाकिस्तानी हल्ल्याचे राजकारण न जमलेल्या आणि मुंबईतील बॉम्बस्फोटांची निवडणूक करण्यात अपयश आलेल्या ठाकऱ्यांना हा एकटा खान हाती लागला. त्या मुद्यावर आपण मराठी अस्मितेचे आणि धर्मद्वेषाचे राजकारण पुन्हा उभे करू शकतो असे त्यांच्या मनात आले. काँग्रेसचा पराभव करणे जमले नाही, राहूलला अडविणे शक्य झाले नाही आणि मनसेला थांबविता आले नाही या स्थितीत लहानशा का होईना एका विजयाची सेनेला गरज होती. शाहरूख एकटा आहे आणि 'खान' आहे. त्याच्याविरुध्द मराठी आणि हिंदू मानस आपण एकवटू शकतो असे ठाकऱ्यांना वाटले असेल तर तो त्यांच्याविषयी सहानुभूती वाटायला लावणारा भाग आहे. यावेळपर्यंत त्यांच्या राजकारणाला उबगलेल्या आणि फतव्यांनी वैतागलेल्या मराठी माणसांनीच त्यांना आणि त्यांच्या सैनिकांना धडा शिकविण्याचे मनोमन ठरविले असेल आणि तो तसा शिकविला असेल तर तेही समजण्याजोगेच आहे.
सेनेने बहिष्काराचा फतवा काढला असताना आणि तो ठोकशाही पध्दतीने अंमलात आणण्यासाठी तिचे सैन्य चित्रपटगृहांवर चालून गेले असताना मुंबईतील तरूण-तरुणींनी आणि महिला व पुरुषांनी शाहरूखचा चित्रपट पहायला जाण्याचे धाडस दाखविले असेल तर तो त्यांच्या चित्रपटशौकाहूनही संविधाननिष्ठेचा मोठा भाग आहे. 'एरव्ही गेलो नसतो पण ठाकऱ्यांनी फतवा काढल्यामुळे मुद्दाम गेलो' ही अनेक तरुण-तरुणींची याविषयीची प्रतिक्रिया शिवसेनेच्या संकोचक व संपत चाललेल्या प्रभावाची नांदी आहे. क्षीण झालेल्या सेनेच्या राजकारणात चैतन्य घालण्याच्या शरद पवारांच्या राजकारणाला जनतेने दिलेली ती चपराकही आहे. जे सरकारला जमले नाही, इतर राजकीय पक्षांना करता आले नाही ते असंघटित असलेल्या मराठी समाजाने उत्स्फूर्तपणे केले असेल तर तो मुंबईकरांमध्ये रुजू लागलेल्या लोकशाही मूल्यांचाही विजय ठरणारा आहे.
एखाद्याने गुन्हा वा गुंडगिरी केली तर त्याला कायदा लावता येतो. पण राजकारणाच्या नावाने एखादी संघटना झुंडशाहीवर उतरत असेल तर तेथे कायदा हतबल होतो. अशावेळी जनतेत जागी होणारी आत्मशक्तीच परिणामकारक होते आणि ती अशा संघटनांचा आणि त्यांच्या पुढाऱ्यांना नक्षा उतरविते. ठाकरे, त्यांची शिवसेना आणि तिला साथ देणारे इतर लोक या साऱ्यांना यातून काही शिकता आले तर त्यामुळे झालाच तर त्यांचाच फायदा अधिक होणार आहे. महाराष्ट्राची गोष्ट वेगळी आहे. त्याने आपला मार्ग आता शोधून घेतला आहे.