शरद पवारांनी बाळासाहेब ठाकऱ्यांची मातोश्री मुक्कामी भेट घेतल्याच्या घटनेवर ' ती केवळ क्रिकेटसाठी होती' हे काँग्रेसच्या प्रवक्त्याने केलेले भाष्य त्या पक्षाची अडचण सांगणारे व ती समजून घ्यायला लावणारे आहे. केंद्रात सत्तारुढ असलेले संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार ज्या अनेक पक्षांचे मिळून बनले आहे त्यात पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक आहे. महाराष्ट्रात सत्तेवर असलेले अशोक चव्हाणांचे आघाडी सरकारही पवारांच्या पक्षातील 60 आमदारांच्या भरवशावर उभे आहे. सत्तेसाठी कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करण्यात पवारांना कोणताही विधीनिषेध अडवीत नाही हे त्यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीने देशाच्या लक्षात आणून दिले आहे. 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांचे सरकार उलथविण्यासाठी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी पवारांनी जुन्या जनसंघापासून कम्युनिस्टांपर्यंत आणि समाजवाद्यांपासून शेतकरी कामगार पक्षापर्यंतच्या वेगवेगळया व परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांशी मैत्री केली होती. त्यासाठी ज्यांना आपले राजकीय गुरू मानले त्या यशवंतरावांच्या राजकीय प्रवाहापासून फारकत घेण्यातही त्यांनी कोणता अनमान बाळगला नाही. 'पवार हे काँग्रेसच्याच संस्कृतीत वाढलेले नेते आहेत' असे प्रशस्तीपत्र विलासराव देशमुखांनी त्यांना नुकतेच बहाल केले असले तरी पवारांनी त्या संस्कृतीची संगत आतापर्यंत किमान दोनवेळा सोडली आहे हेही कुणी विसरण्याचे कारण नाही.
1986 मध्ये राजीव गांधींच्या पुढाकाराने त्यांचे काँग्रेसमध्ये पुनर्वसन होऊन ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तरी त्यांच्या राजीव गांधीविरोधी कारवाया सुरूच राहिल्या. त्यांचे तसे डावपेच लक्षात येताच राजीव गांधींनी त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेण्याचा पवित्रा घेतला तेव्हा पवारांना अनुकूल असलेल्या देशातील उद्योगपतींनी, काँग्रेसमधील पवारांच्या सहानुभूतीदारांनी आणि काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना थांबविले. 1997 मध्ये सीताराम केसरींना आव्हान देऊन पवारांनी पुन्हा बंडाचे निशाण उभारल्याचे दिसले. पण केसरींच्या विरोधात आपला निभाव लागणार नाही हे लक्षात येताच त्यांनी ते गुंडाळले व आपण काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत असे जाहीर केले. 1999 मध्ये सोनिया गांधींच्या विदेशातील जन्माच्या मुद्यावर काँग्रेसचा हा निष्ठावान कार्यकर्ता पुन्हा बंडाचे निशाण हातात घेऊन उभा राहिला. सोनिया गांधींचे वय आणि काँग्रेस संघटनेवरील त्यांचा प्रभाव यामुळे यापुढे काँग्रेसकडून देशाचे सर्वोच्च सत्तापद आपल्याला कधी मिळणार नाही हे लक्षात आले तेव्हा त्याने स्वतःचा वेगळा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. कोणताही राष्ट्रीय पक्ष सारा देश आपल्या झेंडयाखाली आणण्याच्या अवस्थेत तेव्हा नसल्याने त्या काळात प्रादेशिक पक्षांनी खाल्लेली उचलही पवारांच्या त्या खेळीला कारण ठरली. पंतप्रधानपदासाठी ज्योती बसूंचे नाव पुढे येऊ शकते, देवेगौडा आणि गुजराल पंतप्रधान होऊ शकतात आणि त्या पदाच्या निवडीवर लालू प्रसादांसारख्या प्रादेशिक पुढाऱ्याचा प्रभाव निर्णायक ठरतो हे तेव्हाचे वास्तव पवारांच्या महात्वाकांक्षा पालवणारे ठरले असेल तर तो त्यांचा दोषही नव्हे.
तेव्हाचे वास्तव आता राहिले नाही. काँग्रेस आणि भाजपच्या नेतृत्त्वात देशपातळीवर दोन मोठया व डाव्यांच्या प्रभावाखाली एक लहान, अशा तीन आघाडया आता उभ्या आहेत. यापुढे केंद्रात सत्ता यायचीच असली तर ती यापैकी एका आघाडीची येणार आहे हे लक्षात येताच पवारांनी पुन्हा काँग्रेसशी जुळवून घेतले. त्यांना काँग्रेसजवळ आणण्यात सोनिया गांधींनीही, राजीव गांधींचा पूर्वीचा अनुभव विसरून जाऊन, पुढाकार घेतला. आज पवार केंद्रात तिसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ मंत्री आहेत आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी आहे. काँग्रेस संस्कृतीत वाढून आणि त्या पक्षासोबत सरकारात सामील होऊनही आपले राजकारण संशयास्पद राहील आणि आपले नाव नेहमी वादात अडकले असेल याची काळजी पवारांनी याही काळात घेतली आहे.
शिवसेना-भाजप युती महाराष्ट्रात एकवार सत्तारुढ झाली आहे आणि आताही त्या युतीच्या आमदारांची संख्या (90) सत्तारुढ काँग्रेस आघाडीच्या आमदारांच्या संख्येहून (144) 54 ने कमी आहे. पवारांच्या पक्षाजवळ 60 आमदार आहेत हे लक्षात घेतले तर युतीसोबत जाऊन त्यांना आपला पाठिंबा 150 आमदारांपर्यंत वाढविता येणार आहे. महाराष्ट्र हे देशातील उद्योग व अर्थक्षेत्रात आघाडीवर असणारे राज्य असल्यामुळे त्यावरची आपली सत्ता जाऊ नये यासाठी काँग्रेस पक्ष सगळया तडजोडींना तयार असेल आणि ती मिळविण्यासाठी सेना-भाजप युतीही सर्व तऱ्हेच्या करार-मदारांसाठी सिध्द राहील हे पवारांपुढचे आताचे पर्याय आहेत. राजकीय डावपेचांतील सगळे कौशल्य अंगी असणारा हा नेता या पर्यायांचा विचार करीतच असणार.
एका ज्येष्ठ संपादकाने म्हटल्याप्रमाणे पवारांच्या मनात देवेगौडा-कुमारस्वामी या पितापुत्रांनी कर्नाटकात केलेला खेळ असण्याची शक्यताही नाकारता येणारी नाही. कुमारस्वामींनी बंड करून भाजपासोबत सरकार स्थापन करायचे आणि 'मुलगा माझे ऐकत नाही' म्हणून कानावर हात ठेवण्याचे ढोंग करणाऱ्या देवेगौडांनी दिल्लीच्या राजकारणात तिसऱ्या आघाडीसोबत राहायचे ही खेळी पवार खेळू शकतात हा त्या संपादकाने दिलेला इशारा महत्त्वाचा आहे. अजितदादांनी बंड करून युतीच्या मदतीने सरकार स्थापन करायचे आणि 'पुतण्या माझे ऐकत नाही' असे म्हणत पवारांनी केंद्रातील मंत्रीपद राखायचे असा संकेत या इशाऱ्यात आहे. (तसाही आपल्या काकांचे म्हणणे न ऐकण्याकडेच आताच्या अनेक मराठी पुतण्यांचा कल आहे) एखाद्या वाचकाला हे सारे फार ताणल्यासारखे वाटत असले तरी शेजारच्या कर्नाटकात हे घडले आहे आणि स्वतःला डावे समजणाऱ्या देवेगौडांचे डावेपण जेवढे चोपडे तेवढेच ते पवारांचेही राहिले आहे.
काँग्रेस पक्ष आणि त्याच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याजवळ राष्ट्रव्यापी जनाधार आहे आणि राहूल गांधींना मिळत असलेला तरुणाईचा पाठिंबा इतरांच्या महत्त्वाकांक्षा जास्तीच्या ताणणारा व त्यांची दीर्घकालीन परिक्षा पाहणारा आहे. तिकडे भाजपामध्येही नव्या व तरुण चेहऱ्यांना पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे त्या आघाडीकडूनही बाहेरच्या 'जुन्या व जाणत्या' पुढाऱ्यांना यापुढे फार बळ मिळेल याची शक्यता कमी आहे. तिसऱ्या आघाडीतील प्रमुख पक्षांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा पट्टाभिषेक मायावतींना कधीचाच करून टाकला आहे. या स्थितीत कोणत्याही आघाडीला बहुमत न मिळण्याच्या अस्थिर काळातच प्रादेशिक पक्षाच्या पुढाऱ्याला सत्तापद मिळणे शक्य आहे. तशी वाट पाहण्याची तयारी करून बसलेले किमान दीड डझन नेते आज देशात आहेत. पवारांची तगमग या संदर्भात आपण समजून घ्यायची आहे.
शिवसेना या सध्या गलितगात्र व हतप्रभ झालेल्या पक्षाला संजीवनी घालण्याचा पवारांचा परवाचा प्रयत्नही याच संदर्भात समजून घेता येणार आहे. मुळात त्यांच्या या खेळीने त्यांच्याही पक्षातल्या अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 'ते असे काही करू शकतात' हे चांगले ठाऊक असणाऱ्यांनाही ते प्रकरण अकस्मात घडल्याने बुचकळयात पडल्यासारखे झाले आहे.
शिवसेना हा मित्र नसलेला पक्ष आहे. त्यापासून आपण फार दूर असल्याचे सांगण्यावर इतर पक्षांचा कटाक्ष तर त्याच्याशी गेली अनेक वर्षे मैत्री केलेल्या भाजपाचा त्यापासूनचे आपले वेगळेपण सांगण्यावर भर आहे. बाहेर मित्र नाहीत, असलेली आघाडी तुटण्याच्या बेतात आहे आणि घरची माणसे विरोधात गेलेली व जात असलेली पहावी लागत आहे हे सेनेचे सध्याचे चित्र आहे. त्यातून राहूल गांधींच्या मुंबई भेटीने तिला पार सैरभैर केले आहे. ज्या मराठी व महाराष्ट्रीय माणसांचा मराठी जनतेला अभिमान आहे ती बहुतेक सारी याआधीच दुखावून व दुरावून झाली आहेत. सेनेच्या अशा एकाकी व विकलांग अवस्थेत तिला हवे असलेले टॉनिक पुरवायला शरद पवार हे नेते अनेकांच्या रोषाची पूर्वकल्पना असतानाही तिच्या दारात गेले असतील तर त्याचा अर्थ निव्वळ क्रिकेटच्या संदर्भात लावणे वा बसविणे कठीण आहे. पवारांच्या या भेटीत बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर त्यांच्यासोबत होते एवढयावरही तिचा अन्वय त्यांच्या क्रिकेटप्रेमाच्या चौकटीत लावता येणार नाही.
शिवसेनेला बळ देण्याचे हे राजकारण काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांएवढेच डाव्यांना, जनतादल आणि रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही गटाला, बसपाला व राजदला एवढेच नव्हे तर तेलगु देसम् आणि द्रमुक-अण्णाद्रमुक यांनाही आवडणारे नाही. असलेच तर ते त्यांच्या भुवया उंचावणारे आहे हे कळण्याएवढे पवार मुरब्बी आहेत. आपण ही भेट क्रिकेटसाठी घेत असल्याचे कितीदाही सांगितले तरी त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही हेही त्यांना समजणारे आहे. काँग्रेस किंवा इतर 'समजूतदार' पक्षांनी त्यांची री ओढली तर त्यांच्याही समजूतदारीविषयीचे वेगवेगळे अर्थ लोक लावतील हेही त्यांना कळणारे आहे. तरीही पवार हा डाव खेळत असतील तर त्यांचे मनसुबे वेगळे आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा जनाधार, कार्यक्षेत्र, आवाका आणि दृष्टी महाराष्ट्रापलिकडे जाणारी नाही. नुकत्याच झालेल्या दोन्ही निवडणुकांत पवारांचा जनाधार रोडावला आहे. शिवेसनाही प्रथमच माघारली असून तिच्या ताब्यातील विरोधी पक्षनेतेपद भाजपाकडे गेले आहे. हा संकोच यापुढे थांबणार नाही आणि जी स्वप्ने आपण आपल्या अनुयायांना आजवर दाखविली ती आणखी दूर जाणारी आहेत याची जाणीव पवार आणि ठाकरे या दोघांनाही झाली आहे. आपल्या उरल्यासुरल्या ताकदीच्या भरवशावर नजिकच्या व उर्वरित भविष्यात मिळेल तेवढे पदरात पाडून घेण्यासाठी साऱ्यांना संशयाच्या भोवऱ्यात अडकविण्याचा हा प्रकार आहे.
दुःख याचे की आपले लपंडावाचे हे राजकारण देश, समाज, सहकारी आणि अनुयायी यांना समजत नाही या भ्रमात शरद पवार अजूनही आहेत. त्यांची प्रत्येक चाल काँग्रेस पक्षाएवढीच इतरांनाही समजणारी आहे. तिचा अन्वयार्थ समाजाला समजावून सांगायला सगळी माध्यमे सज्ज आहेत. त्यांच्या पक्षातील निकटवर्ती सहकाऱ्यांनाही हे डचमळणारे आणि संपायला आलेले राजकारण कळणारे आहे. राजकारणी माणूस केवढाही मातब्बर असला तरी तो समाजाची सदासर्वकाळ फसवणूक करू शकत नाही हे राजकीय वास्तव पवारांसारखे अनुभवसमृध्द नेते लक्षात घेत नसतील तर तोच खरा कीव करण्याजोगा प्रकार आहे.
No comments:
Post a Comment