कनु संन्याल या नक्षलवादी चळवळीच्या संस्थापक नेत्याने वयाच्या 76 व्या वर्षी गळयाला फास लावून आत्महत्या केली या घटनेचे अशा चळवळींचा अभ्यास करणाऱ्यांना आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. उरात बाळगलेल्या उदात्त स्वप्नासाठी तेवढाच चांगला मार्ग चोखाळायचे सोडून हिंसाचाराचा रस्ता धरणाऱ्या अनेकांच्या वाटयाला असाच शेवट यापूर्वी आला आहे.
शेतकरी आणि भूमिहीनांच्या वर्गाला न्याय मिळवून देण्याच्या भव्य कल्पनेसह चारू मुजुमदार, कनु संन्याल आणि जंगल संथाल या तिघांनी 1960 या दशकाच्या अखेरीला या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली. ती पुढे नेण्यासाठी 'क्रांतिकारी हिंसाचाराचा' मार्ग पत्करण्याची त्याचवेळी त्यांनी शपथही घेतली. मार्क्सच्या विचाराने भारलेल्या या तिघांचे त्यापूर्वीचे आयुष्य डाव्या चळवळींशी एकरूप झालेले होते. त्या चळवळीत राहून त्यांनी तुरुंगवास आणि हालअपेष्टा भोगल्या होत्या. मात्र डावे पक्ष संसदीय लोकशाहीच्या मार्गाने जाऊ लागले तेव्हा त्यांनी क्रांतीचा मार्ग सोडला असा आरोप त्यांच्यावर करीत या तिघांनी प. बंगालच्या उत्तरेला सिलीगुडीजवळच्या नक्षलबारी या लहानशा खेडयात आपल्या 'क्रांतिकारी चळवळी'चा आरंभ केला. चारू मुजुमदार यांनी तिची वैचारिक बाजू सांभाळली. कनु संन्यालने नेतृत्व स्वीकारले तर तिच्या सेनापतिपदाची धुरा जंगल संथालच्या खांद्यावर आली. त्या तिघांचा तोवरचा त्याग, क्रांतीवरची त्यांची अव्यभिचारी निष्ठा आणि आयुष्यात वाटयाला येऊ शकणाऱ्या सगळया सुखसोयींपासून दूर राहून पत्करलेले दारिद्रयाचे जीणे यामुळे भारावलेल्या सुशिक्षित तरुणांचा एक मोठा वर्ग त्यांच्यासोबत तेव्हा उभा राहिला. आपल्या आंदोलनाच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर संसदीय लोकशाहीच्या मार्गाला लागलेल्या डाव्या पक्षांचाच आहे अशी भूमिका घेत नक्षलवादाच्या या प्रणेत्यांनी सुरुवातीला डाव्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच आपल्या गोळीचे लक्ष्य बनविले. त्या पक्षाचे अनेक कार्यकर्ते त्या काळात नक्षलवाद्यांकडून मारले गेले.
ज्योती बसू बंगालच्या गृहमंत्रिपदावर व पुढे मुख्यमंत्रिपदावर आले तेव्हा त्यांनी नक्षलवाद्यांविरुध्द कठोर कारवाईचे पाऊल उचलून ती बऱ्यापैकी मोडित काढली. नंतरच्या काळात बंगालच्या मुख्यमंत्रिपदावर आलेल्या सिध्दार्थ शंकर रे यांनी कोणतीही दयामाया न दाखविता तिचा पुरता बीमोड केला. मात्र हाती आलेल्या बंदुकांनी अनुभवता येणारे मानसिक बळ बंगालमधील सुशिक्षित बेकारांना आकर्षकच वाटत राहिले. या आकर्षणाची लागण नजीकच्या बिहार व ओरिसा या राज्यांतील अरण्यप्रदेशात राहणाऱ्या आदिवासींच्या समाजातील बेकार तरुणांनाही झाली. 1950 च्या सुमारास तेलंगणामध्ये फसलेल्या कम्युनिस्टांच्या बंडाच्या जखमा तेव्हाही ताज्या होत्या. त्या आठवणींनी होरपळत असलेल्या जुन्या कम्युनिस्टांनाही या नव्या चळवळीचे आकर्षण वाटले. करीमनगर आणि आदिलाबाद या तेलंगणातील जिल्ह्यांत तिचे आगमन त्यामुळे झाले. आजच्या घटकेला देशातील 150 जिल्ह्यांत तिचा पायरव आहे आणि त्यापैकी काहीत तिचे अस्तित्व जाणवण्याएवढे मोठे आहे.
प्रत्येकच क्रांती आपली पिले खात असते, तशी या चळवळीनेही आपल्या पिलांचा जीव घ्यायला फार पूर्वीच सुरुवात केली. गरीब आदिवासींना, शेतकरी आणि भूमिहीनांना न्याय मिळवून द्यायला उभ्या झालेल्या या चळवळीने त्याच वर्गातील लोकांना कधी पोलिसांचे खबरे ठरवून तर कधी ते वर्गक्रांतीला साथ देत नाहीत म्हणून मारायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या गडचिरोली या एकाच जिल्ह्यात तिने साडेसातशेहून अधिक आदिवासींना त्यांचे गळे कापून आजवर ठार केले. भांडवलदार, कारखानदार, उद्योगपती, व्यापारी आणि राजकीय पुढारी यांच्याकडून खंडण्या वसूल करणारी ही चळवळ श्रीमंतांचीच बटिक बनल्याचे चित्र नंतरच्या काळात देशाच्या अनेक भागात उभे राहिले.
तिचे हे स्वरूप पाहून चारू मुजुमदार तिच्यापासून प्रथम दूर झाले. जंगल संथालचा अंतही असाच नैराश्यापोटी झाला. कनु संन्यालची आताची आत्महत्या हा या मालिकेतच्या अखेरच्या पर्वाचा भाग आहे. ज्या क्रांतीचे पर्यवसान लोकशाहीत होत नाही किंवा जिला लोकाधार मिळविण्यात यश येत नाही ती प्रथम आपल्या अनुयायांच्या व नंतर नेत्यांच्या जीवावर उठत असते. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर उफाळलेला हिंसाचार आणि अमेरिकेच्या राज्यक्रांतीनंतर तेथे झालेली घटना समितीची स्थापना या दोन घटनांमधील फरक अशावेळी लक्षात घ्यावा लागतो. फ्रेंच राज्यक्रांतीचे सारे नेते एकामागोमाग एक गिलोटिनच्या पात्याखाली आपली मस्तके गमावीत राहिले. उलट अमेरिकी क्रांतीचे नेते प्रथम त्या देशाचे घटनाकार व पुढे त्या देशाचे लोकनियुक्त राज्यकर्ते बनले.
नक्षलवादी चळवळीने आपली खरी व मूळची दिशा सोडली, नंतर आलेल्या पुढाऱ्यांनी तिचे हेतू बदलले आणि तिला निव्वळ दहशतवादी बनविले. गरिबांसाठी उभी झालेली चळवळ त्यांच्याच गळयांवर वार करताना दिसू लागली याची खंत असह्य झाली तेव्हाच कनु संन्यालांनी तिच्यापासून या दशकाच्या आरंभी फारकत घेतली. 'कोणतेही सशस्त्र व हिंसक आंदोलन समाज बदलू शकत नाही. त्यासाठी लोकांना विश्वासात घेणारा लोकशाहीचा मार्गच आत्मसात करावा लागतो' हा विचार 2005 च्या सुमारास त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवला. 'ज्या मार्गाने आजचे माओवादी जात आहेत तो मार्ग आम्ही 1968-69 मध्ये अनुसरला. त्यातून हिंसेची निरर्थकता आमच्या लक्षात आली. काही पोलिसांना मारल्याने पोलिस व्यवस्था बदलत नाही आणि एखाद्या जमीनदाराला मारल्याने भांडवलशाहीही संपत नाही. देश आणि समाज बदलण्याचे बळ फक्त लोकशाहीच्याच मार्गात आहे' असे नंतरच्या काळात ते साऱ्यांना बजावत राहिले. त्याही पुढे जाऊन आजचे नक्षलवादी हे फक्त लुटारूच बनले आहेत असेही सांगायला त्यांनी कमी केले नाही. जयप्रकाश नारायण यांनी 1970 च्या दशकात उभ्या केलेल्या संपूर्ण क्रांतीविषयीही या काळात त्यांनी आपली आस्था बोलून दाखविली.
त्यांच्या मनातली समाज परिवर्तनाची धग अखेरपर्यंत कायम राहिली. ती सफल व्हावी याचा त्यांना असलेला ध्यासही शेवटपर्यंत तरुण होता. मात्र नक्षलवादी चळवळीला तोपर्यंत आलेली नुसत्या हिंसाचाराची क्रूर अवकळा त्यांना तिच्याजवळ जाऊ देत नव्हती. कनु संन्याल यांची आत्महत्या या पार्श्वभूमीवर पाहिली व अभ्यासली जाणे गरजेचे आहे.
भारतीय पोलिस सेवेत मोठया अधिकारपदावर असलेल्या एका केरळी महिलेने यासंदर्भात दिलेली माहिती आणखीच अस्वस्थ करणारी आहे. नक्षलवाद्यांच्या चळवळीत उत्साहाने सामील झालेल्या केरळातील ज्या अनेक कार्यकर्त्यांनी नंतरच्या काळात आत्महत्या केल्या त्यांच्या नावांची मोठी यादीच तिने प्रस्तुत लेखकाला ऐकविली. या आत्महत्यांचे एकमेव कारण त्यांना आलेले वैफल्य हे होते. ज्यांच्या बाजूने शस्त्र हाती घेतले त्या गरीबांवरच आपल्याला ते चालवावे लागले. त्या हिंसाचारात आपली म्हणविणारी माणसे तर मेलीच पण त्यांच्यासोबत आपल्यातल्या माणुसकीचाही बळी गेला ही खंत मनात घेऊन या चळवळीतील माणसांनी मृत्यू जवळ केला होता. कनु संन्यालचा मृत्यू ही या शृंखलेतील सर्वात मोठी घटना आहे. आयुष्याची अनेक वर्षे रानावनात व घरादारापासून दूर राहून क्रांतीची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या लक्षात एक गोष्ट वृध्दापकाळी नक्कीच लक्षात येत असावी. जोवर सरकार बंदुकांच्या सहाय्याने लढते आणि आपल्याजवळही बंदुका असतात तोवरच आपल्याला विजय मिळण्याची शक्यता असते. मात्र आपल्याजवळ बंदुका असताना सरकारजवळ रणगाडे आणि अण्वस्त्रे असतील तर तशा विजयाची शक्यताच संपणारी असते. (सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने देश स्वतंत्र होईल याचा आठ आण्याएवढा विश्वास मला वाटला तर उरलेल्या आठ आण्याची जोखीम पत्करण्याची माझी तयारी आहे. मात्र पहिल्या आठ आण्याचाच मला विश्वास वाटत नाही असे लो. टिळक तेव्हा का म्हणाले असतील याची कल्पना यातून यावी.) एखादा तालुका, जिल्हा वा छत्तीसगडसारखे एखादे राज्य ताब्यात आणले की दिल्लीवर झेंडा फडकवता येत नाही ही गोष्ट कनुंसारख्या अनुभवी माणसाच्याही लक्षात फार पूर्वीच आली असणार.
नक्षलवाद ही क्रांतीच्या कल्पनेचा ध्यास, जाणते वा अजाणतेपणी घेतलेल्या माणसांची अखेरच्या मुक्कामाची जागा आहे. तिथवर जाता येते. तेथून परतता मात्र येत नाही. ज्या समाजव्यवस्थेवर संतापून वा तिला कंटाळून त्या मुक्कामावर जायचे त्या व्यवस्थेने परतीचे सारे मार्ग बंद केले असतात आणि तो मुक्काम सोडून परतू पाहणाऱ्यांना त्यात अडकलेले कडवे लोक नंतर जगूही देत नाहीत. चळवळीशी 'गद्दारपण' केल्याचा आरोप ठेवून नक्षलवाद्यांनी दिवसाढवळया हातपाय तोडून आणि डोळे काढून आजवर किती स्त्री-पुरुषांची हत्या केली याचा तपशील सरकारनेच कधीतरी जाहीर केला पाहिजे.
नक्षलवादाची चळवळ धनिकांना लुटणारी आणि गरिबांमध्ये वाटणारी, रॉबिन हूडसारख्यांकडून चालविली जाते या भ्रमात अजूनही राहिलेल्यांचे डोळे उघडायला तर त्यामुळे मदत होईलच पण हातात बंदुका देऊन मनात अडाणी बळ वाढविणारे क्रांतीचे हे मायाजाल अजूनही ज्यांना भुरळ घालू शकते त्या भाबडयांनाही त्यातून बरेच काही शिकता येईल. नक्षलवाद ऊर्फ माओवाद ही वैचारिक व राजकीय चळवळ आहे आणि तिचा सामना राजकीय पातळीवरच केला पाहिजे असे सांगणारी शहाणी माणसे फार आहेत. देशाचे नवे लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांनीही त्यांच्या ताज्या वक्तव्यातून आपले असे अज्ञान उघड केले आहे. आश्चर्य याचे की या वादाला राजकीय उत्तर दिले पाहिजे असे सांगणारे लोक ते द्यायला पुढे झालेले कधी दिसले नाहीत. नक्षलवाद्यांनी ज्यांचा बळी घेतला त्यांना सहाय्य करायलाही ही विचारी माणसे त्या क्षेत्रात गेलेली कधी कुणी पाहिली नाहीत.
सोळा हजारांवर निरपराध माणसांची हत्या करून या चळवळीने नेपाळची सत्ता हस्तगत केली हा ताजा इतिहास लक्षात घेणे व सत्ता हेच तिचे ध्येय असल्याचे मान्य करणे हेही त्यांना त्यांच्या भूमिकांमुळे आजवर जमले नाही. केंद्र सरकारच्या माहितीनुसार माओवाद्यांचे जमाखर्चाचे वार्षिक अंदाजपत्रक पंधरा हजार कोटींचे आहे ही एकच बाब या शहाण्या मंडळीचे डोळे उघडू शकणारी आहे. तेवढयावरही ही माणसे तिला सामाजिक किंवा राजकीय चळवळीचा किताब देणार असतील तर त्यांनी कनु संन्याल यांनी त्यांच्या वाटयाला आलेल्या वैफल्यातून केलेली आत्महत्या किमान विचारात घेतली पाहिजे. क्रांती आपली पिले खाते असेच आजवर म्हटले गेले. कनुंच्या आत्महत्येने नक्षलवाद्यांच्या स्वप्नातील तथाकथित क्रांतीने तिचा बाप खाल्ला आहे, एवढे जरी त्यांच्या लक्षात आले तर या चळवळीविषयीच्या साऱ्यांच्या आकलनात एक स्पष्टपणा येऊ शकणार आहे.
No comments:
Post a Comment