Monday, April 5, 2010
दानजीवींचे नितीकारण
माणिकचंद गुटख्याचे निर्माते आणि मालक रसिकलाल धारिवाल यांनी पुण्याच्या मराठी साहित्य संमेलनाला दिलेल्या देणगीवर डॉ. अभय बंग या महाराष्ट्र भूषण समाज सेवकाने आक्षेप घेतला आणि त्यातून उभ्या झालेल्या वादामुळे वैतागून जाऊन धारिवाल यांनी आपली देणगी परतही घेतली. मात्र तेवढयावर हा वाद संपणार नाही आणि तसा तो संपूही नये. महाराष्ट्रभर पसरलेल्या सेवाभावी संस्थांना त्यांच्या सेवाकार्यासाठी दिल्या जाणाऱ्या देणग्या व भेटी कधी चेकच्या तर कधी रकमेच्या स्वरूपात दिल्या जातात. या संस्थामध्ये तयार होणाऱ्या वस्तुंच्या विक्रीतूनही त्यांना पैसा मिळतो. हा सर्व व्यवहार रसिदा व कागदपत्रांच्या सहाय्याने कायदेशीररित्याच होत असतो आणि त्यांची दरवर्षी आर्थिक तपासणीही होते. धारिवाल यांनी साहित्य संमेलनाला दिलेली देणगी जाहीर होती आणि ती त्यांनी चेकच्या रूपाने, म्हणजे कायदेशीर स्वरूपातच देऊ केली होती. अशा देणगीला जे विरोध करतात त्यांना विचारायचा खरा प्रश्न, तुमच्या संस्थांना मिळणाऱ्या देणग्या पहिल्या नंबरच्या किंवा सच्च्या कमाईतून मिळणाऱ्या पैशातूनच आल्या असतात याची तुम्ही हमी देऊ शकता काय, हा आहे. जे व्यावसायिक, उद्योगपती, व्यापारी, राजकारणी, सहकार महर्षी, शिक्षण महर्षी आणि सेवाभावी सज्जन तुम्हाला पैसा देतात आणि ज्यावर तुमच्या संस्थांचे संसार उभे राहतात तो पैसा खात्रीशीरपणे घामाच्या कमाईतून व तोही स्वत:च्या घामाच्या कमाईतून देणाऱ्याने मिळविला असतो हे तुम्ही छातीठोकपणे सांगू शकता काय? सेवाग्राम ही सरकारी दान न स्वीकारल्यामुळे डबघाईलाच नव्हे तर पडझडीला आलेली संस्था आहे. पण महाराष्ट्रातील ज्या सेवाभावी संस्था, सध्या डफावर आहेत आणि ज्यांना मिळणाऱ्या पुरस्कारांच्या, देणग्यांच्या आणि अनुदानाच्या बातम्या रोजच्या रोज वृत्तपत्रात प्रकाशित होत आहेत त्या साऱ्यांना आपल्याला मिळणाऱ्या पैशाच्या शुध्दतेची ग्वाही देता येते काय? त्यातही ज्यांना परदेशाचा पैसा मिळतो त्या संस्था त्या पैशाची अशी शहानिशा कितपत करतात? या संस्थांचे कार्यकर्ते तेच, संचालक तेच, निर्णयकर्ते आणि मालकही तेच. त्यांच्यात कायदेशीरपण असले तरी लोकशाही नाही. हे संचालक चांगले ऐषआरामात राहतात, विमानातून फिरतात, वर्षाकाठी देशविदेशाच्या दोन-तीन वाऱ्या करतात आणि यांना उपचारासाठीही विदेश लागतो. या मंडळीच्या उपदेशाची आणि 'त्याग' नावाच्या कमालीच्या साक्षेपी गोष्टीची भूरळ पडलेली भाबडी माणसे त्यांना कधी धारिवालासारखी आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करायला धजावतात काय? आपला मध्यमवर्ग तसाही भोळा आहे. तो श्रमजीवीपेक्षा बुध्दीजीवी माणसांना मोठे मानतो. त्यातूनही त्यांची श्रध्दा दानजीवी लोकांवर अधिक असते. ही दानजीवी माणसे बोलतात छान, उपदेश करतात भारी आणि आव आणतात तोही बुध्द-गांधींचा. प्रत्यक्षात यांच्या संस्थात असलेल्या एकाधिकारशाहीकडे, कौटुंबिक वारसदारीकडे आणि त्यांनी मिळविलेल्या बक्षीस-पुरस्कार-देणग्या आणि अनुदानाच्या एकनंबरी असण्याकडे किती जणांचे लक्ष असते. त्यातूनही ही दानजीवी माणसे नीतीचा उपदेश फार करतात. त्या उपदेशामुळे चांगल्या व भल्या माणसांच्याही मनात अकारणच एक न्यूनगंड तयार होतो. या न्यूनगंडाचे रूपांतर मग देणग्या व दानात होते. या संस्थांनी ज्यांना सेवा पुरवायची ती माणसे जेथल्या तेथे राहतात. त्यांनी या तऱ्हेने आणलेल्या दानावर संचालक मात्र महान होतात. धारिवालांच्या गुटख्याने उभे केलेले खरे प्रश्न हे आहेत आणि समाजाने त्यांचीही उत्तरे आता मागितलीच पाहिजेत. धारिवाल हे एकटेच या प्रकारामुळे वैतागले नाहीत, आपण मिळविलेला पैसा सत्कारणी लागावा असे मनात असणारे सारेच जण त्यामुळे दचकले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment