Pages

Monday, April 5, 2010

शाहरूख ः एक निमित्तकारण

एकेकटया माणसाला लक्ष्य बनवायचे, त्याला कुणा संघटनेचा, पक्षाचा वा जातीचा पाठिंबा नाही याची खात्री करून घ्यायची आणि अस्मितेचे जुजबी निमित्त पुढे करून त्याच्यावर हल्ला चढवायचा ही राजकीय आखणी तात्पुरती प्रसिध्दी मिळवून देणारी असली तरी ती आखणाऱ्यांना आलेले वैफल्यच अखेर उघड करीत असते. राजकारणाचे असे किरकोळ फंडे, त्याचे नेतृत्व करणाऱ्यांजवळ फारसे राजकीय वा सामाजिक कार्यक्रम उरले नसल्याचे व त्यांना जाणवलेल्या त्यांच्या अदूरदर्शी हतबलतेचे प्रदर्शन करीत असतात. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर आणि मुकेश अंबानी यांना 'धडा' शिकवून झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शाहरुख खान या सध्याच्या लोकप्रिय नटावर उगारलेला फणा आणि त्यांच्या आततायी अनुयायांनी त्याच्या चित्रपटांना घातलेला विळखा हे याच अधू दृष्टीच्या अल्पजीवी राजकारणाचे उदाहरण आहे. प्रसिध्द व लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाचे एखाददुसरे उणे हाती धरून त्यावर ओरड केली की ती करणाऱ्यालाही प्रसिध्दी मिळते. ठाकरे व त्यांची शिवसेना यांनी याच 'तात्काळ प्रसिध्दी' तंत्राचा अवलंब आता चालविला आहे. मागल्या निवडणुकांनी पराभव केला आणि पुढच्या निवडणुकांना अजून चार वर्षांचा कालावधी आहे. मधल्या काळात करावे असे चमकदार कार्यक्रम नाहीत किंवा असले तरी ते हाती घेण्याची क्षमता नाही. महागाई आहे, उपासमार आहे, प्रादेशिक विषमता आहे, नक्षलवाद व शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, साखर कडू तर डाळी दिसेनाशा झाल्या आहेत आणि या साऱ्या प्रश्नांवर आवाज बुलंद करू शकणाऱ्या संघटना नाहीत. शिवसेना हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मोठा विरोधी पक्ष आहे. या प्रश्नांचे प्रवक्तेपण करून सरकारवर जनमताचा दबाव वाढवीत नेणे ही त्याची जबाबदारी आहे. त्यातून भाववाढीच्या जबाबदारीचे सर्वाधिक ओझे ज्यांच्या माथ्यावर आहे ते देशाचे कृषी व नागरीपुरवठा मंत्री शरद पवार हे शिवसेनाप्रमुखांचे स्नेही आहेत. आपले राजकीय बळ व वजन एकवटून पवारांच्या विरोधात गरीब ग्राहकांची लढाई लढविणे ठाकरे यांना शक्य आहे. परंतु तो दीर्घकाळचा व दमछाक करणारा कार्यक्रम आहे. तो उभा करण्यात बरीच ताकद खर्ची पडणार आहे. त्यातून मिळणारी प्रसिध्दीही मिळमिळीत असण्याचे भय आहे. त्यापेक्षा क्रिकेटचे मैदान खणून मिळणारी प्रसिध्दी सखोल आणि मोठी आहे. एखाद्या नामवंतावर चिखलफेक करून मिळविता येणारे नाव धारदार राहणार आहे. त्यासाठी फारशी दमछाक करण्याची गरज नाही. हातच्या वर्तमानपत्रात एक लेख हाणला तरी ते होण्यासारखे आहे. शाहरुख खानवर तसे शरसंधान करून ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांनी हे साधले आहे.
आयपीएल आणि क्रिकेट हे सध्याचे डफावरचे प्रकरण आहे. या सामन्यांत पाकिस्तानचे खेळाडू भाग घेऊ शकणार नाहीत. त्यात भाग घेणाऱ्यांच्या पदरात पडणारे कोटयवधींचे धनही त्यामुळे त्यांना मिळणार नाही. मुळात अशी निर्माण होणे हा राजकारणाचा क्रीडाक्षेत्रावरचा परिणाम आहे व तो दुर्दैवी आहे. ही स्थिती सुधारावी आणि तिचा क्रीडा व सांस्कृतिक संबंधांवर होणारा अनिष्ट परिणाम टाळावा यासाठी गंभीर प्रकृतीच्या राजकीय नेत्यांनी प्रयत्न करणे ही आताची गरज आहे. त्याविषयीची चिंता केंद्रातील मंत्र्यांनी व नेत्यांनी व्यक्तही केली आहे. पण ठाकरे व त्यांची सेना यांचा अशा गांभीर्याशी संबंध नाही. त्यांचा पाकिस्तानविरोध राजकीयच नाही, त्याला मुस्लीम धर्मद्वेषाची जोड असल्यामुळे तो जास्तीचा तीव्र व विखारी आहे. त्याचमुळे जो कोणी पाकिस्तानी खेळाडूंचा आयपीएल सामन्यांत समावेश न होण्याबद्दलची हळहळ व्यक्त करील त्याच्यावर तुटून पडण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणीचे हत्यार उचलले आहे. त्यांच्या नशिबाने अशी हळहळ व्यक्त करण्याचे धाडस शाहरुख खान या मुंबईतल्याच नटाने दाखविल्यामुळे त्यांना जवळचे लक्ष्य मिळाले आहे. शाहरुख जेवढा डफावरचा तेवढेच ठाकऱ्यांचे राजकारणही डफवाले असल्यामुळे या वादाला लागलीच संघर्षाचे रूप येऊन पुढचे सारे अपेक्षेबरहुकूम व नित्याप्रमाणे घडले आहे. ठाकऱ्यांच्या आज्ञाधारक सैनिकांनी शाहरुखचे चित्रपट लागलेल्या थिएटरांवर हल्ले चढविणे, त्याच्या जाहिरातीची पोस्टरे फाडणे आणि त्याच्या चित्रपटावर बहिष्कार घालणे असे सारे आजवर अनेकदा करून झालेले प्रकार याही वेळी झाले. या चाळयांची मुंबईकरांना आता सवय झाली आहे आणि महाराष्ट्राच्याही ते अंगवळणी पडले आहेत. मात्र ही सवय आणि असे अंगवळणी पडणे यांनाच 'लोकमान्यता' समजण्याची वृत्ती आत्मसात केलेल्या ठाकरे यांना ती त्यांच्या पराक्रमाला मिळालेली पावती वाटत आहे. ते असे काही करतीलच हे लोकांनी गृहित धरायचे, तेवढे करून मिळणाऱ्या प्रसिध्दीवर ते संतुष्ट होतील हे सरकारने समजायचे आणि त्यात काही अनिष्ट आहे हे सांगण्याचे धारिष्टय दाखवायला समाजाने भ्यायचे, हा समाज व राज्य या दोहोंची अगतिकता व इतर राजकीय पक्षांचे दुबळेपण उघड करणारा प्रकार आहे. हे चालायचेच असे समाजाने म्हणायचे, इथवर चालून हे थांबेल याची सरकारने वाट पाहायची, इतर पक्षांनी भेकडपणे पाहून न पाहिल्यासारखे करायचे आणि आम्ही साऱ्यांना नमविले आहे अशी शेखी ठाकऱ्यांनी मिरवायची हा सारा राजकारण, समाज व राज्य यांना आलेल्या बुध्दिमांद्याएवढाच मानसिक बधिरतेचाही परिणाम आहे. या समाजातील माणसांना त्यांचे मन मोकळे करून बोलण्याचा, आपली मते सांगण्याचा आणि इच्छा बोलून दाखविण्याचा अधिकार असावा की असू नये? त्यासाठी कुणा एका राजकीय पक्षाची वा घराण्याची पूर्वसंमती त्याला घ्यावी लागावी काय? मते मांडण्याचा आणि ती इतरांवर लादण्याचा हक्क देशाच्या घटनेने शिवसेनेच्या पुढाऱ्यांनाच तेवढा दिला आहे काय? आणि स्वतंत्र भारताच्या राजकारणाने वयाची साठी गाठली तरी त्याने एवढे पोरकट राहायचे काय?
राजकारण किरटे झाले की ते नुसते फाजीलच होत नाही, त्याला विकृतीचीही किनार येत असते. ठाकरे यांचा शाहरुख खानवर असलेला राग तो अभिनेता म्हणून ख्यातनाम असल्यामुळे वा त्याने पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलच्या सामन्यात भाग घेता येत नसल्याबद्दल व्यक्त केलेल्या खेदामुळेच निर्माण झाला नाही. तो 'खान' असल्याचाच त्यांना राग आहे. त्याने केलेल्या 'हिंदू' व 'राष्ट्रीय' भूमिकांची उंची व वेगळेपण लक्षात न घेण्याएवढे त्याचे 'खानपण' स्वतः कलावंत असणाऱ्या ठाकरे यांच्या मनात ठासून भरले आहे. शाहरुख, सलमान आणि आमिर या तीन 'खानां'नी भारतीय चित्रपटसृष्टीत मिळविलेले राष्ट्रीय यश वाखाणता न येण्याएवढा जबर 'खान'द्वेष त्यांच्या मनात आहे. त्यांच्या यशाची हेटाळणी करताना ठाकरे यांनी जे उद्गार याआधी काढले ते त्यांच्या याच विकारी वृत्तीचे प्रदर्शन करणारे आहेत. चित्रपट शौकिनांमधील या अभिनेत्यांच्या लोकप्रियतेविषयी बोलताना 'आमच्या पोरींनाही आताशा मुसलमान पोरेच अधिक आवडू लागली आहेत' असे अतिशय हीन व अभिरुचीशून्य वक्तव्य त्यांनी एकेकाळी केले आहे. ते त्या अभिनेत्यांएवढीच सगळया भारतीय मुलींचीही बदनामी व अपमान करणारे आहे. ठाकरे यांची शिवसेना जातीपातीचे राजकारण करीत नाही, मात्र आपल्या राजकारणाचे धर्मांध व धर्मद्वेष्टे स्वरूप ती लपवीतही नाही. हा द्वेष कोणत्या पातळीवरचा असावा आणि तो व्यक्त करताना सभ्यतेच्या साध्या मर्यादाही तिला कशा सांभाळता येऊ नयेत हे उघड करणाराच हा प्रकार आहे. खेद ठाकरे यांच्या वक्तव्याचा वा राजकारणाचा नाही. त्यांचे असे आततायीपण संतोषाने खपवून घेण्याच्या आपल्या सामाजिक मानसिकतेचाही तो अपराध आहे. महाराष्ट्रात सत्तारूढ असलेल्या काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारच्या दुबळया राजकारणाचाही तो परिणाम आहे. 'शाहरुखला आम्ही संरक्षण देऊ' एवढे म्हणूनच हे सरकार थांबले आहे. हे संरक्षण ज्यांच्यापासून द्यायचे त्यांच्या बंदोबस्ताची व्यवस्था करणे या सरकारला जमणारे नाही असे सांगणारे हे दुर्दैवी चित्र आहे. जेथे सरकार हतबल होते तेथे समाजाच्या सक्रिय पुढाकाराची अपेक्षा तरी कशी व कुणी बाळगायची? समाजाच्या प्रश्नांवर राजकारण करता येत नसेल तर ते धार्मिक समजुतींवर उभे करायचे, ते जमले नाही की जातीपातीचे मुद्दे पुढे करायचे, पुढे जाऊन अस्मितांचे लहानसहान प्रश्न उकरून व जागवून पाहायचे आणि तेवढयावरही भागले नाही की द्वेषाचे राजकारण सुरू करायचे, या दुष्टचक्रातून आपण जेव्हा बाहेर पडू तेव्हा आपले राजकारण खऱ्या लोकशाही वळणावर जाईल. तो दिवस लवकर उजाडावा यासाठी...

No comments:

Post a Comment