प्रिय मित्र श्री. सुरेश द्वादशीवार,
यांना सप्रेम नमस्कार
आपली कोहम् कादंबरी वाचली. छान आहे. मला आवडली.
विषय तत्त्वज्ञानाचा असूनही तीत रुक्षता नाही. पहिली दोन प्रकरणे तर खूपच बहारदार आहेत. तुलनेने तिसरे राजशेखर प्रकरण, प्रारंभी काहिसे रुक्ष वाटले.
कादंबरीने खरेच आपल्या वाचनाची व्यासंगाची आणि बौध्दिक परिशीलनाची कल्पकता व सखोलता प्रकट केली आहे. वृत्तपत्राच्या धबडग्यात वावरत असतानाही आपण एवढे मूलगामी वाचन आणि महत्त्वाचे म्हणजे चिंतन करू शकता, हे खरोखरीच कौतुकास्पद आहे.
नित्य स्मरणात ठेवावीत अशा सुभाषितांची जागोजागी मनोज्ञ पखरण आहे.
वाचता वाचता काही शंकास्थानेही भेटली. शंकांचे कारण माझे अल्प ज्ञान असू शकते. उदाहरणार्थ,
1) राजशेखर विद्वत्तापूर्ण प्रवचने वयाच्या 21 व्या वर्षी करू लागला. जपानमध्ये तर वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्याने विद्वजनांवर आपली छाप पाडली अशी माहिती आहे. वर तो महाविद्यालयाच्या परिक्षा देत होता, सिगरेट ओढीत होता, अपेयपान करीत होता असेही वर्णन आहे. त्यावेळी स्वामी जिवंत होते. प्रवचने स्वामींच्या मृत्यूनंतर सुरू झालेली दिसतात. महाविद्यालयीन विद्यार्थीदशेत त्याचे वय निदान 18 ते 20 असेल की तो तेव्हा खूपच लहान होता?
2 ) संस्कृत देवांनी निर्माण केली, मराठी काय चोरापासून झाली, हा प्रश्न माझ्या स्मरणाप्रमाणे संत एकनाथांचा असावा, ज्ञानेश्वरांचा नसावा.
3) चार्वाकांना जिवंत जाळा असा उल्लेख आहे. चार्वाकांना हे आदरार्थी बहुवचन आहे की अनेक चार्वाक होऊन गेले? ब्रह्मतेजाने ज्या चार्वाकाला जाळले अशी कथा महाभारतात आहे तो दुर्योधनाच्या काळचा म्हणजे आजपासून पांच हजारांहून अधिक वर्षे पूर्वीचा. ज्याच्या नावावर भौतिकतावादी चार्वाकदर्शन आहे तो एवढा प्राचीन समजायचा काय? महाभारतातला चार्वाक संन्यासी होता. हा चार्वाक संन्यासी असणे शक्य वाटत नाही.
4 ) परंपरा हा नुसताच स्थितीवाद आहे असे एक निर्णायक मत असल्याचे सूचित होते. जी थांबते ती परंपरा राहत नाही ती रुढी बनते. परंपरा गतीमान असते. मात्र ती प्राचीनाशी संबंध ठेवून असते. बाय द पास्ट, थ्रू द प्रेझेंट, टू द फ्युचर अशी परंपरा असते. परंपरा या संस्कृत शब्दाचा व्युत्पत्तीमूलक अर्थही असाच आहे.
पण या सर्व शंका गौण आहेत. वर म्हटल्याप्रमाणे त्या अल्पज्ञानातून उद्भूत झाल्या असण्याचीच शक्यता आहे. महत्त्वाचा भाग, पाश्चात्य व पौरस्त्य तत्त्वज्ञानाचा ज्या ताकदीने आपण परामर्श घेतला तो आहे. एवढे मौलिक चिंतन कांदबरीच्या स्वरुपात आपण मांडले हे खरोखरी असामान्य आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन
कळावे,
स्नेहांकित,
मा.गो. वैद्य.
आद. बाबूरावजींना (श्री. मा.गो. वैद्य यांना)
सा. नमस्कार
तुम्ही कोहम वाचल्याचा आनंद झाला. अभिमानही वाटला. त्याची तुम्ही घेतलेली दखलही भावली. तुम्ही विचारलेल्या शंकांबद्दलची माझी मते अशी
1) आपल्या परंपरेत ज्ञान आणि वय यांचे नाते नेहमीच विस्मयात टाकणारे ठरले आहे. आद्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी जसा हा अचंबा घडविला तसा तो विवेकानंद आणि मौ. आझादांनीही घडविला आहे. ही माणसे त्यांच्या घडत्या वयात कशी वागत होती ते साऱ्यांविषयी कळायला मार्ग नसला तरी त्यातील काहींची चरित्रे आता उपलब्ध आहेत व ती विश्वसनीय आहेत. सिगारेट ओढणे, अपेयपान करणे किंवा मांसाहार यापासून असे अनेकजण दूर राहिले नव्हते. माझ्याहून त्यांच्या तशा कहाण्या आपणही जाणत असणार.
2) संस्कृत व मराठीविषयक आपले म्हणणे बरोबर आहे. 3) चार्वाक ही व्यक्ती नसून परंपरा आहे. चारु वाक्. चतुर बोलणारे या अर्थानेही तो शब्द परंपरेत आला आहे. चार्वाकांचे ग्रंथ होते. ते शिकवण्याची इतिहासात व्यवस्था होती. ब्रह्मसूक्तांपासून शंकराचार्यांच्या परंपरेतील प्रत्येकाला चार्वाकांना उत्तर द्यावेसे वाटले. यावरून या परंपरेची थोरवीही लक्षात यावी. चार्वाकांकडे पाहण्याची वक्रदृष्टी आपल्या परंपरेत शंकराचार्यांच्या नंतर बऱ्याच कालावधीने आली असावी असे इतिहासावरून दिसते. दुर्योधनाच्या बाजूने उभा होणारा चार्वाकांचा प्रतिनिधी कुलसंहाराविरुध्द बोलणारा आहे. राज्यासाठी कुलसंहार करणाऱ्यांना लोभी ठरवून दोष देणारा आहे. अशी परंपरा लोभी लबाडांची असणार नाही.
4) परंपरा ही मृतांची लोकशाही आहे हे विधान एका ज्येष्ठ पाश्चात्त्य इतिहासकाराचे आहे. ते प्लेटोच्या तत्त्वचिंतनातही आले आहे. तुम्ही म्हणता तसा रुढी व परंपरा या शब्दांतील फरक या विधानकर्त्यांनी लक्षात घेतला नसावा. मात्र त्यामुळे माझ्या प्रतिपादनात फारसा फरक पडतो असे मला वाटत नाही.
या शंकांखेरीज तुम्ही केलेले माझ्या लिखाणाचे कौतुक मला बळ देणारे व माझा विश्वास वाढवणारे आहे.
तुमचा लोभ असाच कायम रहावा.
आपला नम्र,
सुरेश द्वादशीवार.
No comments:
Post a Comment