आपले राजकारण नको तेवढे सत्तातुर आणि उतावळे आहे. सत्तेवर असलेल्यांना खाली खेचण्याची वा खाली पाहायला लावण्याची कोणतीही संधी सोडायला ते तयार नाही. मग अशी संधी विश्वसनीय असो वा नसो, ती सत्ताधाऱ्यांभोवती गळफास आवळणारी असो वा आपल्याच अंगलट येणारी असो... विकिलिक्स या वादग्रस्त माहिती यंत्रणेने केलेल्या एका तथाकथित गौप्यस्फोटाचा आधार घेऊन डॉ. मनमोहनसिंग सरकारचा सरळ राजीनामा मागायला निघालेल्या भारतीय जनता पक्षाने दाखविलेली अशी उताविळी आता त्याच्याच अंगाशी आली आहे. अमेरिकेशी केलेल्या अणुकराराखातर 2009 मध्ये सरकारने लोकसभेत मांडलेला विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यासाठी अमेरिकेने कोटयवधी रुपयांची खैरात करण्याची तयारी केली होती असा हा गौप्यस्फोट आहे. त्यासाठी सतीश शर्मा यांच्यामार्फत साठ कोटी रुपयांची रक्कम तयार ठेवण्यात आली असे त्यात म्हटले आहे. कोणत्याही फुटकळ कारणासाठी सरकारचा राजीनामा मागायला सज्ज असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला, पंतप्रधानांचा राजीनामा (गेल्या सात वर्षांत बहुधा शंभराव्यांदा) मागायला हा गौप्यस्फोट पुरेसा वाटला आहे. अडवाणींपासून जेटलींपर्यंत आणि सुषमाबाईंपासून शेषाद्री चारीपर्यंतचे सगळे पट्टीचे राजीनामा मागणारे त्यानिमित्ताने पुढे झालेले देशाने पाहिले. काँग्रेस व अमेरिका यांच्या विरोधात जाऊ शकणारे फुटकळही कारण आपल्या राजकारणासाठी पुरेसे आहे असे वाटणारे डावे पक्षही भाजपाने सुरू केलेल्या राजीनाम्याच्या त्या समूहगानात सामील झालेले दिसले.
'सरकारी सेंसॉरशिपविरुध्द माहितीच्या खुल्या अधिकाराचा आग्रह धरणारी व त्यासाठी कोणत्याही टोकापर्यंत जाण्याचे कष्ट घेण्याची आपली तयारी असल्याचे' सांगणारी विकिलिक्स ही माहिती यंत्रणा आजपर्यंत अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, युरोपातील लोकशाही देश आणि आफ्रो-आशियायी लोकशाह्या यांच्यावरच हल्ले चढविताना दिसली आहे. 2006 मध्ये जूलियन असान्जे या ऑस्ट्रेलियन तरुणाने इतरांच्या संगणकातील माहिती 'चोरून' मिळविण्यासाठी व ती जगाला सांगण्यासाठी या विकिलिक्सची सुरुवात केली. त्याने मिळविलेल्या अशा सनसनाटी व 'गुप्त' माहितीच्या बळावर आपले राजकारण आणि वृत्तकारण बळकट करता येते हे लक्षात आलेल्या युरोप व अमेरिकेतील काही पुढाऱ्यांनी व वृत्तपत्रांनी त्याचे सहकार्य घेऊन त्याला बळही मिळवून दिले. अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तानातील छळछावण्यांमध्ये केलेले अपराध, केनियात घडवून आणलेले मृत्युकांड आणि तशाच तऱ्हेच्या अमेरिकाविरोधी गोष्टींना विकिलिक्सने उजेडात आणले तेव्हा जगभरातील व्यवस्था विरोधी प्रवाहांना आणि डाव्या विचाराच्या पक्ष संघटनांना ती यंत्रणा आपली मित्रही वाटू लागली. अमेरिकेविरुध्द जराही काही प्रकाशित झाले तरी त्यामुळे ज्यांची मने आनंदून जातात अशी 'विचारवंत' माणसे आपल्यातही फार आहेत. विकिलिक्सवाल्यांनी मनमोहनसिंगांचे सरकार वाचवायला अमेरिकेने काही कोटी खर्च करण्याची तयारी केली होती हे सांगताच या साऱ्यांना हर्षाच्या उकळया फुटणे त्यामुळे स्वाभाविकही होते.
मात्र त्या बातमीचा आधार घेऊन मनमोहनसिंगांचा राजीनामा मागायला निघालेल्या या मंडळीला आपल्या उत्साहाच्या भरात त्या बातमीवाल्यांच्या भात्यात आणखीही बाण असतील आणि ते पुढे आपल्यावरही सोडले जातील याची कल्पना नव्हती. 'विश्वासदर्शक मत जिंकण्यासाठी आमच्या पक्षातील तीन सभासदांना प्रत्येकी एकेक कोटी देऊन फितविण्याचा प्रयत्न मनमोहनसिंग सरकारने तेव्हा केला' असे म्हणणारे आणि त्या नोटांची बंडले सभागृहात आणणारे चेहरे ज्यांना अजून आठवतात त्यांना विकिलिक्सच्या या स्फोटामुळे या मंडळीचे भान केवढे हरपले असेल हे सहज कळू शकते. या माणसांनी त्यांच्या नित्याच्या सवयीप्रमाणे संसदेत गदारोळ करून तिचे काम बंद पाडले आणि पंतप्रधानांनी विकिलिक्ससंबंधीची त्यांची भूमिका प्रांजळपणे स्पष्ट केल्यानंतरही त्यांना आपल्या छब्या दूरचित्रवाहिन्यांवर मिरविल्यावाचून राहवले नाही.
आता मात्र साराच डाव उलटला आहे. मनमोहनसिंग सरकारसाठी अमेरिकेने पैसे द्यायची तयारी केली होती असे म्हणणारे विकिलिक्स 'भारतीय जनता पक्ष आपले ध्येयधोरणच अमेरिकेच्या तालासुरावर आणि त्याच्या संमती-सहमतीने ठरवितो' असे आपल्या ताज्या गौप्यस्फोटात सांगत समोर आले आहे. 'अमेरिकेशी केलेल्या अणुकरारावर आम्ही जाहीरपणे कठोर टीका करीत असलो तरी आमच्या टीकेकडे फारशा गांभीर्याने पाहू नका. अमेरिकेवर केलेली टीका भारतीय मतदारांना आवडते म्हणून आम्ही ती करतो. शिवाय ती टीका सरकारची कोंडी करणारी असल्यामुळे विरोधक म्हणून ती आमचे बळही वाढवीत असते. उद्या आम्ही सत्तेवर आलो तर हा करार आमच्याकडून रद्द होणार नाही याची खात्री असू द्या. आम्ही तुमच्याकडे मित्र म्हणूनच पाहतो' असे आश्वासनच भाजपच्या आणि संघाच्या पुढाऱ्यांनी अमेरिकेला दिल्याचे व 2005 पासून 2010 पर्यंत तसे पुन्हा पुन्हा शपथेवर सांगितल्याचे या विकिलिक्सचे म्हणणे आहे. देशाच्या सार्वभौमत्वाएवढाच स्वदेशीचा बडीवार मिरविणारा हा पक्ष आपली ध्येयधोरणे कोणाच्या दडपणाखाली व कशी ठरवितो यावरच या गौप्यस्फोटाने प्रकाश टाकला आहे. झालेच तर खरे अमेरिका व विदेशधार्जिणे कोण हेही त्याने स्पष्ट केले आहे.
मनमोहनसिंग सरकारवर अमेरिकाधार्जिणेपणाचा आरोप करणारे अडवाणी, सुषमा, जेटली आणि त्यांचा पक्ष हे सारेच केवढे अमेरिकाधार्जिणे आहे आणि आपले तसे धार्जिणेपण विरोधी बाकावर असतानाही ते कसे जपत आहेत हे सांगणारा हा ढळढळीत पुरावा आहे. विकिलिक्सचा हा गौप्यस्फोट खोटा वा बनावट असल्याचे सांगण्याचे धारिष्टय, त्याच्या जुन्या गौप्यस्फोटाचा आधार आपल्या सरकारविरोधी राजकारणासाठी घेतल्यामुळे या पुढाऱ्यांना व त्यांच्या पक्षाला जमलेही नाही.... विकिलिक्स ही यंत्रणा विश्वसनीय नाही, ती जगभरच्या सगळया व्यवस्थांवर आलेले संकट आहे ही गोष्ट पाश्चात्त्य नेते व लोकशाही व्यवस्थांचा आग्रह धरणारे लोक वारंवार सांगत आले आहेत. जूलियन असान्जे याला लैंगिक गुन्हेगारीच्या कारणासाठी इंग्लंडने एकदा हद्दपारही केले आहे... मात्र राजकारणात कशाचाही आधार घेण्याच्या बोकाळलेल्या प्रवृत्तीमुळे भाजपाने या असान्जेचा आधार घेतला आणि एक जास्तीचा अनिष्ट पायंडा पाडला.
No comments:
Post a Comment