Pages

Monday, April 5, 2010

एका राजकीय श्रमिकाचे निधन

राजकारण हा अतिशय निष्ठुर व्यवहार आहे. त्यात काहींनी नुसतेच झिजायचे, वाळायचे आणि उपेक्षेचे धनी व्हायचे तर काहींनी त्यांच्या कष्टावर फुलायचे, फळायचे आणि बहराला यायचे असते. राजकारणात आयुष्य काढणाऱ्या बहुसंख्य अभागी कार्यकर्त्यांचा समावेश यातल्या पहिल्या वर्गात तर फार थोडया भाग्यवंतांचा अंतर्भाव दुसऱ्या वर्गात होणारा आहे. त्यांनी राबायचे आणि यांनी वेचायचे. ते खस्त आणि हे मस्त. खरे तर जीवनाची सगळीच क्षेत्रे अशा अन्यायाने ग्रासली आहेत. मात्र राजकारणात होणारा हा अन्याय कमालीचा बटबटीत, जीवघेणा आणि जाळणारा आहे. 'आम्ही जन्मभर सतरंज्याच उचलायच्या काय?' असा केविलवाणा पण संतप्त प्रश्न पुढाऱ्यांसमोर विचारण्याचे धाडस न करणारे अनेक जण तो खासगीत विचारत असतात आणि ते तो सार्वजनिकरीत्या विचारणार नाहीत याची काळजी त्यांच्या श्रमावर उभे झालेले पुढारी घेत असतात. सैनिकांनी मरायचे आणि सेनापतींच्या माथ्यावर विजयाचे तुरे खोचले जायचे ही जुनी तऱ्हा आजच्या लोकशाहीतही तशीच राहिली आहे.
'त्यांच्या आजच्या सन्मानात तुम्ही कालवर केलेल्या परिश्रमांची पावती आहे' असे एखादे दिलासावजा दिखाऊ वाक्य त्या उपेक्षितांच्या अंगावर भिरकावले की आज यशस्वी झालेले समाधान मानणार आणि तेवढयाशा फुंकरीनेही ते बिचारे शांत होणार... ऍड. त्र्यंबक बालाजीपंत उपाख्य दादासाहेब देशकर या आजन्म कार्यकर्ता राहिलेल्या राजकीय श्रमिकाने आरंभी संघ-जनसंघासाठी, पुढे जनता पक्षासाठी आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षासाठी केलेले परिश्रम व त्या परिश्रमावर बहरलेल्या सगळयाच पुढाऱ्यांनी त्यांची त्यांच्या अखेरच्या दिवसांत केलेली उपेक्षा ज्यांनी पाहिली त्यांना राजकारणाच्या या निष्ठुर कार्यशैलीची चांगली ओळख पटावी. मागची माणसे पुढे जावी, पुढे जाऊन मोठी व्हावी आणि मग त्या पुढे गेलेल्यांनी मागे वळून त्यांना मोठे करणाऱ्यांकडे पाहूही नये हे संचित कमालीचे वेदनादायी आहे. चंद्रपुरात परवा अशाच एकाकी अवस्थेत निधन पावलेल्या दादा देशकरांच्या वाटयाला असे संचित यावे ही त्यांना आरंभापासून ओळखणाऱ्या सगळयांनाच कमालीचा चटका लावून गेलेली बाब आहे. आपली उपेक्षा दादांना दिसत होती. तिचा दाह त्यांना जाणवत होता. पण आयुष्यभर जपलेल्या निष्ठा तिची वाच्यता करू देत नव्हत्या.
दादा देशकर हे चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर साऱ्या विदर्भातील एक नामांकित फौजदारी वकील होते. जुन्या पिढीतील ज्येष्ठ नेते व लोकमान्यांचे सहकारी लोकाग्रणी बाबासाहेब उपाख्य बळवंतराव देशमुख यांची शागिर्दी पत्करून त्यांनी न्याय क्षेत्रात प्रवेश केला. फौजदारी कायद्यातील सगळया खाचाखोचा, उलट तपासणीला लागणारे कौशल्य आणि न्यायालयीन व्यवहारात यशस्वी होण्यासाठी लागणारा आत्मविश्वास या गोष्टी त्यांनी ऐन तारुण्यातच आत्मसात केल्या. या व्यवसायाच्या बळावर आपल्या चाहत्यांचा एक मोठा वर्ग उभा करणे, त्याला पक्षात आणून पक्षाची संघटना वाढविणे आणि तिच्या बळावर पक्षाला निवडणुकीतील विजयाच्या उंबरठयापर्यंत नेऊन पोहचविणे हे राजकीय मशागतीचे काम त्यांनी कमालीच्या निरपेक्ष बुध्दीने गेली 60 वर्षे केले. पराभव समोर दिसत असतानाही केवळ पक्षाची आज्ञा म्हणून विधानसभेच्या निवडणुकी लढविल्या. त्यात ओळीने तीन पराभव वाटयाला आले तरी नाउमेद न होता आपले काम जुन्याच जिद्दीने चालू ठेवले. लोकसभेची निवडणूक लढून तीतही आपला पराभव करून घेतला. 'दादा पडायला उभे राहतात' असे सगळे म्हणत असतानाच ते चंद्रपूरसारख्या महत्त्वाच्या शहराचे नगराध्यक्ष झाले. तेही त्यांच्या पक्षाचे सभागृहात ते एकटेच सभासद असताना. माणसे जोडायची, ती जुळून राहतील यासाठी पडेल ती कामे करायची, त्यांच्या बऱ्यावाईटात त्यांना साथ द्यायची आणि हे सारे केवळ पक्षाच्या वाढीसाठी करीत राहायचे. एक-दोन नव्हे, चांगली सहा दशके दादा असेच राबले. त्यातून त्यांचा पक्ष वाढला, त्याचे सदस्य विधानसभेवर आणि लोकसभेवर निवडून गेले. त्या साऱ्यांच्या पदरात दादांनी लावलेल्या वृक्षांची फळे पडू लागली. मात्र ती फळे ज्यांच्या हाती आली त्यांनी त्या बागेच्या माळयाकडे फारसे लक्ष दिल्याचे कधी दिसले नाही आणि तो तसाच खपत राहील असा विश्वासही त्यांनी वर बाळगला.
कधी बसने, कधी मोटारसायकलवर तर कधी त्यांच्याजवळ उशिरा आलेल्या एका जुनाट मोटारीतून दादा दिवसरात्र गावोगाव हिंडत असायचे. त्यासाठी आपल्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करायचे. अशिलांचा रोष ओढवून घ्यायचे. चंद्रपूर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे कार्यक्षेत्र. त्यातही मूल-सावली हे त्यांचे विधानसभा क्षेत्र. तेथील काँग्रेसची संघटना बळकट. पुढे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आलेले व खासदार बनलेले अब्दुल शफी यांचेही क्षेत्र हेच आणि त्या जिल्ह्याचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले माजी मंत्री वामनराव गड्डमवार या दमदार पुढाऱ्याचे कार्यक्षेत्रही तेच. दादांनी काँग्रेसच्या याच बालेकिल्ल्यात सुरुंग पेरण्याचे काम केले. जात सोबतीला नाही, पक्षाची संघटना अस्तित्वात नाही आणि संघाचा फारसा रंगही कुणाला ठाऊक नाही अशा क्षेत्रात सतत 30 वर्षे खपून त्यांनी त्यात आपला पक्ष रुजविला, वाढविला आणि त्याची भक्कम पायाभरणीही केली. तेव्हाचे त्यांचे परिश्रम व त्याला आता आलेले यशाचे फळ ज्यांना पाहता आले ते सारे 'दादांनी शून्यातून विश्व उभे केले' असाच त्याविषयीचा निर्वाळा देतील.
हे करीत असताना, त्या भागातील आदिवासींचे लोकप्रिय नेते राजे विश्वेश्वरराव व दलितांचे नेते बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांचा लोभही दादांना संपादन करता आला. आमचा रोष त्यांच्या पक्षावर असला तरी त्यांच्यावर नाही असे गौरवोद्गार हे नेते त्यांच्याविषयी काढत. या दीर्घकालीन झुंजीत दादांनी पराजय पाहिले पण त्यांना लाचार वा शरणागत झालेले कधी कोणी पाहिले नाही. त्यांच्या मुद्रेवर अपराजित स्मिताची एक झाक नेहमी असायची. ती ओसरल्याचे वा मलूल झाल्याचेही कधी कुणाला दिसले नाही. राजकारणात पराभव वाटयाला आले तसे खाजगी जीवनात दुःखाचे आघात झाले. मात्र त्यांचा आत्मविश्वास आणि हास्य कधी मावळले नाही की त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले करारी पौरुष कधी ढळले नाही.
दादा विनोदी बोलायचे. राजकारणात राहिलेल्या दादांचा विनोद बरेचदा 'चावटय' घेऊन यायचा. त्यांची भाषणे तशा विनोदांनी बराच खळाळ उभा करायची. सभ्य माणसांनी नाके मुरडली तरी दादांचा ग्रामीण माणूस त्यावर फिदा असायचा. दादांनी कादंबऱ्या लिहिल्या. त्याही चांगल्या डझनभर. त्या बहुतेक त्यांच्या अनुभवाला आलेल्या कथाविश्वावर बेतलेल्या होत्या. त्यांनी हाती घेतलेले न्यायालयीन कज्जे, त्यांचा तपास, त्यातली माणसांची परवड, स्त्रियांची हलाखी आणि समाज व सरकार यांनी 'आरोपी' ठरविलेल्या एका वेगळया जमातीची दुःखे त्यात रंगविली असायची. त्यांच्या वाचकांचा एक वर्गही तयार होता.
दादा असे बहुआयामी होते. मात्र त्यांचे खरे लक्ष राजकारणावर केंद्रित होते. आपला पक्ष आणि विचार यांची वाढ हा त्यांच्या काळजीचा, विचाराचा व परिश्रमाचा विषय होता. त्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांच्या त्या धडपडीचे साक्षीदार अनेक आहेत. नंतरच्या काळात त्यांच्या वाटयाला आलेल्या परवडीचे पक्षकारही फार आहेत. दादांनी राजकारणाला काय दिले आणि राजकारणाने त्यांना काय दिले याचा हिशेब व्यस्त ठरेल असा आहे आणि करणाऱ्याला तो दुःखी करणाराही आहे.

No comments:

Post a Comment